Wednesday, July 29, 2026

कावळा: भाग ३ — नेहमीच्या आजी

सांगोवांगीच्या गोष्टींवर अवलंबून न राहता स्वतःच्या अनुभव मांडणारी "कावळा" या विषयावरची एक छोटेखानी लेखमालिका (कावळा: भाग १कावळा: भाग २)

---------------------

याला मी गंमतीने आजी म्हणतो. आमची काकूआजी २०२३ साली गेली आणि तेव्हापासून हा यायला लागला त्यामुळे. अर्थात कावळा आहे की कावळी आहे कळायला मार्ग नाही.


याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो जिथे खाण्याचं स्टीलचं छोटं भांडं बाल्कनीच्या रेलिंगला अडकवलेलं असतं तिथे येऊन काव काव करत नाही. तो खिडकीपाशीच येतो, तिथे बसतो, आणि मग आत बघत पुकारा चालू करतो. मग मी भांड्यात भात "वाढायचा," मग या आजी तिथे येऊन खाणार. आणि खाताना बघायचं नाही, नाहीतर आजी उडून जाणार. 


तळटीपः कावळ्यात आत्मा नसतो माहित आहे, मी फक्त गंमतीने आजी म्हणतो.


© मंदार दिलीप जोशी
गुरुपौर्णिमा, शके १९४८

Tuesday, July 28, 2026

कावळा: भाग २

सांगोवांगीच्या गोष्टींवर अवलंबून न राहता स्वतःच्या अनुभव मांडणारी "कावळा" या विषयावरची एक छोटेखानी लेखमालिका. (कावळा: भाग १भाग ३ - नेहमीच्या आजी)

---------------------

ओंकारेश्वरला एका दहाव्याला गेलो होतो तिथे आधी एक कुटूंब पिंडाला कावळा शिवण्याची वाट बघत होतं. आता ते पिंड असं असतं की खाली अगदी छोटी गव्हाची पोळी ते पिंड राहील इतपतच आकाराची असते आणि त्यावर पिंड ठेवलेलं असतं (पिंड घरंगळत पडू नये आणि एखाद्या स्टँडवर ठेवावं तशी स्थिरता यावी म्हणून). तसं त्या आधी आलेल्या कुटुंबाने त्यांचं पिंड तिथे एका चौथर्‍यावर ठेवलेलं होतं. काही वेळाने एक कावळा आला आणि त्या पिंडाखालची फक्त पोळी घेऊन गेला. मग काही वेळाने दुसरा कावळा आला आणि त्या पिंडाला म्हणजे भाताला शिवला. 

हे असं का नाही माहित. हा शंभर टक्के योगायोग असू शकतो. काही लोक म्हणतील काही कावळ्यांना पोळी आवडते, काहींना भात. काहींना दोन्ही चालतं. कावळ्यांचाही मूड असेल, कधी पोळी कधी भात. 

मला मात्र हे विलक्षण वाटलं की एका कावळ्याने वरचा सहज खाता येईल असा भात सोडून खालची पोळी खेचून घेण्याचे कष्ट का घ्यावेत आणि मी ज्या दहाव्यासाठी गेलो होतो त्या पिंडाला शिवायला कावळा आला त्याने थेट पिंडालाच का चोच लावली असेल या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत.











© मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. चतुर्दशी, शके १९४८


कावळा: भाग १

सांगोवांगीच्या गोष्टींवर अवलंबून न राहता स्वतःच्या अनुभव मांडणारी "कावळा" या विषयावरची एक छोटेखानी लेखमालिका. (कावळा: भाग २कावळा: भाग ३ - नेहमीच्या आजी)