Monday, October 5, 2026

लोकसत्तेतला संभाव्य अग्रलेख: हातात कायदा नको, मनात विवेक हवा!

फ्लायदुबई विमानातील दुर्दैवी घटना ही अत्यंत चिंताजनक, खेदजनक, आणि मानवी विवेकबुद्धीला आव्हान देणारी आहे.

अहिंसा ही केवळ बोलण्यापुरती गोष्ट नसून, ती आचरणात आणण्याची गोष्ट आहे. हिंसेला हिंसेने उत्तर दिले, तर संघर्ष संपत नाही, तर त्याचे पर्यवसान निव्वळ संघर्ष अधिक भडकण्यात होते. हिंसेचा प्रतिकार करायचा असेल, तर हातात शस्त्र नव्हे, तर संयम आणि विवेक हवा. समोरच्याने माणुसकी सोडली म्हणून आपणही माणुसकी सोडणे, हा हिंसेवरचा विजय नव्हे तर तो आपला नैतिक पराभव ठरतो. अहिंसा म्हणजे दुर्बलतेचे लक्षण नव्हे तर हिंसेला हिंसेशिवाय थोपवण्याचे तेच खरा मार्ग आहे. 

त्यामुळे कॅप्टन स्मित यांनी "अरे"ला "कारे" करत कायदा हातात घेणे हे सर्वथा अनुचित होते. कायदा हा अशा प्रकारे हाताळण्याची वस्तू नसून, तो राज्यसंस्थेच्या विधिसंमत यंत्रणेकडे सोपविण्याचा विषय आहे. म्हणूनच स्मित यांनी स्वतः हस्तक्षेप न करता तत्काळ पोलिसांना दूरध्वनी करणे अपेक्षित होते.

परंतु यानंतरचा घटनाक्रम तर अधिकच भयंकर आहे. कप्तान स्मित यांनी वैमानिक कक्षाचे (कॉकपिट) द्वार उघडले आणि तसे करून विमानाला व मानवतेला भयंकराच्या दाराशी नेऊन ठेवले असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. द्वार उघडल्यावर विमानातील कर्मचारीवर्ग आणि प्रवाशांनी मिळून हल्ला करणाऱ्यास दाबून ठेवले. म्हणजे एका व्यक्तीने कायदा हातात घेतला म्हणून आक्षेप; आणि त्यानंतर अनेकांनी मिळून एका व्यक्तीला दाबून ठेवले, तरी त्यास कायद्याच्या चौकटीतील कृती मानायचे? तरी इस्रारल आणि भारतात बहुसंख्यवादाची (majoritarianism) चलती असल्याने ही झुंडशाही त्यांना शोभते हे ही खरेच. कारण ज्या तत्परतेने प्रधानसेवकांनी कप्तान साहेबांशी दूरध्वनीवरून संभाषण केलं आणि तेवढ्यात हनुमान चालीसाची जाहिरात करून घेतली त्यावरून बहुसंख्यवाद हेच या सरकारचे व त्यासारखी विचारसरणी धारण करणाऱ्यांचे अधिकृत धोरण आहे हे स्पष्ट होते.

अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी संपूर्ण ताकदीनिशी सर्वसामान्य जनांवर प्रभाव टाकू पाहणाऱ्या या छुप्या हिंसात्मक प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो.

वास्तविक, कायद्याचे राज्य म्हणजे कायदा हातात घेणे नव्हे तर कायद्याची अंमलबजावणी ही व्यवस्थेच्या हाती सोपविणे होय. संकट कितीही गंभीर असो, अहिंसा, संयम आणि विधिसंमत मार्ग यांचा त्याग होता कामा नये.

तसेच, या घटनेचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच तिचे जातीय, धार्मिक आणि राजकीय अर्थ लावून प्रचाराचे पीक काढण्यास सुरुवात झाली आहे. इस्रायलने याला कट्टर इस्लामी विचारसरणीशी जोडण्याचा प्रयत्न केला आणि भारतातही काही हिंदुत्ववादी मंडळींनी त्यास आपल्या नेहमीच्या प्रचारात याचा उपयोग करून घेतला. विमानात त्या वेळी पेशाने विमान चालवता येणारी व्यक्ती हजर असणे हा विलक्षण व सोयीचा योगायोग असला तरी या पार्श्वभूमीवर इस्रायलमधल्या सार्वत्रिक तसेच उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक जवळच असणे हा ही एक योगायोग निश्चितपणे मानता येत नाही.

तपास सुरू आहे, असे मानले तरी प्रमुख तपासयंत्रणा इस्रायलची असण्याची शक्यता असल्याने निष्कर्ष काय निघेल हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही. हल्लेखोर मुस्लिम असल्याने त्याला लहानपणापासूनच शालेय जीवनात, नोकरीत, व समाजात भेदभावाचा सामना करावा लागला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित त्या भेदभावातूनच त्याच्या मनात असंतोष निर्माण झाला असावा आणि त्याचेच हे उद्रेकात्मक प्रतिबिंब असावे, ही मानसिकता दुर्लक्षित करून चालणार नाही. अर्थात, या सर्व अनुमानांना कोणताही प्रत्यक्ष पुरावा नसला तरी नेतन्याहूप्रणित झायोनिझमने ग्रस्त ज्यू समाजाची वृत्ती आणि इकडच्या उजव्या अतीराष्ट्रवादी अर्थात जिंगोइस्टिक हिंदुत्ववादी शक्तींचा इतिहास लक्षात घेतला तर अशा शक्यता या इतर मवाळ निष्कर्षांपेक्षा सत्याच्या अधिक जवळ जाणाऱ्या आहेत असे मानायला जागा आहे. 

या घटनेकडे पाहताना कॅप्टन स्मित यांच्या ब्राह्मण असण्याचा अनावश्यक उदोउदो करणे अथवा हल्लेखोर मुस्लिम असल्याच्या बाबीला अवाजवी महत्त्व देणे, हे दोन्हीही अनुचित आहे. कप्तान साहेब जे ब्राह्मणेतर असते, तर भारतातील ब्राह्मण्यवादी प्रवृत्तींनी काय कांगावा केला असता हे इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी वैमानिकावर झालेल्या अन्यायाने केवळ अधोरेखित होत नाही तर भविष्यात काय काळजी घ्यावी लागेल याकडे अंगुलीनिर्देशही करते. अतिशय कडक कायदे असताना असे होत असेल तर कायदा रद्द झाला तर काय होईल याची कल्पनाही करवत नाही. पण हे विषयांतर झाले, ते टाळले पाहिजे. मुद्दा हा आहे की व्यक्तीची जात किंवा धर्म हा या घटनेच्या नैतिक मूल्यमापनाचा आधार नसावा, तसेच या बाबी एखाद्या व्यक्तीच्या परिस्थितीनुसार वर्तणुकीच्या सामान्यीकरण करण्यास वापर होऊ नये. येथे प्रश्न इतकाच आहे की हिंसेला हिंसेने प्रत्युत्तर देणे योग्य की अयोग्य, कायदा हातात घेणे योग्य की कायद्याच्या यंत्रणेकडे प्रकरण सोपविणे योग्य. जातीय वा धार्मिक चष्म्यातून या घटनेकडे पाहिल्यास मूळ मुद्दा—अहिंसा, संयम आणि विधिसंमत आचरण—दुय्यम ठरतो. यातून आणखी एक प्रश्न निर्माण होतो तो असा की विद्यमान प्रस्थापितांना हल्लेखोराचा याकूब मेमन करायचा आहे काय?

विमान सुरक्षितपणे भूमीवर उतरावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत; पण त्यासाठी कायदा हातात घेण्याची वेळ येऊ नये—आणि आलीच, तर स्वतः हातात न घेता तातडीने व्यवस्थेशी संपर्क करावा, हेच खरे गांधीवादी तत्त्वज्ञान! 

हेच तत्वज्ञान आपल्याला सद्य राजकीय पटलावर मुहब्बत की दुकान मांडून प्रेम आणि अहिंसा वाटू पाहणाऱ्या राहुल गांधींमध्ये दिसते किंबहुना ते गांधीवादाचे जिवंत उदाहरण आहेत. ते प्रधानसेवकांहून वयाने लहान असले तरी सर्वसमावेशकतेची टर्री मिरवणाऱ्या मोदींनी व त्यांचे डिअर फ्रेंड असणाऱ्या नेतन्याहू यांनी या गोष्टी त्यांच्याकडून अवश्य शिकाव्या अशी सूचना त्यांना करून या विषयावरचे आमचे भाष्य हे अरण्यरुदन ठरू नये असा आशावाद व्यक्त करून थांबवतो.

― संपादक गिरीश कुबेर 

🖋️ मंदार दिलीप जोशी