Friday, February 5, 2016

टवाळा आवडे विनोद

आज हापिसात एक सॉलिड जोक झाला. जेवणाच्या सुट्टीनंतर मी घातलेला घट्ट स्वेटर काढायचा प्रयत्न करत होतो...तेव्हा


एक भोचक कलीगः अय्या मंदार, तू नक्की काय करतो आहेस? स्वेटरमधे घुसण्याचा प्रयत्न करतो आहेस की त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न? हँ हँ हँ हँ हँ हँ

मी: तू इकडे बघू नको. असं कपडे काढताना बघू नये कुणाकडे.

बाकीचे:  हँ हँ हँ हँ हँ हँ.


--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
 पौष कृ. १२, शके १९३७
--------------------------------------------------

Tuesday, February 2, 2016

मला पडलेलं स्वप्न

मला सर्वसाधारणपणे स्वप्नं पडत नाहीत.

म्हणजे अजाबातच नाहीत. रात्री एकदा का डोळा लागला की थेट गजर वाजला की किंवा आपोआप जाग आली की डोळे उघडतात. तसं पडतं एखादं स्वप्न क्वचित पण पु.ल. म्हणतात तसं पेटंट स्वप्न म्हणजे दुसर्‍या दिवशी तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा अकाउंट्स पार्ट १ हा किंवा गणिताचा पेपर आहे आणि आपल्याला शष्प येतंय. तेव्हाही आपल्याला शाळा कॉलेज संपून अनेक वर्ष झालेली असूनही आपण अजून पेपर का देतोय हे स्वप्नातून जागं होता होता लक्षात येतं. एक वेगळ्या प्रकारचं स्वप्न म्हणजे जिन्यावरुन किंवा कुठूनतरी उतरताना पाय घसरला आणि पाय झटकतच जाग आली. हे ही फार क्वचितच.

काल पडलेल्या स्वप्नाने मात्र त्या वेळी जाम तंतरली होती. कारण एक क्षण मला वाटलं की मी झोपेतच खपलोय.

तर....स्वप्नं असं की मी मेलोय (हितशत्रूंनी त्यांना फुटलेल्या आनंदाच्या उकळ्या दाबाव्यात. मी इतक्यात जात नाही. समद्यास्नी पोचवून मंगशान खपणार हाय) आणि भूत झालोय (जेव्हा केव्हा मरेन तेव्हा हे मात्र होणारे आणि समस्त दुश्मनांच्या बोडक्यावर बसणारे. संबंधितांनी प्लीज नोंद घ्यावी. नंतर कंप्लेन चालनार नाय ;). आणि बाकीच्यांनाही येऊन भेटणार आहे. खांद्यावर किंवा मांडीवर टॅप केल्यासारखं वाटलं की समजेलच ब्वाहाहाहाहाहा).

तर, स्वप्नात मी मेलोय हे असं समजलं की मी आपल्याच घरात वावरतो आहे आणि कुणाला मी तिथे आहे हे समजत नाही आहे. घरात त्या वेळी दोन व्यक्ती आहेत. एक माझी आई आणि आणखी एक माझ्याच वयाचा माणूस जे सोफ्यावर बसून एकमेकांशी बोलत आहेत. यातही गंमत अशी की स्वप्नात ते घर माझं असलं तरी मला अजिबात परिचित नाही, सद्ध्याचं किंवा आधी राहिलो त्यांपैकी कुठलंच घर ते नाही. स्वप्नातली माझी आई ही माझी आई नाहीच, दुसरीच कुणीतरी आहे पण त्या स्वप्नात मी तिला आई म्हणतो आहे. त्या माणसालाही मी ओळखत नाही. संपूर्ण स्वप्नात या दोघांचेही चेहरे मला नीट दिसलेले नाहीत.

तो दुसरा माणूस आहे त्याच्या मांडीवर लक्ष वेधून घ्यायला हाताने टक् टक् केलं तर सिनेमात दाखवतात तसा माझा हात अख्खाच्या अख्खा आरपार गेला. पण ती आई होती तिच्या मांडीवर टॅप केल्यावर मात्र तसं झालं नाही. तिने चक्क माझ्याकडे बघितलं पण नक्की कसं बघितलं ते आठवत नाही. इतकं झाल्यावर स्वप्नातच विचार केला की अनायसे भूत झालोच आहोत तर घर पाहून घ्यावं. इथेच राहू आवडल्यास!

पण फिरायला सुरवात केल्यावर अचानक घाबरून जाग आली. कुशीत पोराला घेऊन झोपलो होतो.  क्षणभर जाम तंतरली. मला वाटलं मी खरंच भूत आहे आणि पृथ्वीतलावरच्या हयात कुटुंबियांविषयीची आसक्ती न संपल्याने चिरंजीवांना कुशीत घेऊन झोपलो आहे.

मग जिवंत असल्याची खूण म्हणून मोबाईल ऑन केला आणि व्हॉट्सअ‍ॅप चालू केलं तेव्हा मी जिवंत असल्याची खूप पटली. ;)

आता मी स्वप्नांना फारसं महत्व देत नाही. ते काही भूत-भविष्य वगैरे सांगतात यावरही फारसा विश्वास नाही. मात्र या स्वप्नाचा अर्थ काय हा प्रश्न फार डोकं खातो आहे सकाळपासून. बायको म्हणाली स्वप्नात मरण दिसणं याचा अर्थ तुम्ही दीर्घायू होणार. तरी यावर जाणकारांनी काही प्रकाश पाडल्यास उपकृत होईन.

--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
पौष कृ. १०, शके १९३७
--------------------------------------------------