Friday, April 1, 2022

खर्रा इतिहास: अकबरानेच लावला होता एक एप्रिलचा शोध, कहाणी ऐकून व्हाल थक्क

 म. ज. अकबर सर तरुण असताना एकदा बागेत फिरायला गेले. फिरत असताना त्यांना एक युवती त्यांच्या दृष्टोतपत्तीस पडली. तिच्या सौंदर्याने ते मोहित झाले आणि येऊन बादशहा जिल्लेइलाही हुमायूं यांना म्हणाले की हिला उचलू का? 

बादशहा जिल्लेइलाही जहांगीर यांनी लहानग्या जलालुद्दीनला समजावले की बाळा आधी प्रेमाने मागणी घालून पाहू, नाहीच ऐकलं तर उचलायची तयारी आहेच! मग मुघल बादशहांच्या शेहजाद्यांना शोभेल असे एक शिष्टमंडळ तयार करण्यात आले आणि जडजवाहीर, पैसे वगैरे घेऊन मुलीकडे पोहोचले. मुलीला ही सोयरिक मान्य नव्हती पण तिच्या भावाने म्हटलं तू आत्ता राडे करु नको आपण आधी मिळतंय ते पदरात पाडून घेऊ बाकी मी बघतो. "हमारी एक अट हय!" भाऊ शिष्टमंडळाच्या प्रमुखाला म्हणाला. आता हा ऐन वेळी नको म्हणाला तर काय करायचं या विचाराने शिष्टमंडळातल्या जेष्ठ दाढीच्या हृदयाचा ठोका चुकला. बादशहा याचं जे काही करायचं ते करतील पण आधी आपलीच पाळी यायची. तो म्हणाला "ते प्री-वेडिंग शूट वगैरे काही होणार नाही. जे काही शूटींग करायचं ते निकाह नंतर शहजाद्याला करु दे. आधी काही जमायचं नाही." 



"अश्लील! अश्लील!!" शिष्टमंडळात गदारोळ झाला. "अरे क्या हुआ, उसमें क्या अश्लील हय? मैने बोला वो कॅमेरामन को लेकर झाड को लटकनेका प्री-वेडिंग करते हैं ना वो नहीं करनेका. थेट शादी में मिलेंगे". आता कुठे जेष्ठ दाढीचे फुदकणारे हृदय जागेवर बसले. मुलीच्या भावाने घातलेली अट अगदीच सौम्य होती. 

होता होता निकाहचा दिवस उजाडला. इकडे शहजदा जलालुद्दीनला मनातल्या मनात गुदगुला होत होत्या. अखेर पलीकडच्या दालनातून विचारणा करणारा आवाज ऐकू आला, "बेटी क्या तुम्हे शहजादा अकबर वल्द बादशहा जिल्लेइलाही हुमायूं वल्द बादशहा जिल्लेइलाही बाबर से निकाह कबूल है?" याच्या उत्तरादाखल मंजुळ आवाजात "हां, कबूल है" असा आवाज येताच अकबराला भावना आवरेनात. पण निकाह नंतर आम्ही तुम्हाला दख्खनमध्ये फिरायला पाठवू तोवर सबर करा असं बादशहा शहनशहा-ए-आलम जिल्लेइलाही हुमायूं सर म्हणाले. त्या अनुसार दख्खनमध्ये असलेल्या बंगल्यावर दोघांना पाठवण्यात आले. निकाह झाल्यावर मुलाला व नवरीला फिरायला पाठवण्याची कल्पना बादशहा हुमायूं सरांचीच. हुमायूं सरांनी आपल्या बेगमला  खिडकीतून चांद दाखवला होता तेव्हापासून हुमायूं नावाचा हनीमून असा अपभ्रंस झाला. (हे अ‍ॅडिशनल ज्ञान ठेऊन घ्या).

पहिल्याच रात्री घुंघट उचलल्यावर तरुण शहजादा जलालुद्दीन जोरात किंचाळला. समोर जलालुद्दीन ने उद्यानात बघितलेली मुलगी नसून भलतीच कुणीतरी आणा कयूब नावाची वेडसर, मुलगी होती. जलालुद्दीनला गुस्सा आला आणि वेडाच्या भरात "शोधा, शोधा, त्या मुलीला शोधा" असं म्हणाला. पण त्या मुलीचा परिवार तोवर सगळा पैसाअडका घेऊन भारताबाहेर कधीच पसार झाला होता! मग हुमायूं सर म्हणाले, की पदरी पडलं पाक झालं समजून हिला नांदव. आपण सुंदर मुली काय असल्या सत्तावन्न शोधू. शेवटी शहजादा अकबर शांत झाला, पण पुढे बराच काळ तो रात्रीत "शोधा, शोधा" बडबडत असे. म्हणून त्या मुलीचे नाव रंगेबिरंगी इतिहासात "शोधा अकबर" म्हणून प्रसिद्ध झाले.

ज्या दिवशी आपण उल्लू बनल्याचे अकबराच्या लक्षात आले तो दिवस एक एप्रिलचा होता. आपण एकटेच का फूल व्हावे, समस्त हिंदूस्थान आणि जगाने एक दिवस का होईना फूल व्हावे म्हणून एक एप्रिल हा दिवस फूल्स डे म्हणून साजरा करण्याचे शाही फर्मानानुसार जाहीर झाले. 

पण संघी चड्डीवाले हा इतिहास तुम्हाला सांगणार नाहीत. 

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ४२०, ओळ ५

© मंदार दिलीप जोशी