Showing posts with label स्त्रीवाद. Show all posts
Showing posts with label स्त्रीवाद. Show all posts

Thursday, February 25, 2021

स्त्रीवाद अर्थात फेमिनिझम - महिला सशक्तीकरण नव्हे तर पुरुष अशक्तीकरण

हिंदू स्त्रिया आणि पुरुषांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तथाकथित स्त्रीवाद हा हिंदू महिलांच्या सबलीकरणासाठी किंवा सक्षमीकरणासाठी नसून हिंदू पुरुषांचे म्हणजेच त्यांच्या वडील, भाऊ, पती आणि पुत्र असलेल्या पुरुषांचे आणि त्या योगाने संपूर्ण हिंदू समाजाचे अशक्तीकरण करण्याचा डाव्यांचे षडयंत्र आहे.

आज एकच मूल असलेल्या कुटुंबांत (हिंदू हे वेगळं लिहायला नको) एक मुलगी ही वेळप्रसंगी आईचे रूप धारण करु शकणारी कुणाची बहीण उरलेली नाही. मुलांचीही हीच अवस्था आहे; बहिणींचे रक्षण करायला किंवा तिच्याकडे हट्ट करायला आज अनेक घरांत बहिणीच नाहीत. अशी नाती उरलेलीच नसल्यामुळे आजची तरुण पिढी ही या नात्यांसोबत येणारी मजा, अधिकार, आणि जबाबदार्‍यांच्या तसंच त्या नात्यांच्या असण्याने आपसूक मिळणार्‍या शिक्षणापासून आणि सकारात्मक परिणामांच्या कोणत्याही जाणीवांशिवाय मोठी होत आहे. आजच्या पत्नी आणि आई असलेल्या स्त्रियांचा विचार करायचा तर पुरुषांसाठी आज फक्त मातृत्व ही एकच भावना शुद्ध स्वरूपात उरलेली आहे, कारण हल्ली प्रेयसी आणि पत्नीच्या नात्यांबरोबरच प्रेमाचं स्वरूप आज भावनिकदृष्ट्या प्रचंड व्यवहारी आणि कोरडं झालेलं आहे, आणि म्हणूनच वडील नामक व्यक्ती मुलींच्या आयुष्यात त्या नावाच्या अर्थासह असेलच असं नाही. याचं कारण शोधायला गेलं तर आजच्या तरुणींना नवरा आणि वडील या नात्यांना त्यांच्या पूर्णार्थाने अनुभवणं आणि स्वीकारणं हे कमीपणाचं वाटू लागलेलं आहे हे निदर्शनास येतं. 

इंग्रजीत एक म्हण आहे, 'Power corrupts, and absolute power corrupts absolutely' अर्थात सत्तेमुळे भ्रष्ट आचार निर्माण होतो आणि अमर्याद सत्तेमुळे अमर्याद भ्रष्ट आचार निर्माण होतोच. त्याचप्रमाणे आजचा स्त्रीवाद हा स्त्री आणि पुरुषांना कुठल्याही नात्यात एकमेकांना पूरक असण्याऐवजी स्त्रीला कुटुंबात अमर्याद अधिकार दिले गेले आणि त्याचा परिणाम म्हणून आजचे पुरुष स्त्रैण वाटावेत इतके बुळे बनलेले आहेत, किंबहुना बनवलेले गेले आहेत. त्यातही एकच मूल असल्याने त्याला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणं हे ओघाने आलंच. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर आजच्या तरुणांना नर्ड बनवण्याच्या नादात मर्द बनवायचं बाजूला पडलेलं आहे.

आजच्या स्त्रीला मिळालेल्या अमर्याद अधिकार आणि सत्तेमुळे तिला एक प्रकारची मानसिक नशा अनुभवायला मिळत असली, तरी असा कुठलाही अनुभव तिला जीवशास्त्राशी, जनुकीय प्रेरणांशी, आणि पर्यायाने निसर्गाशी उभा दावा मांडण्याची शक्ती देत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी स्त्रैण असलेला मुलगा जेव्हा पुढे जाऊन लग्नाच्या बाजारात उभा राहतो तेव्हा इतर बाबतीत अनुरूप असलेल्या मुलीला त्याला 'पसंत' करणं अवघड होऊन बसतं (लग्नाचा बाजार म्हणजे इथे जेव्हा प्रथम भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटू लागतं तेव्हापासून प्रत्यक्ष विवाह होईपर्यंतचा काळ). कारण कुठल्याही स्त्रीला अशा प्रकारचा स्त्रैण (emasculated) पुरुषाबद्दल प्रेम किंवा आकर्षण वाटणं शक्यच नसतं असा पुरुष आसपास असताना तिला (शारीरिक) सुरक्षितेची भावनाच निर्माण होत नाही. एक स्त्री म्हणून तिची अंतःप्रेरणा तिला काया, वाचा, मने अशाच पुरुषाकडे खेचूण नेते, अशा पुरुषाला शोधते जो तिचं संरक्षण करु शकेल. असा पुरुष तिला हल्ली कुठे मिळतो हे वेगळं सांगायला नको. 

इथे एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे लक्षात घेतली पाहीजे की स्त्रीमुक्तीचा भारतातला अर्थ हा हिंदू पुरुषांपासून स्त्रियांना मुक्त करुन इतरांसाठी त्यांना उपलब्ध करण्याची संधी निर्माण करणे हा आहे. स्त्रीमुक्ती या गोंडस नावाखाली ही एक निव्वळ वामपंथी चळवळ आहे जिने आपल्या देशात फक्त आणि फक्त हिंदूंचेच नुकसान केले आहे, आणि ह्या नुकसानाचा फायदा कोणाला होतो आहे ते ही दिसतच आहे, त्यामुळे डावे हे कोणाची ढाल बनले आहेत हे समजणे सोपे आहे. हे एकदा लक्षात आलं की या मागचं षडयंत्र लक्षात यायला वेळ लागणार नाही. पर्यायाने भारतातली डावी चळवळ ही हिंदूंच्या दृष्टीने विकत घेतलेले गारदी आणि पाळलेले पेंढारी ठरली आहे. 

द फेमिनिस्ट लाय - इट वॉज नेव्हर अबाऊट इक्वॅलिटी (The Feminist Lie - It Was Never About Equality) या आपल्या पुस्तकात बॉब लुईस सप्रमाण सिद्ध करतो की स्त्रीवाद म्हणजेच फेमिनिझम चळवळ ही समानतेबद्दल कधीच नसून उलट स्त्रीयांचा श्रेष्ठतावाद निर्माण करण्याचा उद्देश त्यामागे होता. हा अमेरिकन संदर्भ झाला, पण एक भारतीय म्हणून आपल्याला समानता नवीन नाही. एक सनातन संस्कृती म्हणून आपण अनेक राण्या पाहिल्या आहेत आणि शक्तिरुपेण संस्थिता अशा देवींचा आपलं रक्षण करावं म्हणून नेहमीच धावा केलेला आहे. आपली समस्या समानतेच्या नावाखाली, महिला सशक्तीकरणाच्या नावाखाली होणारे पुरुषांचे अशक्तीकरण, हतवीर्य होणं ही आहे. दुर्दैवाने हे अगदी राजरोस सुरु आहे आणि यावर आपल्याला लवकरात लवकर उपाय शोधावाच लागेल.


बॉब लुईसचे हे पुस्तक अत्यंत वाचनीय असून नेटवर विनामूल्य उपलब्ध आहे. 

आपल्याला इतिहासात अनेक उदाहरणे आहेत ज्यात जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आलेली आहे तेव्हा अनेकदा आपण देवींचा धावा केलेला आहे. महिषासुरमर्दिनी, नरकासुरमर्दिनी या देवीच होत्या. बाईचा सत्तांध बुवा आणि बुवाची अधिकारहीन बाई करणार्‍या स्त्रीवादी असुराचा वध करायलाही स्त्रियांनीच पुढाकार घ्यावा लागेल आणि त्यांना जी शस्त्रे लागतील त्याला पुरुषांना धार काढून द्यावी लागेल. फेमिनिझम हा राक्षसांची ढाल आहे, आणि राक्षसांना संपवायचं असेल तर त्यांची स्त्रीवाद ही ढाल आधी नष्ट करावी लागेल. 

🖊 मंदार दिलीप जोशी
माघ शु. १३, शके १९४२

टीपः ही पोस्ट स्त्रीवाद या विषयाकडे फक्त स्त्री नव्हे तर सर्व बाजूंनी विचार करणार्‍या लोकांसाठी आहे. "म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की...." छाप वक्तव्य करायची असतील तर कृपया पोस्टकडे दुर्लक्ष करावे.

--------------------------------------------------------------------------
संदर्भः English Version
--------------------------------------------------------------------------



Wednesday, October 14, 2020

साम्यवाद अर्थात भंपकपणा: एका मृत्यूलेखाची(!) चिरफाड

सर्वप्रथम मार्क्सवासी झालेल्या मार्क्सवादी कम्युमिस्ट पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्या दातार बाईच्या आत्म्याला (असलाच तर) कम्युनिस्टेश्वर शांती किंवा सद्गती देवो अशी प्रार्थना.

Marxist Communist Party of India leader Usha Datar

ही पोस्ट वाचण्याअगोदर (१) आणि (२) हे दोन लेख वाचा, पार्श्वभूमी समजायला सोपं जाईल; किंवा पोस्ट वाचल्यावर वाचा, तरीही चालेल. या दोन बहिणी आणि त्या दोन बहिणींच्यात साम्य दिसू शकेल. फरक इतकाच, की त्यातल्या एकीला उपरती झाली पण बाटगे जोरात बांग देतात या उक्तीनुसार आयात तत्वज्ञानाने आंधळे झालेल्या एत्तद्देशीय कम्युनिस्टांना आणि फेमिनाझी मंडळींना कधीच होणार नाही.

ही बातमी म्हणजे फक्त मृत्यूबद्दलची बातमी नाही तर मेंदूची कवाडे उघडी ठेवल्यास कम्युनिस्ट (साम्यवादी) आणि स्त्रीवादी चळवळीचा भंपकपणा आणि धोका समजून घ्यायला अत्यंत उपयुक्त अशी बातमी आहे. 

(१) कला क्षेत्रातील कम्युनिस्ट प्रभावः या बाईंच्या बहिणीचे लग्न "नाटककार" व "विचारवंत" इसमाशी झाल्यावर त्या डाव्या आणि महिला चळवळीत काम करु लागल्या.

आता "नाटककार" व "विचारवंत" हा एकच माणूस कसा असू शकतो? हा एक भयंकर मोठा विनोद आहे. कारण हे म्हणजे बद्धकोष्ठ आणि जुलाब यांच्यावर घेतली जाणारी औषधे एकदम घेतल्यासारखे आहे. तर ते असो. 

(२) या सगळ्या कम्युनिस्ट आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या सगळ्यात आधी अत्यंत सुस्थितीतील किंवा श्रीमंत पुरुषांशी स्वतःचं लग्न वगैरे उरकून मोकळ्या होतात, मुलं वगैरे होऊ देतात आणि मग इतर भोळ्याभाबड्या (की बावळट) तरुण पिढीला, प्रामुख्याने तरुणींनाच, पुरुषी वर्चस्ववाद (patriarchy) वर दुगाण्या झाडणारी प्रवचने देऊन त्यांची आयुष्य नासवायची कामे करायला सुरुवात करतात. त्याला फोडणी म्हणून #SmashBrahminicalPatriarchy असेल तर आणखी उत्तम. 

म्हणजे:

  • पुरुष कसे वाईट!
  • लग्न काय फक्त मुलं होण्यासाठी करायची का? 
  • मुलगा आणि मुलगी समान आहेत तर इतक्या मुली का होऊ द्यायच्या?
  • बायका म्हणजे काय मुलं होण्याचा कारखाना आहेत का?
  • मुळात लग्नच कशाला करायचं?
  • तुमचं शरीर ही तुमची मालमत्ता आहे तिचा उपभोग कसा घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं (ma life ma body) - यात आयरनीच्या देवाला वाहिलेली ठिणगी म्हणजे म्हणजे पुरुषी वर्चस्ववादाला झुगारुन द्यायची भाषा करायची आणि स्वैराचाराला प्रोत्साहन देऊन स्वतःचं शरीर कुणालाही वापरू द्यायला प्रोत्साहन द्यायचं हे यांचं धोरण.

पार्श्वभूमी समजली असेल तर आता मूळ बातमीकडे वळूया. या बाईंच्या बहिणीचं लग्न "नाटककार" व "विचारवंत" इसमाशी झाल्यावर त्या डाव्या आणि महिला चळवळीत काम करु लागल्या. त्यांच्या प्रभावाने या दातार बाई सुद्धा "पुरोगामी" चळवळीत काम करु लागल्या. 

आता दैवदुर्विलास बघा. सर्वसाधारणपणे जुन्या काळी आपल्याला असं दिसतं की पहिली मुलगी झाली तर मुलगा होण्यासाठी आणखी दोन किंवा तीन 'चान्स' घेतले जायचे. त्यामुळे आपल्याकडे तीन बहिणीच असणे किंवा तीन किंवा चार बहिणींच्या पाठीवर एक भाऊ हे सर्रास होतं. जुन्या काळातली सामाजिक परिस्थिती वेगळी असल्याने मी यावर चांगलं किंवा वाईट अशी कोणतीच टिप्पणी करणार नाही. पण याला प्रतिगामी, बुरसटलेले विचार, पुरुषी वर्चस्ववादाचं प्रतीक वगैरे हिणवणार्‍या आणि मुख्य म्हणजे उठल्या बसल्या जेन्डर इक्वालिटीच्या (gender equality) गप्पा ठोकणार्‍या 'पुरोगामी' लोकांनीही त्याच वाटेवर जावं हे डाव्या/कम्युनिस्ट लोकांचे व्यवच्छेदक लक्षणच म्हणावे लागेल. कारण त्या काळात दातार बाईंनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते, म्हणजेच  त्या काही अगदीच अडाणी अशिक्षित नव्हत्या. तरीही 'स्त्री मुक्ती' चळवळीत सक्रीय असलेल्या या पुरोगामी बाईंना तीन मुली असणे म्हणजे आपण 'हसे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला' या म्हणीचे ठळक उदाहरण आहे. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण' ही म्हण वापरणार होतो पण कम्युनिस्ट लोकांचा ब्रह्म वगैरे गोष्टींवर विश्वास नसल्याने त्यांना हे कितपत झेपेल याची शंकाच आहे.

तर, पैसेवाले नवरे गटवायचे, व्यवस्थित मुलं वगैरे होऊ द्यायची - थोडक्यात स्वतःची आयुष्य व्यवस्थित स्थिरस्थावर वगैरे करुन घ्यायची आणि मग आपल्या सडलेल्या डाव्या, कम्युनिस्ट विचारांनी समाजाला नासवायला सुरवात करायची. लोकांना दाखवायला घरकामगार संघटना, बालहक्क हक्क लढा, दारुमुक्ती आंदोलन वगैरे जोडधंदे करायचे. 

आणि एके दिवशी मरायचं आणि "वैकुंठ" नामक स्मशानभूमीत "अंत्यसंस्कार" करुन घ्यायचे. 

अनेक बाबी वैय्यक्तिक म्हणून सोडून दिल्या तरी देहदान करायला हरकत नव्हती, जुन्या काळच्या ग्रॅज्युएट व्यक्तीला मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र या बाबतीत माहिती नसेलच असे नाही. म्हणजे हे लोक मरतानाही आपला भंपकपणा दाखवायला कमी करत नाहीत. शेवटी 'वैकुंठ' नामक ठिकाणी 'अंत्यसंस्कार' करुन घेतलेच ना?!

आहे की नाही गंमत?!

असो. good communist is a dead communist हे मात्र खरं.

© मंदार दिलीप जोशी
अधिक अश्विन कृ १२, शके १९४२

Monday, April 30, 2018

माझ्या समानतेच्या लढ्याची किंमत माझ्या तान्हुल्या नातीला मोजावी लागेल का?

मागे अमेरिकेतील सु/कु प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका आणि विचारवंत मॅलरी मिलेट यांच्या भगिनी केट मिलेट यांनी लिहीलेला एक लेख शेअर केला होता. आज इंग्लंडमधल्या एक प्रसिद्ध स्त्रीवादी कार्यकर्त्या जॉनेट कॉप्फरमॅन यांनी स्वतः व्यक्त केलेल्या भावना तुमच्यापुढे मांडतो आहे. (या लेखाचा स्वैर अनुवाद)

---------------------

माझ्या समानतेच्या लढ्याची किंमत माझ्या तान्हुल्या नातीला मोजावी लागेल का?

आजच्या महिलांना भेडसावणारी भावनिक पोकळी पाहून एकोणीसशे साठच्या दशकापासूनच्या प्रसिद्ध स्त्रीवादी (फेमिनिस्ट) जॉनेट कॉप्फरमॅन यांनी व्यक्त केलेल्या भावना.

माझ्या नातीचा अँबर अ‍ॅनचा जन्म झाल्यावर काही तासातच तिला मी माझ्या हातांत घेतलं आणि छातीशी कवटाळलं. त्याच वेळी मनात दाटलेल्या असंख्य गुंतागुंतीच्या भावनांनी काहूर माजवलं, मी पार गोंधळून गेले. मला तेव्हा नक्की काय वाटत होतं हे शब्दात वर्णन करणं कदाचित अवघड आहे, कदाचित नातीच्या जन्मामुळे झालेला उन्मुक्त आनंद आणि तिच्या भविष्याची धास्ती यांचं मिश्रण असं त्या भावनांचं वर्णन करता येऊ शकेल.

माझं पहिलं नातवंडं. अतिशय बांधेसूद शरीर, डोळ्यांत असलेली चमक, माझ्या बोटांत हळूच गुंतलेली तिची बोटं - आई कशाला, आजीलाही ओळखतात बरं का बाळं! अँबरचा जन्म हा एक चमत्कार मानावा लागेल. अर्थात, जन्माला आलेलं प्रत्येक सुदृढ बाळ हे एक चमत्कारच असतं, पण अ‍ॅम्बरच्या आईला, म्हणजे माझ्या सूनबाई ईव्हाला गर्भाशयाच्या अंतःस्तराचा क्षोभ (एन्डोमेट्रिओसिस) हा आजार असल्याने तिला आपण कधी आई होऊ शकू असं वाटतंच नव्हतं. शिवाय त्यांच्या लग्नाच्या वेळी दोघांची वयं पन्नाशीच्या पुढे होती - माझा मुलगा इलियास होता ५२ वर्षांचा आणि ईव्हा होती ५० वर्षांची. त्यामुळे मला नातवंडांची कितीही हौस असली तरी माझ्या वयाची सत्तरी ओलांडल्यावर मी ती आशा जवळजवळ सोडून दिली होती. आणि मग तो चमत्कार झाला. माझ्या पंचाहातराव्या वाढदिवसाला मला ईव्हाने मला गोड बातमी दिली आणि या संपूर्णपणे अनपेक्षित पण सुखद धक्क्याने मी खुर्चीवरुन जवळजवळ पडलेच. ईव्हाला दिवस गेले होते!

लहानगी अँबर हलकेच माझ्या कुशीत शिरत असताना मला तो दिवस आठवत होता, आणि मनात तो भावनांचा कोलाहल गोंधळ घालत होता. नातीच्या जन्माने मनात निर्मळ आनंद दाटण्याऐवजी भावनांचं जरासं कटूगोड असं मिश्रण भरून राहिलं होतं. आता आम्ही तिचा हात धरू, एखाद्या कुंभारासारखं तिच्या वकूबानुसार तिच्या आवडीनिवडींना आकार देऊ, पण पुढे काय? तिच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय? का असं वाटत होतं मला?

त्याचं कारण होतं त्याच दिवशी वर्तमानपत्रात मी वाचलेली एक बातमी. शाळेत जाणार्‍या मुलींना शारिरिकदृष्ट्या अक्षम असतानाच त्यांच्याच वयाच्या मुलामुलींकडून कौमार्य गमावण्याची जबरदस्ती कशी केली जाते याचा उल्लेख त्यात होता. कौमार्य गमावणं ही गोष्ट काहीतरी मोठी डिग्री मिळवावी अशा पद्धतीने इकडे मिरवतात. त्याच बातमीत पुढे अनेक अस्वस्थ करणार्‍या गोष्टींचं वर्णन होतं — किशोरवयीन मुलामुलींमध्ये झालेला नैराश्याचा (depression) प्रादुर्भाव, त्यातून स्वतःलाच इजा करुन घेणं, खाण्याच्या सवयी इतक्या बिघडलेल्या की जवळजवळ त्याला कुपोषण म्हणता येईल अशी परिस्थिती, शाळेत विद्यार्थ्यांचा त्यांच्याच शाळासोबत्यांकडून होणारा क्रूर मानसिक छळ (bullying), भ्रमणध्वनी (मोबाईल) वरुन होत असलेली लैंगिक स्वरूपाच्या संदेशांची देवाणघेवाण (sexting), आणि एकंदर लैंगिक बाबतीत निर्माण केला जाणारा गोंधळ. या गोष्टींना अधिकाधित किशोरावस्थेतली मुलं बळी पडत असल्याचं त्या बातमीत म्हटलं होतं.

हे फार भयंकर होतं. आम्ही स्त्रीमुक्ती चळवळीत सक्रीय असताना पुढच्या पिढीसाठी - विशेषतः पुढच्या पिढीतील आमच्या मुलींसाठी एका उज्ज्वल भविष्याची कल्पना केली होती. एक असं जग ज्यात स्वप्न बघायला आणि ती अंमलात आणायला आकाश कमी पडेल, आपले निर्णय आपण घेण्याचं स्वातंत्र्य आणि त्यातून प्रगती साधता येईल, आणि कुठल्याही क्षेत्रात कर्तृत्व गाजवण्यासाठी संधींची समान उपलब्धता असेल. बास, याच गोष्टींसाठी मी आणि अनेक स्त्रीयांनी साठच्या दशकात तीव्र लढा दिला होता. अशाच जगाची कल्पना आमच्या मुलींसाठी आम्ही केली होती.

जॉनेट कॉप्फरमॅन पुढे म्हणतात की आज याच स्त्रीवादाने आजच्या मुलींच्या आयुष्यात काय उलथापालथ माजवली आहे ते पाहून मी हादरून गेले. समानतेचा लढा आम्ही स्त्री"वादा" कडे घेऊन जाण्याने आजच्या मुलींना नक्की फायदा झालाय की नुकसान हे तपासणं मला गरजेचं वाटू. माझ्या मते दुर्दैवाने आजचा काळ हा महिलांसाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत उदास आणि रोगट असाच आहे.

लैंगिक सूख हे दैवी आनंद देणारं असायला हवं. शरीराला मिळणार्‍या सुखाचा मार्ग हा मनातून जायला हवा. पण आज सेक्सचा फक्त शारीरिक कंगोराच उरला आहे. दुर्दैवाने दैनंदिन आयुष्याच्या जवळजवळ प्रत्येक भागाला पॉर्न संस्कृतीने ग्रासलं आहे. याचं मूळ साठच्या दशकाती स्त्रीवादी आंदोलनांचा भाग असलेल्या लैंगिक स्वातंत्र्याच्या हाकांत आहे. हवं तितकं शारीरिक सूख मिळवा, तुम्हाला हव्या त्या व्यक्तीबरोबर ते मिळवा, एकाने समाधान झालं नाही तर अनेक व्यक्तींबरोबर झोपा, तडस लागे पर्यंत जेवता तसं एकमेकांची शरीरं भोगा, ओरबाडा.

प्रणयाराधन आणि शय्यासोबतीतल्या अत्यंत खाजगी असायला हव्यात अशा गोष्टी आज खुलेपणाने मोठ्या पडद्यावर दिसतात. छोट्या पडद्याने आपल्या मोठ्या भावाला या बाबतीत केव्हाच मागे टाकलं आहे. इकडे आयटीव्ही टू वाहिनीवर उघड उघड स्वैराचाराला प्रोत्साहन देणारा एक प्रेमाचं बेट (Love Island) नावाचा रिअ‍ॅलिटी शो होऊन गेला. शिसारी येणारी गोष्ट म्हणजे त्यात भाग घेणारे लोक माणसं आहेत की शरीरं भोगणारे यंत्रमानव असा प्रश्न पडावा. [आपल्याकडे बिग बॉस या कार्यक्रमाचं रूपांतर लवकरच अशाच हिडीस शो मध्ये येत्या काही वर्षातच होईल अशी मला खात्री आहे]

काळानुसार बदल हा अपरिहार्य आहे पण स्त्री आणि पुरुषांच्या सगळ्याच पारंपारिक भूमिका आज वैचारिक तिरस्काराचा विषय झाल्या आहेत — इतक्या की एक काळ असा होता की टीव्हीवर जाहीरातींतून गृहिणी आणि आई या दोन भूमिकांत स्त्री दिसूच नये असा अचाट अलिखित नियमच ठरून गेला होता. का? तर म्हणे स्त्री आणि पुरुष यांच्या "जुनाट" आणि "बुरसटलेल्या" पारंपारिक भूमिकांचं सरसकटीकरण (gender stereotyping) होऊ नये म्हणून.

स्त्रीमुक्तीवादाच्या चळवळींनी महिलांना प्रगतीच्या अनेक संधी नक्कीच मिळवून दिल्या, पण त्याच बरोबर आजचं जगणं स्त्रीमुक्तीवादाने अधिक संघर्षपूर्ण, वेदनादायी, किचकट आणि मनःशांती हिरावून घेणारं बनवल्याने त्या संधी या अशा गोष्टींमुळे केव्हाच खुज्या ठरल्या आहेत.

आज मला आम्ही त्या काळी दिलेल्या घोषणा आठवतात, "स्त्रीयांनो, आपले ब्रा जाळा, मिनीस्कर्ट घाला. मुक्त व्हा!" पण खरंच आजची स्त्री मुक्त आहे का? अशा घोषणांनी नक्की काय साध्य केलं? व्हिक्टोरियन काळातल्या कपड्यांच्या थरांनी गळ्यापासून पायापर्यंत गच्च आवळलेल्या गृहिणीचा प्रवास आपल्या शरीराचं प्रदर्शन मांडायला सोकावलेल्या मुलींपर्यंत झाला तो अशाच घोषणांच्या प्रभावाने. पन्नासच्या दशकात आपले पायही झाकलेले हवेत म्हणून स्त्रीया बॉबी सॉक्स या विशिष्ट प्रकारचे पायमोजे घालत असंत. त्या स्त्रीयांवर हे बंधन होतं, आजच्या मुलींवर अधुनमधून एखादा तरी कमी कपड्यांतला, तोंडाचा चंबू करुन काढलेला सेल्फी सोशल मिडीयावर टाकणं अनिवार्य वगैरे आहे की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे.

दैवदुर्विलास असा की एकीकडे स्त्रीस्वातंत्र्याचं कारण पुढे करुन इंग्लंडमधल्या बहुसंख्य समाजातल्या महिलांपैकी अनेक जणींचा कल हिणकस पद्धतीने शरीरप्रदर्शन करण्याकडे आहे, दुसरीकडे त्याच इंग्लंडमधल्या धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्य असलेल्या लोकसंख्येतील स्त्रीया मात्र आजही कपड्यांच्या बाबतीत व्यवस्थित मर्यादा पाळताना दिसतात. त्यांच्या म्हणण्यानुसार एक स्त्री म्हणून आमच्या शरीराचं पावित्र्य जपण्यासाठी, आमची स्पेस जपण्याकरता आम्ही असं करतो. आहे की नाही गंमत? यांच्या पैकी कोण बंधनात आहे आणि कोण मुक्त आहे?

खूप जास्त लांबीचा सुका बोंबिल वाटावा असं पोट खपाटीला गेलेलं, हाडं दिसू लागलेलं, गालफडं बसलेलं, आणि डोळे निस्तेज आणि खोल गेलेलं कुपोषित शरीर असणार्‍या सेलिब्रिटींचं अनुकरण करण्याचा रोग समाजात पसरेल अशा भविष्याची कल्पना आमच्यापैकी कुणीच करु शकलं नव्हतं.

शरीर आणि मन यांना एकत्र वाढू देण्याऐवजी वेळेआधीच दिलं जाणारं लैंगिक "शिक्षण" आज मुलांच्या मनातला गोंधळ वाढवण्याचं आणि त्यांना अकाली मोठं करण्याचं काम काम करत आहे. शरीराची पूर्ण वाढ होण्याअगोदरच आजच्या मुलींना लहान ब्रा/बिकीनी घालायला आज उद्युक्त केलं जातं. अर्वाच्य शब्द आणि लैंगिक व्यवहारांचं एक मोठं जग आज टीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमातून आज मुलांना नासवतंय.

आमच्या काळात एक आई म्हणून असलेल्या परीक्षेत नापास होणं, नको असलेलं गर्भारपण, अतिरिक्त मद्यपान या आणि तत्सम चिंता अगदीच मिळमिळित वाटाव्यात अशा भयानक चिंता संधी, पर्याय, आणि प्रगतीच्या अगणित संधी आणि स्वातंत्र्याची लयलूट असलेल्या आजच्या जगात मला माझ्या अँबर बद्दल आज भेडसावतात.

तरुणपणात सळसळत्या रक्ताच्या धगधगत्या आदर्शवादाची झिंग डोक्यात घेऊन त्याकाळी आम्ही दिलेल्या स्त्रीवादी लढ्यांनी मात्र आजच्या मुलींमध्ये "वाद" तेवढा शिल्ल्क ठेवला आणि त्यांच्यातल्या स्त्रीलाच मारुन टाकलं. एक स्त्री म्हणून आम्हाला परमेश्वराने दिलेलं अत्यंत अमूल्य, अद्वितीय, आणि अलौकिक असं काहीतरी आम्ही हरवून बसलो आहोत.

माझा जन्म दुसर्‍या महायुद्धाच्या काळात झाला. युद्ध संपल्यावर मला घेऊन आई आणि बाबा लंडनला परतले. त्याकाळी शालेय शिक्षण हे फक्त परीक्षेत चांगले गुण मिळवण्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर तुम्ही पुढे कुठल्यही क्षेत्रात गेलात तरी न बिचकता आत्मविश्वासाने काम करत यावं या दृष्टीने व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास कसा करावा यावर भर असे. कालांतराने वयाच्या चौदाव्या वर्षाच्या आसपास बॉयफ्रेन्ड आयुष्यात आले, तरी तेव्हा त्या नव्या नात्यात सेक्स करायलाच हवं असा कोणताही वैय्यक्तिक किंवा सामाजिक दबाव आमच्यावर नव्हता.

बॉयफ्रेन्ड सिनेमाला घेउन गेल्यावर तिथल्या अंधारात घेतलेल्या चोरट्या चुंबनांपलीकडे कधी आमची मजल जात नसे. आणि पहिलं चुंबन मिळवण्यासाठी सुद्धा बॉयफ्रेन्ड मंडळींना भरपूर प्रणयाराधन करावं लागे. हां, आणि आम्ही गरमागरम प्रेमपत्र सुद्धा पाठवायचो बरं का! आपलं कौमार्य जपणं हे त्या काळी किमान साखरपुडा होईपर्यंत केलं जायचं किंवा किमान लग्नाचं विश्वासार्ह आणि ठाम आश्वासन मिळेपर्यंत तरी. आपल्या शरीर असं का, सेक्स म्हणजे काय वगैरे ज्ञान क्वचित आईकडून तर बरंचसं चोरून वाचलेल्या पुस्तकांतून आणि मित्रमैत्रिणींकडून मिळायचं. एक गोष्ट मात्र आमच्या पापभिरू मनावर कोरली गेली होती, ती म्हणजे कितीही इच्छा बळावली तरी ती पुर्णत्वाकडे कधीही न्यायची नाही. असं करणं म्हणजे फक्त नको असलेलं गर्भारपण ओढवून घेणं इतकंच नव्हे तर सगळ्यांसाठी ती गोष्ट एका भयंकर दुर्घटने सारखी होती.

आज एखाद्या किशोरवयीन मुलीला तिच्या बॉयफ्रेन्डने सेक्स्टिंग (sexting) केलं तर त्याच्या उत्तरादाखल आपला एक उत्तान कपडे घातलेला हॉट सेल्फी पाठवावा की आणखी काही करावं असा प्रश्न पडतो. त्यात तिला समवयस्कांकडून एकाहून एक भयानक असे सल्ले मिळत असतात. जणू काही त्या वयातल्या एखाद्या मुलीने करायच्या या अत्यंत सामान्य गोष्टी आहेत.

अँबरने या गोष्टी सहजपणे अंगिकाराव्यात असं मला वाटतं का? एका मुलीने करायच्या या अगदी सामान्य गोष्टी आहेत असं तिला वाटावं का? तिला कधी एखादं सुंदर प्रेमपत्र मिळेल की तिला फक्त शरीराची भूक असलेल्या भावनाशून्य नात्यांना तोंड द्यावं लागेल? ज्या मुलींच्या वाट्याला या गोष्टी येतील, त्यांच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. स्वतंत्र आयुष्य जगायच्या नादात स्वैराचाराची बंधनं लादून घेतली की काय होतं याची आजची पिढी हे उदाहरण आहे.

आमच्यात आणि आजच्या काळात एक मूलभूत फरक असा की आम्हाला मर्यादांची जाणीव होती. काही वेळा याच मर्यादा जाचक वाटल्या तरी आमच्याकडून काय अपेक्षित आहे हे ठावूक असल्याने आमचा पाय कधी घसरला नाही. आमच्या आईवडिलांशी आमचे कडाक्याचे वादही व्हायचे, पण तरीही आम्ही आज्ञाधारक होतो. आपण वेगळं वागलो, तर त्यांना आवडणार नाही हा प्रेमळ धाक होता. माझ्या बाबांना मी काजळ लावलेलं आवडायचं नाही, आणि मी ते मुद्दामून लावून त्यांना डिवचायचे. आमच्या मनासारखं झालं नाही तर आम्ही घर सोडून जाऊ अशी धमकीही आम्ही द्यायचो पण तसं करण्याची हिंमत कधीच झाली नाही. आपण कसे वागलो म्हणजे आईबाबांना आवडेल, हा विचार कायम मनात असायचा.

लोकांनी काय, किती (कमी), आणि कसं खावं हे सांगणारे धंदेवाईक तज्ञ आणि जाहीरातींचा मारा करणार्‍या कंपन्या तेव्हा नव्हत्या. आम्हाला एक वेळचा नाश्ता आणि दोन वेळचं भरपूर जेवायला मिळत असे. मधल्या वेळीतर भूक लागली तर सँडविच मिळत. तरीही आम्ही बारीक होतो, पण कुठल्याही व्यायामशाळा किंवा स्वतःची उपासमार करुन घेऊन नव्हे, तर या बारीकपणामागचं खरं कारण भरपूर चालणे आणि नाचकाम हे होतं. त्यामुळे आमच्या कंबरेचा "कमरा" कधी झालाच नाही. एखादं गुटगुटीत बाळ बघितलं की आपलंही असंच बाळ हवं असं लोकांना वाटायचं, आणि किशोरवयात जरासं जाडसर पोर बघितलं की कुणी हेटाळनी करायचं नाही. मुलींना त्यांच्या शरीरयष्टीवरुन हिणवलं जायचं नाही. आजचा काळ शस्त्रक्रीयेने चरबी काढण्याचा आहे. पण तरीही प्रचंड सुटलेली लठ्ठ शरीरं हा प्रकार त्या काळात सर्रास नव्हताच. दुर्दैवाने वेगवेगळ्या फळांचे रस, बारीक होण्याची घातक औषधं, आणि सूपरफूड यांची रेलचेल असलेल्या आजच्या काळात आजच्या मुली आपल्या शरीराबाबत समाधानी नाहीत.

लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केल्यावर मी काही काळ नृत्यांगना आणि मॉडेल म्हणून काम केलं. मग न्युयोर्कला गेले आणि संशोधक ग्रंथपाल (research librarian) म्हणून काम केलं. मग लग्न केलं आणि वयाच्या चोवीसाव्या वर्षी लंडनला परतले.

निसर्गाच्या विरोधात जाऊन घेतलेला समानतेच्या शोधाबद्दलची माझी अस्वस्थता साधारण १९७९ साली माझ्या The MsTaken Body या माझ्या पहिल्या पुस्तकातून. समानतेचा ढोल वाजवणर्‍या महिलांचा अतिरेक तेव्हाच मला दिसू लागला होता. आज प्रसूतीबद्दल कुठलीही गोष्ट नैसर्गिक पद्धतीने करण्यात बायकांना वाढत्या प्रमाणात वाटणारी भीती आणि "आणल्या जाणार्‍या" कळा या गोष्टी निश्चितच योगायोगाच्या नाहीत.

स्त्री असण्यामागचा आध्यात्मिक आणि शारिरिक आनंद आज यांत्रिकतेत जखडला गेला आहे. मूल जन्माला घालणं यातला आनंद "मा लाईफ मा चॉईस" मुळे केव्हाच हरवला. फार पुर्वी घरी सुईण येऊन मूल जन्माला येताना तुम्हाला मदत करायची. आता पुरुषी ढवळाढवळ वाढल्याने म्हणा किंवा प्रसूती आरामदायक व्हावी या करता औषधांचा मारा वाढल्याने म्हणा, स्त्रीयांना स्वतःबद्दल, स्वतंच्या शरीराबद्दल पुरेसा आत्मविश्वासच उरलेला नाही. समानतेमागे धावता धावता नवर्‍यांनी प्रसूतीदरम्यान हजर राहण्याचं फॅड निघालं आणि प्रसूतीसाठी तज्ञांचा ताफा हजर राहू लागला, आणि स्त्रीयांना आपण हे दिव्य एकटीने पार पाडू शकतो हा विश्वासच उरला नाही. आता मला सांगा, अशा समानतेचा काय उपयोग?

एक गोष्ट मात्र नक्की की पुरुषांची बरोबरी करण्याच्या मागे लागता लागता आज स्त्रियांची मक्तेदारी असलेली क्षेत्रे आज उरलेलीच नाहीत. मला असं वाटतं की स्त्रीच्या पारंपारिक भूमिकांचं सरसकटीकरण (stereotyping) हे खरं तर स्त्रीलाच एक वेगळी ओळख आणि सुरक्षितता प्रदान करतं. मुलं जन्माला घालणं आणि घराची काळजी घेणं याचा अर्थ तुम्ही जखडला गेला आहात असा नाही, तर तुम्हाला तुमच्या स्त्रीपणाचा सोहळा साजरा करण्याचं. स्वातंत्र्य मिळालं आहे असा होतो.

मला दोन मुलं पदरात असताना मी दोन डिग्र्या घेतल्या, काही काळ शिक्षिकेच्या भूमिकेत शिरले आणि मग लेखक आणि ब्रोडकास्टर म्हणून नाव कमावलं. हे करत असतानाच मी घरही सांभाळत होते. घरच्यांसाठी स्वयंपाक करत होते, मुलांशी खेळत होते, त्यांचा अभ्यास घेत होते आणि कधी कधी या सगळ्याचा ताण असह्य होऊन कोलमडतही होते. पण मी माझ्या मुलांमागे नेहमीच ठामपणे उभी होते. माझ्या आयुष्यातून काही शिकण्यासारखं असेल तर ते हे की आयुष्यात असलेले लोक महत्त्वाचे आहेत आणि एक बायको, आई, आणि बाई म्हणून ज्या ज्या म्हणून भूमिका त्यात अध्याहृत असतील त्या सगळ्या भूमिकांसकट माझं तिथे असणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि अनिवार्य आहे.

मी फक्त ४४ वर्षांची असताना माझा नवरा जॅक्स कर्करोगाने गेला. त्या वेळी तो ६१ वर्षांचा होता. एक आई म्हणून माझ्या मुलीवर मी कदाचित जास्तच भार टाकला असेल, पण त्या वेळी माझ्यात सुपरवुमन घुसली होती, आणि हा शब्द किती फसवा आहे हे आता लक्षात येतंय.

मी आजही "अग्गं बाई, बाईनेच का बरं ही कामं करायची" असा विचार न करता पदर खोचून स्वयंपाकघरात घुसू शकते, झाडलोट करु शकते, आणि घरातली कोणतीही कामं आनंदाने करते. मग ती करताना मी बाहेर कोण म्हणून वावरते त्याचा काहीही संबंध नसतो. रोजची घरातली कामं करणं ही देखील एक स्त्री म्हणून व्यक्त होण्याची एक पद्धत आहे आणि त्यातून चक्क आध्यात्मिक आनंद मिळवता येतो. जगण्याकरता भरपूर पर्याय समोर उपलब्ध असणं यात आयुष्याची परिपूर्णता नाही हे माझ्या केव्हाच लक्षात आलंय.

एक आजी म्हणून माझी अशी इच्छा आहे की माझ्या अँबरने असंच आयुष्य जगावं. तिने आयुष्यात काहीही करावं, पण तिला छान स्वयंपाक करता यावा, तिने घरासमोरच्या बागेत शांतपणे बसून पुस्तक वाचावं, उत्तम संगीताची तिला जाण असावी, आणि मुलांना घेऊन समुद्रावर फिरायला तिला जाता यावं— आणि मुख्य म्हणजे या सगळ्यासाठी तिला भरपूर वेळ मिळावा — जो आजच्या मुलींकडे उरलाच नाहीये. समानतेच्या मागे जाताना तिने दारूत स्वतःला बुडवून घेऊ नये आणि निरर्थक शारीरिक संबंधांनी स्वतःला नासवूनही घेऊ नये. तिने संवेदनक्षम, दयाळू, आणि सर्जनशील असावं पण त्याही पेक्षा एक बाई म्हणून आत्मविश्वासाने वावरावं. पुरुषांची बरोबरी करायला न जाता तिने आपलं स्त्रीत्व जपावं, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचा सोहळा साजरा करावा.

एक स्त्री म्हणून, आई म्हणून देवाकडे लई नाही मागणं !

© मंदार दिलीप जोशी (मराठी रूपांतर/भाषांतर)
फाल्गुन कृ. ७, शके १९३९ | ८ मार्च इसवी सन २०१८

मार्क्सवादी स्त्रीमुक्ती चळवळीचे भयाण वास्तव

मार्क्सवादी स्त्रीमुक्ती चळवळीचे भयाण वास्तव: अमेरिकन स्त्रीवादी चळवळीची मुकुटमणी केट मिलेट यांची धाकटी बहीण मॅलरी मिलेट यांच्या शब्दातः

या लेखाच्या सुरवातीलाच मॅलरी त्यांच्या बालपणीची एक गोष्ट सांगतात. हायस्कूल नंतर मॅलरी मिलेटना त्यांच्या शाळेतल्या एका ननने विचारलं की पुढे काय करायचा विचार आहे. मॅलरीने उत्तर दिलं आता स्टेट युनिवर्सिटीत प्रवेश घेईन. यावर ननच्या चेहर्‍यावर पसरलेले उदास भाव पाहून मॅलरीने त्यांना कारण विचारलं. नन म्हणाली, मला वाईट वाटतं की चार वर्षांनंतर तू एक डाव्या विचारसरणीची नास्तिक बनूनच बाहेर पडशील. मॅलरी म्हणतात, "मला हसू आलं. किती भोळसट आणि बावळट विचार आहेत यांचे." मग मॅलरी विद्यापीठात गेल्या आणि चार वर्षांनी आपल्या सहा वर्षांनी मोठ्या असलेल्या आपल्या केट मिलेट या बहिणीसारख्याच डाव्या विचारसरणीच्या नास्तिक बनून बाहेर पडल्या. त्या ननने वर्तवलेलं भविष्य खरं ठरलं होतं.

हा प्रसंग पाहिला तर डाव्यांनी अमेरिकेत किती घट्ट पाय रोवले होते याचा अंदाज येइल. हिटलरने पार्श्वभागावर लाथ मारून हाकललेले फ्रँकफर्ट स्कूलवाले अमेरिकेत पोहोचले आणि तिथे अमेरिकेची संस्कृतिक वाट लावण्याचे काम जोमाने केलं. आज आपण जी अमेरिका पाहतो, जे त्यांचं संस्कृतिक व कौटुंबिक जीवन पाहतो तसं ते नेहमीच तसं नव्हतं. अमेरिकन असले तरी कुटुंबाचं महत्त्व त्यांच्या दृष्टीनेही होतंच. डाव्यांच्या क्रिटिकल थिअरीने अमेरिकन संस्कृतीची पूर्ण वाट लावली आणि भ्रष्ट केलं. आता अमेरिका करते म्हटल्यावर त्याचं अनुकरण जगाने करणं हे ओघाने आलंच. आपल्याकडे अशा विचारांचं आकर्षण हे अशा पद्धतीने आयात केलेल्या विचारांचं आहे.

या लेखात मॅलरी आपल्या बहिणीच्याच आग्रहावरुन न्यू यॉर्कला स्थलांतरित झाल्यावाच्या एका प्रसंगाचं वर्णन करतात. केटने त्यांना आपली मैत्रिण लिली कार्पच्या घरी एका कार्यक्रमाला बोलावलं. कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यक्षस्थानी असणार्‍या केटने शाळेत घोकून घ्यावी तशी काही उत्तरं घोकून घेतली. ती अशी होती:

"आपण इथे का जमलो आहोत?" - केट
"क्रांती करायला" - सगळ्यांनी एका सुरात उत्तर दिलं.

"कुठल्या प्रकारची क्रांती?" - केट
"संस्कृतिक क्रांती" - सगळे

"आणि आपण ही संस्कृतिक क्रांती कशी करणार आहोत?" - केट
"अमेरिकन कुटुंबसंस्थेचा नाश करुन" - सगळे

आणि अमेरिकन कुटुंबसंस्थेचा नाश कसा करणार?" - केट
"अमेरिकन बापाचा नाश करुन" - सगळे

"आणि अमेरिकन बापाचा नाश कसा करणार?" - केट
"त्याची शक्ती खलास करुन" - सगळे

"आणि ती कशी खलास करणार?" - केट
"लग्नसंस्थेवरची निष्ठा खतम करुन" - सगळे

"आणि ती कशी खतम होणार?"

मॅलरी लिहीतात, की यावर जे उत्तर आलं त्यामुळे त्यांना जबर धक्का बसला. त्या म्हणतात, माझा श्वासच अडकला, कानांवर विश्वास बसेना. कोण होते हे सगळे? मी नक्की पृथ्वीवर चाललेल्या कार्यक्रमातच बसले होते की भलत्याच ग्रहावर?

ते उत्तर होतं:
"स्वैराचार, कामुकता, वेश्यावृत्ती, आणि समलैंगिकतेला प्रोत्साहन देऊन (आम्ही लग्नसंस्था आणि कुटुंबव्यवस्थेला) खतम करणार."

--------------

केटने अनेक पुस्तकं लिहीली, त्यातली अनेक महाविद्यालयांत अभ्यासालाही लावली गेली. केट लवकरच अमेरिकन स्त्रीवादाची मुकुटमणी बनली. तिचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ मानला जाऊ लागला.

--------------

लेखात मॅलरी आणखी एक मुद्दा मांडतात. त्या म्हणतात की आज मी माझ्या बहिणीच्या नादाला लागून बरबाद झालेल्यांकडे पाहते तेव्हा हृदय विदीर्ण होतं. म्हातारं सगळ्यांनाच एक ना एक दिवस व्हायचं आहे, मात्र या सगळ्या जणी आज स्त्रीवादाची शिकार झाल्याने भीषण एकाकीपणाने ग्रस्त आहेत. त्यांनाही आजी होता आलं असतं, आणि ज्या कुटुंबसंस्थेचा स्वतःच्या हाताने नाश केला तेच नातेसंबंध आज त्यांना हवेहवेसे वाटत आहेत पण ते आता त्या कधीच अनुभवू शकणार नाहीत. मॅलरी या केटच्या बहीण असल्याचं जेव्हा लोकांना कळतं तेव्हा "तुझ्या बहिणीच्या पुस्तकांमुळे माझ्या बहिणीचं (किंवा जी कोण असेल तिचं) आयुष्य बरबाद झालं असं अनेकदा ऐकवलं जातं.

आपल्याकडे हिंदूंच्या दुर्दैवाने या इंग्रजी डाव्यांच्या पुस्तकांचे पुरेसे अनुवाद झाले नाहीत (हे डावे उच्चविद्याविभूषित असूनही) पण त्यांच्या कल्पना मात्र इथे राबवल्या गेल्या. त्याने जे नुकसान झालं ते झालंच, आणि अजूनही चालू आहे. संस्कृतिक विध्वंस कसा करायचा या संबंधी फ्रॅकफर्ट स्कुलोत्पन्न घटिंगणांनी भरपूर लेखन केलेलं आहे आणि त्यांच्या कल्पना इकडे राबवून इथल्या डाव्यांनी आपलं भरपूर नुकसानही केलेलं आहे. लव्ह जिहादला याच कारणाने प्रोत्साहन मिळालेलं आहे, पण त्यासंबंधातला लेख पुन्हा केव्हा तरी. दुर्दैवाने आपल्याक्डे हिंदुत्ववादी संघटनांनी बौद्धिक योद्ध्यांना तयार करण्यात अक्षम्य चालढकल केली आणि या पुस्तकांचं भाषांतर केलंच नाही. त्या इंग्रजी पुस्तकांचं देशी भाषांत रूपांतर करायला अजूनही वेळ गेलेली नाही.

देशाला कळायला हवं, की हे विष आहे.

असो. मॅलरी मिलेट यांचा मूळ इंग्रजी लेख तुम्हाला इथे वाचता येईल.
https://www.frontpagemag.com/fpm/240037/marxist-feminisms-ruined-lives-mallory-millett

 https://photos.app.goo.gl/vNZueF3xipoDmOiv1


  © मंदार दिलीप जोशी
     शके १९३९