आपण भारतीय फारच संवेदनशील असतो आणि त्यामुळे आपल्याला भावुक करून टीआरपी वाढवणं हा सर्वभाषिक वाहिन्यांच्या हातचा मळ झालेला आहे.
सिनेमा नाटकात गरजच असते, पण हे लोण आता तथाकथित रिएलिटी शो पासून मुलाखतीपर्यंत सगळीकडे पसरलेलं आहे. पहावं तिथे रडारड. अगदी मास्टरशेफ सारख्या कार्यक्रमात सुदधा माझी आई/वडील, त्यांनी खाल्लेल्या खस्ता, आमची गरिबी, लोक मला कसे टोचून बोलत होते हो असं टँण टँण टँण ब्लाह ब्लाह ढसा ढसा अश्रूपात करत सुरू असतं.
मुलाखतीतल्या लोकांचं कार्यक्षेत्र आणि त्या मागचा प्रवास आणि त्यासंबंधीचे विचार या पुरता कार्यक्रम मर्यादित असेल तर यांना बहुतेक पैसे मिळत नसावेत, म्हणून ओढूनताणून अश्रू काढायचे प्रकार चालतात. त्यात मुलाखत देणारे लोक अभिनयक्षेत्राशी संबधित असतील तर आपल्याला त्यांच्या उत्कृष्ठ अभिनयाचं दर्शनही होतं. कहर म्हणजे मुलाखतीतल्या लोकांच्या भावनांच्या विहिरीला त्यांच्या दिवंगत आईवडीलांचे फोटो दाखवून किंवा तुम्ही त्यांना काय सांगाल अशा प्रश्नांचे रहाट लावून डोळ्यांतून अश्रूंचे पाट वहायला लावणे.
गंमत म्हणजे बऱ्याच लोकांना ते खरं वाटतं. रिएलिटी शो असो किंवा मुलाखत, अशा कार्यक्रमात जवळजवळ प्रत्येक वेळी सगळं सराव करून घेतलेलं अर्थात रिहर्स केलेलं असतं हो. प्रश्न सुद्धा आधी द्यावे लागतात, हे काही मोठं गुपित नव्हे.
सामान्य जनतेतील एखादा दमलेला बाबा आपली मुलं काय करत असतील या वेळी शाळेत असा विचार करत असतो तर ऑफिसमधून येताना ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर एखाद्या आईचा अर्धा जीव पिल्लांपर्यंत पोहोचून तिचे डोळे पाणावलेले असतात. एखादी बहीण आपल्या भावाचा इंटरव्ह्यू आज नीट होऊदे अशी परमेश्वराकडे प्रार्थना करत असते तर एखादा भाऊ बहिणीच्या लग्नासाठी जुळवाजुळव करत असतो. एखादा मित्र आपल्या जायबंदी मित्राला ऑफिसात सोडायला वाट वाकडी करून आणि खिशाला खार लावून जातो तर कुणी आणखी काही करत असतं.
थोडक्यात, आम्हाला तुमची पाककला दाखवा, अभिनय दाखवा, खेळ दाखवा - हं त्या संदर्भातला संघर्षही दाखवा म्हणजे आम्ही काही शिकू त्यातून. बाकी रडारड आणि रोजच्या आयुष्यातला संघर्ष जनतेच्या पाचवीला पुजलेली आहे. त्याबाबतीत सामान्य लोकांकडून तुम्हीच शिकाल.
So please spare us the artificial sentimental overflow. तुमची रडारड तुमच्याकडे ठेवा.
🖋️ मंदार दिलीप जोशी
पौष पौर्णिमा, शके १९४१