१९९७ साली कॅलिफोर्नियात नेथन जॉनर नामक एका १४ वर्षीय शालेय विद्यार्थ्याने एक पेटीशन तयार केलं: Ban Dihydrogen Monoxide.
त्याचं म्हणणं होतं की हे रसायन अतिशय खतरनाक असून अनेक कारखान्यांच्या औद्योगिक कचऱ्यात अर्थात वेस्ट प्रॉडक्ट मध्ये त्याचा समावेश होतो. याचा आण्विक ऊर्जा प्रकल्पात याचा उपयोग केला जातो. आग विझवायलाही हे रसायन वापरतात. पण हेच कर्करोगाने ग्रस्त पेशींतही आढळते. हृदय आणि मूत्रपिंडाच्या विकारांनी ग्रस्त रुग्णांत याचे आधिक्य आढळते. हेच धोकादायक रसायन प्रक्रिया केलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगात, औषधांत, आणि सौंदर्यप्रसाधनांत याचा सर्रास वापर होतो. म्हणून यावर बंदी घालायलाच हवी.
नेथनच्या या पेटीशनवर अक्षरशः हजारो लोकांनी सह्या केल्या. सह्या करणाऱ्यांत अनेक विद्यापीठात शिकवणारे प्राध्यापक, पीएचडी धारक, बुद्धिजीवी विचारवंत, आणि सिनेटर (लोकप्रतिनिधीही) सुद्धा सामील होते.
हा प्रयोग त्या मुलाने फक्त हे दाखवण्यासाठी केला होता की लोक कसे विचार न करता आणि विषयाची माहिती न घेता आलेल्या प्रत्येक प्रचाराच्या लोंढ्यात वाहून जातात.
नेथन जॉनर खोटं बोलत होता का? नाही. त्याने केलेला प्रत्येक दावा खरा होता.
पण ते खतरनाक रसायन नेमकं काय होतं? डाईहायड्रोजन मोनोऑक्साइड अर्थात H2O अर्थात आपलं सरळ साधं पाणी!
म्हणून प्रत्येक बातमीच्या प्रत्येक शीर्षकामागे अर्थात हेडलाईनमागे धावण्याआधी हा विचार करा ― आपल्याला त्या विषयातलं किती कळतं? तुम्हाला असलेली माहिती किती खरी आहे? ― हा विचार केला नाहीत, तर तुमच्यावर डाईहायड्रोजन मोनोऑक्साइडवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांच्या रांगेत उभं राहिलेलं आणि नंतर पोपट झालेला बघण्याची वेळ येईल.
©️ मंदार दिलीप जोशी
मूळ हिंदी: ©️ डॉ राजीव मिश्रा