Thursday, September 21, 2017

दारात भारताच्या गर्दी अलोट आहे

आदेश हा किताबी संदेश आसमानी
दारात भारताच्या गर्दी अलोट आहे

शतके सहिष्णुता ही पोसून सोसली मी
अब्रू जमीन सारी गमवून आज आहे

एका अलिबाबाचे झाले चव्वे-चाळीस
प्रत्येक चोर पुन्हा राहतो गर्भार आहे

डाव्यांस खाज आज सुटली साम्यवादी
मोजून दाम घेतो विकत पत्रकार आहे

यात्रेस जावयाला भरतो आजही जिझिया
पाहुण्यांस आज माझ्या मी देतो भाडे आहे

आश्रयास कुणी अतिथी म्हणूनि आला
घर, भूमी, आणि कन्या मागून आज आहे

जन्मास शिवाजी ते यावे पण शेजारी
वृत्तीच आत्मघाती ठरणार आज आहे

उत्तिष्ठ आज कृष्ण म्हणतो उच्चारवाने
हाती खडग घेता तरणार पार्थ आहे

तस्मात सज्ज सारे देशरक्षणास व्हा रे
अन्यथा आज सारे होणार भस्म आहे

© मंदार दिलीप जोशी
अश्विन शु. १, शके १९३९

तळटीपः मित्र श्री कौतुक शिरोडकर यांच्या दोन ओळींवरुन सुचलेली कविता. कविता माझी असली तरी प्रेरणास्थानाचा उल्लेख अपरिहार्य आहे.

Tuesday, September 12, 2017

लाल सलामवाले लोकहो

(अ)प्रिय लाल सलामवाले लोकहो,

तुमचा कन्हैय्याकुमार म्हणाला की माझ्या सख्ख्या बहिणीने भगव्या रंगाचे कपडे घातले तर मी तिचे कपडे फाडेन.

आमचा कन्हैय्या मानलेल्या बहिणीची वस्त्र फेडली जात असताना तिची अब्रू झाकायला तिच्या मदतीला धावून येतो.

हाच फरक आहे तुमच्या आणि आमच्या कन्हैय्यात.

सोळा हजार बायकांवरुन सोशल मिडीयावर फालतू पोस्टी फिरवणं सोपं आहे, समाजात मानाने वावरता यावं म्हणून इतक्या स्त्रियांना नवरा म्हणून स्वत:चं नाव देणारा भगवान श्रीकृष्ण होणं अशक्य.

तेव्हा तुमच्या लाल चड्डीत रहा. राम, कृष्ण वगैरे झेपायचे नाहीत तुम्हाला.

©️ मंदार दिलीप जोशी

Wednesday, September 6, 2017

मोबाईल, बायको, पर्स, आणि आपण

मनुष्यास स्थितप्रज्ञ या पातळी पर्यंत पोहोचायचे असल्यास दोनच मार्ग उपलब्ध आहेत.

एक साड्यांच्या दुकानात सेल्समनची नोकरी करावी आणि दुसरा म्हणजे आठवड्यातून एकदा बायकोच्या किंवा आईच्या ज्या पर्समधे मोबाईल वाजतोय त्याच पर्समधून फोन वाजायचा थांबायच्या आत काढून पलिकडच्या माणसाला हेलो म्हणून दाखवण्याचा सराव करावा.

साड्यांच्या दुकानात सेल्समन होणे अवघड वाटत असल्यास दुसर्‍या पर्यायाचे अवलोकन करा.

मोबाईल फोन हा घरी असताना पर्समधे का ठेवला जातो हे मला न उमगलेलं कोडं आहे. आणि ठेवला तर ठेवला तो नवरे लोकांना का काढायला सांगतात हे दुसरं कोडं.

आधीच पर्समधे इतक्या वस्तू असतात की फोन वाजला की आकाशवाणी झाल्यासारखा अष्टदिशांनी आवाज येतोय असं वाटत राहतं. मग आपण घराच्या आकारमानानुसार स्वयंपाकघर, दिवाणखाना, बेडरूम, इतकंच काय बाथरूम सुद्धा फिरून येतो. नेमका कुठल्या पर्समधे फोन ठेवलाय हे आठवलं आणि मोबाईल शोधायला पर्स उघडली तर त्यातल्या पिना, पेन्सिली, एक बॉलपेन, एक मार्कर पेन, एक शाळेच्या काळापासून जपलेलं शाईचं पेन, लिप बाम, पेन बाम, खडू, मुलांचे क्रेयॉन, आपण मोबाईल शोधायला आत हात घालताच बोटांचा कचकावून चावा घेत मिटणार्‍या केसांच्या जादुई क्लिपा, टोकदार कानातली, गळ्यातले साधे, मोत्याचे, अमेरिकन असे वगैरे किमान चार पाच प्रकारची गळ्यातली, शँपूची पाकिटं, घरापासून किमान १० किलोमीटरवर असणार्‍या लेडीज टेलरच्या दोन अश्मयुगीन पावत्या, आधी हात आणि मग बेसावध राहिल्यास आपलंच तोंड काळं करणारी काजळाची कांडी, पॉकेट श्रीमद्भगवतगीता (बेटा, तुम्हारा इस पर्स में क्या है? जो था वो कल नहीं रहेगा, जो नहीं था वो कैसे मिलेगा, वगैरे), स्क्रू ड्रायव्हर (हो, हा पण निघाला होता एकदा. कशाला काय विचारता? नवर्‍याचे स्क्रू टाईत करायला ख्या ख्या ख्या), आणि आपण पर्समधे हात घातलाय की मुंग्यांच्या वारुळात असा प्रश्न डावा अशा वस्तू म्हणजे सुटे मोती, वावडिंग, बॉल बेअरिंग, वेलची, लवंगा इत्यादी वस्तूंचे अडथळे पार करुन मोबाईल पर्यंत पोहोचेपर्यंत तो वाजायचा बंद झालेला असतो.

ह्या, त्यात काय, कोणाचा आहे ते पाहून परत फोन करु असं आपण म्हणतो आणि कॉल हिस्टरीत जातो. नेमका तो नंबर साठवलेला नसतो. मग बायको, "काय हो, तुम्हाला इतकं नाही जमत!" असं म्हणत हातातून मोबाईल घेते आणि त्या नंबरला बिंधास्त फोन लावते. तो नेमका तिच्या बालमैत्रिणीने घेतलेला नवा नंबर असतो. "बघा, इतक्या वर्षांनी केलाय पमीने फोन, मी लावला नसता तर आणखी किती काळाने तिने केला असता कोण जाणे" असं आपल्याला पुन्हा ऐकावं लागतं.

नेमका अशा वेळी आपला फोन वाजतो आणि पलिकडे बायकोची सासू किंवा आपली सासू यांच्यापैकी एक जण असते. आपल्याला मोबाईल तिसरा हात असल्यासारखा जवळ ठेवायची सवय असल्याने उचलावाच लागतो आणि बायकोच्या बालमैत्रिणीशी (तिच्या - आपलं नशीब कुठलं इतकं चांगलं? - तिच्या) गप्पा संपेपर्यंत आपल्या फोनवर पलिकडे आपली सासू असल्यास "तुमची मुलगी कित्ती दमते हो कश्शा कश्शाला म्हणून वेळ नसतो तिला" अशी कौतुकं सांगत आणि बायकोची सासू असल्यास पटकन विषय बदलत "अगं आई आज मन्याने काय कमाल केली माहित्ये शाळेत" या ट्रॅकवर गाडी नेत काही वेळ काढावा लागतो. सुमारे असंख्य मिनीटांनी बालमैत्रिणीशी बोलून झाल्यावर बायको फोन ठेवते आणि आपली सासू असल्यास, "अहो काय हे, आधी नाही का सांगायचं आईचा फोन होता. काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल म्हणून इतका वेळ थांबली ती! आता तिची औषधांची वेळ आहे, उचलेल की नाही कोण जाणे फोन, काय बरं काम असेल?!" असं म्हणत फोन लावते आणि तिची सासू असल्यास, "दमले बाई, उद्या सकाळी लगेच करते फोन, आता झोपल्याही असतील सासूबाई" असं म्हणत सुस्करा सोडते.

स्थितप्रज्ञ होण्याकरता साड्यांच्या दुकानात सेल्समन होणे त्यापेक्षा सोपं वाटू लागतं.

-----------------------------------------------------------------
या लिखाणाचा कुठल्याही शहाण्या, अर्धवट, किंवा ठार वेड्या अशा मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तींशी; जिवंत, अर्धमेल्या, किंवा मृत व्यक्तींशी; आणि त्यांच्या स्थान, भाषा, शिक्षण, आणि व्यवसाय वगैरेंशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
-----------------------------------------------------------------

© मंदार दिलीप जोशी

Monday, September 4, 2017

गावांतील देवळांचे महत्त्व

प्रत्येक गावात एक तरी प्रमुख देऊळ असावं आणि त्यातल्या देवतेचा एक तरी मोठा उत्सव असावा. आणि जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी दरवर्षी उत्सवाला हजेरी लावणारे ग्रामस्थ असावेत. नाही, हे निव्वळ स्वप्नरंजन नव्हे. ज्या गावांत असं एखादं तरी प्रमुख देऊळ असतं आणि त्याचा असा उत्सव असतो त्या गावाला शहरांकडे वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतरानंतरही तग धरुन राहणे सोपे जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे स्थानिक देवतेच्या वास्तव्यामुळे, तिच्या होणाऱ्या पूजाअर्चनेमुळे, एकत्र जमण्यामुळे लोकांची गावाशी नाळ जोडलेली राहते. म्हणूनच ग्रामीण भागात मंदिरे ही आजही लोकांना एकमेकांशी व स्थानिक संस्कृतीशी, आपल्या मातीशी (our roots) जोडून राहण्याची प्रेरणा देतात. भारतात काही ठिकाणी तर शैक्षणिक व खेळात जिंकलेली पदके व चषक मंदिरात ठेवलेले दिसून येतात. कारण उत्तुंग यश मिळवल्यावर ते ग्रामदेवतेच्या चरणी अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी जपली गेलेली आहे.

ग्रामदेवता या जन्ममृत्यू, पूर, दुष्काळ, शेतीतले अपयश, एखादी दुर्घटना इत्यादी स्थानिक समस्यांबाबत ग्रामस्थांची काळजी घेणार्‍या एका प्रकारे हिंदू देवतांच्या स्थानिक प्रतिनिधी असतात. माणसाने एक वेळ चारधाम यात्रा आयुष्यातून एकदाच करावी पण आपल्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला वर्षातून एकदा तरी जावेच. अशा प्रकारच्या स्थानिक देवता या शहरात अभावानेच आढळून येतात. म्हणूनच अर्थार्जन इत्यादी कारणांसाठी आपल्या गावातून स्थलांतरित झालेल्यांनी, शक्य झाल्यास सहकुटुंब, वर्षातून किमान एकदा तरी गावी जाऊन आपल्या ग्रामदेवेतेची पूजा करावी व उत्सवाला हजेरी लावावी. गावातली मंदिरे ही साधी असली तरी त्यांचा प्रभाव थोर असतो हे वैय्यक्तिक अनुभूतीवरुन सांगू शकतो. वर्षातून एकदा जरी गावी गेलं तरी आपल्याला तिथल्या समस्या कळू शकतात. हा उद्देशही मनात असू द्यावा व दरवर्षी आपली उपस्थिती नोंदवून यथाशक्ति यथामति आपली सेवा देवतेच्या चरणी रुजू करावी व तिथल्या परंपरा जपण्यास मदत करावी.

असं म्हणतात की राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर लवकरच श्री अजित डोबाल यांनी आपल्या जवळ जवळ ओस पडलेल्या गावी जाऊन आपल्या ग्रामदेवतेचे दर्शन व आशीर्वाद घेतले होते. आता इतका व्यग्र माणूस हे करु शकतो, तर आपण का नाही? इच्छा ठेवा, मार्ग दिसेलच.

© मंदार दिलीप जोशी