महंमद रफी हा गानस्वर्गातील गंधर्व. हेमंत कुमार, मन्ना डे, तलत वगैरे यक्ष, किन्नर, इत्यादी. कदाचित हिमेश रेशमियाला असुरवंशातील उपमा शोभेल. पण किशोर कुमार हा माझा आवाज आहे. बस्स. बाकी काहीही वर्णन नाही. तो माझा आवाज आहे. कंपनीतल्या सी.ई.ओ. पासून चपराशापर्यंत आणि देशाच्या राष्ट्रपतींपासून महापालिकेच्या झाडूवाल्यापर्यंत कुणालाही येताजाता गुणगुणता येतील अशी गाणी गाणारा तो माझा किशोर आहे. सामान्य माणसाचा आवाज. ते उर्दूत दर्द वगैरे का काय म्हणतात ते त्याच्या गळ्यातून प्रत्येक शब्दानिशी टपकायचं. शास्त्रीय गाणं अजिबात शिकला नसूनही अनेक दशकं गात राहणं यातच किशोरचं मोठेपण आहे. "मी गायचो ते किशोर कुमार आरामात गाऊ शकायचा. पण तो गायचा ते मला जमायचं नाही." - हे साक्षात मन्ना डे यांचे शब्द आहेत.
त्याच्या व्यवहारीपणाला इंडस्ट्रीतल्या कोत्या मनाच्या लोकांनी कंजूषपणाचं लेबल लावलं. त्याच्या उत्स्फूर्तपणाला कायम आचरटपणाचं लेबल लावलं गेलं. प्रत्येक प्रौढ माणसात एक लहान मूल असतंच. त्याने ते लपवून ठेवलं नाही इतकंच. किशोर कुमार या वल्लीच्या विक्षिप्तपणाच्या अनेक जितक्या सुरस कथा आणि त्याहून अधिक दंतकथा प्रसिद्ध आहेत, तितक्याच त्याच्या कंजूषपणाच्या आख्यायिका सर्वश्रुत आहेत. त्याच्या गाण्याच्या बरोबरीने त्याचा चिकटपणाच्या कथा रंगवून सांगण्यात येतात. पण चित्रपटसृष्टीतलं ज्ञान ज्यांना आहे, आणि या माणसाच्या अंतरंगात डोकावण्याची संधी ज्यांना मिळाली आहे ते मात्र या सदगृहस्थाच्या स्वभावाचे काही वेगळेच पैलू आपल्याला सांगतात.
हिंदी चित्रपटसृष्टीसारख्या निष्ठूर आणि ठायी ठायी फसवाफसवी असणार्या क्षेत्रात कठोर व्यवहारवादी असणं किती आवश्यक आहे हे किशोरने फार लवकर जाणलं होतं. आपले जेष्ठ बंधू अशोक कुमार उर्फ दादामुनी यांना आलेले अनुभवही त्याने बघितले होते. त्यामुळे आपले कष्टाचे, हक्काचे पैसे वसूल करताना त्याने कसलीच भीडभाड न बाळगता अनेक विचित्र क्लुप्त्या वापरल्या. अर्थातच त्यामुळे आणि ह्या क्षेत्रातल्या क्रूर राजकारणामुळे तो कसा विक्षिप्त आणि तर्हेवाईक आहे, तो कसा सारखा पैसे पैसे करत असतो, त्याचं मानधन मिळेपर्यंत त्याला धीर कसा धरवत नाही वगैरे अनेक अफवा झपाट्याने पसरल्या. त्याकाळी आजच्या सारखा पिसाटलेला मिडीया नसला तरी असल्या दंतकथा भरपूर मसाला लावून सत्यकथा असल्याच्या थाटात छापणारी चित्रपटसृष्टीशी संबंधीत अनेक नियतकालिकं उर्फ गॉसिप मॅगझिन्स तर होतीच, शिवाय आज आहे तसा तेव्हाही लोकांचा छापील शब्दावर अंमळ जास्तच विश्वास होता. साहजिकच या गैरसमजांना बर्यापैकी खतपाणी मिळालं. म्हणूनच किशोर कुमारने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्दर्शक सत्यजित रे यांना त्यांच्या 'पाथेर पांचाली' या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी अर्थसहाय्य केलं ही माहिती असो किंवा मग सत्यजित रे यांच्याच 'चारुलता' या चित्रपटासाठी केलेल्या पार्श्वगायनासाठी किशोरने एक पैसाही घेतला नव्हता ही गोष्ट असो, फारशी कुणाला ठाऊक असण्याचा संभव नाही.
गीतकार शांताराम नांदगावकर यांच्या "अश्विनीssss येsss नाssss" या गाण्याच्या आणि अर्थातच 'गंमत जंमत' या चित्रपटाच्या यशानंतर किशोरकडून आणखी मराठी गाणी गाऊन घ्यावीत असं अनेक संगीतकारांना वाटू लागलं. 'घोळात घोळ' या चित्रपटासाठी अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुधीर नांदोडे गीतकार असलेलं "हा गोरा गोरा मुखडा" ह्या गाण्याचं ध्वनीमुद्रण संपल्यावर संबंधितांना असं वाटलं की किशोर कुमारला त्याच्या लौकिकाला साजेसं भरभक्कम मानधन दिलं गेलं पाहीजे. त्यामुळे ध्वनीमुद्रण संपताच किशोरच्या हातात एक जाडजूड पाकीट ठेवलं गेलं. किशोरने पाकीट उघडलं आणि त्यातल्या काही नोटा काढून परत केल्या. आश्चर्यानं "किशोरदा ये क्या?" असं विचारल्यावर "अरे देखो, मैने कुछ दिनो पहले आपके दोस्त के यहां एक मराठी गाना गाया था, तो उनसे जितने पैसे लिये थे उतनेही आपसे लूंगा." अनेकदा रेकॉर्डिंगच्या आधीच मानधनाची मागणी करणार्या किशोरनं चक्क जास्त मानधन नको म्हणून काही पैसे परत केले हे बघून तिथे उपस्थित असणार्यांची बोटं तोंडात गेली.
इतर गायकांनी गायलेल्या दु:खी गाण्यांत आणि किशोरने गायलेल्या दर्दभर्या म्हणजेच सॅड साँग्स यांची तूलना केल्यास किशोरची गाणी आपल्याला सरस वाटतील ते किशोरच्या गाण्यांचं एक वैशिष्ठय आहे त्यामुळे. 'मेरा जीवन कोरा कागज' यासारख्या अगदी थोड्या गाण्यांचा अपवाद वगळला तर त्याच्या दु:खी गाण्यांतही हताश भाव कधीही दिसला नाही. नेहमी सकारात्मक वृत्ती आणि आशावाद दिसला. पुढे जाण्याचा मार्ग सुचवलेला असे. समस्येला काहीतरी समाधान सुचवलेले असे. 'दु:खी मन मेरे, सुन मेरा कहना' या नंतरची ओळ आहे 'जहां नहीं चैना, वहां नहीं रहना'. तसंच 'दिल आज शायर है, गम आज नगमा है' या गाण्याच्या शेवटी 'लेकिन लगाया है जो दांव हमने, वो जीत कर आयेंगेही' हा दुर्दम्य आशावाद आहे. हाच आशावाद त्याला माझा आवाज बनवण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावतो. कारण आज माजलेल्या बजबजपुरीत माझा हरवलेला आवाज मला किशोरच्या आवाजात सापडतो.
म्हणूनच किशोर नामक सोबती हा आपल्यात नाही असं म्हणवत नाही. तो आहे. आणि माझा आवाज बनून राहिला आहे.