Sunday, October 28, 2012

पुणे बस डे ला पाठिंबा...नाही!देव आनंदला एकदा एक जेष्ठ पत्रकार महाशयांनी विचारलं, "तू तुझे सिनेमे गोल्डीला दिग्दर्शित करायला का नाही सांगत. त्यावर देव म्हणाला होता "अगर गोल्डी डायरेक्ट करेगा तो मैं क्या करुंगा?" हे म्हणजे हरभजनसिंगने "अगर सचिन बॅटिंग करेगा तो मैं क्या करुंगा" अस म्हणण्यासारखं होतं. अगदी सकाळ वृत्तसमूहासारखं आहे नै का? मला वाटतं भल्या सकाळी सकाळपैकी कुणाच्या तरी डोक्यात अचानक कल्पनांची सकाळ होऊन "पी.एम.टी. बस चालवत असेल तर मग सकाळ काय करणार?" असा दिव्य विचार आला असण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी अनेकांना वेठीला......सॉरी हां....तर त्यांनी व्यवसायिक, कारखानदार, राजकारणी अशा अनेकांना मदतीला घेऊन एक नोव्हेंबरला पुणे बस दिन साजरा करण्याचं ठरवलं. त्या  दिवशी नागरिकांनी फक्त बसनेच प्रवास करायचा असं ठरलं.

मला एकदम भडभडून आलं. पण म्हटलं त्या दिवशी बसने जाता आलं नाही तर? तर मग टिव्हीवर या दिवसाच्या यशाच्या बातम्या बघून भागवायचं? छे छे!! म्हणूनच आज कात्रज ते कोथरुड डेपो प्रवास करण्याची संधी आली तेव्हा अचानक मला बस प्रेमाचा उमाळा आला. कात्रज बस स्टँडवर उभी असलेली सुंदर खाशी नसली तरी सुबक लांबुडकी बस कपाळावर 'कोथरुड डेपो'चं कुंकू लाऊन उभी असलेली दिसली आणि विराट कोहलीला फुलटॉस दिसल्यावर होत नसेल इतका आनंद मला झाला आणि मी त्यात जाऊन बसलो. आता बस क्रमांक आठवत नाही. पण वांदो नथी. कारण वीरेंद्र सेहवागने वेडावाकडा फटका खेळून देखील चौकार गेला की टोनी ग्रेग वगैरे मंडळींच्या म्हणण्याप्रमाणे जसं "दी बॉल हॅज नॉट क्वाईट गॉन व्हेअर ही इंटेंडेड टू, बट दोज आर फोर रन्स ऑल राईट. इट डज नॉट मॅटर हाऊ दि रन्स कम, इट ओन्ली मॅटर्स दॅट दे डू" असं असतं, अगदी तस्सच पुण्यात बसचे क्रमाक महत्वाचे नसतात. तुम्हाला हवं तिथे नेऊन हापटलं की झालं बघा. चौदा रुपये सुट्टे नसल्याने पन्नास रुपये कंडक्टरला देऊन आणि तीस रुपये घेऊन बाकीचे सहा रुपये कधी येतात याकडे अर्ध लक्ष ठेऊन प्रवास सुरू केला. आणि लवकरच बस प्रवासाच्या आनंदावर विरजण पडायला सुरवात झाली. सुरवातीला दमदार स्टार्ट घेऊन रोरावत स्टँडबाहेर पडलेली बस मेली ठेचेवर ठेच, ठेचेवर ठेच करत मार्गाक्रमण करु लागली. बस अचानक बंद पडत असे, ती चालक पुन्हा पुन्हा सुरू करत असे. खोक् खोक् खोकून आणि प्रेक्षकांच्या तोंडावर ड्वायलाग मारुन मारुन भरपूर पिडून मगच खपणार्‍या टीबीसम्राज्ञी लीला चिटणीस, सुलोचना, निरुपा रॉय, अचला सचदेव इत्यादी सिनेआयांप्रमाणे अ ते ज्ञ यांपैकी एकाही अक्षराने लिहून द दाखवता येणारे असंख्य आवाज करुन ही बस शेवटी सणस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या परिसरात कुठेतरी बंद पडली.

कंडक्टरने खाली उतरून प्रवाशांना हाकत हाकत दुसर्‍या बशीत भरण्यास सुरवात केली. "ओ, सहा रुपये" असं म्हटल्यावर त्याने दारावर पूरग्रस्तांसाठी वर्गणी मागितल्यावर अतिशय दयार्द्र नजरेने पण तितक्याच अलिप्तपणे डब्यात लोकं पैसे टाकतात तसे माझ्या खिशात सहा रुपये टाकले. आणि लगोलग मला एका बशीत भरला. ही बस ६८ क्रमांकाची बरं का. आर.टी.ओ. नोंदणी क्रमांक MH12 AQ 3414. या बसचा भोंगा उर्फ हॉर्न सोडला तर सगळे भाग वाजत होते. काही वेळाने माझ्या शरीरातल्या २०६ हाडांपैकी सगळीच्या सगळी वाजायला लागून तो आवाज या आवाजात मिसळतोय की काय आसा भास होऊ लागला. शिवाय पत्रे ठिकठिकाणी फाटल्याने कुठे लागू नये ही कसरतही सुरू होतीच. दुसर्‍या दिवशी "बाबांना टुच केलं बाबा लल्ले नाई" हे वाक्य ऐकायला लागू नये म्हणून मनातल्या मनात रामरक्षा म्हणत शेवटी एकदाचा कोथरुड डेपोचा थांबा आला आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला. तो पुन्हा चुकून सुद्धा बस मधे न पाऊल ठेवण्याचा निश्चय करुनच.

बस डे. माफ करा. मी नाही प्रवास करणार त्या दिवशी. तुम्हाला रोज बस नीट चालवता येत नसतील तर वर्षातला एक दिवस बसने प्रवास करुन काय साध्य होणार. निव्वळ बस उत्तमरित्या चालवल्या तर अनेक मार्गांवर बस चालवून कोट्यावधीचा महसूल मिळण्याची शक्यता असताना अशी सोन्याची अंडी देणार्‍या कोंबडीला उपाशी ठवण्याचं पातक राजकारण्यांकडून घडतं. आणि मग उठल्याबसल्या टगेगिरी करणारे आणि कार्यकर्त्यांवर मायेचे सिंचन करणारे मंत्री असोत की 'पुण्याची सार्वजनिक वाहतूक सुधारू' असं निवडणूक जाहीरनाम्यात लिहून नंतर राष्ट्रकुलाला लुटण्यात व्यग्र होऊन त्या आश्वासनाची सुरळी करणारे खेळप्रिय मंत्री असोत कुणालाच काहीच करावसं वाटत नाही. तासंतास बस येत नाही, आली तर लहान मुलांना खेळायलाही उपयोगी पडणार नाही अशा रितीने खुळखुळा झालेल्या अवस्थेतला बसवजा पत्र्याचा डबा येतो. चालकाने गिअर बदलला तर गिअरस्टिक सकट मागच्या सहा आसने खडखड्खड्खड करत हादरतात. थांब्यावर बस थांबत नाही. काय काय लिहू? मला नाही हो आवडत गाडी चालवत बाईक उडवत रोज जायला. पण काय काय सहन करायचं रोज?

म्हणून टीकेचा धनी व्हायचा धोका पत्करुन म्हणतो. पुणे बस डे ला माझा पाठिंबा नाही. कदापि नाही. पुणे बस डे गेला खड्ड्यात!!

--------------------------------------------------------------------------------------
हीच ती वाजणारी बस:या चित्रफितीत येणारे गाड्यांच्या हॉर्नचे वगळता सगळे खड्खड्खड्खड् आवाज हे बसच्या भागांचे आहेत.

--------------------------------------------------------------------------------------

सिमेंटच्या जंगलातलं हिरवं बेट


पुण्यातल्या कोथरुडमधेच हे ठिकाण आहे असं मला कुणी आठवडाभरापूर्वी सांगितलं असतं तर मी त्यावर अजिबात विश्वास ठेवला नसता. पण स्वतः बघितल्यावर विश्वास ठेवावाच लागला.  न्यु डी.पी.रस्यावरुन महेश विद्यालय ज्या सहजानंदकडे जाणार्‍या रस्त्यावर आहे त्याच रस्त्यावर अगदी शेवटी ही दगडखाणीची टेकडी आहे. भरपूर वृक्षारोपण करुन खाणीमुळे निर्माण झालेल्या विवरातलं अनावश्यक गवत काढून टाकल्यास उत्तम पर्यटन स्थळ म्हणून हे विकसित करता येईल. याबाबत स्थानिक नगरसेवकाला त्याने पुढाकार घ्यावा ही सूचना करण्याचा मानस आहे.टेकडीवरुन दिसणारा सूर्योदय
वारजेकडे जाणारा रस्ता
टेकडीवरुन दिसणारे वारजे उपनगर


टेकडीवरुन दिसणारा कुमार परिसर/सहजानंद हा कोथरुडचा भाग


पायवाट आणि डांबरवाट