Showing posts with label ललित. Show all posts
Showing posts with label ललित. Show all posts

Saturday, March 21, 2015

पुतळ्यांचे 'पुतळे' होऊ नयेत म्हणून




स्थळः पुण्यातील कोथरुड येथील कर्वे पुतळ्याशेजारचा पेट्रोल पंप.

बहुधा पुण्यात नवीन असलेला एक माणूस त्याच्या नातेवाईकाशी फोनवर बोलत होता. तो नक्की कुठे उभा आहे हे सांगताना त्याचं लक्ष पुतळ्याकडे गेलं. तो पुतळा कुणाचा आहे हे त्याला माहित नव्हतं हे स्पष्ट होतं. तो जिथे उभा होता तिथून त्याला पुतळ्याखाली लिहीलेली अक्षरं अर्धवट दिसत होती. ती पाहून तो फोनवरच्या नातेवाईकाला म्हणाला, "मी भारतरत्न पुतळ्याशेजारी उभा आहे".

माझा मुद्दा थोडा वेगळा आहे, पण वरच्या घटनेने माझ्या मनात पुतळे आणि ते ज्यांचे आहेत त्यांच्याविषयी सर्वसामान्य लोकांना असणारी माहिती याविषयी मनात विचारचक्र सुरु झालं. आपल्या राज्यात आणि देशात अक्षरशः लाखोंच्या संख्येने पुतळे असतील. सर्वाधिक पुतळे बहुतेक गांधीजींचे असावेत. आता गाधीजींविषयी कुणाला माहिती नाही असा प्रश्न आपल्याला पडेल. पण आर.के.लक्ष्मण यांचे एक सुप्रसिद्ध व्यंग्यचित्र आहे. एक नेता गांधीजींच्या तसबीरीखालचे नाव वाचायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचा खाजगी सचीव मागून त्याला, "It's Gandhiji sir", असं सांगतो आहे. यथा प्रजा तथा राजाच्या या काळात नेत्यांची ही स्थिती असेल तर सरवसामानय जणतेची काय असेल याची सहज कल्पना येऊ शकते.

यावर मला सुचलेले उपाय करता येऊ शकतो. जिथे असे पुतळे असतील तिथे पुतळ्याच्याच खाली एखाद्या छोट्या स्टॅन्डवर माहितीपत्रकांचा (फ्लायर्स) गठ्ठा ठेवता येईल. अशा माहिती पत्रकांच्या एका बाजूला त्या व्यक्तीची अगदी थोडक्यात माहिती आणि दुसर्‍या बाजूला त्या व्यक्तीवर असलेल्या पुस्तकांची शक्य तितकी समग्र यादी असावी. तसेच, अशीच माहिती पत्रके वरील ठिकाणाप्रमाणेच शेजारील पेट्रोल पंप वर इतर दुकाने यांमध्ये ठेवण्याची सक्ती करावी व ग्राहकांना दुकानातून बाहेर पडताना ती माहितीपत्रके देण्याची सक्ती करावी. ही माहितीपत्रके दुकानांना अर्थातच सरकारतर्फे विनामूल्य पुरवायची असल्याने ती ग्राहकांना देण्यात अशा दुकानदारांना कष्ट पडू नयेत. तसेच अशा पुतळ्यांशेजारी असलेली दुकाने पुरेशी मोठी असल्यास गल्ल्याशेजारी एखाद्या स्टॅन्डवर त्या व्यक्तींविषयी असलेली पुस्तके विक्रीस ठेवता येतील. मोठ्या दुकानांतून व मॉलधून असे करणे सोपे जावे. सर्वासामान्यपणे असे बघण्यात येते की एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल आणि त्याच्या विचारसरणीबद्दल एखाद्या व्यवसायिकाला किंवा स्थानिक नेत्याला अंमळ अधिक ममत्व असते. अशा व्यक्तींच्या भावनांना आवाहन करुन अशी पुस्तके सवलतीच्या दरात किंवा मोफत देण्याची व्यवस्था करता येऊ शकते. अर्थात अशी पुस्तके ही सर्वप्रकारची असावीत. म्हणजे त्या व्यक्तीच्या कार्य व चरित्राबरोबरच त्याच्या विचारांची समीक्षा असलेली पुस्तकेही असावीत जेणेकरुन वाचनेच्छुक लोकांना सर्वसमावेशक माहिती मिळवता येऊ शकेल.

कर्वे पुतळा ही खूण आणि बसस्टॉप म्हणून सांगताना किती जणांना पुतळा असल्यामुळे कुणीतरी मोठा माणूस असणार या पलिकडे त्यांच्या कार्याविषयी किती माहिती असेल? निदान त्या ठिकाणी तरी महर्षी कर्वे केवळ एक पुतळा म्हणूनच उभे आहेत. पण वर म्हटल्याप्रमाणे व्यवस्था केल्यास दोन फायदे होऊ शकतील. एक म्हणजे लोकांना अशा व्यक्तींविषयी पुरेशी माहिती होऊ शकेल, आणि दुसरा म्हणजे आपल्या देशाला मिळालेली आझादी ही फक्त बिना खडग बिना ढाल मिळालेली नसून हजारोंच्या संख्येने असलेल्या समाजसुधारक आणि क्रांतीकारकांचा देश घडवण्यात आणि स्वतंत्र करण्यात महत्त्वाचा सहभाग होता हे समजण्यात मोलाची मदत होईल.

जाता जाता एक प्रश्नः हा उपाय सरकारला कसा कळवता येईल?

Saturday, August 23, 2014

पोच

माझ्या आजोबांचा लोकसंग्रह बर्‍यापैकी होता. ते गेले तेव्हा अनेक जण आजीला भेटायला येऊन गेले. काहींनी आजोबांच्या चांगल्या आठवणी सांगितल्या, काहींनी त्यांचे गुणवर्णन केले, तर काहींनी नुसत्या मौनानेच आम्ही तुमच्या दु:खात सामील आहोत हे सांगितले. जे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत त्यांनी पत्र पाठवून सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. आजोबा गेल्याचे दु:ख काही प्रमाणात का होईना अशा लोकांमुळे कमी व्हायला मदत झाली.
हे आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच आलेला एक अनुभव. नुकतेच माझे एक जवळचे नातेवाईक गेले. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजताच आई-बाबा गावी रवाना झाले. दुसर्‍या दिवशी मी निघणार होतो. ऑफिसला रजा टाकली. तिकडे त्या अत्यवस्थ माणसाच्या सख्ख्या साडूचा वेगळाच चॅनल लागलेला. त्याचा मुलगा आणि सून पुण्याला रहायला होते आणि त्यांच्या राहत्या जागेचा भाडेकरार संपत आलेला होता. आमची एक जागा भाड्याने देणे असल्याने त्यांना ती जागा हवी होती. त्याने बाबांकडे गळ घातली आणि प्रचंड घाई करत बाबांना मला सकाळीच फोन करायला लावला. माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. या माणसाला आपली जागा द्यायची नाही असं निक्षून बजावलं आणि तिरमिरीतच फोन कट केला. अरे एक माणूस आता जाईल की नंतर अशा परिस्थितीत मृत्यूशय्येवर पडलेलं आहे, आणि या माणसाला जागेची पडलेली आहे? जरा कळ काढता येत नाही? इतकी खाज की सगळे भयानक ताणाखाली असताना स्वतःचा स्वार्थ साधावासा वाटतो? लोकांना प्रसंगाचं गांभीर्य आणि पोच नामक गोष्ट का नसते? हा प्रसंग काही मित्रांना सांगितल्यावर आणखी भयानक किस्से ऐकायला मिळाले. घरोघरी मातीच्याच चुली असणार म्हणा. हे किस्से संबंधित मित्रांच्या नावाचा उल्लेख न करता पुढे देतोय.
आमच्याच इमारतीतील एका कुटुंबासंबंधित किस्सा:
आमच्या इमारतीतील एक आजी कर्करोगाने आजारी आहेत. घरात त्यांचे पती, मुलगा, सून आणि दीड वर्षाची नात आहे. त्या आजींना भेटायला म्हणून काही लोक बाहेरगावाहून आले आणि मुक्कामाला चक्क त्यांच्याच घरी राहिले. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळा, आंघोळीला पाणी काढून द्या, वर त्यांना मधुमेह असल्याने त्याची पथ्य सांभाळा हे त्या कुटुंबाने करत बसायचं का? लोकांना इतकी साधी अक्कल नसते?
सौ. "अ" यांनी सांगितलेला किस्सा:
आमच्या घरी माझ्या सासर्‍यांच्या आजोळकडुन त्यांना मिळालेल्या श्री स्वामी समर्थांच्या खडावा आहेत. सासरे गेल्यावर एक बाई आम्हाला भेटायला आल्या आणि म्हणू लागल्या "काका जाताना पादुकांविषयी काही बोलले का?" त्यांनी असं विचारलं आणि त्याक्षणी त्या बाईबद्दलचा मनातला सगळा आदर नष्ट झाला.
श्री. "ब" यांचे एका व्यक्तीबद्दलचे दोन किस्से:
वडील गेल्यावर शेजारची एक गुजराथी शेजारीण आईला म्हणाली. "तुमाला आता नौ सबसिडाईझ्ड सिलेंडर लागणार नाहीत. त्यातले तुमाला न लागणारे सिलेंडर आम्हाला कमी किंमतीत द्याल का?" समोर आई होती म्हणून ती वाचली. माझा चेहरा आणि हावभाव पाहून ती जी सटकली ती पुन्हा मी भारतात तिथे घरी असेपर्यंत फिरकली नाही.
वडील गेल्यावर चार महिन्यातच आई गेली. त्यावेळी तीच गुजराथीण दुसर्‍याच दिवशी, "तुम्हाला फ्लॅट विकायचा आहे का? माझ्या ओळखीचे एक गुजराथी आहेत. त्यांना हवा आहे. मी तुम्हाला चांगलं डिल मिळवून देईन!" तिच्या सुदैवाने त्या दिवशी माझी बायको आणि मावशी समोर होत्या. मावशीने तिला अक्षरशः हात धरुन घराबाहेर काढायचं फक्तं बाकी ठेवलं होतं.
माझा आणखी एक किस्सा:
आमच्या नात्यातल्या एक आज्जी गेल्या. त्यांच्या बाराव्याला जेवणाची एक पंगत उठून दुसरी बसताना त्या आज्जींची सून बडबडली, "चला आता खर्‍या खवैय्यांची पंगत बसली." बसलेल्यांपैकी एक नातलग ताडकन् म्हणाला "आम्ही दिवसांचं जेवतोय, बारशाचं नाही."
"क" अणि "ड" या दोन बहिणींनी सांगितलेली हकिकतः
आम्ही आजोबा गेल्यावर त्यांना घेऊन सातारला निघालो होतो अंत्यसंस्कारांसाठी तेंव्हा एकाने फोन करुन सांगितलेलं "सांभाळून जा - अशा गाड्यांचे अपघात होऊन सगळेच्या सगळे मेल्याच्या अनेक घटना ऐकल्यात आपण". त्यानंतर बाबांचं आणि आईचं चित्त सातार्‍याला पोहोचेपर्यंत थार्‍यावर नाही. भयानक ताणाखाली काढलेले ते काही तास आजही आठवतात.
लोकहो पोच नसलेले काही महाभाग आपल्याही परिचयाचे असले तर असल्या नगांचे किस्से इथे सांगा.

Friday, May 6, 2011

व्यसन

एक मुलगा एका दुकानाबाहेर पडतो.

"ए हीरोss आजचे धरून तीनशे साठ रुपये बाकी आहेत तुझे, किती?" मागून हाक.

"तीनशे साठ."

"हां बरोब्बर तीनशे साठ. तेवढं लवकर द्यायचं बघा."

"शेट, लक्षात आहे माझ्या, देतो."

"दहा दिवस झाले, हेच सांगतय राव."

"देतो, देतो, दोन दिवसात नक्की देतो." ओशाळलेला चेहरा घेऊन तो मुलगा त्याच्या दुचाकीवर बसून निघून गेला.

लेखाच्या नावासंदर्भात वरचा संवाद वाचून कदाचित तुमचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. नाही, हा संवाद एखाद्या दारूच्या गुत्त्यावरचा किंवा परमिट रूमबाहेरचा नाही (अर्थात तिथे उधारी चालत असावी असं मला तरी वाटत नाही - अनुभव नाही). हा संवाद आहे एका सायबर कॅफे बाहेरचा. शेजारी एका दवाखान्यात आलो असता कानावर पडलेला. सहज रिसेपशनिस्टला विचारलं तर हे असले प्रेमळ(!) संवाद रोजचेच आहेत असं समजलं. ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात सापडलेल्या विद्यार्थीदशेतील मुलांचे आणि सायबर कॅफेच्या गल्ल्यावर बसलेल्यांचे. "अहो काय सांगू, अनेक वेळा समजावून झालं, पेशंट आहेत त्रास होतो, काहीही परिणाम नाही".

असेल अपवादात्मक ठिकाण, म्हणून फार विचार केला नाही. असंच एकदा प्रिंटाआउट काढायला अन्य एका सायबर कॅफे मध्ये जावं लागलं. तिथे अनेक मुलं शालेय गणवेशात बसलेली दिसली. ही मुलं करताहेत तरी काय पहावं म्हणून एकाच्या नकळत सहज डोकावलो तर कसलासा ऑनलाईन युद्धाचा गेम तो खेळत होता. शेजारीच त्याचा मित्र त्याला कसं खेळायचं याचं मार्गदर्शन करताना दिसला. माझं काम झाल्यावर सायबर कॅफेच्या मालकाला विचारलं, "काय हो, दोघांना कसं काय बसून देता तुम्ही एका पी.सी. वर?"

"अहो शेट, लय भारी गिर्‍हाईकं आहेत ही. रोज येत्यात. बराच वेळ बसत्यात, लई खेळत्यात. बक्कळ कमाई यांच्यामुळं" मालक उत्तरले.

निराशेने मान हलवून बाहेर पडलो, तर मागोमाग वरच्यासारखाच संवाद कानावर पडला. उधारी बाकी असल्याचा. फक्त ह्या वेळी रक्कम कमी होती.

मित्रमंडळी आणि अन्य काही सायबर कॅफेचे मालक यांच्याशी चर्चा करता समजलं की ही परिस्थिती धक्कादायकरित्या सर्वसामान्य आहे. कोपर्‍याकोपर्‍यावर कुत्र्याच्या छत्रीसारखे उघडलेले सायबर कॅफे यांमुळे घरी इंटरनेटची जोडणी नसलेले किंवा इतर काही कारणांमुळे घरी गेमींग न करू शकणारे यांची चांगलीच सोय झाली आहे. शिवाय गेल्या काही वर्षात जितक्या झपाट्याने तुरडाळीचे दर वाढले त्यापेक्षाही वेगाने घसरलेले सर्फिंगचे दर ही ऑनलाईन गेम्सचं वेड फोफावण्यासाठी एक अत्यंत सुपीक जमीन ठरली आहे. दुर्दैवाने अधिकाधिक लोक ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात सापडत आहेत.


ई-व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणारे तज्ञ म्हणतात की इंटरनेट सहज उपलब्ध असणं या व्यतिरिक्त ऑनलाईन खेळ यांचे अतिशय वेगाने लागू शकणारे व्यसन ही प्रामुख्याने चिंतेची बाब आहे. वैयत्तिक/प्रत्यक्ष आयुष्यात छटाकभर सत्ताही नसलेल्यांकडे ऑनलाईन खेळात मोठ्या सैन्याचे अधिपत्य किंवा एका शहराचे नेतृत्व येऊ शकते. इंग्रजीत असलेल्या ''Power corrupts, and absolute power corrupts absolutely' या प्रसिद्ध उक्तीप्रमाणे ही नशा ऑनलाईन असली, तरी ही सत्ता मनाचा झपाट्याने ताबा घेते, आणि मग शाळा, शिकवणीची फी, खाऊचे पैसे इत्यादीतला एक मोठा हिस्सा या खेळांवर खर्च होऊ लागतो.

माझा एक प्रोग्रामर मित्र ऑनलाईन खेळ बनवतो. त्याने काही महत्त्वाची माहिती सांगितली. ऑनलाईन खेळ बनवणारे मानसशास्त्राचा उत्तमरित्या उपयोग करुन घेतात. प्रत्यक्ष आयुष्यात नैराश्याचे किंवा मानसिक कणखरतेची कसोटी प्रसंग पाहणारे प्रसंग आले की अशा ऑनलाईन खेळांच्या नादी लागलेल्या लोकांना खेळातल्या विजयाचे प्रसंग आठवून त्यांची पाऊले आपोआप गेमिंगकडे वळतात. मानसशास्त्रात हा प्रकार 'क्लासिकल कंडिशनिंग' या नावाने ओळखला जातो.

हे खेळ काही वेळ खेळून सोडून देण्यासारखे निश्चित नाहीत. ते खेळायचे असतील तर बराच वेळ द्यावा लागतो. खेळात एखाद्या जागी माघार घ्यावी लागणं आणि एखाद्या प्रसंगी जिंकणं यात अशा प्रकारे समतोल साधला जातो की खेळणार्‍यापुढे जिंकण्याचं गाजर सतत नाचवलं जातं. खेळताना आपण नक्की कधी जिंकणार हे सांगता येत नाही. विजय हा अगदी पुढच्या क्षणाला मिळू शकतो, पुढच्या तासात तुम्ही जिंकू शकता, किंवा जिंकायला अगदी दिवसभरही लागू शकतो. पण बराच वेळ हरतोय म्हणून आपण खेळ खेळणं थांबवलं तर तो जिंकण्याचा क्षण गमावू ह्या भीतीने खेळणारे अमर्याद काळ खेळतच राहतात. सतत अनेक तास असे खेळ खेळल्याने ताणामुळे काहींनी आपला जीव गमावल्याचीही उदाहरणं आहेत.

किशोरावस्थेत असलेल्या मुलांत या व्यसनाचा प्रामुख्याने प्रादुर्भाव असला तरी लहान मुलेही याला अपवाद नाहीत. माझ्या एका मित्राची प्राथमिक शाळेत जाणारी लहान मुलगी त्यांच्या घरातल्या संगणकावर बार्बी हा खेळ खेळते. त्याबद्दल बोललं असता चिडचिडी होते आणि हट्टीपणा करते. जी मुले बंदुका, तोफा आणि तत्सम गोष्टी असणारे खेळ खेळतात त्यांना राग लवकर येतो आणि अशी मुले हिंसक होण्याची शक्यता असतेच असते.


ही बाब आता फक्त ऑनलाईन खेळांपुरती मर्यादित नाही तर अश्लील मजकूर, चित्रे आणि चलतचित्रे असलेली संकेतस्थळे, चॅटींग आणि सोशल नेटवर्किंग यांनीही या व्यसनाचा मोठा भाग व्यापला आहे. आंतरजालीय जुगार, समभाग खरेदी-विक्री, पोर्नोग्राफी, आणि सेक्स चॅट हे या ई-व्यसनाचे काही घटक.

इंटरनेट उर्फ आंतरजालाचे व्यसन ह्या गोष्टीने आता इतके गंभीर स्वरूप धारण केले आहे की पुण्यातल्या मुक्तांगण या व्यसनमुक्तीसाठी काम करणार्‍या संस्थेत आता दारू आणि अंमली पदार्थांचे व्यसन याबरोबरच इंटरनेट व्यसनमुक्ती ही एक वेगळी उपचारपद्धती विकसित करण्यात आली आहे. संस्थेत या नवीन व्याधीवर उपचार घेणारी ही सगळी शाळा आणि महाविद्यालयात शिकणारी तरुण मुले आहेत. उपरोल्लेखित अनेक समस्यांबरोबरच सायबर रिलेशनशिप अ‍ॅडिक्शन हा एक अत्यंत धोकादायक प्रकार आहे. सोशल नेटवर्किंग, आंतरजालावरचे मित्र अशा गोष्टींमुळे वेळ-काळाचे भान न राहिल्याने घरी पालकांशी आणि इतर घरच्यांशी अगदी तुटक किंवा उद्धटपणे संभाषण करणे, प्रत्यक्ष आयुष्यातील नातेसंबंधांकडे होणारे दुर्लक्ष, वाचन-लेखन-मनन आणि मैदानी खेळ खेळण्यास अनुत्सुक असणे यासारख्या बाबींकडे घरातल्या मोठ्यांचे एक तर वेळेवर लक्ष जात नाही, किंवा अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. शेवटी सहामाही/वार्षिक परीक्षेत दिवे लागल्यावर प्रगती पुस्तकात दिसणारी अधोगती हा पालकांसाठी एक मोठा धक्का असतो. मग सुरवातीला आपली मुलं संगणक लिलया हाताळतात हा अभिमान गळून पडतो आणि पालकांच्या जीवाला नवीन घोर लागतो. इतर व्यसनग्रस्तांप्रामाणेच आपल्याला व्यसन आहे हेच मुळात या मुलांच्या गावी नसते. मुक्तांगण संस्थेतले समुपदेशक अशा मुलांना हीच गोष्ट आधी पटवून देतात. उपचारांच्या दुसर्‍या टप्प्यात मग त्यांच्या भावी प्रगती बाबत बोलून त्यांना प्रोत्साहित केले जाते. समुपदेशनाबरोबरच ध्यानधारणा, वाचनास उद्युक्त करणे, अशा विविध प्रकारे 'बरे' केले जाते. अडनिडं वय आणि या आजाराचे विचित्र स्वरूप यामुळे या मुलांना ई-व्यसनमुक्त करण्यासाठी घेतली जाणारी मेहनत आणि लागणारा वेळ हा अर्थातच इतर व्यसनाधीन लोकांपेक्षा अधिक असतो. मुलांबरोबरच पालकांचंही समुपदेशन केलं जातं. कारण फक्त मुलांचंच नव्हे तर संपूर्ण घराचं सौख्य आणि शांती अशा गोष्टींमुळे हिरावली जाते. मुलं संगणक वापरत असताना त्यांना विचित्र वाटणार नाही अशा प्रकारे त्यांच्यावर लक्ष ठेवावे असा सल्ला पालकांना दिला जातो.

सद्ध्या मुक्तांगणमधे ई-व्यसनांवर उपचार घेणार्‍यांमधे मुलं आणि तरुणांचे प्रमाण जास्त असलं तरी भविष्यात संस्थेत उपचारासाठी दाखल होणार्‍यांमधे मोठ्यांची संख्या वाढू लागल्यास आश्चर्य वाटायला नको. ऑनलाईन नात्यांमधे गुंतल्याने प्रत्यक्ष आयुष्यातल्या नात्यांवर परिणाम होण्याबरोबरच प्रत्यक्ष आयुष्यातल्या असमाधानकारक नात्यांमुळे अनेक जण ऑनलाईन नात्यांमधे गुंतण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. आर्थिक नुकसान, दैनंदिन वेळेचा अपव्यय याबरोबरच ऑफिसमधल्या कामावर परिणाम होणे याही गोष्टी लक्षणीयरित्या वाढल्या आहेत. यापायी अनेकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्याचीही उदारहणे आहेत. समविचारी लोकांशी संपर्कात राहणे आणि स्वतःला रचनात्मक पद्धतीने व्यक्त करणे या उद्देशाने आपण अनेक सोशल नेटवर्किंगच्या संकेतस्थळांचे सभासदत्व घेतो खरे, पण मग त्याच बरोबर अनेक अनावश्यक गोष्टींमधे आपला सहभाग वाढतो आणि इतर अनेक अनावश्यक गोष्टी आपल्या मेंदूत प्रवेश करतात. मी आत्ता ज्या आस्थापनात काम करतो तिथे एकेकाळी कर्मचार्‍यांना आंतरजाल मुक्तपणे उपलब्ध होतं. जीमेल, याहू, ऑर्कुट, फेसबुक आणि इतर सगळ्या संकेतस्थळांवर कुठल्याही वेळी सगळयांचा मुक्त वावर असायचा. पण प्रमाणाबाहेर वापर वाढला आणि कामावर परिणाम होऊ लागला तसा हा वेळ नियमबद्ध करुन फक्त दिवसातला अर्धा तास असा केला गेला. आम्हाला निदान सलग अर्धातास मिळतो. अनेक आस्थापनांत हाच वेळ एक तास असला तरी एका वेळी फक्त दहा मिनिटं अशा प्रकारे तो वापरावा लागतो. याचाच अर्थ आंतरजालाचा वापर कसा आणि किती करावा यासंबंधात मोठ्यांनीही आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

इतर काही नाही म्हणून करमणुकीसाठी आंतरजालावर फेरफटका मारायचा याला काही अर्थ नाही. आंतरजाल की करमणुकीची जागा आहे हा समज निखालस चुकीचा आहे. कारण आंतरजाल हे टीव्ही सारखं इडीअट बॉक्स नव्हे. नेटवर बसल्यावर सतत माणसाचा मेंदू जागृत असतो, त्याला आराम मिळत नाही. सतत 'अ‍ॅलर्ट' रहावं लागत असल्याने मग थकवा येणं हे ओघाने आलंच.


मुळात आपल्याला आंतरजालाचे व्यसन लागले आहे ह्याची जाणीव होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. एखादे महत्वाचे काम करण्यासाठी आपण लॉग-इन केले आणि काही क्षणांच्या कामासाठी आलेलो आपण अर्धा-एक तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ ऑनलाईन आहोत असे लक्षात आले आहे का कधी? आंतरजालावर सोशल नेटवर्किंगमधे किंवा इतर गोष्टींमधे गुंतल्याने ऑफिसची काही बिनतातडीची कामे पुढे ढकलायची सवय लागली आहे का? वैयत्तिक आयुष्यातले वैफल्य सहन होत नसल्याने त्यापासून पळण्यासाठी तुम्ही आंतरजालावर येता का? या आणि तत्सम अनेक प्रश्नांपैकी एकाचे जरी उत्तर "हो" असले तरी सावध व्हा. एखाद्या संस्थेत जाऊन ई-व्यसनमुक्ती कार्यक्रमात सहभागी व्हायला कमीपणा वाटत असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवा. 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' हेच सूत्र इथेही उपयोगी पडते. एकदा निग्रह करा, मग वास्तवाशी सामना करणे ही बाब ई-व्यसनांच्या विस्तवाशी खेळ करण्यापेक्षा नक्कीच सोपे वाटू लागेल.

तर मग, करताय ना आजच निश्चय?

Tuesday, May 3, 2011

आणखी एक राधिका

८ मार्च २०११ रोजी सगळा देश - नव्हे - अखिल विश्व जागतिक महिला दिन साजरा करत असतानाच राजधानी दिल्लीत राधिका तन्वर या कॉलेज तरुणीला एका युवकाने गोळी घालून ठार केल्याच्या वृत्ताने सगळा देश हादरला.

"सगळा देश हादरला" असं लिहीण्याची पद्धत असते. कारण असले प्रकार आजकाल इतके सर्वसामान्य झाले आहेत की कुणी हादरत वगैरे नाही. एका सहकर्मचार्‍याची प्रतिक्रिया अगदी प्रातिनिधिक म्हणावी लागेल. "असेल काहीतरी प्रेमाबिमाचं लफडं, सोड यार".

सुदैवाने चार दिवसांत पोलीसांनी यशस्वी(!) तपास करुन खुन्याला अटक केली. विजय उर्फ राम सिंग हा तो खूनी. पोलीसांनी नेहमीच्या पद्धतीने चौदावं रत्न दाखवून त्याची चौकशी केली तेव्हा जे उघड झालं ते समजल्यावर मात्र हा विषय डोक्यातून जाईना.

उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील राम सिंग हा राधिकाच्या घराजवळच असणार्‍या एका शिवणकाम कारखान्यात कामाला होता. राधिकाचा पाठलाग करणे आणि तिला छेडणे हा त्याचा आवडता छंद होता. तसंही मुलींना अशा प्रकारे त्रास देणे हे प्रकार नवीन नव्हते, पण त्याचा राधिकावर विशेष "जीव" असावा. असाच एकदा राधिकाचा पाठलाग करत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच राधिकाने धावत रस्त्यातच उभ्या असलेल्या काही लोकांना गाठले आणि "तो माणूस मला छेडतोय" अशी आरोळी ठोकली. एखादा चोर, मुलींना छेडणारा नि:शस्त्र गुंड असे कोणी तावडीत सापडले की हात साफ करायला लोक टपलेलेच असतात. अर्थातच त्या लोकांनी मग "लडकी को छेडता है" किंवा तत्सम डायलॉग मारत त्याला बेदम चोप दिला. अशा अनेक गोष्टी कानावर आल्याने राम सिंगला कामावरुन काढून टाकण्यात आले. असेच काही दिवस गेले पण राम सिंग राधिकाचा पाठलाग करणे आणि तिने स्पष्ट नकार दिल्यावरही तिच्याकडे आपल्या एकतर्फी "प्रेमाची" कबूली देणे सोडेना.

नोकरी गेल्याने राम सिंगने मुंबई गाठली आणि तिथे रोजगार शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्याच्या विकृत डोक्यातून राधिकाचा विचार जाता जाईना. त्याने वारंवार दिल्लीला येऊन राधिकाच्या मागावर राहणे सोडले नाही. एकदा राधिका बस मधून उतरून पादचारी पुलावरून जात असताना पुन्हा त्याने राधिकाला गाठले आणि त्याच्याशी लग्न करण्याची गळ घातली. तिच्याही मनात त्याच्याविषयी 'प्रेमभावना' असल्याचा त्याचा समज होता. तसं बोलून दाखवल्यावर राधिकाने तिथेच त्याच्या श्रीमुखात भडकावली. आता हा आपल्याला त्रास देणार नाही अशा समजूतीत असलेल्या राधिकाला मात्र राम सिंगच्या मनात भडकलेल्या सूडाग्नीची कल्पना कशी असावी?

विजय उर्फ राम सिंगने आपला सूडाग्नी शमवण्यासाठी राधिकालाच संपवण्याचा घाट घातला. त्याने सरळ गुरगाव गाठले आणि तिथून दोन हजार रुपये देऊन एक 'कट्टा' उर्फ गावठि पिस्तूल विकत घेतले. गंमत म्हणावी की दैवदुर्विलास, आपल्या देशात डि.व्ही.डी प्लेअर आणि पिस्तुल या दोन वस्तू एकाच किंमतीत आणि सहजतेने विकत घेता येतात.

पिस्तूल घेऊन पूर्ण तयारीने तो पुन्हा दिल्लीला आला आणि एके दिवशी संधी साधून त्याने राधिकाला गाठले. पुन्हा त्याला झिडकारून राधिकाची पाठ वळताच त्याने खिशातून पिस्तुल काढले. पण लगेच न चालवता जिना सुरू होण्याच्या जराच आधी त्याने तिच्यावर झाडून जिन्यावरुन उतरुन पळ काढला. पुलावर बर्‍यापैकी वर्दळ असल्याने काही क्षण कुणाला काय झाले ते समजेना. ह्याच गोंधळाचा फायदा घेऊन राम सिंग तसाच पिस्तूल हातात घेऊन पळाला आणि दिल्लीच्या गर्दीत दिसेनासा झाला.

पोलीसांनी तिच्या घरच्यांकडे आणि महाविद्यालयातील मित्रपरिवाराकडे आधी चौकशी केली. मग इतर तपास सुरु झाला आणि राम सिंगच्या खोलीत राहणार्‍या मित्रांकडून माहिती मिळाल्यावर तपास वेगाने करुन त्याला मुंबईतून अटक केली. राम सिंगला त्याच्या कृत्याविषयी अजिबात पश्चात्ताप नव्हता "माझी बायको नाही झाली तर आता इतर कुणाचीही होणार नाही" असले विकृत समाधान त्याच्या चेहर्‍यावर झळकत होते.

मला सर्वात जास्त क्लेषकारक वाटलेली बाब म्हणजे राधिकाच्या घरच्यांच्या चौकशीत पोलीसांना जी धक्कादायक बाब समजली ती होय. असे काही प्रकार अनेक दिवस सुरू असल्याचे राधिकाने तिच्या घरच्यांना सांगितलेच नव्हते! मग त्याचं नावही ठाऊक असणं दूरच राहिलं. राम सिंगला जेव्हा अटकेनंतर तिच्या घरच्यांनी पाहिले तोपर्यंत त्यांनी त्याला त्यांच्या घराच्या आसपास बघितलेही नव्हते!! राधिकाने जरी फक्त तिच्या घरच्यांना 'एक माणूस आपला पाठलाग करत असतो आणि आपल्याला छेडत असतो" असं नुसतं सांगितलं असतं तरी पुढची कारवाई करुन पुढची अप्रिय घटना टाळता आली असती.

हे समजल्यावर मनात असंख्य प्रश्नांचे मोहोळ उठले. असे का झाले असावे? याला घरचे वातावरण कारणीभूत असावे का? शक्य आहे. कारण असले प्रकार घडल्यावर "तुझीच काहीतरी चूक असेल" अशी मुक्ताफळे उधळणारे पालक आहेतच की. मुलांना आई-वडीलांची इतकी भीती वाटावी, की छेडछाड आणि पाठलागासारख्या गंभीर बाबीही त्यांना सांगायला संकोचावे? मुलांना - आणि विशेषतः मुलींना) धाकात ठेवण्याच्या प्रयत्नात आपण त्यांना आपल्यापासून दूर करत आहोत ह्याची जाणीव पालक म्हणून आपल्याला राहिली नाही असे झाले आहे का? मुले आणि आई-वडील/एकूणच घरातले यांच्यातला संवाद इतका हरवत चालला आहे का, की आपल्या अब्रू आणि जिवाला असलेल्या धोक्याबाबतही घरच्यांशी बोलावेसे मुलांना वाटू नये? की राधिकाला वाटलं तशी ही बाब गांभीर्याने घेण्याजोगी वाटत नाही अनेक मुलांना? बाहेर घडणारं सगळं आपल्या आई-वडिलांना सांगणारी मुले आहेत, मान्य. पण अगदी काहीच न बोलणारी, थोडंच सांगणारी, किंवा नेमकं महत्वाचं तेच न सांगणारीही मुलं आहेतच की.

विकृत मंडळी जागोजागी असणारच, पण मग मुले असले प्रकार घरी का सांगत नसावीत? काहीही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असा विश्वास आपण आपल्या मुलांच्या मनात निर्माण करण्यात अपयशी ठरतोय का?

अशा अनेक राधिका या आधी झाल्या आहेत. पुढेही होतील. पण मुलांच्या मनात विश्वास निर्माण करण्याच्या दिशेने — जेणेकरुन त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकता येतील — आपल्याला काय करता येईल?

Friday, October 15, 2010

ज्याची त्याची बांधीलकी

स्थळः एका मोठ्या कंपनीची मोठी कॉन्फरन्स रूम.

विषयः व्यक्तिमत्व विकास आणि मनःशांती (किंवा तत्सम काहीतरी).

वक्ता: एक नावाजलेला समुपदेशक. बाकी चर्चा झाल्यावर तो एक प्रश्न विचारतो, "काय केलं म्हणजे तुम्हाला आनंद होतो?"

आलेल्या उत्तरांपैकी बहुतेक उत्तरे मिस इंडिया, मिस युनिव्हर्स किंवा तत्सम स्पर्धांमध्ये त्या ललना देतात त्यासारखीच उत्तरे. काही खरी, काही खोटी. म्हणजे "मला गरीबांची सेवा केल्यावर आनंद मिळतो", "मला रुग्णसेवा करण्यात आनंद मिळतो", "मला कुठल्याही प्रकारची समाजसेवा केल्यावर आनंद होतो", वगैरे.
"मला दु:खी-पीडीतांची सेवा करण्यात आनंद मिळत नाही", एक कर्मचारी उत्तरतो.

झटक्यात सगळ्यांच्या नजरा 'हा आहे तरी कोण प्राणी' हे बघायला त्याच्याकडे वळतात.

"मला समाजसेवेत आनंद मिळत नाही", तो पुन्हा बोलतो.

"तुम्ही तुमचं म्हणणं अधिक स्पष्ट करून सांगाल का?" आता समुपदेशकाची उत्सुकताही चाळवली गेली असते.

"मला आनंद अनेक गोष्टीतून मिळतो. गाणी ऐकणे, वाचन करणे, वेगवेगळ्या प्रकारचे चांगले सिनेमे बघणे, विविध खेळ बघणे, माझ्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रपरिवाराबरोबर वेळ घालवणे, वगैरे.

मी समाजसेवा हे एक प्रकारची बांधीलकी किंवा कर्तव्य म्हणून करतो, कारण माझा आनंद हा 'इतरांना दु:ख असणे' यावर अवलंबून नसतो. My happiness does not depend on others being unhappy."

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

ही गोष्ट ऐकल्यावर मी विचारात पडलो. खरंच समाजकार्यात आनंद मिळतो असं सांगणारे फसवा आनंद तर मिळवत नाहीत?  हे नक्की कसलं लक्षण आहे? अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने आनंद शोधणे ही एक प्रकारची विकृती आहे का?  एकटेपणा घालवायला, काही कारणाने दु:खी झालेले मन रमवायला, वेळ आहे हाताशी म्हणून तो घालवायला (किंवा सत्कारणी लावायला) किंवा अशाच काही कारणांमुळे जेव्हा समाजसेवा केली जाते तेव्हा त्यात त्यात स्वार्थ गुंतल्याने हेतू शुद्ध राहत नाही, मग पुण्य मिळणं वगैरे तर दूरच. तुम्हाला काय वाटतं?

Friday, August 27, 2010

माझी चिडचिड आणि यथा प्रजा तथा राजा

माझी अनेक गोष्टींमुळे चिडचिड होते. त्यातली एक मुख्य म्हणजे लोकं जेव्हा स्वतः मध्ये अगदी सहजसाध्य असलेली सुधारणा घडवून आणल्यास परिस्थिती सुधारण्याची शक्यता असताना अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी, सरकार, व्यवस्थापन, पोलीस – ही यादी न संपणारी आहे – यांना दोष देत बसतात.

अर्थात उपरोल्लेखित घटकांचा काहीच दोष नसतो असं नाही, पण एक बोट त्यांच्याकडे असताना स्वतःकडे असलेली तीन बोटं मात्र दुर्लक्षिली जातात.

'यथा राजा तथा प्रजा' अशी म्हण आहे. पण ती बदलून 'यथा प्रजा तथा राजा' अशी करायला हवी असं हल्ली प्रकर्षानं वाटू लागलंय. आपल्या समाजाचं नैतिक अध:पतन इतकं झालंय की आपल्याला हे असले राज्यकर्ते मिळाले कारण आपलंच नाणं खोटं होतं म्हणून हे पटू लागतं.

तर, ह्याच विषयाशी संबंधीत माझी ही अवांतर चिडचिड.....

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

चिडचिड क्रमांक एकः गुन्हेगार आणि सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया

(१) संजय दत्त हा विविध आरोपांखाली मुंबई बाँबस्फोट खटल्यात अडकला आणि निकालात बेकायदेशीर शस्त्र बाळगणे वगैरे आरोपांखाली दोषी आढळला. त्यानंतर सामान्य जनतेने त्याच्यावर बहिष्कार घालायचं सोडून संजूबाबा संजुबाबा म्हणून डोक्यावर घेतलं, त्याचे अनेक चित्रपट लोकांनी उचलून धरले. सर्वसामांन्यांकडून देशद्रोह्याला हा असा पाठिंबा?

सायरा बानूला लगेच आपल्या धर्मभगिनीच्या मुलाचा पुळका आला आणि तिने "इस लडके को इतना पर्सिक्युट किया गया है...." असे एका वृत्तवाहिनीवर तारे तोडले. शिवाय तो सहा वर्षांसाठी तुरुंगात गेल्यास तो काम करत असलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांच कसं कोट्यावधींच नुकसान होईल वगैरे बकवास हिंदी चित्रपट क्षेत्रातील तथाकथित विद्वानांनी सुरु केलीच. म्हणजे ह्यांनी गुन्हा केला त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही, तुम्हाला त्या गुन्ह्याबद्दल कायद्याप्रमाणे शिक्षा होणं महत्वाचं नाही, पण तुमच्या नसण्यानं किती आर्थिक नुकसान होईल आणि ते टाळता कसं येईल किंवा भरून कसं काढता येईल ते महत्वाचं! बाकी देश, कायदा, वगैरे सटरफटर गोष्टी नका हो सांगू यांना!!

(२) "हाऊ क्युट ना, ही ही ही ही": कु़ख्यात डॉन अबू सालेम ह्याला अटक केल्यावर वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात आणलं असता त्याला 'बघायला' जमलेल्या तिथल्या काही निवासी महिला डॉक्टरांचे हे उदगार. तो क्युट आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण एका अंडरवर्ल्ड डॉनला – एका गुन्हेगाराला, खून्याला बघायला एवढी गर्दी? ते ही ठीक आहे, पण चांगल्या घरातल्या (हे गृहीत धरलं आहे) उच्चशिक्षित होऊ पाहणार्‍या महिलांच्या तोंडून हे असले उदगार? हरे राम!

(३) उपरोल्लेखित डॉन महाशयांची ठेवलेली बाई म्हणजेच रखेल म्हणजेच हिंदी चित्रपटातील दुय्यम नटी मोनिका बेदी हिचा एका रिअ‍ॅलिटी शो मध्ये सहभाग आणि एका दिवंगत राजकीय नेत्याच्या मुलाने तिच्याबरोबर केलेली सलगी वजा लगट - अनेक लोकांनी हाही कार्यक्रम चवीने बघितला आणि ट्रेन आणि बस मध्ये, नाक्यावर वगैरे कोण कसं दिसलंय याच्या जोरदार चर्चा झडल्या. ह्या कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. मग मालिका निर्मात्यांनी जर "लोकांना पाहिजे ते आम्ही देतो" असा युक्तीवाद केल्यास त्यात चूक काय?

(४) पुढे ह्या आणि अशा अनेक प्रकारे शेण खाल्लेल्या तसंच मारहाण आणि शिवीगाळ केल्यामुळे पहिल्या बायकोने घटस्फोट दिलेल्या या नेतापुत्राचं एका वाहिनीनं चक्क स्वयंवर मांडलं. त्याचा हा इतिहास ठाऊक असूनही देशभरातून मुलींची ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी झुंबड उडाली. कार्यक्रम सुरु असतानाही ह्या दिवट्याचे वेडेचाळे सुरुच. कार्यक्रम त्या वाहिनीवर सुरु झाल्यावर चक्क गगनभेदी टी.आर.पी.

या स्वयंवरात 'निवडलेल्या' दुसर्‍या बायकोलाही मारहाण आणि शिवीगाळ झाल्यावर तर कहर झाला. खेळ, शेती, हवामान, भाववाढ, पाऊस, महागाई, जागतिक घडामोडी वगैरे सारख्या बातम्या तीन-चार दिवस चक्क दुय्यम ठरल्या. पुढे साहेबांनी बायकोबरोबर प्रभादेवीला सिद्धीविनायक दर्शन कसं घेतलं, आम्ही आता सुखाने संसार कसा करू वगैरे टँण टँण टँण पद्धतीने मुलाखती दिल्या. हेही सगळं लोकांनी उत्साहाने पाहिलं.

(५) हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खानला एका दुर्मिळ जातीच्या प्राण्याची शिकार केल्याबद्दल अटक झाली. जामीनावर सुटका झाल्यावर त्याच्या बंगल्याच्या गच्चीत त्याने त्याच्या नेहमीच्या उघड्या अवतारात अत्यंत उर्मट भाषेत आपल्या 'चाहत्यां' समोर एक निर्ल्लज्ज भाषण ठोकलं. त्याचा प्रत्येक शब्द साधारण शंभराच्या आसपास जमलेले ते चाहते उचलून धरत होते. अक्षरशः जल्लोष सुरु होता. त्याने काही वावगं केलंय हेच उपस्थितांपैकी कुणाला वाटत नव्हतं!! मग त्याचा निषेध करणं, बहिष्कार टाकणं सोडाच!!!

काही काळाने त्यानं मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्याकडेला झोपलेल्या काही लोकांना चिरडलं. नंतर सलमान अनेक चित्रपट आणि रिअ‍ॅलिटी शो यामधून झळकला आणि लोकांनी त्याला प्रचंड पाठिंबा दिला.

या सगळ्यात मिडीया कसा पिसाटल्यासारखा करत होता त्याचा उल्लेख करायचा मोह आवरत नाही.
तुरुंगात असताना सलमानने कुठली भाजी खाल्ली, त्याच्या नेहमीच्या आवडी-निवडी काय ह्याची चवीने अक्षरशः दिवसभर चर्चा सुरू होती. संजय दत्त तुरुंगात कसा सुतारकाम शिकला हेही समजलं. तो तुरुंगात किती शांत असतो वगैरे आवर्जून सांगितलं गेलं.

पिसाटलेला मिडीया हा एक मोठा विषय आहे, पण सर्वसामान्य लोकांनी ह्या घटिंगणांवर बहिष्कार घालायचं सोडून त्यांना एखाद्या महात्म्याप्रमाणे वागणूक द्यावी हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. एकीकडे सरकार कायदा आणि सुरक्षितता राखण्यात कसं अपयशी ठरतं आहे ह्याच्या चर्चा करायच्या आणि दुसरीकडे कायदा मोडणार्‍यांना बहिष्काराच्या मार्गाने धडा शिकवायचा सोडून त्यांना आपल्याच पैशाने अधिकाधिक लोकप्रिय आणि धनवान व्हायला मदत करायची ह्याला काय म्हणावे?

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

चिडचिड क्रमांक दोनः लोका सांगे ब्रह्मज्ञान...

मला काही दिवसांपूर्वी आंतरजालावरून फिरत फिरत एक विपत्र आलं होतं, त्यात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्या त्या गुन्ह्याप्रमाणे होणार्‍या दंडाची रक्कम किती याची यादी दिली होती. म्हणजे सिग्नल तोडल्यास किती दंड, नो एन्ट्री मध्ये शिरल्यास किती दंड, गाडी चालवताना भ्रमणध्वनीवर बोलताना आढळल्यास किती दंड, वगैरे. कारण अर्थाच की पोलीस वाट्टेल तो दंड आकारतात आणि पावती देत नाहीत. ते विपत्र कितीही उपयोगी असलं तरी मला अंमळ गंमतच वाटली. कारण तोपर्यंत आणि हा लेख लिहीपर्यंत वाहतूकीच्या नियमांचं पालन कसं करावं यासंदर्भात एकही विपत्र असं आंतरजालावर फिरताना आढळलं नाही किंवा मला कुणी पाठवलं नाही.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

चिडचिड क्रमांक तीनः स्वतःकडे तीन बोटं

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका कंपनीमधला किस्सा ऐकण्याचा योग आला. कंपनी व्यवस्थापनाने 'ओपन फोरम' सभा आयोजित केली होती. त्यात काही कर्मचारी 'कँटीनमध्ये असणारा स्वच्छतेचा अभाव' या विषयी तावातावाने बोलत होते.

अ‍ॅडमिनच्या व्यवस्थापक साहेबांनी प्रश्न केला "नक्की कसली अस्वच्छता असते?"

जी उत्तरं आली त्यात प्रामुख्याने कँटीनमध्ये अर्धवट खाल्लेल्या बिस्किटांचे पुडे, शीतपेयांचे रिकामे कॅन, चॉकलेट वगैरेंचे इतस्ततः पडलेले कागद, सिगरेटची थोटके, इत्यादींचा समावेश होता. अर्थातच कँटीन प्रशासनाकडून हा कचरा कसा वेळेवर साफ केला जात नाही ही मु़ख्य तक्रार होतीच.

"ठीक आहे, मी संबंधितांना सूचना देतो," व्यवस्थापक उत्तरले, "पण मला एक सांगा, हा कचरा कोण करतं?"

उपस्थितांमध्ये कुजबूज सुरु झाली. आता कुणीही उत्तर द्यायला पुढे येईना.

"मी सांगतो ना, तुम्हीच," व्यवस्थापकांनी बाँब टाकला.

"कॅंटीनमध्ये कोण खातं? तुम्ही." आता व्यवस्थापक साहेबांचा आवाज किंचित चढला होता.

"कॅंटीनमध्ये योग्य जागी कचर्‍याचे डबे ठेवलेले आहेत. त्यांचा उपयोग करण्याऐवजी टबलांवर, खुर्च्यांवर, आणि जमिनीवर तुम्ही उल्लेख केलेल्या गोष्टी कोण टाकतं किंवा तशाच ठेवतं? तुम्ही."

"सगळेच असं करतात असं नाही, पण जे करत नाहीत ते इतरांना हे करण्यापासून परावृत्त का करत नाहीत? ऐकलं नाही तक्रार/सुचना करण्यासाठी पत्रपेटी ठेवलेली आहे. त्याकडे दुर्लक्ष कोण करतं? तुम्ही."

पुढे काही सुधारणा झाली की नाही ते समजलं नाही, पण स्वच्छतेबद्दल कंपनी व्यवस्थापनाला जाहीर दोष देणार्‍यांची तोंड निदान तेव्हा तरी बंद झाली.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

तर माझी चिडचिड होण्याची ही काही कारणं. समाजातील खलप्रवृत्ती व लोकांच्या विसंगत प्रतिक्रिया आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याऐवजी व्यवस्थेला कायम दोष देणार्‍यांविषयी तुमचा काय अनुभव आहे?

Saturday, May 22, 2010

अजि म्या पु.ल. पाहिले




महाविद्यालयात असताना डोक्यात अनेक खुळं घुसतात, ठाण मांडून बसतात आणि मग जे काही ठरवलं असेल ते तडीस नेल्याखेरीज मन स्वस्थ बसू देत नाही. ते वयच तसं असतं, मग मी तरी त्याला अपवाद कसा असणार? त्यातलंच एक वेड म्हणजे माझे आवडते लेखक आणि अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना भेटायचं. पण माझ्यासमोर मूलभूत का काय म्हणतात तसा प्रश्न उभा होता की "कसं?"

वार्षिक परिक्षा संपल्यावर एकदा 'गणगोत' हे पुस्तक वाचत बसलो असता अचानक मनात विचार आला.....महाविद्यालयालयीन किंवा ग्राम्य भाषेत सांगायचं तर 'डोक्यात किडा वळवळला'...की आपण यांना भेटायला हवं, नव्हे भेटायचंच.

पुस्तक वाचून संपवलं आणि मेजावर ठेवणार तोच माझ्या हातातून सटकलं. खाली पडू नये म्हणुन पटकन दोन बोटात धरलं तेव्हा उचलताना पुस्तकाच्या सुरुवातीला पुस्तकाचे हक्क वगैरे लिहीलेल्या पानावर पु.लं.चा पुण्यातला पत्ता दिसला आणि माझी ट्युब पेटली. सुट्टीत पुण्याला मामाकडे जाणार होतोच. म्हटलं तेव्हा सरळ त्यांच्या घरी जावं. पण मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरात त्यांची घरं असल्याने ते नक्की कुठे असतील हे कसं समजणार ही सुद्धा समस्या होतीच. शिवाय फोन करून भेट ठरवायला मी काही पत्रकार नव्हतो किंवा कुठला कार्यक्रम ठरवायला जाणार नव्हतो. पण माझ्या नशीबात त्यांचं दर्शन घडणं लिहिलं होतं बहुतेक. कारण दुसर्‍याच दिवशी एका वर्तमानपत्रात ते कुठल्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात असल्याचं वाचनात आलं आणि ठरवलं की ह्या पुण्याला मामाकडे जाईन तेव्हा आगाऊपणा करून सरळ त्यांच्या घरीच जायचं.

मग ४ जून १९९६ च्या गुरुवारी दुपारी साधारण चार-साडेचारच्या सुमारास मी आणि माझा मामेभाऊ सुजय असे पु.ल. रहात असलेल्या रूपाली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या त्यांच्या सदनिकेसमोर उभे राहिलो. आम्ही भलतं धाडस केलं होतं खरं, पण पु.लं.ना आमच्यासारख्या आगाऊमहर्षींकडून त्रास होऊ नये म्हणून सदैव सजग असणार्‍या सुनीताबाई आम्हाला आत तरी घेतील की नाही अशी भीती होती. "शेवटी आलोच आहोत तर बेल तर वाजवूया, फार फार तर काय होईल, आत घेणार नाहीत, भेटणार नाहीत, एवढंच ना" अशी स्वत:चीच समजूत काढून आम्ही धीर केला आणि बेल वाजवली". दार उघडलं गेलं आणि........

..........."अजि म्या ब्रह्म पाहिले " अशी अवस्था झाली. समोर साक्षात पु.ल.!

मी भीत भीत म्हणालो, "आम्ही मुंबईहून तुम्हाला भेटायला, तुमची स्वाक्षरी घेण्यासाठी आलो आहोत, आम्ही येऊ का?". मी मनात हुश्श केलं.

"आत या," पु.ल. म्हणाले. आम्हाला हायसं वाटलं. आम्ही दोघांनी त्यांचा प्रत्येक शब्द मनात साठवून ठेवायचा असं ठरवलं होतं. खरं सांगतो, त्यांनी त्याक्षणी "चालते व्हा" असं म्हणाले असते तरी आम्हाला तेवढाच आनंद झाला असता.

थोडं विषयांतर होतंय, पण एक उदाहरण देऊन कारण सांगतो. इथे मला लौकीकदृष्ट्या नुकसान झालं तरी त्याचा फायदा कसा करून घ्यावा ह्याच्याशी संबंधीत एक किस्सा आठवला.

गॅरी सोबर्स यांनी इंग्लंड मधल्या एका काऊंटी सामन्यात माल्कम नॅश नामक गोलंदाजाला एका षटकात, म्हणजेच सहा चेंडूंवर, सहा षटकार मारले. पु.लं.नीच एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे 'मुंबईत क्रिकेट हा खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे' तसा तो राणीच्या देशातही असावा, कारण नॅशने आपली गोलंदाजी धुतली गेली म्हणून रडत न बसता त्याला ते सहा षटकार कसे मारले गेले ह्याचं रसभरीत वर्णन करणारे कार्यक्रम (टॉक शो) सादर करून त्याच्या आख्ख्या क्रिकेट कारकिर्दीत कमावले नसतील इतके पैसे कमावले.

तद्वत "आम्हाला हाकलले, पण कुणी? प्रत्यक्ष पु.लं.नी" असा मित्रमंडळींमध्ये, खाजगी का होईना, कार्यक्रम त्यांना 'वीट' येईल इतक्या वेळा सादर केला असता

आम्हाला आत यायला सांगून पु.ल. सोफ्यावर बसले. त्यांच घर अगदी त्यांच्यासारखंच साधं आणि नीटनेटकं. समोर भिंतीवर चार्ली चॅपलीनचं एक पोस्टर. आम्ही आपापल्या कागदावर त्यांची स्वाक्षरी घेतली. मी माझ्या हातातल्या कॅमेर्‍याकडे बोट दाखवून त्यांना "आमच्याबरोबर तुमचा एक फोटो काढू का?" अशी विनंती केली. पण त्यांनी "नका रे, आजारी माणसाचा कसला फोटो काढायचा" असं म्हणून नकार दिला. मी थोडा खजील झालो, कारण त्यांचे गुढगे दुखत होते हे त्यांच्या चालण्यातून दिसत होतं. त्यांनी असं म्हणताच सुजयच्या चेहर्‍यावर एक नाराजीची सुक्ष्म लकेर उमटलेली मला दिसली. "ठीक आहे, माफ करा. स्वाक्षरी बद्दल धन्यवाद" असं कॄतज्ञतेने म्हणून आम्ही त्यांच्या पाया पडलो. सुनीताबाईंकडे पाणी मागितलं व पिऊन लगेच निघालो.

माझ्यासाठी "आता मी मरायला मोकळा" असं वाटण्याचा तो क्षण होता.

"काय हे, फोटो का नाही काढून दिला, पु.ल. आहेत ना ते", आम्ही इमारती बाहेर आल्यावर सुजयची चिडचिड बाहेर पडली. लहान मूल रुसल्यावर कसं दिसेल तसे हुबेहुब भाव त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते. "अरे सुजय", मी म्हणालो, "तू एक लक्षात घे, ते पु.ल. असले तरी भारतीय रेल्वे किंवा एस.टी. सारखी 'जनतेची संपत्ती' नाहीत. त्यांची प्रायव्हसी महत्त्वाची नाही का? आपण आगाऊपणा करून भर दुपारी गेलो खरं, नशीब सेलस्मन लोकांना हाकलतात तसं आपल्याला हाकलून नाही दिलं. उगीच कुणालाही फोटो कोण काढू देईल?" आता सुजयची नाराजी थोडी कमी झालेली दिसली.

"आणि असं बघ, काही देवळात फोटो काढायला बंदी असते की नाही, तसंच हे ही समज. ह्या साहित्यातल्या आपल्या दैवताचा फोटो आपल्याला काढता आला नाही असं समज. आणि त्यांनी आपल्याला प्रसाद दिलाय की!"

"प्रसाद?" सुजय बुचकळ्यात पडला. "अरे आपल्याकडे ह्या साहित्यातल्या देवाचा स्वाक्षरीच्या रूपाने प्रसाद आहेच की". असं म्हणताच सुजयची खळी खुलली.

मी पु.लं.ना प्रत्यक्ष भेटलो हे ऐकल्यावर द्राक्ष आंबट लागलेली एक कोल्हीण...आपलं...माझी एक मैत्रीण म्हणाली, "हँ, त्यात काय पु.ल. आपल्या पुस्तकातून सगळ्यांनाच भेटत असतात". खरय की - लेखक आणि कवी त्यांच्या पुस्तकातून, खेळाडू मैदानात किंवा टी.व्ही. वरील थेट प्रक्षेपणातून आणि कलाकार त्यांच्या कलेतून सगळ्यांनाच भेटत असतात. पण यांपैकी आपली आवडती व्यक्ती प्रत्यक्ष समोरासमोर भेटावी, त्या व्यक्तीशी थोडंसं का होईना बोलायला मिळावं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं. पण ते भाग्य फार थोड्यांच्या नशीबी येतं आणि अशा नशीबवान लोकांपैकी मी एक आहे ही एक खास गोष्ट खचितच आहे.


मुंबईला परतताच वर्तमानपत्रातला पु.लं.चा एक फोटो त्या कागदावर चिकटवून तो स्वाक्षरीचा कागद फ्रेम करून घेतला. वरच्या चित्रात दिसणारी ती फ्रेम पुण्यातील माझ्या घरात त्या जादूई क्षणांची आजही आठवण करून देते आहे.

मी ज्या दिवशी पु.लं.ना भेटलो तो दिवस ४ जून आणि त्यांची पुण्यतिथी १२ जून हे दोन्ही दिवस जवळ आले आहेत असं लक्षात आलं आणि ह्या आठवणी सहज शब्दबद्ध झाल्या. तुम्हाला कुणाला पु.ल. भेटले असल्यास तुम्हीही तुमच्या आठवणी सांगा.