Friday, August 26, 2016

पंडित नामा ९: श्री बी. के. गंजू

बी. के. गंजू
निवासः छोटा बाझार, श्रीनगर
व्यवसायः नोकरी, दूरसंचार विभाग, केंद्र शासन
हत्या: २२ मार्च १९९०

"काश्मीर में अगर रहना होगा
अल्लाह-हू-अकबर कहना होगा"

काश्मीरमधे रस्त्यावर घोळक्याने फिरणार्‍या जमावाची ही आणखी काही आरोळ्यारूपी मुक्ताफळे. यातली पहिली घोषणा एका 'सेक्युलर' परिचिताला सांगितल्यावर त्याने लगेच "तुम्ही नाही का, 'अगर इस देश में रहना होगा, तो वंदे मातरम् कहना होगा' म्हणता!" असे तारे तोडले. आवाजात शक्य तितकं मार्दव आणून त्याला 'वंदे मातरम्' चा अर्थ देशाला आई मानून वंदन करणे असा आहे, कुठल्याही विशिष्ठ इश्वराला वंदन करणे नव्हे, हे लक्षात आणून दिलं. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी हे मानणारे काश्मीरमधले पंडित काश्मीरच्या भूमीला माता समजून वंदन करायला केव्हाही तयार झाले असते. पण त्यासाठी जबरदस्तीचे धर्मांतर कुणाला मंजूर होईल? आम्ही मानतो त्याच इश्वराला तुम्ही मानलं पाहीजे ही जबरदस्ती माथेफिरूच करु शकतात, आणि अशी जबरदस्ती काश्मिरात सर्रास सुरु होती.

श्रीनगर मधल्या छोटा बाझार जवळच्या एका मशीदीच्या एका भिंतीवर लावलेल्या एका 'खतम करायच्या व्यक्तीं'च्या यादीत श्री बी. के. गंजूंचं नाव पाहून एकाने ती गोष्ट श्री गंजूंना सांगितली. आत्तापर्यंत अशा घटना आणि याद्यांची केवळ ऐकीव माहिती असलेल्या गंजू दांपत्याचं स्वतःचंच नाव त्या यादीत लागल्याचं पाहून धाबं दणाणलं. नक्की कुणाची मदत घ्यावी, कुणाशी बोलावं हे त्यांना समजेना. काश्मीरमधे पोलीसांची मदत घेणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखंच होतं. आता कुंपणच शेत खाऊ लागलं होतं. ती रात्र गंजू दांपत्याने एकमेकांकडे पण शून्यात बघत घालवली. जरा जरी आवाज झाला तरी ते दचकत. त्यांना कुणीतरी दार ठोठावत असल्याचाही मधेच भास होई. ही रात्र कधी संपणारच नाही की काय अशी भीती दोघांना वाटू लागली. क्वचित ताण असह्य होऊन मग डोळ्यांतून घळाघळा अश्रू ओघळत. आपण साधे नोकरदार. आपण कुणाचं काय वाकडं केलं आहे? असा श्री गंजूंना प्रश्न पडे. पण याचं उत्तर एकच होतं. त्यांनी काश्मिरात हिंदू म्हणून जन्म घेण्याचं घोर पातक केलेलं होतं.

पहाटे केव्हातरी यांत्रिकपणे सौ गंजू उठल्या आणि देवघरात गेल्या. पण त्यांना साधं निरंजन लावण्याचाही धीर होईना. मग त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन तिथेही दिवा न लावता अर्धवट अंधारात चहा केला. सगळी रात्र भीतीने थरथरत विचित्र मनस्थितीत जागून काढलेल्या गंजू दांपत्याला तो चहा ना धड गोड लागला ना ते त्याची उष्णता अनुभवत त्याचा धड आस्वाद घेऊ शकले. तेवढ्यात फोनच्या आवाजाने ते पुन्हा दचकले. ते घरात आहेत की नाहीत हे बघायला कुणीतरी फोन केला गेला असावा. अर्थातच तो फोन घ्यायची त्यांची हिंमतच झाली नाही.

सकाळी साधारण नऊच्या सुमारास दारावर थाप पडली आणि त्या बरोबरच "गंजू साहेब कुठे आहेत, आम्हाला काही तातडीचं काम आहे त्यांच्याकडे" हे शब्द कानावर पडले. नक्की काय घडतं आहे याची अर्थातच पूर्ण कल्पना असणार्‍या सौ. गंजू "ते घरी नाहीत. ऑफिसला गेले आहेत" असं उत्तरल्या. दार ठोठावणार्‍यांचा त्यावर विश्वास बसला नाही. "असं कसं होईल, इतक्या लवकर ते ऑफिसला कसे जातील? दार उघडा. खूप तातडीचं काम आहे हो आमचं", त्यांनी अजून हेका सोडलेला नव्हता. पण सौं गंजूंनी कोणताही धोका पत्करायचा नाही असंच ठरवलं होतं. त्यांनी आता त्यांच्या हाकांना उत्तर द्यायचंही थांबवलं. काही वेळाने दारावरच्या थापा थांबल्या आणि दार उघडायच्या विनंत्याही. आता बाहेरून कुठलाही आवाज येत नव्हता. बहुतेक बाहेर जे कुणी होतं ते बहुतेक गेले असावेत असं वाटून सौ गंजूंनी एका खिडकीतून हळूच बाहेर डोकावून बघितलं तेव्हा बाहेर कुणीच दिसलं नाही. सौ गंजूंनी नवर्‍याला पोलीसांना हळूच फोन करण्याचा सल्ला दिला. फोन झालाच होता तेवढ्यात घराच्या एका बाजूच्या खिडकीच्या बाजूने जोरात धडक बसल्याचा आवाज झाला. कुणीतरी घरात घुसण्याचा प्रयत्न करत होतं. प्रसंगावधान राखून सौ. गंजूंनी श्री बी. के. गंजूंना गच्चीवर ठेवलेल्या आणि धान्याच्या पोत्यांनी वेढलेल्या एका रिकाम्या पिंपात जाऊन लपायला सांगितल. श्री गंजू धावले.

काही वेळातच दोन अतिरेकी घरात घुसण्यात यशस्वी ठरले. त्यांच्यापैकी एकाच्या हातात कलाशनिकोव्ह** होती आणि दुसर्‍याच्या हातात पिस्तूल. आता सौ गंजूंना विचाराच्या फंदात न पडता त्या दोघांनी घराच्या कानाकोपरा शोधायला सुरवात केली. कसंही करुन त्यांना श्री गंजूंना शोधायचंच होतं. एका रिकाम्या खोलीला लावलेलं कुलूप तोडुन ते आत शिरले. तिथेही आपलं सावज न सापडल्याने ते वैतागले. रक्ताला चटावलेल्या हिंस्त्र श्वापदाच्या आवेशात "तो उंदीर फार काळ मोकाट फिरू शकणार नाही. कधी ना कधी सापडेलच", असं म्हणून ते घराबाहेर पडले.

आता सौ गंजूंनी सुटकेचा नि:स्वास सोडला. या वेळी कदाचित त्यांनी असाही विचार केला असेल की पहिली संधी मिळताच काश्मीर खोरं सोडून जम्मू किंवा इतर कुठेतरी पळून जायचं.

पण दुर्दैवाने तसं व्हायचं नव्हतं. श्री गंजू हे गच्चीवर पिंपात लपताना गंजूंच्या एका काश्मिरी मुसलमान शेजार्‍याने बघितलं होतं. गंजूंच्या घरातून बाहेर पडलेले अतिरेकी काही अंतर जाताच त्या शेजार्‍याने त्यांना गंजूंच्या घराच्या छताकडे बघा अशी खूण केली. आपली खेप 'फुकट' जाणार नाही या आनंदात आणि अर्थातच इतका वेळ फुकट घालवल्याच्या संतापात ते दोघे पुन्हा श्री गंजूंच्या घराकडे धावतच निघाले. आता पुतळ्यासारख्या निश्चल उभं राहिलेल्या सौ. गंजूंकडे डुंकूनही न बघता ओलांडून ते घराचा जिना धडाधडा चढून आपल्या लक्ष्याच्या दिशेने गच्चीवर निघाले. वर जाताच वेळ न दवडता त्यांनी श्री बी. के. गंजूंवर गोळ्यांचा वर्षाव केला. रक्ताच्या चिळकांड्या आजूबाजूच्या तांदळाच्या पोत्यांवर उडाल्या. आता त्या हरामखोरांचं समाधान झालं होतं. तरीही शेवटच्या घटका मोजणार्‍या श्री गंजुंना ते दोघे अतिरेकी "आता तुझ्या घरच्यांना तुझ्या रक्ताने माखलेले हेच तांदूळ खाऊ देत. काय चविष्ट लागेल ना मग जेवण!" असं बोलून खुनशी आनंदात हातातलं पिस्तुल आणि कलाशनिकोव्ह नाचवत निघून गेले. मागे धाय मोकलून आकांत करणार्‍या सौ गंजूंना सोडून.

"दिल मे रखो अल्लाह का खौफ
हाथ मे रखो कलाशनिकोव्ह"

अल्लाहचं नाव घेत कलाशनिकोव्ह हातात घेतलेल्या त्याच्या बंद्यांनी आणखी एका काश्मीरी काफिराला संपवलं होतं.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

श्रावण कृ. , शके १९३८
२६ ऑगस्ट इसवी सन २०१६
--------------------------------------------------------

**कलाशनिकोव्ह = मशीनगन