Showing posts with label Corona. Show all posts
Showing posts with label Corona. Show all posts

Friday, September 25, 2020

काही नाही, इ-शाळा चालली आहे!

प्रसंग एकः

"अरे, मल्हारचं नाव घेतल्यावर मल्हारनी बोलायचं, बाकीचे कशाला बोलताय?"

- हे बोलताना शिक्षिकेने प्रचंड संयम ठेवल्याचं आवाजात आणलेल्या सुलोचनाबाईं इतक्या आर्ततेवरुन स्पष्ट कळत होतं. पण मुलं आर्तता वगैरे समजण्याच्या पलिकडे गेलेली असतात. 

मी शिक्षक झालो नाही तेच बरं आहे. "अरे काय वर्ग आहे की मासळी बाजार?" असं खेकसलो असतो. 

प्रसंग दोनः मराठीचा तास.

"बाई मी भूप राग म्हणून दाखवू?" असं अनेकदा ऐकल्यावर... "हं आता समीर भूप राग म्हणून दाखवतोय हं, ऐका रे सगळ्यांनी समीरचं!" असं "आलीया भोगासी" च्या चालीवर ताई म्हणतात.

मग समीर भूप राग म्हणतो. सगळे टाळ्या वाजवतात. मग समीर म्हणतो, "बाई आमचे आठ राग शिकून झालेत." आता बाईंच्या आणि बाकी औरंगजेबांच्या पोटात गोळा येतो. तरी आणखी एक दोन जणं नरडं साफ करुन घेतातच. एक जण पियानो वाजवतो. कार्टं पियानो वाजवत असताना मला, "बाई मी 'चलो इक बार फिर से, अजनबी बन जायें हम दोनो' म्हणू का?" असं विचारण्याची सुरसुरी येते पण मी ती "असं मुलांच्या वर्गात घुसू नये" असं स्वतःला मनातल्या मनात बजावून आवरतो. 

त्यात आवाज ब्रेक होत असतो. तरी सगळं झाल्यावर एक जण मधेच, "बाई मी अमुक वाजवू?" असं विचारतो. नेमका तेव्हा आवाज ब्रेक होत नाही. त्यामुळे शिक्षिका, "वाजव बाबा!" म्हणतात. आता शिक्षिकेच्या आवाजात हताशपणा दिसू लागतो. पुन्हा आवाज ब्रेक व्हायला लागतो त्यामुळे तो नक्की काय वाजवतो आहे कळत नाही. एक जण, "चायला काय चाललंय" असं वैतागून म्हणतो. तेव्हा नेमका आवाज व्यवस्थित येत असल्याने ते सगळ्यांना नीट ऐकू जातं, आणि "कोरोना जाऊदे आणि हा शाळेत येऊदे मग बघतो" असं तो वाजवणारा मनातल्या मनात म्हणतो.  

तेवढ्यात एक जण, "ताई मला साप खूप आवडतात" असं म्हणतो. इ-शाळा असली, तरी बाई बसल्या जागी दचकतात. तरीही "हो का, वा वा, छान छान" असं म्हणतात. तेवढ्यात कुणीतरी, "ए घाणेरड्यांनो" असं म्हटलेलं स्पष्ट ऐकू येतं. 

सुमारे पावणेचार वाजता "बाई मला भूक लागली मी जेवायला जाते" असं गीता नामक एक कन्या विव्हळते. मागून गीताच्या आईचा पार बाहेरच्या खोलीतून आलेला "पय्चक्" असा आवाजही नीट ऐकू येतो. "अरे गीता असं काय ते करायचं" असं म्हणून बाई तिला जाऊ देतात. जाऊ न देऊन सांगतात कुणाला?!

"आता आपण थांबू" बाई म्हणतात.

"बाई मी एक कविता म्हणून दाखवू?" असं महेश नामक एक पिल्लू म्हणतं. आता मात्र ताईंचा संयम संपतो. "आता महेश कविता म्हणतोय मग आपण थांबणार आहोत आज", बाई ठणकावतात. महेश कविता म्हणत असताना मध्येच कुणीतरी "पॅयँsssssssss" अशी सायरन वाजवतो. महेशची कविता म्हणून संपते, आणि ताई पटकन सेशन संपण्याच्या बटणावर क्लिक करतात.

आणि अशा रीतीने "मराठीचा तास" संपतो आणि माझ्या मनात शिक्षकांबद्दलचा आदर द्विगुणित होतो.

© मंदार दिलीप जोशी

टीप: शाळा आणि इतर संदर्भ दिलेले नसले तरी नावं बदलली आहेत.