Monday, October 10, 2016

दसरा सण मोठा, नसे विचारवांत्यांस* तोटा

चला, दसरा आला आणि सालाबादप्रमाणे आपट्याची पानं तोडू नका वगैरे नेहमीच्या बुद्धीभेद करणार्‍या पोस्टी नेटवर दिसू लागल्या.

तर्क आणि विज्ञानाला फाटा देऊन भावनिक बाबींवर भर दिला की असा काहीतरी विचित्र प्रकार निर्माण होतो. या सणाला अशा पोष्टी टाकायला "पहा पहा निसर्ग ओरबाडला जातोय" असं म्हणून भावनिक आवाहना बरोबरच मिथ्याविज्ञान अर्थात स्युडोसायन्सचा आधार घेतला जातो. इंग्रजीत एक म्हण आहे, "If you want to kill a dog, call it mad". तद्वत, हिंदू धर्मातील प्रथा एक एक करुन बंद पाडायच्या असतील तर "अमुक गोष्ट कुप्रथा आहे" हे आधी ठरवायचे आणि मग पद्धतशीरपणे हल्ला करायचा ही पद्धत आता नवीन नाही.

तारतम्य ठेऊन छाटणी केल्याने कोणत्याही झाडाची हानी होत नाही. आणि आपट्याच्या झाडाचं तर नाहीच नाही, कारण ते झाड खूप मोठं असतं. काही दिवसांनी पानं परत येतात. किंबहुना, हे सगळ्याच झाडांच्या बाबतीतलं शास्त्रीय सत्य आहे. आपट्याला आता कोवळी नुकतीच फुटलेली पालवी नाही. आता पाने जून झाली. अर्धामुर्धा पाला कापला तर झाडे अधिकच आटोपशीर वाढतील. पानांच्या कचर्‍याचाच प्रश्न असेल तर आपट्याची पाने हे उत्तम खत आहे. दुसर्‍या दिवशी टाकून देण्याऐवजी आपल्या कुंडीत पाने रिचवा.

छाटणी केल्यानंतर साधारण ४० ते ९० दिवसांत झाडांना नवी पालवी फुटते. अर्थात पालवी येण्याचे प्रमाण आणि वेळ झाडाच्या वयावर अवलंबून असते. नव्या पालवीला कीड लागण्याचा धोका असतो. त्यामुळे वातावरणात कीड नसलेल्या काळात पालवी येणे अधिक चांगले. त्यामुळे साधारणत: ऑक्टोबरमध्ये झाडांची छाटणी करावी. कारण पुढे येणाऱ्या थंडीत वातावरणातील किडीचे प्रमाण अत्यल्प असते.ही माहिती आपल्या पूर्वजांना देखील होती आणि म्हणूनच त्यांनी पाने वाटल्याने निसर्गाचे कोणतेच नुकसान होणार नाही उलट त्या झाडांचे संरक्षण होईल अश्या रीतीने ही परंपरा जपली असावी, परन्तु पुस्तक वाचून स्वतःला तत्वज्ञानी समजणारे आधुनिक पर्यावरण वादी आपल्या समोर वृक्षतोड होतांना बघत बसतात पण आपल्या सण उस्तव वेळी मात्र यांचे निसर्गप्रेम उफाळून येते, एरवी हजारो वृक्षतोडीची प्रकरणे घडतात पण तक्रार द्यायला हे पुढे येत नाहीत.

आता आपट्याच्या झाडाबद्दल जरा अधिक माहिती घेऊया. आपट्याला संस्कृतमधे अश्मंतक असं नाव आहे. हा झाला भाषा इतिहास. आपट्याची झाडं आशिया खंडातच आढळतात. हा झाला भूगोल. आता आपट्याच्या झाडाचा कशा कशासाठी उपयोग केला जातो ते पाहूया आणि वळूया विज्ञानाकडे.

आपटा हे औषधी वनस्पती म्हणून प्रसिद्ध आहे. आपट्याची पाने औषधी असतात. इतकंच नव्हे तर आपट्याच्या झाडाला येणार्‍या शेंगांच्या बिया,  तसेच फुले व झाडाची साल यांचा औषध म्हणून आणि विविध औषधी घटक म्हणून सर्रास वापर केला जातो. आपट्याच्या सालीपासून दोरखंड बनवतात. ज्या झाडांपासून डिंक मिळवला जातो त्यात आपट्याच्या झाडाचाही समावेश आहे. या झाडापासून टॅनीन मिळवतात. आता तुम्हाला अधिक परिचयाचा असलेला उपयोग सांगतो. आपट्याच्या पानांचा उपयोग विडी बनविण्याकरिता केला जातो. मग? बंद पाडायचे का हे सगळे उद्योग?

अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण | इष्टानां दर्शनं देही कुरु शत्रुविनाशनम् ||
अर्थ: आपट्याचा वृक्ष हा महावृक्ष असून तो महादोषांचे निवारण करतो.इष्ट(देवतेचे) दर्शन घडवितो व शत्रुंचा विनाश करतो.

वरच्या श्लोकातल्या महादोष निवारण या शब्दांचा निर्देश आपट्याचे औषधी गुण यांच्याकडे आहे.

जसं नारळाच्या झाडाचा नारळासकट एकूण एक भाग कामी येतो तसंच आपट्याच्या झाडाचे अनेक भाग मानवी उपयोगाचे आहेत. तेव्हा "नारळ काढू नका....पहा पहा निसर्ग ओरबाडला जातोय" हे जितकं अवैज्ञानिक विधान आहे, तितकंच खुळचट विधान "आपट्याच्या झाडाची पाने तोडू नका" हे आहे.

आणि अशा बकवास पोस्टी टाकणार्‍यांनी आपट्याची किंवा इतर किती झाडं लावली आणि जगवली आहेत? अशांना माझा फुकटचा सल्ला: उगा खुर्च्या उबवून लोकांनी काय करायचं त्याचे फुकटचे सल्ले देऊ नका. आधी अभ्यास करा आणि मग बोला. उगाच निसर्गप्रेमाचा आव आणून सणांवर घाव घालू नका.

यात रामायणातील सुद्धा संदर्भ आहे. कथा मोठी आहे तेव्हा संक्षिप्त स्वरूपात सांगतो. एकदा एका गुरूने शिष्याच्याच आग्रहावरुन त्याला चौदा कोटी मुद्रा गुरुदक्षिणा म्हणून द्यायला सांगितल्या. पण त्यात एक मेख होती. गुरूने अट घातली की त्या चौदा कोटी मुद्रा एकाच माणसाकडून आणल्या पाहीजेत. पण चौदा कोटी एकदम एकाच माणसाकडून कशा आणायच्या? ते फार अवघड. मग तो अयोध्येचे महाराज रघु यांच्याकडे पोहोचला. महाराज रघु हे दानशूर व विद्येची कदर करणारे आहेत अशी त्यांची ख्याती होती. पण नेमके त्याच वेळी महाराज रघुंनी यज्ञात सर्व संपत्ती दान केली होती. त्यामुळे त्यांनी त्या शिष्याला त्याची इच्छा पुर्ण करु शकत नसल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. पण पराक्रमी असल्याने इंद्रावर स्वारी करुन तेवढ्या मुद्रा तुला देतो असे आश्वासनही दिले. यामुळे इंद्र घाबरला व त्याने अयोध्येबाहेर आपट्याच्या तसेच शमीच्या झाडांवर कुबेराला सांगून सुवर्णमुद्रांचा वर्षांव , आणि मग त्या सगळ्या मुद्रा त्या शिष्याला दिल्या. पण त्या चौदा कोटी पेक्षा खूप जास्त होत्या म्हणून गुरुंनी १४ कोटीच ठेवून घेतल्या. आता बाकीच्या मुद्रांचे काय करायचे? महाराज रघूंनी एकदा दिलेले दान परत घ्यायचे नाही म्हणुन त्या मुद्रा परत घेण्याचे नाकारले. म्हणून त्या शिष्याने त्याच दोन झाडांच्या खाली त्या मुद्रा ओतून लोकांना त्या न्या असे सांगितले. अचानक धनलाभ झाल्याने व त्या वृक्षांखाली झाल्याने लोकांनी त्या झाडांची पूजा केली व त्या मुद्रा लुटल्या. हा दिवस दसर्‍याचा होता.

शमीच्या झाडावर पांडवांनी शस्त्रे लपवली ही कथा महाभारतात आहेच.

बाकी, आपट्याचंच झाड का? शमीचं का नाही? याला उत्तर इतकंच की हीच गोष्ट "आपण तोंडातून का भोजन करतो व पार्श्वभागातून का मलविसर्जन करतो? त्या ऐवजी ढुंगणातून जेवण व तोंडातून का नाही हगता येत? हा आपल्या मुक्त इच्छेवर (फ्री विलवर) निसर्गाचा आघात नव्हे का? इथपर्यंत नेता येईल. 

परंपरा टाकून देण्याचा अट्टाहास धरण्यापेक्षा कालानुरूप योग्य बदल अवश्य करावेत. सीमोल्लंघन म्हणजे मोहिमेवर जाऊन पराक्रम गाजवून सोने लुटून आणण्याची कल्पना पर्याय म्हणून फुले देऊन कशी साधणार? त्यापेक्षा आपट्याचे झाड प्रत्येक संकुलात रुजवण्याचा निर्धार केला तर अधिक योग्य ठरेल. पावसानंतर जड झालेले ओझे माफक पद्धतीने कमी करू आणि आपट्याचीच पाने लुटून आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची जाण ठेवू.

© मंदार दिलीप जोशी
अश्विन शु. ८, शके १९३९ | दुर्गाष्टमी | खंडेनवमी

कठीण शब्दांचे अर्थः
विचारवांत्या = perverted thought diarrhea