चित्रपटांतून कुकर्म अर्थात चोरी, दरोडेखोरी, स्मगलिंग, माफिया इत्यादी कृत्ये करणार्यांना किंवा आपल्याला हवं ते वाट्टेल त्या मार्गाने मिळवणारा नायक म्हणून प्रस्तुत केलं जाण्याची सुरवात खरं तर खूप पूर्वी झाली. ढोबळ मानाने सांगायचे झाले तर ही सुरवात अशोक कुमार नायक असलेल्या किस्मत (१९४३) या सिनेमापासून झाली असं म्हणता येईल. मात्र त्या वेळी जेवणात मीठ असावं इतकं अशा सिनेमांचं प्रमाण होतं. या प्रकाराला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली ते मात्र अमिताभ बच्चनच्या अँग्री यंग मॅन सिनेमांनी.
त्या काळात बॉलीवूड पुर्णपणे दाऊद आणि अंडरवर्ल्डच्या ताब्यात केलेलं नव्हतं तेव्हा किमान जे काही निर्माण व्हायचं त्याचा दर्जा उत्तम असायचा आणि म्हणूनच या प्रकाराला प्रतिष्ठा मिळण्यातून एक साध्य झालं की सामान्य जनतेच्या मनातलीही डॉन किंवा भुरट्या चोर्या करणार्याबरोबरच मोठे गुन्हे करणारा गुन्हेगार या प्रकाराबद्दल भीतीयुक्त तिरस्कार या भावनेची जागा कुतुहूलयुक्त आकर्षणाने घेतली. हे का झालं, याचा शोध घ्यायचा तर या चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते यांच्या नावांचा शोध घ्या, त्यांची पार्श्वभूमी तपासा म्हणजे तुम्हाला याचं रहस्य उलगडेल. चित्रपटसृष्टी पूर्णपणे माफियामय झाल्यावर त्याना दर्जाशी काही देणंघेणं उरलं नाही, कारण जो परिणाम पापभीरू जनतेच्या मनावर करायचा होता तो आधीच करुन झाला होता. उदाहरणादाखल शोले, डॉन, आणि परवाना या तीन सिनेमांबद्दल वाचा.
गुन्हेगारांच्या उदात्तीकरणाबरोबरच उद्योजक हे रक्तपिपासू, दुष्ट, स्वार्थी लोक असे रंगवले गेले. जुन्या काळचे, म्हणजे अगदी कृष्णधवल काळापासूनचे सिनेमे पाहिले तरी नायक हे गरीब पण मनाने उदार. उलट मारवाडी पोषाखातले, सेठ धरमदास किंवा तत्सम सूचक नावे असलेले वगैरे नाव असणारे व्हिलन, गोरगरीबांना लुटणारे असेच दाखवले गेले. हिंदी चित्रपटांतून भारतीय/हिंदू संस्कृतीचे विकृत दर्शन आणि शांतीदूतांचे उदात्तीकरण हा संबंधित पण मोठा विषय आहे, त्या संदर्भात इथे वाचता येईल..
कट टू १९९० दशकः
"हाऊ क्युट ना, ही ही ही ही": कु़ख्यात डॉन अबू सालेम ह्याला अटक केल्यावर वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात आणलं असता त्याला 'बघायला' जमलेल्या तिथल्या काही निवासी महिला डॉक्टरांचे हे उदगार आहेत. तो क्युट आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण एका अंडरवर्ल्ड डॉनला – एका गुन्हेगाराला, खून्याला बघायला एवढी गर्दी? ते ही ठीक आहे, पण चांगल्या घरातल्या (हे गृहीत धरलं आहे) उच्चशिक्षित होऊ पाहणार्या महिलांच्या तोंडून हे असले उदगार निघावेत हा उपरोल्लेखित उदात्तीकरणाचाच परिणाम म्हणावा लागेल.
जे निर्माते "लोकांना पाहिजे ते आम्ही देतो" असा युक्तीवाद करतात तो अंशतः बरोबरच आहे, पण 'लोकांना काय हवं' या पेक्षा 'लोकांना काय चालतं ते आम्ही देतो' हे सत्याच्या अधिक जवळ जाणारं आहे. आणि लोकांना ते चालावं याची पार्श्वभूमी ऐंशीच्या दशकातच तयार करण्यात आली हे आपण विसरता कामा नये. प्रत्येक माणसांत करड्या छटा असतात असं गोंडस पण फसवं कारण देऊन गुन्हेगारीला वलय आणि सामाजिक स्वीकारार्हता प्राप्त करुन देण्यात आली.
हरणमार्या सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी अटक झाली. जामीनावर सुटका झाल्यावर त्याच्या बंगल्याच्या गच्चीत त्याने त्याच्या नेहमीच्या उघड्या अवतारात अत्यंत उर्मट भाषेत आपल्या 'चाहत्यां' समोर एक निर्ल्लज्ज भाषण ठोकलं. त्याचा प्रत्येक शब्द साधारण शंभराच्या आसपास जमलेले ते चाहते उचलून धरत होते. अक्षरशः जल्लोष सुरु होता. त्याने काही वावगं केलंय हेच उपस्थितांपैकी कुणाला वाटत नव्हतं!! मग त्याचा निषेध करणं, बहिष्कार टाकणं सोडाच!!! काही काळाने त्यानं मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्याकडेला झोपलेल्या काही लोकांना चिरडलं (यातून तो निर्दोष बाहेरही पडला). नंतर सलमान अनेक चित्रपट आणि रिअॅलिटी शो यामधून झळकला आणि आजही उजळ माथ्याने वावरतो आहे.
पिसाटलेला मिडीया हा एक मोठा विषय आहे, पण सर्वसामान्य लोकांनी चवीने त्यांचे सिनेमे बघितले हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. एकीकडे सरकार कायदा आणि सुरक्षितता राखण्यात कसं अपयशी ठरतं आहे ह्याच्या चर्चा करायच्या आणि दुसरीकडे कायदा मोडणार्यांना आपल्याच पैशाने अधिकाधिक लोकप्रिय आणि धनवान व्हायला मदत करायची हा सर्वस्वी आपला दोष आहे.
कट टू २०२०:
कै. सुशांत सिंगच्या निमिताने आज करण जोहर, सलमान, शाहरुख या सगळ्यांना आपण लक्ष्य करतो आहोत, पण ही सगळी आपली आणि आपल्या आधीच्या पिढीची अपत्ये आहेत एवढं ध्यानात आलं तरी पुरे. पूर्वी सोशल मिडीया नसल्याने या गोष्टी किंवा या मागचा पॅटर्न सहज लक्षात येत नसे, पण आता हिरवे आणि लाल सगळेच तर्क आणि पुराव्यानिशी उघडे पडत असताना आपल्याकडे ते कारण नाही. आजही आपण तेच करणार असू तर आपल्यासारखे मूर्ख आपणच.
✒️ © मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. ५/६, शके १९४२