मी सहावीत होतो तेव्हाची गोष्ट आहे. पाचवी झाल्यावर सहावीत माझी शाळा बदलली. मुंबईतल्या आम्ही राहत असलेल्या विक्रोळीतल्या विद्या मंदिर या शाळेतून नाव काढून दादरच्या हिंदू कॉलनी मधल्या तेव्हाच्या किंग जॉर्ज आणि नामांतर करुन राजा शिवाजी विद्यालय झालेल्या प्रतिष्ठित शाळेत मला घालण्यात आलं. नवी शाळा असल्याने आणि घरापासून चांगलीच लांब असल्याने बर्यापैकी बावरलेल्या अवस्थेत सुरवातीला मी वावरत असे. सुरवातीला ओळखी पाळखी झाल्या, पण त्याच बरोबर रॅगिंग हा प्रकारही सुरू झाला. मी अरे ला ल्गेच का रे करणारा असल्यामुळे तोंडी रॅगिंगला बरं तोंड देऊ शकत असे.
पण खरी गंमत सुरू झाली चित्रकलेच्या तासाला. पांढर्या शर्टावर मागे रंगांचे फटकारे दिसू लागले. रंग तसे निरुपद्रवी असल्याने लगेच धुतलेही जात, पण तरी दिवसभर रंगीत झालेला शर्ट घेऊन वावरणे ही अपमानास्पद बाब होती. पण हा प्रकार नेमकं कोण करतं याचा सुगावा लागलेला नव्हता, कारण मागच्याला विचारावं तर तो आपण या गावचेच नाही असा चेहरा करत असे. सगळे अनेकदा एकमेकांकडे बोट दाखवत असत. त्यामुळे शिक्षिकेला सांगितलं तर तिचा गोंधळ व्हायचा. हा प्रकार सहन केल्याने आधी नकळत तर मग मला जाणवेल अशा प्रकारे शर्ट रंगवला जाऊ लागला. मागच्याला आणि मागे बसणार्या इतरांना कडक इशारे वगैरे देऊन झाले. एक दोनदा हात उगारूनही झाला. पण जो पर्यंत मी प्रत्यक्ष बघत नाही तो पर्यंत कुणी दाद देईना. शाळा नवी असल्याने पटकन पंगा घेता येईना.
पण एकदा पाठीवर कुणीतरी ब्रश फिरवतंय अशी पुसटशी शंका आली आणि मी हळूच हातातल्या कंपासच्या आत दडवलेल्या आरशात बघितलं, तर मागचा मुलगा माझ्या शर्टावर चित्रकलेचे प्रयोग करण्यात गुंगून गेला होता.
मला नक्की काय झालं, कोण माझ्या अंगात संचारलं माहीत नाही.
पण अचानक माझा उजवा हात उचलला गेला, हाताची मूठ वळली गेली, मी गर्रकन् मागे वळलो आणि त्याच्या तोंडावर एक जबरदस्त ठोसा मारला.
तो मुलगा बेंचवरुन खाली कोपर्यात पडला. त्याचा एक दात तुटला होता, आणि तो भयंकर भेदरलेल्या चेहर्याने एकदा माझ्याकडे आणि एकदा आजूबाजूच्यांकडे बघत होता. माझा एकंदर अवतार बघता त्याला कुणाला सांगण्याची सोय नव्हती. ना शिक्षिकेला, ना वर्गातल्या इतरांना. कुठल्या तोंडाने आणि काय सांगणार? मी शेण खाल्लं म्हणून मला शिक्षा झाली हे? ते काही असो, त्या ठोशानंतर माझ्या शर्टावरची चित्रकला बंद झाली हे खरंच.
काल जेव्हा भारतीय सैन्याने 'इनफ इज इनफ' म्हणत अतिरेक्यांची ज्या प्रकारे ठासली, तो काल मारलेला पाकिस्तानला ठोसा मला भूतकाळात घेऊन गेला. मी मारलेल्या ठोशाने त्या मुलाचा एक दात पडला, काल भारतीय सैन्याने मारलेल्या ठोशाने पाकिस्तानचे अडीचशेच्या आसपास दात पाडले. अजून बरेच पाडायचेत, पण एक मारा, लेकिन क्या सॉलिड मारा ना?
- इनफ इज इनफ जोशी
© मंदार दिलीप जोशी