The conflict between communism and freedom is the problem of our time. it overshadows all other problems. this conflict mirrors our age, its toils, its tensions, its troubles, and its tasks. on the outcome of this conflict depends the future of all mankind.
साम्यवाद आणि स्वातंत्र्य यातील संघर्ष हा आपल्या काळातली अशी समस्या आहे जी इतर सगळ्या समस्यांना झाकोळून टाकते. हा संघर्ष आपल्या कालखंडाचा आणि त्यातल्या आपल्या कष्टांचा आरसा आहे. या संघर्षाचा निकाल काय लागतो त्यावर समस्त मानवजातीचे भवितव्य अवलंबून आहे.
George Meany
President, AFL-CIO
[अमेरिकेच्या कामगार नेत्यांत विसाव्या शतकातील एक प्रमुख नेते म्हणून ज्यांचे नाव आजही मानाने घेतले जाते ते हे जॉर्ज मीनी. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत जॉर्ज तरूण वयात प्लंबर झाले. सुमारे बारा वर्षांनंतर त्याचा कामगार संघटनेत प्रवेश झाला. त्यांनी द्वितीय विश्वयुद्धात अमेरिकेच्या राष्ट्रीय युद्ध कामगार संघटनेत (National War Labor Board) अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबरचे (American Federation of Labor) प्रतिनिधित्व केलं. १९५२ ते १९५५ या काळात त्यांनी अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबरचे अध्यक्षपद भूषवले. या संघटनेचे अमेरिकेतल्याच काँग्रेस ऑफ इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन्स Congress of Industrial Organizations (CIO) यात विलिनीकरण होणे ही त्यांचीच कल्पना. विलिनीकरण झालेल्या AFL–CIO या संघटनेचे अध्यक्षपद त्यांनी पुढील २४ वर्ष भूषवले. कामगार चळवळ ही सचोटीपूर्ण आणि भ्रष्टाचारमुक्त असावी यावर त्यांचा भर असे. अनेक वर्ष कामगार नेता असूनही जॉर्ज हे घोर साम्यवाद विरोधी होते.]
आपल्यापैकी अनेकांचा असा समज आहे की साम्यवादी पक्ष आज फक्त केरळात सत्तेत आहेत, म्हणजे साम्यवादाचा प्रभाव आकुंचन पावत आहे आणि साम्यवादाचा पराभव झालेला आहे किंवा होत आलेला आहे. पण परिस्थिती तशी नाही. एखादा विषाणू अर्थात व्हायरस ज्याप्रमाणे स्वतः स्वतंत्रपणाने काही करु शकत नाही आणि त्याला वाढायला आणि पसरायला मानवी शरीर लागते, त्याच प्रमाणे सम्यवाद हा स्वतःच्या पक्षाच्या सत्तेत असण्यावर अवलंबून नसून थेट सत्तेत नसतानाही विविध विचारधारांच्या पक्षांत शिरून ते पक्ष आणि विचारधारा आतून पोखरून टाकण्याचे काम करत असतो. अशी कामे करणारी माणसे ही ओळखण्यास वेळ लागत असला तरी डोळे आणि कान उघडे ठेवल्यास ओळखता येतात. ती ही माणसेच असल्याने कधीकधी आपल्या वागण्याबोलण्यातून काही गोष्टी वेळोवेळी उघड करत असतात, त्यामुळे अशी कामे करणारी माणसे ही ओळखण्यास वेळ लागत असला तरी डोळे आणि कान उघडे ठेवल्यास ओळखता येतात.
अमेरिकेचा सांस्कृतिक आणि पर्यायाने सामाजिक र्हास हा अशाच आतून पोखरल्या गेलेल्या पक्षांच्या मार्फत घडवून आणला गेलेला आहे. भारतीय परिप्रेक्ष्यात बघायला गेलं तर दुर्दैवाने हा रोग आज आपल्या देवघर, कपड्यांचं कपाट, आणि शयनगृहातही पोहोचलेला आहे (कसा ते पुढे पाहूच). तो आणखी पसरायला नको असेल, आणि अमेरिकेचा झाला तसा र्हास भारताचा व्हायला नको असेल तर साम्यवाद आणि त्याचे ज्ञात आणि अज्ञात जन्मदाते आणि पुरस्कर्ते यांची तोंडओळख करुन घेणे गरजेचे आहे. हा भाग मुद्दाम लहान ठेवला असून पुढच्या भागात कार्ल मार्क्स कोण होता? साम्यवादाचा तो जन्मदाता होता की त्याच्या आधी अनेक वर्ष जी विध्वंसक प्रवृत्ती बोकाळलेली होती तिला त्याने तात्त्विक मुलामा दिला आणि भरपूर लेखन केलं जे साम्यवादाचा आधार बनलं? साम्यवाद म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाची उत्तरे पाहू. पुढच्या भागात आद्य साम्यवादी, साम्यवादाचा जन्मदाता ज्याला म्हटलं जातं तो कार्ल मार्क्स आणि ज्याच्या जीवावर तो जगत असे त्या फ्रेडरिक एन्गल्स यांची ओळख करुन घेऊ.
© मंदार दिलीप जोशी
श्रावण शु. ८, शके १९४४