काल तेलंगणा विद्या वंथुला वेदिकाचा माजी अध्यक्ष असलेला शहरी नक्षलवादी गुर्जला रविंदर राव याला झालेली अटक व पाठोपाठ त्याने एक्स आश्रय दिलेला माओवादी पक्षाचा वाराणसी सुब्रमण्यम आणि त्याची बायको यांना आज झालेली अटक हा घटनाक्रम वाचला आणि मी १० जानेवारीला लिहिलेल्या लेखाची आठवण झाली.
त्यातला हा परिच्छेद मला फार महत्वाचा वाटतो, कारण ज्या प्रमाणे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये हे वाक्य डाव्यांनाच चांगलंच समजल्याने ते आपल्या शहरी बापांना वाचवायचे प्रयत्न करताना वय वगैरे मुद्दे काढून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात.:
"या दोघांच्या शारीरिक अवस्थेचे वर्णन गोगटे साहेब "दोन वयोवद्ध व गंभीर आजारी असलेल्या.." असे करतात. क्षणभर असे गृहित धरू की हे दोघे खरंच मरणासन्न आहेत, पण त्यामुळे बहुसंख्य शांतताप्रिय जनतेला, गंभीर आरोपांत तुरुंगात असलेल्या वरावरा राव आणि स्टॅन स्वामी या दोन शहरी नक्षलवाद्यांच्या जहरी व कावेबाज विचार व शिकवणीमुळे निर्माण झालेला, होत असलेला, व होऊ शकणारा असलेला धोका हा कुठेही कमी होत नाही. कारण स्वतः सशस्त्र होऊन मैदानात उतरत नसले तरी इतरांची माथी भडकावून हातात शस्त्र घेऊन ४ महिन्याच्या बालकापासून निरपराध वृद्धांपर्यंत, व सशस्त्र दलांपासून पोलिसांपर्यंत कुणाचाही कशाही प्रकारे मुडदा पाडण्याला मार्गदर्शन करणारी, प्रोत्साहन देणारी, व अशा घटनांचे निर्लज्ज समर्थन करणारी ही विचारसरणी आपल्या शहरातल्या घरात राहून, विद्यापीठात शिकवत असताना, पुस्तके व इतर साहित्य निर्माण करत असताना आपले विषारी व विखारी विचार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पसरवण्याची ठाम शक्यता असते."
या दोन्ही अटकांबद्दल तेलंगणा पोलिसांचे अभिनंदन.
© मंदार दिलीप जोशी