Monday, September 4, 2017

गावांतील देवळांचे महत्त्व

प्रत्येक गावात एक तरी प्रमुख देऊळ असावं आणि त्यातल्या देवतेचा एक तरी मोठा उत्सव असावा. आणि जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी दरवर्षी उत्सवाला हजेरी लावणारे ग्रामस्थ असावेत. नाही, हे निव्वळ स्वप्नरंजन नव्हे. ज्या गावांत असं एखादं तरी प्रमुख देऊळ असतं आणि त्याचा असा उत्सव असतो त्या गावाला शहरांकडे वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतरानंतरही तग धरुन राहणे सोपे जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे स्थानिक देवतेच्या वास्तव्यामुळे, तिच्या होणाऱ्या पूजाअर्चनेमुळे, एकत्र जमण्यामुळे लोकांची गावाशी नाळ जोडलेली राहते. म्हणूनच ग्रामीण भागात मंदिरे ही आजही लोकांना एकमेकांशी व स्थानिक संस्कृतीशी, आपल्या मातीशी (our roots) जोडून राहण्याची प्रेरणा देतात. भारतात काही ठिकाणी तर शैक्षणिक व खेळात जिंकलेली पदके व चषक मंदिरात ठेवलेले दिसून येतात. कारण उत्तुंग यश मिळवल्यावर ते ग्रामदेवतेच्या चरणी अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी जपली गेलेली आहे.

ग्रामदेवता या जन्ममृत्यू, पूर, दुष्काळ, शेतीतले अपयश, एखादी दुर्घटना इत्यादी स्थानिक समस्यांबाबत ग्रामस्थांची काळजी घेणार्‍या एका प्रकारे हिंदू देवतांच्या स्थानिक प्रतिनिधी असतात. माणसाने एक वेळ चारधाम यात्रा आयुष्यातून एकदाच करावी पण आपल्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला वर्षातून एकदा तरी जावेच. अशा प्रकारच्या स्थानिक देवता या शहरात अभावानेच आढळून येतात. म्हणूनच अर्थार्जन इत्यादी कारणांसाठी आपल्या गावातून स्थलांतरित झालेल्यांनी, शक्य झाल्यास सहकुटुंब, वर्षातून किमान एकदा तरी गावी जाऊन आपल्या ग्रामदेवेतेची पूजा करावी व उत्सवाला हजेरी लावावी. गावातली मंदिरे ही साधी असली तरी त्यांचा प्रभाव थोर असतो हे वैय्यक्तिक अनुभूतीवरुन सांगू शकतो. वर्षातून एकदा जरी गावी गेलं तरी आपल्याला तिथल्या समस्या कळू शकतात. हा उद्देशही मनात असू द्यावा व दरवर्षी आपली उपस्थिती नोंदवून यथाशक्ति यथामति आपली सेवा देवतेच्या चरणी रुजू करावी व तिथल्या परंपरा जपण्यास मदत करावी.

असं म्हणतात की राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर लवकरच श्री अजित डोबाल यांनी आपल्या जवळ जवळ ओस पडलेल्या गावी जाऊन आपल्या ग्रामदेवतेचे दर्शन व आशीर्वाद घेतले होते. आता इतका व्यग्र माणूस हे करु शकतो, तर आपण का नाही? इच्छा ठेवा, मार्ग दिसेलच.

© मंदार दिलीप जोशी