Thursday, February 1, 2024

सेलिब्रिटी

रात्रीचे बारा वाजले होते.

केस विस्कटलेले, कपडे अस्ताव्यस्त झालेले, तरीही एक प्रकारचा आनंद चेहर्‍यावर घेऊन अत्यंत उत्तेजित झालेला मित्या कुल्डारोव्ह आपल्या आईवडीलांच्या फ्लॅटमधे घुसला आणि सगळ्या खोल्यांत तरंगत फिरला. त्याचे आईबाबा झोपायच्या तयारीत होते. थोरली बहीण एका कादंबरीचं शेवटचं पान वाचत होती. आणि त्याचे शाळकरी भाऊ गाढ झोपी गेले होते.

"अरे हा काय अवतार करुन घेतला आहेस, आणि कुठून येतो आहेस? काय चालवलं आहेस हे!" आईबाबा उद्गारले.

"नका विचारू, अजिबात नका विचारू. माझाही विश्वास नसता बसला प्रत्यक्ष अनुभव घेतला नसता तर. खूपच अविश्वसनीय गोष्ट घडली आहे आईबाबा!" असं म्हणून कसलासा अत्यानंद झालेल्या मित्याला धड उभंही राहता येईना, आणि त्याच अवस्थेत त्याने  खिदळत आरामखुर्चीत आपला देह टाकला. 

"अशक्य प्रकार घडलाय, तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही असा. बघा!"

अंगाभोवती शाल लपेटून त्याची बहीण खाटेवरुन उठून मित्याचं म्हणणं ऐकायला आत गेली. त्याचे भाऊही जागे झाले. 

"काय झालं रे, असा काय दिसतोयस?" त्याच्या आईने काळजीने विचारलं.

"आई, आई तुला काय सांगू मला किती आनंद झालाय. आई, तुला माहित्ये का, आता आख्ख्या रशियाला माझं नाव ठावूक झालं आहे. आख्ख्या रशियाला! डिमिट्री कुल्डारोव्ह नामक एक नोंदणी कारकून अस्तित्वात आहे हे आजवर फक्त तुम्हाला माहित होतं, आता पूर्ण रशिया मला ओळखतो आई, पूर्ण रशिया! परमेश्वरा!!!"

मित्या म्हणजे डिमित्री इतका उत्तेजित झाला होता की तो खुर्चीतून टुणकन् उडी मारून उठला आणि पुन्हा सगळ्या खोल्यांत तरंगत फिरून आला. 

"अरे पण आम्हाला धड सांगशील का नेमकं काय झालंय?"

"तुम्ही सगळे शहामृगासारखे राहता, पेपर वाचत नाही, काय छापून आलंय याचा गंध नसतो. किती रोचक गोष्टी असतात वर्तमानपत्रांत! पेपरांत छापून आलं की लगेच सगळ्यांना सगळं समजतं, काहीच लपून राहत नाही. मला किती आनंद झालाय तुम्हाला सांगू! तुम्हाला माहित्ये का, पेपरात फक्त सेलिब्रिटी लोकांची नावं छापून येतात. आणि आता त्यांनी चक्क माझं नाव छापलंय!!!"

"काय सांगतोस काय, कुठे?"

मित्याच्या वडिलांचा चेहरा फिका पडला. आईने भिंतीवरच्या क्रूसाकडे एकदा नजर टाकली आणि पटकन आकाशातल्या बापाकडे करुणा भाकली. त्याचे शाळकरी बंधू अंथरूणातून उठून लगेच त्यांच्या दादाकडे म्हणजे मित्याकडे गेले. 

"होय, होय. माझं नाव वर्तमानपत्रात छापून आलेलं आहे. आता आख्ख्या रशियाला माझं नाव कळलेलं आहे. आई, ही प्रत जपून ठेवा त्या पेपरची, या अविस्मरणीय प्रसंगाची आठवण म्हणून आपण अधुनमधून ते वाचत जाऊया. थांब, मी दाखवतो."

असं म्हणून मित्याने खिशातून त्या दिवशीचं वर्तमानपत्र काढून दाखवलं. बाबा, हे बघा, असं म्हणून त्याने निळ्या पेन्सिलीने खूण केलेल्या एका परिच्छेदाकडे लक्ष वेधून घेतलं.

"वाचा!"

मित्याच्या बाबांनी खिशातून आपला चष्मा काढून डोळ्यांवर चढवला. 

"मोठ्याने वाचा बाबा" मित्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. आईने पुन्हा एकदा भिंतीवरच्या क्रूसाकडे नजर टाकली आणि आकाशातल्या बापाकडे करुणा भाकली. बाबांनी घसा खाकरला आणि पेपर वाचायला सुरवात केली. 

"२९ डिसेंबरच्या रात्री अकरा वाजता डिमिट्री कुल्डारोव्ह नामक एक नोंदणी कारकून..."

"बघितलंत?! पुढे वाचा बाबा..."

"...डिमिट्री कुल्डारोव्ह नामक एक नोंदणी कारकून, लिटिल ब्रोनायाह भागातील कोझिहिन इमारतीत असलेल्या बिअरच्या दुकानातून आपल्या मित्राबरोबर मद्यधुंद अवस्थेत परतत असताना..."

"मी आणि सायमन पेट्रोविच येत होतो बाबा, बरोब्बर वर्णन केलंय... वाचा बाबा पुढे वाचा..."

"...मद्यधुंद अवस्थेत परतत असताना घसरुन एका घोडागाडी खाली पडला. अचानक घडलेल्या घटनेमुळे घोड्याने घाबरून कुल्डारोव्हच्या अंगावरुन उडी मारली आणि अर्थातच मागून गाडीही नेली. गाडी थोडी पुढे गेल्यावर काही कामगार गाडीला थांबवण्यात यशस्वी झाले. सदरहू घोडागाडीचा मालक युहनोवस्की जिल्ह्यातील डुरिकिनो गावचा रहिवासी असलेला इव्हान डेट्रोव्ह नामक व्यक्ती असल्याचे समजते, तसेच गाडीत स्तेफान लुकोव्ह नामक एक मॉस्को शहरातील दुय्यम व्यापारी असल्याचेही समजते. अपघात घडल्यावर सुरवातीला बेशुद्धावस्थेत असलेल्या कुल्डारोव्हला पोलीस ठाण्यात नेण्यात आले व तिथे त्याला एका डोक्टरांनी तपासले. त्याच्या डोक्यावर बसलेला मार..."

"गाडीच्या खालचा दांडा लागला बाबा, वाचा वाचा पुढे वाचा..."

"...त्याच्या डोक्यावर बसलेला मार फार गंभीर नसल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची पोलीस ठाण्यात योग्य पद्धतीने नोंद करण्यात आली आणि जखमी व्यक्तीवर योग्य औषधोपचार करण्यात आले... "

"थंड पाण्याने शेक घ्यायला सांगितलं मला त्यांनी." "आता पूर्ण रशिया ओळखतो मला. झालं ना वाचून सगळं? द्या तो पेपर इकडे." असं म्हणून मित्याने पेपर खेचून घेतला आणि घडी करुन खिशात ठेवला. 

"आता मला ही गोष्ट माकारोव्ह कुटुंबियांना सांगितली पाहीजे. मग इवानित्स्की मंडळींना सुद्धा. आणि नातास्या इवानोव्हना, आणि अ‍ॅनिसिम वॅसिलिच... किती जणं बाकी आहेत अजून. चला, मी पळतो.

मित्या आपली टोपी आणि मफलर चढवला आणि आनंदाने नाचत विजयी मुद्रेने घराबाहेर पडला.

(रशियन लेखक अ‍ॅन्टोन चेकोव्ह यांच्या "जॉय" या कथेचं मराठी रुपांतर)

© मंदार दिलीप जोशी
पौष कृ ६, शके १९४५ | विक्रम संवत २०८० | युगाब्ध ५१२५

Saturday, January 27, 2024

जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम्

मुंबईतील एक वृद्ध निवृत्त गृहस्थ. वय ७५च्या आसपास. अगदी सश्रद्ध, अतिशय साधे, सरळ आणि पापभिरू व्यक्ती. राम मंदिराचं उद्घाटन होणार ही बातमी कळल्यावर जबरदस्त आनंदी झाले होते. २२ जानेवारी कधी एकदा उजाडते याची डोळ्यांत प्राण आणून वाट बघत असत.

त्यांना साधारण गणपतीच्या थोडं आधीपासून तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्या. पण पावसाळ्यात अनेकांची पोटं बिघडतात, तसलं काही असेल म्हणून त्यावरचे उपचार घेत राहिले. त्या औषधांनी तेवढ्यापुरतं बरं वाटत असे. गणपतीत आठ दिवस कोकणात गावीही जाऊन आले. तेव्हाही त्यांना भूक जास्त लागत नव्हती. गणपती झाल्यावर परत मुंबईत आले तेव्हा एकदा छाती आणि पोटाच्या मधे बोट दाबल्यावर हाताला गोळ्यासारखं काहीतरी लागलं. तेव्हा मुलाने तपासणीसाठी ऑक्टोबर २०२३ च्या सुरवातीला मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांना दुर्दैवाने कॅन्सरचं निदान झालं. मोठ्या आतड्याचा कर्करोग, तिसरी स्टेज. 

मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयात एका कर्करोगतज्ञांकडे त्यांच्यावर उपचार सुरु होते. ज्या वेळी कर्करोगाचं निदान झालं त्याच वेळी लक्षात आलं की तो पोटात सगळीकडे पसरलेला आहे. शस्त्रक्रिया करणंही शक्य नव्हतं. या डॉक्टरांनी कुटुंबियांना सुरवातीलाच सांगितलं होतं की रोग फार पुढे गेलेला आहे, वाचण्याची किंवा फार काळ जगण्याची काहीही आशा नाही. जेमतेम महिनाभर काढतील. 

त्यांच्यावर उपचार सुरु असताना तब्येतीत सुधारणा काहीही नव्हती, पण तब्येत बिघडतही नव्हती. पण श्रद्धेत ताकद बघा, जो मनुष्य जेमतेम महिना काढेल असं डॉक्टर म्हणालेले असताना फक्त श्रद्धेच्या जोरावर त्या व्यक्तीने २२ जानेवारीचा दिवस बघितला. २२ तारखेला दिवसभर राममंदिर सोहोळा टीव्हीवर लाईव्ह बघत होते. डोळे भरून तो अप्रतीम सोहळा बघितल्यावर रात्री घरात गव्हल्याची खीर करायला सांगितली, बाकी काहीही जेवले नाहीत. फक्त देवाला नैवेद्य दाखवला त्या पानातील खिरीची वाटी होती तेव्हढी खीर फक्त खाल्ली.

दुसऱ्या दिवशी २३ तारखेला सकाळी उठल्यावर मुलाला सांगितलं की पोटात थोडं दुखतंय. म्हणून मग त्याने डॉक्टरांना कॉल करून नऊच्या सुमारास त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी काही इंजेक्शन वगैरे दिली आणि थोड्या वेळाने त्यांचं दुखणं थांबलं. त्यानंतर ते झोपले. दुपारी बाराच्या सुमारास झोपेतच त्यांनी इहलोकीचा प्रवास संपवला आणि रामरायाच्या भेटीला निघून गेले.

कोहीनूर मिलमध्ये कामाला होते, आर्थिक स्थिती पूर्वी जेमतेम होती. पण मुलं कर्तबगार निघाली. त्यांना पेन्शन वगैरे काही नव्हतं, तरी पण दोन वर्षांपूर्वी जेव्हा मंदिरासाठी निधी गोळा करणे चालू होते तेव्हा स्वतःच्या सेव्हिंगमधून दहा का पंधरा हजार रुपये दिले होते. अर्थात त्यांच्या मुलाने पण दिलेच होते. पण ह्यांनी स्वतःकडून काहीतरी द्यावं म्हणून राम मंदिरासाठी दिले. फक्त राममंदिर सोहोळा बघायचा म्हणून जवळपास डॉक्टरांनी भाकीत केलेला १ महिना अधिक वरचे अडीच महिने स्वतःच्या इच्छाशक्तीवर त्यांनी तग धरला. राम मंदीर उदघाटन होणार ह्याच बळावर ते तगून राहिले. इतकी पराकोटीची श्रद्धा बाळगणे आपल्याला जमेल तो दिवस सोन्याचा. 

इच्छाशक्तीत खूप बळ असतं. किंबहुना श्रद्धेतून इच्छाशक्ती निर्माण होत असावी. जगण्याचं प्रयोजन आपल्याला श्रद्धा देते, आणि ते प्रयोजन साध्य करायला इच्छाशक्तीची मदत होते. म्हणूनच हे डावे आणि लिबरांडू जेव्हा लोकांच्या श्रद्धेची टिंगल करतात तेव्हा फार डोक्यात जातात.

मध्यंतरी एक लेख वाचला, त्यात (पाश्चात्य) सश्रद्ध लोक नास्तिकांंपेक्षा सरासरी ४ वर्ष अधिक जगतात असा निष्कर्ष काढलेला होता. भारतीय परिप्रेक्ष्यात असा काही सर्वे झाला असल्यास माहित नाही, पण अशी उदाहरणे बघितली, की आपल्याकडे ४ पेक्षा कितीतरी अधिक वर्ष आकडा निघेल यात शंका नाही. तसंही सद्ध्या सुरु असलेले एकेक प्रकार बघितले, तर हा देश फक्त सश्रद्ध लोकांच्या परमेश्वरावरच्या श्रद्धेमुळे चालला आहे याची खात्री पटते. पण ते असो. 

जय श्रीराम.

© मंदार दिलीप जोशी
पौष कृ. २, शके १९४५ | विक्रम संवत २०८० | युगाब्ध ५१२५

टीपः एका मित्राने त्याच्या एका नातेवाईक व्यक्तीबद्दल सांगितलेली सत्यकथा. नामोल्लेख न करता सादर.

Thursday, January 25, 2024

रामाची नसलेली बहीण आणि खोडसाळ पढतमूर्ख

शीर्षटीपः हे खोटं आहे हे माहीत असूनही स्वतः वाल्मिकी रामायणातला संदर्भ तपासून + जाणकार व्यक्तीशी माझ्या आकलनाबाबत चर्चा करुन हे लिहीतो आहे. 

आज एका व्यक्तीने मला शंका विचारली की एक पोस्ट फिरते आहे. यात शांता नामक दशरथकन्या वाचकांशी संवाद साधते आहे या स्वरूपात ती फॉर्वर्डेड पोस्ट आहे. थोडक्यात पोस्टचा सारांश असा:

दशरथ राजाची एक कन्या होती शांता तिला त्यांनी अंगदेश नरेश रोमपाद राजाला दत्तक दिली. एक ब्राह्मण शेतीची समस्या घेऊन आला त्याच्याकडे राजाचं दुर्लक्ष झाल्याने तो देश सोडून  गेला म्हणून इंद्रदेवाचा कोप झाला आणि राज्यात दुष्काळ पडला. मग "ऋषी शृंग" यांनी यशस्वी उपाय सांगितला म्हणून शांताचा विवाह "ऋषी शृंग" यांच्याशी लावून दिला. 

पोस्टमधे अधुनमधून "मी मुलगी असल्याने मला दत्तक देताना दशरथाने विचारलं नाही",  "मुलगी असल्याने अंगदेशात मला राज्यकारभार करण्याचा अधिकार नव्हता" वगैरे स्त्रीमुक्तीवादी मळमळ आहेच. पण चतुराईने 'दुखावलेल्या ब्राह्मणामुळे' दुष्काळ पडल्याचं ठोकून दिलेलं आहे. म्हणजे patriarchy अर्थात पुरुषसत्ताक पद्धतीबद्दल  ओकलेली गरळ  स्त्रीमुक्तीवाद, आणि ब्राह्मणद्वेष सगळं एकदम पेरण्यात आलेलं आहे.

या पोस्टमधली शांता म्हणते की "वाल्मिकी रामायणातील बालकांड मधल्या या या नवव्या सर्गात मला शोधाल. माझा संदर्भ तिथे  नक्कीच सापडेल. एका श्रीरामभक्त राजपुत्रीचा इतका परिचय पुरे नव्हे का?"

यासाठी वाल्मिकी रामायणातल्या बालकांडातील नवव्या सर्गातल्या या श्लोकाचा संदर्भ देण्यात आलेला आहे:
"आनाय्य तु महीपाल ऋष्यशृङ्‍गं सुसत्कृतम् ।
विभाण्डकसुतं राजन् ब्राह्मणं वेदपारगम् ।
प्रयच्छ कन्यां शान्तां वै विधिना सुसमाहितः ॥" 

आता या खोडसाळ पोस्टचा समाचार घेऊया. एक तर संस्कृतचा गंध नाही, दुसरं म्हणजे श्लोकाचा संदर्भ देताना पूर्ण, म्हणजेच मागचापुढचा संदर्भ न देता, एकच श्लोक उचलून टाकणे हे नेहमीचे यशस्वी कलाकार आहेतच. या पोस्टमधे  "ऋषी शृंग" असा उल्लेख वाचल्याने हसून हसून पोट दुखलं. त्या ऋषींचे नाव "ऋष्यश्रुड्न्ग" असे आहे, शृंग नव्हे. हे ऋष्यश्रुड्न्ग मुनी हे विभाण्डक ऋषींचे सुपुत्र होत.

तर, याचा पूर्ण संदर्भ असा आहे की पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करण्यासाठी कोणते ऋषी आमंत्रित करावेत या करता महाराज दशरथ चर्चा करत असताना सुमंत्राने महाराजांना एक कथा सांगितली. त्या कथे अनुसार महर्षि कश्यपांना 'विभाण्डक' नामक एक पुत्र आहेत. विभाण्डक यांना 'ऋष्यश्रुड्न्ग' नामक एक पुत्र आहेत. या नंतर ऋष्यश्रुड्न्ग हे कसे उत्तम आहेत याचं काही वर्णन आलेलं आहे. यांना समकालीन अंगदेशाचे प्रतापी नरेश रोमपाद होते. दुर्दैवाने महाराज रोमपाद यांच्याकडून धर्माचे उल्लंघन  (धर्माचे उल्लंघन म्हणजे कदाचित चुकीची धोरणे वगैरे असेल, त्याच्या खोलात जाण्यात अर्थ नाही) झाल्याने राज्यात अवर्षणाची परिस्थिती निर्माण झाली व भीषण दुष्काळ पडला. अशा वेळी त्या काळी राजे करत तेच रोमपाद महाराजांनी केलं. राज्यातील विद्वान ब्राह्मणांना बोलावून त्यांच्या हातून घडलेल्या या पापाचे प्रायश्चित्त काय असे विचारले. 

आता नीट वाचा. राजाने असे विचारल्यावर विद्वानांनी त्याला सल्ला दिला की विभाण्डक ऋषींचे सुपुत्र जे ऋष्यश्रुड्न्ग मुनी त्यांना आपण सन्मानपूर्वक बोलवावे आणि त्यांच्याशी आपली कन्या शान्ता हिचा विवाह लावून द्यावा. नवव्या सर्गात यानंतर इतक्या प्रभावी आणि विद्वान मुनींना आपल्याकडे कसं बोलवायचं या बद्दल खल केलेला दिसून येतो (आणि दहाव्या सर्गात ऋष्यश्रुड्न्ग मुनींना त्यांचे पिता विभाण्डक यांच्यासज रोमपाद राजाने त्याच्या राज्यात बोलावण्यासाठी जे उपाय केले त्याबद्दल माहिती आहे. त्याच्याही खोलात जाण्यात अर्थ नाही.) 

हे सांगताना सुमंत्र महाराज दशरथांना म्हणतो की या न्यायाने ऋष्यश्रुड्न्ग हे तुमचे जावईच झाले. याचा अर्थ ऋष्यश्रुड्न्ग मुनी हे दशरथाचे जावई "आहेत" असा अर्थ नसून "तुम्ही पण राजा, रोमपाद पण राजा, म्हणून रोमपाद राजाची मुलगी की तुम्हालाही मुलीसारखी असल्याने ऋष्यश्रुड्न्ग मुनी हे तुमचे जावई असल्यासारखे आहेत" असा त्याचा अर्थ होतो. एकाच गावातले एकाच वयोगटातले लोक त्यांच्यापैकी कुणाच्याही मुलीच्या नवर्‍याला "ओ जावईबापू" असंच म्हणतात त्यातला हा प्रकार आहे. पुढे सुमंत्र हा महाराज दशरथांना ऋष्यश्रुड्न्ग मुनींना त्यांचे पिता विभाण्डक यांच्यासह रोमपाद राजाने त्याच्या राज्यात बोलावण्यासाठी जे उपाय केले त्याबद्दल माहिती देतो. 

या गोष्टीचा सारांश असा की मंत्री सुमंत्र हा राजा दशरथाला यज्ञाचे पौरोहित्य करायला सुयोग्य ऋषी कोण याबद्दल माहिती देतो आणि त्या ओघात रोमपाद राजा, त्याच्यावर आलेले संकट, त्यावर उपाय म्हणुन त्याला मुलगी शान्ता हिचा विवाह ऋष्यश्रुड्न्ग मुनींशी करण्याचा मिळालेला सल्ला, आणि त्या संकटाचे झालेले निवारण याचे वर्णन करतो. थोडक्यात, ऋष्यश्रुड्न्ग हे पौरोहित्य करायला सुयोग्य मुनी आहेत त्याची कारणे या सर्गात येतात.

तेव्हा यात कुठेही शान्ता ही दशरथाची मुलगी आहे असा उल्लेख येत नाही.  शान्ता ही अंगदेशचे महाराज रोमपाद यांचीच मुलगी आहे. 

यात एक मेख आहे. श्रावणबाळाच्या आईवडिलांचा शाप असा होता की "तू सुद्धा पुत्रवियोगाने मरशील". संस्कृतमधे "पुत्र" म्हणजे मराठीत "मुलगा" असं नाही. मुलगा किंवा मुलगी असं कुठलंही अपत्य असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे दशरथाने मुलगी दत्तक दिली असती तरी तिच्या वियोगाने तो मृत्यू पावलाच असता. बरं आधी मुलगी झाली... नंतर ती दत्तक दिली त्यानंतर शाप मिळाला म्हणून रामलक्ष्मण ऊशिरा झाले असं नाही होऊ शकत. मुलगी झाली असती, दत्तक दिल्यानंतरही जर ती मरण पावली असती तरीही तिच्या वियोगाने दशरथ राजा मेलाच असता.

दुसरं, त्या काळी ऋषीकन्यांचा विवाह राजाशी आणि राजकन्येचा विवाह ऋषींशी या गोष्टी घडत असत. यातलं काहीही लक्षात न घेता त्यामुळे त्याला स्त्रीवादाची शेपूट लावून आपल्या मनातली मळमळ रामायणाला चिकटवण्याचा हलकटपणा या पोस्टमधे केलेला आहे. 

अशा खोट्या किंवा अर्धखोट्या कथा आधीही होत्या, आता त्यात वाढ होणार हे नक्की. कारण हिंदूंच्या मनात आपल्याच श्रद्धास्थानांबद्दल न्यूनगंड निर्माण व्हावा याचसाठी द्वेष्ट्यांचा अट्टहास सुरू असतो. यात व्हॉट्सॅप विद्यापीठातून ढकललेले संदेश अर्थात 'फॉरवर्ड मेसेज' हे मोठं हत्यार आहे. अशा पोस्ट आल्या की कुठल्यातरी स्त्रीबद्दल पुळका पोस्ट आहे म्हणून भावुक मन असलेले बदामोत्सुक स्त्रीपुरुष त्यावर "छान माहिती" वगैरे कमेंट्स ठोकून देतात. तस्मात् एखादा श्लोक संदर्भ म्हणून टाकलेला आहे म्हणजे ते खरंच असणार असं न समजता त्याच्या आधी आणि नंतर काय उल्लेख आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे गॅस सिम केला ही एक घटना किंवा कृत्य म्हणजे स्वयंपाक केला असे नसते त्याच प्रमाणे एकच श्लोक म्हणजे संपूर्ण सत्य नसते. त्यामुळे असे व्हॉट्सॅप विद्यापीठातले 'फॉरवर्ड मेसेज' पुढे ढकलण्याआधी कुठलाही ग्रंथ समूळ वाचणे आवश्यक ठरते. नाहीतर दासबोधाच्या दहाव्या समासात समर्थांनी केलेले पुढील वर्णन आपल्याला तंतोतंत लागू होईल.

दासबोध | समास दहावा: पढतमुर्ख लक्षण
समूळ ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
गुण सांगतां अवगुण- । पाहे तो येक पढतमूर्ख ॥ ८॥

जय श्रीराम.

© मंदार दिलीप जोशी
पौष पौर्णिमा, शके १९४५ | विक्रम संवत २०८० | युगाब्ध ५१२५

Saturday, December 30, 2023

राम मंदिर आणि डाव्यांचा थयथयाट

अनेक राजकारण्यांना चर्चेत राहण्यासाठी काही ना काही सनसनाटी, विचित्र वक्तव्य करावीच लागतात. त्याचप्रमाणे ते तोंडावाटे जी नकारात्मकता पसरवतात ती आत्यंतिक निष्ठेने घणाघात, टोला, चिमटा, इत्यादी लेबले बातम्या म्हणून पसरवण्याचं काम पत्रकार करत असतात. अशा राजकारण्यांना आपल्या तोंडावाटे काय बाहेर पडतं आहे याचा फारसा विचार करण्याची आवश्यकता नसते (आणि अनेकदा फारसा विचार करण्याची त्यांची तितकी कुवतही नसते) कारण ती वक्तव्ये मुळातच लोकांना वैताग आणायला आणि उचकवायला केली गेलेली असतात.

कलाकारांचं मात्र तसं नसतं; यात नटनट्या, दिग्दर्शक, लेखक, आणि कवी आणि सगळेच सादरकर्ते अर्थात 'परफॉर्मर' आले. त्यांना काहीही मांडायला सर्जनशीलता वापरावी लागते. त्यातच विशिष्ट राजकीय अजेंडा आणि आणि कला या गोष्टी एकत्र आल्या की एक आकर्षक आणि प्रभावी, पण तितकंच फसवं आणि घातक मिश्रण तयार होतं. ज्याप्रमाणे आयुर्वेदात दूध उत्तम, फळे उत्तम पण मिल्क शेकचे दूरगामी घातक परिणाम होतात त्याचप्रमाणे कलाकारांची सर्जनशीलता आणि धर्मद्वेषी राजकीय अजेंडा यांचं मिश्रण झाल्याने होतात.

एक कविता गेले अनेक दिवस समाजमाध्यमांवर फिरते आहे. विशेष म्हणजे ही कविता फिरवणाऱ्यांमध्ये काही हिंदुत्ववादी रामभक्त ही सामील आहेत. यात त्यांचा दोष नाही; डाव्यांना एका गोष्टीचं श्रेय दिलंच पाहिजे की त्यांनी अनेक हुशार कलावंत आपल्याकडे ओढून घेतलेले आहेत किंवा ते असेट्स व्यवस्थित पोसले आहेत. कविता वापरून दिशाभूल करणे यात डाव्यांचा हातखंडा आहे.

तर, या तथाकथित कवितेतली नकारात्मकता इतक्या खुबीने झाकली आहे की अनेकांना प्रथमदर्शनी "बरोबरच बोललाय की तो!" किंवा "त्यात काय वाईट आहे?" असं नक्कीच वाटू शकतं. आधी ही कविता दिसली तेव्हा की फारसं लक्ष दिलं नव्हतं, मात्र मला दोन जणांनी, म्हणजे दोन हिंदुत्ववादी मित्रपरिवारातल्या दोन जणांनी ही कविता आवडली म्हणून पाठवली तेव्हा माझे कान टवकारले गेले. कविता त्या व्हिडिओत ऐकता येईल किंवा गुगलून मिळवता येईल. आधी ऐकली नसेल तर ती आधी पूर्ण ऐका, आणि बघा सुद्धा.

पण कविता ऐकण्याच्या आधी संजय राऊत आणि अमोल कोल्हे यांची वक्तव्य वाचा आणि कविता आणि त्यांच्यातील साम्य पहा.

"...तर तो राम तुम्हाला पावणार नाही."
― संजय राऊत

"राम मंदिराचं उद्घाटन जितक्या थाटामाटात कराल तितकीच मोठी जबाबदारी रामराज्य आणण्याची देखील आहे..."
― अमोल कोल्हे


या दोघांची वक्तव्ये ही आपण नेहमीच पाल झटकल्याच्या घृणेने झटकून टाकत असतो, पण त्यांच्या बोलण्यातला जो आशय आहे तोच कवितेच्या वेष्टनात गुंडाळला की भल्याभल्यांना योग्य वाटू शकतं. तेच या कलाकाराने साध्य केलं आहे.

अर्थात, या व्यक्तीला कलावंत म्हणावं का हा वेगळाच विषय, पण साहेबांनी ऐतिहासिक विषयांवर पुस्तकं पण लिहिली आहेत हे एके ठिकाणी वाचून पोटात गोळा आला. असो, तर या कवितेच्या यशात, म्हणजे व्हायरल होण्यात, कवितेचं चित्रीकरण ज्या प्रकारे केलं गेलं आहे आणि जे नेपथ्य वापरलं गेलं आहे त्याचा मोठा सहभाग आहे. काळा पडदा, एक खुर्ची, उगाचच आपण प्रगल्भ आणि वैचारिक काहीतरी बोलतोय असं भासवण्यासाठी वाढलेली दाढी घेऊन आणि हातातला पांढरा रुमाल मध्येच समेवर येऊन उद्वेगाने फडकवणारा त्या खुर्चीभोवती वावरणारा पांढऱ्या कपड्यातला एक इसम ― असं नेपथ्य हे खरं तर हाऊ टिपिकल ऑफ लेफ्टिस्ट्स, अर्थात डाव्यांचं व्यवच्छेदक लक्षण म्हणायला हवं. पण ते अजूनही हिंदुत्ववाद्यांच्या लक्षात येत नाही यात डाव्यांची हुशारी म्हणावी की आपला भोळसटपणा (naivety) याचा निर्णय मला करता येत नाही.

आता जरा इतर मुद्द्यांकडे वळूया. राम मंदिर खुलं होण्याच्या काहीच आठवडे आधी ही कविता यावी या 'टायमिंग'मध्ये काहीही आश्चर्य नाही, कारण या विषयावरून चित्त विचलित झालेले आणि पिसाळलेले अनेक राक्षस आपण बघत आहोत आणि मंदिर झाल्यावरही बघणार आहोत.

कवितेच्या सुरवातीलाच हा इसम वाल्मिकी ऋषींचा पट्टशिष्य असल्यागत आपण त्रेता युगातून आलेली व्यक्तिरेखा असल्यासारखं, "हाथ काट के रख दूंगा, ये नाम समझ आ जाये तो" अशी गर्जना करतो. कापाकापी हे सुद्धा डाव्यांचं महत्वाचं लक्षण आहेच, पण इथे जास्त लक्ष देण्यासारखं आहे ते म्हणजे कवितेतून केलं गेलेलं इमोशनल ब्लॅकमेलिंग आणि जनमानस हतोत्साहित करण्याचा प्रयास. राम मंदिर खुलं होण्याची घटिका तोंडावर आलेली असताना हा कवितेच्या सुरवातीपासूनच हा रामभक्तांना अटी घालत सुटलाय की अमुक केलंत तरच तुम्हाला राम समजेल आणि तमुक केलंत तरच रामाचं नाव घेता येईल. तोंडी लावायला ढमूक त्रास आणि दुःख सहन केलंच पाहिजे तरच...अशी भावनिक धमकी आहेच. आत्ता या क्षणी, आणि तसं बघायला गेलं तर कधीही, तुम्ही राम नाही आहात किंवा होऊ शकणार नाही हे सांगायची गरजच काय? हे एक प्रकारे असं सांगणं आहे की तुम्ही राम होऊ शकत नाही आणि चालले राम मंदिर उभारायला.

राम नावाचं परफेक्शन कुणी कधीच साध्य करू शकलेलं नाही आणि शकणारही नाही. त्या अवस्थेकडे निरंतर होणारा प्रवास म्हणजे रामभक्ती, राम उपासना. मग ते करायला अटी आणि शर्ती लागू करणारे हे महाशय कोण?

दुसरं म्हणजे "इस जबरदस्ती के जय श्रीराम में सब कुछ है बस राम नहीं" असं म्हणताना तो हजारो कारसेवकांचा धडधडीत अपमान करतोय. मान्य, जबरदस्तीने जय श्रीराम म्हणायला लावलं की राम भेटणार नाही. पण संपूर्ण कवितेत स्वतःच विधाने करायची आणि स्वतःच ती खोडायची ही नाटकं आहेत. वर या काल्पनिक कृत्याचा दोष सगळ्यांना द्यायचा हा शुद्ध विकृतपणा आहे. शिवाय, स्वेच्छेने जय श्रीराम म्हणणाऱ्या सामान्य बंगालीजनांवर तिथल्या पोलिसांनी अमानुषपणे अत्याचार केले तेव्हा हीच काव्यप्रतिभा कुठे पेंड खायला गेली होती, किंवा तथाकथित प्रेम म्हणून लग्न केल्यावर बायकोला धर्म बदलण्यासाठी, हिंदू धर्म त्यागण्यासाठी जबरदस्ती केली जाते, प्रसंगी जीवही घेतला जातो तेव्हा त्याची निर्भत्सना करणारी कविता का 'होत' नाही असा जाब कविवर्यांना विचारायला हवा.

सुमारे पाचशे वर्षांनंतर अगणित जनांच्या हौतात्म्यानंतर आणि सातत्याने कायदेशीर पाठपुराव्यानंतर राम मंदिर होणार आणि तिथेच होणार आणि तारीखही ठरली हे जेव्हापासून नक्की झालं, तेव्हापासून हिंदुद्वेष्ट्यांच्या कळपांतले राक्षस भयंकर पिसाळले आहेत. मग काहींना राम सगळ्यांचा आहे असा साक्षात्कार झालेला आहे, तर काहींना आमचा राम वेगळा आहे असा वेडाचा झटका येतोय. हॉस्पिटल आणि शाळा बांधा अशी किरकिर आताशा ऐकू येत नाही पण आहे. २०१४ मध्ये डाव्यांचं लाडकं सरकार जाऊन नवीन आणि नावडता पक्ष पूर्ण बहुमताने आल्यापासून सुरू झालेला त्रास हा २०१९ नंतर आणखी वाढला आहे. अजून बरंच काम बाकी असलं तरी ठिकठिकाणी म्हणजे शिक्षणसंस्था, बँका इत्यादी ठिकाणांहून डाव्यांची पिल्ले जाऊन राष्ट्रीय  विचारांच्या व्यक्तींची नेमणूक व्हायला सुरुवात झालेली आहे. शिवाय, सरकारचे निर्णय घोषित होण्याआधीच समजून ते बदलण्यापर्यंत किंवा रद्द होण्यापर्यंत असलेला डाव्यांचा दबदबा आज तितकासा उरलेला नाही. आता पंतप्रधान त्यांच्या मनातली बात कुणाच्याही आधी स्वतःच येऊन जनतेला सांगतात. दौऱ्यावर जाताना फुकटचे पुख्खे झोडणारे दारुबाज पत्रकारांचा तांडा न नेता सरकारी खात्याचे संबंधित निवडक लोकच सोबत असतात. 'काश्मीर फाईल्स' चित्रपटात जो "सरकार उनकी है पर सिस्टम तो हमारा है" यातलं सरकार बदलून झालं, आता सिस्टमला बदलण्याचं काम हळूहळू सुरू आहे. राम मंदिराच्या उद्घाटनापाठोपाठ २०२४च्या निवडणुकाही तोंडावर आहेत. विरोधी पक्षांना अजूनही आपली एक घट्ट मूठ म्हणावी तशी वळता आलेली दिसत नाही, त्यांना पंतप्रधानपदासाठी एक चेहराही देता आलेला नाही. अशा निर्नायकी विरोधकांसमोर आव्हान गोळीबंद आहे, तेव्हा निकाल काय लागणार ते उघड आहेच!

जर आपल्याला अपेक्षित असाच २०२४चा निकाल आला तर सिस्टीम बदलण्यासाठी १५ वर्ष खूप होतात. अधिकाऱ्यांची जवळजवळ संपूर्ण नवी फळी भरती होऊन वरिष्ठ पदांवर पोहोचते. म्हणजे सिस्टीम अधिक वेगाने बदलली जाऊ शकते आणि ही भीती विरोधकांना नक्की आहे!

डावे असुर पिसाटण्याचं हे देखील महत्वाचं कारण आहे.

सातत्याने मुळातच शांतताप्रिय आणि सहिष्णू असलेल्या हिंदू समाजाला वर्षानुवर्षे तुम्ही शांतता पाळा, तुम्ही सहिष्णू व्हा असे डोस पाजले गेलेत त्याला आता हिंदू समाज कंटाळला आहे. आता दुय्यम नागरिक म्हणून न जगता आमचा देश म्हणून ताठ मानेने हिंदूंनी जगायला सुरवात केली आहे, हा डाव्यांच्या पार्श्वभागात घुसलेला मोठा काटा आहे. त्यांना आजही हिंदू समाजमन समजू शकलेलं नाही. मग राम मंदिरासमोर बाईट घेताना भावुक होणारे पत्रकार आणि विविध उपक्रम करणाऱ्या व्यक्ती, आणि कोट्यवधी भारतीय घरांतून ओसंडून वाहणारा उत्साह हे सगळं पाहून डाव्यांना असे काव्यमय वेडाचे झटके येणं साहजिकच आहे.

एकदा जमीन हिसकावून घेतल्यावर ती हिंदू परत घेतात आणि ती देखील हिंसा आणि अहिंसा अशा दोन्ही मार्गांनी, हा मानसिक धक्का आपल्या शत्रूंसाठी फार मोठा आहे. कारण 'झांकी' नंतर 'बाकी' गोष्टींकडे वळलेलं हिंदूंचं लक्ष हे डाव्यांना आणि एकंदर हिंदूंच्या शत्रूंना अत्यंत अस्वस्थ करणार हे उघडच आहे.

जाता जाता कवी महाशयांना माझं चार ओळीत उत्तर असं आहे की:
रामभक्त कैसे बनना है ये उनसे हम क्यूं सीखें
दुर्गा को जिन्होने वेश्या और रावण को महात्मा बताया है
तुम जैसों को अब हम रखते है जूते की नोंक पर
सैकडों वर्षों का वसूलना अब पुराना बकाया है

जय श्रीराम 🙏🏻

🖊️ मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ ३ संकष्ट चतुर्थी, शके १९४५
विक्रम संवत २०८०

Wednesday, November 29, 2023

हे ही आपलेच !

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बोगदातज्ञ श्री अर्नोल्ड डिक्स यांच्याबद्दल भारतीयांना नितांत प्रेम का आहे?

त्यांचे बोगद्या वाचवण्यात बाहेर देवाला नमस्कार करतानाचे फोटो प्रकाशित झाले होते. पण फक्त म्हणून? एक परदेशी गोरा ख्रिश्चन आपल्या धर्माच्या देवासमोर नतमस्तक झाला म्हणून? की अर्नोल्ड धर्मांतर करुन हिंदू झालेत अशी समजूत झाली आहे म्हणून? आणि त्यामुळे हिंदूंचा अहं सुखावला म्हणून?

अजिबात नाही.फसलेल्या कामगारांना वाचवायला यश मिळावं म्हणून या बोगद्याजवळ काहीच दिवसांपूर्वी बाबा भौखनाग यांचे तात्पुरते मंदिर बांधण्यात आलेलं आपण अनेक छायाचित्रांतून बघितलं असेलच. त्या आधी त्याची पालखी काढून पूजा आणि आरती करण्यात आली. परमेश्वर कुपित झालेला आहे असं समजून देवाला साकडं घालण्यात आलं आणि हे छोटं मंदिर उभारण्यात आलं.

श्री अर्नोल्ड डिक्स यांच्याबद्दल भारतीयांना नितांत आदर आणि प्रेम याकरता आहे की ते मोकळ्या मनाने या देशाच्या, धर्माच्या अनुभूतींना सामोरे गेले म्हणून आणि स्थानिक संस्कृती आणि परंपरांबद्दलचा आदर जाहीर दाखवला म्हणून. आणि हो, त्यांच्यात स्वाभाविक काळजी, जिव्हाळा, आणि मानवता दिसली म्हणूनही.

हिंदुत्व म्हणजे दुसरं काय असतं? असलेल्या श्रद्धेचा त्याग करुन दुसरी स्वीकारणे इथवर हिंदुत्व मर्यादित नक्कीच नाही. हिंदुत्व म्हणजे स्वतःत डोकावून सत्यान्वेषण करणे आणि त्यातून जे निष्पन्न होईल त्याकडे डोळसपणे बघणे आणि उघडपणे स्वीकारणे. तेच अर्नोल्ड यांनी केल्याने आता भारतीय त्यांच्यावर प्रेम करु लागले आहेत.

यापैकी काहीही न करता फक्त कर्तव्य पार पाडून आपले पैसे घेऊन निघून गेले असते तरी भारतीयांना त्यांच्याबद्दल आदरच वाटला असता. जसा तो त्यांच्याबद्दल आणि त्यांच्यासारखे बाहेरुन आलेल्या आणि या मदतकार्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाबद्दल वाटतो आहे तसाच, मग त्यांनी यातलं काहीही केलेलं असो किंवा नसो. कारण कृतज्ञता ही आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.

म्हणूनच श्री अर्नोल्ड डिक्स आणि या मदतकार्यात सहभागी झालेल्या सर्वांप्रती आपण कृतज्ञ आहोत.

© मंदार दिलीप जोशी
कार्तिक कृ २, शके १९४५

Tuesday, October 31, 2023

मर्यादा पुरुषोत्तम

चित्रसेन स्वर्गात अर्जुनाला नृत्य आणि संगीताचं शिक्षण देत असताना ते बघत असलेली उर्वशी अर्जुनावर भाळली. अर्जुनावर अनुरक्त झालेल्या उर्वशीला अर्जुन म्हणाला की आमच्या एका पूर्वजाशी म्हणजेच महाराज पुरुरवा यांच्याशी विवाह करुन तुम्ही आमच्या वंशाचा जो सन्मान केलात, आमची वंशवृद्धी केलीत त्यामुळे तुम्ही मला मातेसमान आहात. त्यामुळे इतर कुठल्याही स्वरूपात मी तुम्हाला पाहू शकत नाही. 

इंग्रजीत एक म्हण आहे, "Hell hath no fury like a woman scorned." अर्जुनाच्या नकाराने क्षुब्ध झालेल्या उर्वशीने त्याला शाप दिला की तू कायम नपुंसक राहशील. यावर इंद्राने तिला शाप एक वर्षापर्यंत मर्यादित करण्याचा आणि ते एक वर्ष अर्जुनाला निवडण्याची मुभा देण्याचा सल्ला दिला. अर्जुनाने ते एक वर्ष म्हणून अज्ञातवासाचं एक वर्ष निवडलं. 


अज्ञातवासात अर्जुनाने बृहन्नडेचं रूप घेतलं आणि विराट राजाची कन्या उत्तरा तिला संगीत व नृत्याचं शिक्षण दिलं. अज्ञातवासाच्या शेवटी जेव्हा सर्व पांडव आपल्या मूळ रूपात प्रकट झाले तेव्हा विराट राजाने अर्जुनापुढे आपल्या कन्येच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला. पण अर्जुनाने त्याला नकार दिला. 

आता अर्जुनाने नकार का दिला याकडे लक्ष द्या. अर्जुनाने उर्वशीच्या प्रेमप्रस्तावाला नकार दिला त्याचं कारण आठवलं तर याचंही कारण आपल्या लक्षात येईल. 

अर्जुन विराट राजाला म्हणाला की त्याने उत्तराला संगीत व नृत्याचं शिक्षण दिलं, म्हणजे तो तिचा गुरु होता. आणि शिष्या ही मुलीसारखी असते. पण तुम्ही उत्तराचा विवाह माझा पुत्र अभिमन्यू याच्याशी करा. मग अभिमन्यू आणि उत्तरा यांचा विवाह संपन्न झाला.


विचार करा. आजच्या भाषेत ज्याला हॉट म्हणतात तशी अप्सरा तुमच्यावर अनुरक्त होते आणि तुम्ही तिला तिने तुमच्या एका पूर्वजाशी लग्न केलं म्हणून आईसमान म्हणता आणि नकार देता.

पुढे एक राजा आपल्या सुंदर मुलीचं स्थळ तुम्हाला सुचवतो आणि तुम्ही म्हणता तुम्ही तिचे गुरु असल्याने ती तुम्हाला मुलीसमान आहे म्हणून तुम्ही नकार देता, आणि तिचं लग्न आपल्या मुलाशी लावून देता.

आज शक्य आहे का ते? पण ‘चालतंय’ नावाखाली हवं ते करायचं. जाहिरात, मालिका, आणि सिनेमाच्या माध्यमातून आपल्यावर हे बिंबवण्याचा प्रयत्न सुरु आहे की कोणत्याही वयाच्या व्यक्तीशी म्हणजे खूप लहान किंवा वयाने मोठी असली तरी हल्ली लग्न केलेलं/जमवलेलं चालतं आणि करावं(च). आठवा: अनिल कपूर आणि श्रीदेवीचा 'लम्हें' हा चित्रपट. अनिल कपूरचं श्रीदेवीवर प्रेम असतं पण तिचं दुसर्‍यावर. तिच्याशी लग्न होऊ शकत नाही म्हणून हा पुढे तिच्यासारख्याच दिसणर्‍या तिच्या मुलीशी लग्न करतो. मराठीत 'तुला पाहते रे' आणि हिंदीत 'दिल सम्हल जा जरा' आणि स्त्री व पुरुष यांच्या भुमिकांची अदलाबदल असलेला 'आप के आ जाने से' या मालिकांची उदाहरणे आहेत.

महाभारतातील किंवा कुठल्याही धर्मग्रंथातील व्यक्तींबाबत व्हॉट्सॅप फॉरवर्डेड विनोद ढकलणे आणि त्यावर हाहा करणे याला अजिबात अक्कल लागत नाही. पण मूळ संदर्भ तपासून त्या व्यक्ती किती धार्मिक होत्या आणि धर्मपालन करताना विशिष्ट परिस्थितीत स्त्रीकडे आई आणि मुलगी म्हणून बघायची दृष्टी त्यांना कशी होती यात त्यांचं मोठेपण सामावलेलं आहे हे आपल्या ध्यानात येतं. 

इथे अर्जुनाचं वय नेमकं किती ते सोडा. पण तुम्हाला तुमच्या वयाच्या ४०-४५ वर्षी, २५च्या आसपास वय असलेल्या मुलीमधे स्वतःची मुलगी किंवा बहीण दिसत नसेल आणि फक्त मादीच दिसत असेल तर तुमच्या मेंदूत काहीतरी फार मोठी गडबड आहे हे नक्की (मग दादा/ताई/काका/मामा करायची गरज आहेच असं नाही). ती गडबड एक तर जनुकीय किंवा संस्कारांशी संबंधित तरी आहे किंवा तुम्ही ज्या वातावरणात वाढलात त्याच्याशी तरी. 

तस्मात्, धर्ममार्गावर चाला.

बास, बाकी काही नाही.

🖊️ मंदार दिलीप जोशी
अश्विन कृ. ३, शके १९४५

-----------------------------------------------------------------
टीपः
(१) वरील ४५-२५ ही वये ही प्रातिनिधिक म्हणून घेतली आहेत. अक्षरशः घेऊ नये.
(२) या लिखाणाचा कुठल्याही शहाण्या, अर्धवट, किंवा ठार वेड्या अशा मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तींशी; जिवंत, अर्धमेल्या, किंवा मृत व्यक्तींशी; आणि त्यांच्या स्थान, भाषा, शिक्षण, आणि व्यवसाय वगैरेंशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
-----------------------------------------------------------------