Sunday, December 18, 2022

प्रारब्ध

एक व्हिडिओ बघितला ज्यात एक ताई राजकीय बंदचा भाग म्हणून दुकान बंद करायला आलेल्या काही तरुणांना समजावत आहेत. त्याच ताईंच्या फेसबुक पोस्टवर जी मंडळी गरळ ओकत असतात, त्यांच्या पोस्टवर आलेल्या घाणेरड्या भाषेतल्या टिप्पण्या वाचून लहानपणी आजोबा सांगायचे ती गोष्ट आठवली.

खूप पूर्वी एका आटपाट गावात एक म्हातारा-म्हातारी आणि त्यांचा मुलगा रहायचे. बिचारे इतके गरीब होते की दिवस दिवस उपाशी राहण्याची वेळ त्यांच्यावर येत असे. एकदा काय झालं की गरिबीमुळे त्रासून त्यांनी भगवान शकरांकडून वर प्राप्त करून घेण्यासाठी तप करायचं ठरवलं आणि तिघेही ध्यान लावून बसले.

कैलासावरून त्यांचं तप बघत असलेल्या पार्वतीमातेला त्यांच्यावर दया आली आणि त्या भगवान शंकरांना म्हणाल्या, "अहो, बघा ना, हे तिघे किती घोर तप ठरत आहेत. तुम्ही यांना वर का नाही देत?"

शिवशंकर हसून म्हणाले, "प्रिये, प्रारब्ध. मी वरदान दिल्याने काहीही होणार नाही. या जन्मात जे विधीलिखित आहे ते त्यांना भोगावंच लागेल."

पण पार्वतीमाता पडल्या आई. लगेच चिडून म्हणाल्या, "ते मला काही माहीत नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना जाऊन एक एक वर देऊन या. माझ्याच्याने यांचे कष्ट बघवत नाहीत. जाताय ना?!"

अखंड सृष्टीच्या मातेचं म्हणणं ऐकून भगवान शंकर तिघांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी आपल्याकडे वर मागावा असं सांगितलं.

सर्वात आधी म्हातारीने वर मागितला. ती म्हणाली, "हे भोळ्या शंकरा, तुम्ही मला मी लग्न करून या घरात आले तेव्हा मी जशी होते तशी करा."

भगवान शंकरांनी "तथास्तु" म्हणताच म्हातारीचं रूपांतर एका सुंदर षोडशवर्षीय नवरीत झालं.

हे पाहून म्हातारा भडकला. रागाने लालबुंद होऊन शंकराला म्हणाला, "हे भगवान, या मूर्ख बाईला जराही अक्कल नाही. मी वर मागतो की हिला कुत्री करा."

म्हाताऱ्याचं ऐकून भगवान शंकरांनी "तथास्तु" म्हणताच त्या नवतरुणीचं रूपांतर एका कुत्रीत झालं.

मग भगवान शंकरांनी त्या मुलाला वर मागायला सांगितलं. मुलगा विचारात पडला. आपल्या आईला या अवस्थेत पाहून त्याला अपार दुःख होत होतं. त्याने पटकन हात जोडले आणि शंकरांना विनंती केली, "हे देवाधिदेव, माझ्या आईला पुन्हा पहिल्यासारखं करा."

भगवान शंकर "तथास्तु" म्हणाले आणि शांतपणे परत कैलासाकडे प्रस्थान करते झाले. परत आल्यावर भगवान शंकरांनी माता पार्वतीकडे पाहून एक मंद स्मित केलं आणि पुन्हा ध्यानात गेले.

तसं या गोष्टीकडून बरंच शिकण्यासारखं आहे पण हजारो वर्षांपासून परमेशवराच्या अवतारांपासून ते ऐतिहासिक काळातील थोर मंडळी आणि संत परंपरेतील महान लोक जे शिकवून गेलेत ते वाचून समजून वागण्याची अक्कल जर नसेल तर अशा बैलबुद्धीच्या लोकांना कितीही सांगितलं, तरी शेवटी प्रारब्धात असेल तसेच ते वागणार.

असे लोक कधीही बेकायदेशीरपणे रस्त्यावर चादरी अंथरून जागा बळकावलेल्या असतात त्यांना मुक्त करण्याचा उपक्रम राबवत नाहीत कारण अशा ठिकाणी काही सत्कार्य करण्याची हिंमत तर नसतेच, पण आदेशही नसतो. शिवाय नेहमी आपल्यापेक्षा कमी शक्ती असलेल्या घटकांवरच दमबाजी केली जाते (अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च अजपुत्रम बलिम दद्यात् देवो दुर्बलघातकः।) आणि त्याला आधार म्हणून काल्पनिक ऐतिहासिक अन्यायाची भावनिक फोडणी त्याला दिली जाते. अशी अरेरावी केल्यावर लोक आपल्याला घाबरतात हे एकदा कळलं की ती करणारे त्या राजकीय उतरंडीत जितक्या खालच्या पायरीवर असतील तितका त्यांचा इगो जास्त फुगतो आणि सुखावतो. मुख्य म्हणजे इतर काहीही रचनात्मक न करता उपद्रवमूल्य दाखवायला दिवसाचे काही ठराविक म्हणजे पाचशे ते दोन हजार रुपये मिळाले तर कोण थोर पुरुषांची शिकवण वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करेल? त्याला कुवत लागते आणि असल्यास बुद्धी वापरावी लागते, आणि तेवढे कष्ट घेण्याची यांची तयारी नसते. त्यापेक्षा वरून पैसे आणि आदेश आला की असली कामे ठरत फिरण्यात धन्यता वाटत असेल तर नवल काय?

तस्मात, व्हीडीओतल्या त्या ताईंनी ज्या आईच्या मायेने त्या मुलांना समजावलं ते त्यांचं कृत्य अत्यंत स्तुत्यच आहे. पण... असो. आपण आशा सोडू नये, एखादा तरी या घाणीतून बाहेर पडला तरी आपलं यश समजायचं. बाकी भगवान शकरांवर सोडून देऊया.

हर हर महादेव 🙏🏻

राजकीय बंद


🖋️ मंदारपंत जोशी