Thursday, April 24, 2014

टग्यामहाराज बारामतीकर

धरणात पाण्याचे
अंमळ दुर्भिक्ष्य
अंत करु पाही
मुतोनिया ||

भगिनीस याच्या
मतदान करा
अन्यथा पाण्याला
बूच मारी ||

विरोध करती
नतद्रष्ट काही
टग्या महाराजां
दृष्ट लागे ||

पिऊन 'सोडला'
अवघा समुद्र
ठेविली का नावे
अगस्त्याला? ||

अगस्त्य अवतार
बारामतीचा टग्या
वंदावेच त्याला
पुन्हा पुन्हा ||

टग्यामागे उभा
तो जाणता राजा
आणि त्याची प्रजा
"शुभेच्छुक" ||

शाई पुसोनिया
मतदान करा
द्विगुणित करा
आनंदही ||

रामराया पुढे
हनुमान उभा
तैसेच ठाकले
हे ते दोघे ||

बोले तैसा चाले
जयांची ही कीर्ती
तयांना वंदावे
पुन्हा पुन्हा ||