Thursday, June 23, 2016

यस्य कस्य तरोर्मूलं

काल परवा व्हॉट्सॅपवर कोथिंबीर वापरून किडनी साफ करा अशा आशयाची एक पोस्ट वाचली त्या संदर्भात:

आपल्याकडे लोक पुन्हा आयुर्वेदाकडे व आजीबाईचा बटवा या प्रकाराकडे पुन्हा वळू लागले आहेत. पण आपल्याकडे लोकांच्या उत्साहाने उसळून वर यायला काही कळीचे शब्द (की वर्ड) - उदाहरणतः आयुर्वेदिक, organic, घरगुती, देशी उपचार, वगैरे - पुरेसे ठरतात.  हे शब्द दिसले रे दिसले की अतीउत्साहात 'आला मेसेज केला फॉरवर्ड' असं केलं जातं.

कोथींबीर काय, लिंबू काय, किंवा मध काय - या सगळ्याच गोष्टी आहारात असाव्यातच आणि योग्य प्रमाणात असाव्यात. पण त्याचा उल्लेख जेव्हा औषध म्हणून केला जातो तेव्हा त्याचा धोका आपल्याला जाणवायला हवा.

आयुर्वेदात शंभरपैकी शंभर वेळा प्रत्येक व्यक्तीला तपासूनच त्या व्यक्तीला योग्य ठरेल तो उपाय सुचवला जातो. तेव्हा एखाद्या वैद्याकडून एखादा उपाय एखाद्याला सुचवला गेला असेल तर त्याला सब घोडे बारा टक्के असा न्याय लावता येत नाही. त्या उपायात उल्लेख असलेला त्रास तुम्हाला असेल तर, पुन्हा सांगतो, तुमचा वैद्य तुम्हाला स्वतः तपासून मगच उपाय सुचवेल.

समजा तुम्ही तुमच्या वैद्याला न विचारताच तो प्रयोग केलात आणि त्याचा काहीही अपाय झाला नाही तरी त्याचा अर्थ तो औषध म्हणून सर्रास वापरायचा असा त्याचा अर्थ होत नाही. याचा अर्थ एकच - तुम्हाला काहीही नुकसान झालेलं नाही.

बरं, असा संदेश पुढे ढकलायचाच असेल तर पुढील दोन गोष्टी कराच म्हणजे कराच.

(१) वैद्याकडून तो धोकादायक नाही याची खातरजमा करुन घ्या
(२) धोकादायक नसेल तर त्याचा उल्लेख औषध म्हणून न करता "माझे स्वतःवर केलेले घरगुती प्रयोग" अशा मथळ्याखाली पाठवा. आता तुम्ही म्हणाल की वैद्यांना आक्षेप नाही तर तुम्हाला काय त्रास आहे?

पण पुन्हा वरचा मुद्दा सांगतो. कुठलाही वैद्य तुम्हाला हे असे ढकलसंदेशातले उपाय, अपायकारक नसले तरी, इतरांना औषध म्हणून सांगा असं सांगणार नाही.

हे इतके पाल्हाळ लावण्याचा उद्देश असा की आजही अनेक जण असे संदेश वाचून घरगुती प्रयोग करतात आणि उपाय लागू पडला नाही की निराश होतात. क्वचित असा प्रयोग उलटला, तर तब्येतही बिघडू शकते.

आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट नसतात असं लोक म्हणतात, पण योग्य मार्गदर्शना अभावी अशा अघोरी प्रयोगाद्वारे काही गोष्टींचे सेवन केले गेले तरी जो इफेक्ट व्हायचा तो होतोच ना! नैसर्गिक रेचक असलेला एखादा पदार्थ घेतल्यावर डोकेदुखी उद्भवणार नाही कदाचित, पण लोटा परेड अंमळ वाढण्याचीही शक्यता आहेच की!

समारोप करता करता शाळेत संस्कृत शिकत असताना वाचलेला श्लोक आठवला, तो आठवेल तसा देतो आहे.

यस्य कस्य  तरोर्मूलं, येनकेनापि मिश्रितम् ।
यस्मै कस्मै प्रदातव्यं, यद्वा तद्वा भविष्यति ।।

अर्थातः कशाचे तरी मूळ कशात तरी मिसळून कुणालातरी दिले असता काहीतरी होते. (नाही का?)

तेव्हा, सावधान!

आपला तार्किक,

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. ३, शके १९३८ | संकष्ट चतुर्थी