
पहिला भाग इथे वाचता येईल
चर्चने केलेला विश्वासघात
पहिल्या भागात उल्लेख केल्याप्रमाणे रवांडातील राजकारणात आणि समाजकारणात चर्चची प्रत्यक्ष पण तरीही अनिर्बंध सत्ता होती. आधी जर्मनी आणि मग बेल्जियमला चर्चने त्यांच्या वसाहतवादी सत्तेची पकड मजबूत करायला भरपूर मदत केली. "रिलिजियन हा सामान्य जनतेसाठी अफूसारखा आहे (Religion is the opium of the masses)" या तत्त्वावर चालणार्या साम्यवादाचा वारा टुट्सींना लागण्यापूर्वी त्यांचेही चर्चशी उत्तम संबंध होते. टुट्सी अभिजनवर्गाबरोबर संगनमत करुन रवांडातील सामान्य जनतेच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रावर चर्चने ताबा मिळवला होता. टुट्सींच्या साम्यवादावरच्या वाढत्या प्रेमामुळे हादरलेल्या चर्चने मग हुटूंशी संधान बांधलं आणि टुट्सी राज्यकर्त्यांना सत्तेतून खाली खेचलं.
आता रवांडातील राज्यकर्ते हुटू होते आणि अधिकाधिक सत्ता चर्चच्या ताब्यात जात होती. आर्चबिशप आंद्रे पेरौदिन यांनी साम्यवादाच्या अनुयायांना सैतान आणि गॉडचे शत्रू घोषित करुन टाकलं. टुट्सींना राक्षस संबोधलं जाऊ लागलं. चर्चमधे पाद्री जी प्रवचनं देत त्यात टुट्सींद्वेष ठासून भरलेला असे. टुट्सी हे गॉडच्या पृथ्वीवरील राज्यस्थापनेच्या मार्गातील अडसर असल्याचे सांगून म्हणूनच त्यांचा नायनाट केला पाहिजे हा त्या प्रवचनांमधे सांगितलं जाऊ लागलं. चर्चच्याच मदतीने सत्तेत आलेल्या हुटूंनी चर्चला सरकारच्या प्रत्येक स्तरावर स्थान देत पाद्री मंडळींची महत्त्वाच्या पदांवर नेमणूक केली. आर्चबिशप महाशय तर चक्क केंद्रीय सरकारमध्ये विराजमान होते. चर्चमधे जे सांगितलं जाईल त्याला देवाचा आणि सरकारचा आदेश मानून तो पाळण्याची सक्ती केली गेली. चर्च हे रवांडाच्या सरकरचा एक अविभाज्य अंग बनलं, आणि चर्चच्या विरोधात बोलणं हे सरकारच्या विरोधात बोलण्याइतकाच मोठा गुन्हा मानला गेला. सरकार पातळीवरच हुटू आणि टुट्सी यांच्यात असलेल्या वांशिक फरकावर बोट ठेवत टुट्सींच्या विरोधात जोरदार प्रचार सुरु झाला आणि वर म्हटल्याप्रमाणे चर्चमधे तर टुट्सींना सैतानाची माणसं म्हणून रंगवलं जाऊ लागलं.
हे सगळंं सुरु असताना टुट्सी स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं. काही स्थानिक आणि परागंदा टुट्सी तरूण मंडळींनी रवांडन पेट्रिओटिक फ्रन्ट अर्थात आरपीएफची स्थापना करुन रवांडावर आक्रमण करायची तयारी केली. यात आरपीएफला यशही मिळालं पण त्याची किंमत त्यांना त्यांच्या भाइबंदांच्या प्राणांनी चुकवावी लागली. इथे आपल्याला वर उल्लेख झालेल्या अरुशा शांतता कराराकडे पहावं लागेल. राष्ट्राध्यक्ष हबयारीमाना यांनी १९९३ साली आरपीएफचे नेते पॉल कगामे यांच्याशी केलेला हा करार चर्चच्या मर्जीविरुद्ध जाऊन केलेला असल्याने तो अर्थातच चर्चला मान्य नव्हता. साक्षात चर्च या करारावर नाराज असल्याने कधीच नीट पाळला गेला नाही. साम्यवादी हुटूंना सैतानाची माणसं घोषित केल्यामुळे चर्चच्या मते गॉड आणि सैतान यांच्यात कसलाच करार होऊ शकत नव्हता.
त्यामुळे चर्चने या करारावर सह्या झाल्या झाल्या टूट्सींविरुद्ध विखारी प्रचाराला सुरवात केली. इतकंच नव्हे, तर चर्चमधून उघडपणे टुट्सींचा खातमा करायला लोकांना प्रोत्साहित केलं गेलं. पास्टर इग्नेस यिरिर्वाहन्दी याने तर या नरसंहारात सक्रीय सहभाग घेतला आणि लोकांना टुट्सींना नामशेष कसं केलं जावं याचं चक्क प्रशिक्षण दिलं. प्रचंड प्रमाणावर बुद्धीभेद सुरु होताच. टुट्सींना ठार मारणं न्याय्य ठरवण्याकरता बायबल मधले संदर्भ दिले गेले. लोकांच्या मनावर 'तुम्ही गॉडच्या शत्रूंविरुद्ध लढत असून गॉड तुमच्या बाजूने असल्याने तुम्ही विजयी होणार आहात' हे सतत बिंबवलं गेलं. चर्चने रवांडाच्या सरकारला आणि नरसंहार करणार्या सैन्याला पूर्ण पाठींबा जाहीर केला.
सिनेमातून आणि इतर प्रचारातून पाद्री आणि पास्टर दयाळू आणि नन अतीदयाळू ही प्रतिमा उभी करण्यात ख्रिश्चन जमात यशस्वी झाली आहे. एरवीही तसाच प्रचार सुरु असतो. पण हुटूंच्या तावडीतून जीव वाचवून कॅथलिक चर्चचा आश्रय घेणार्या टुट्सींना मात्र चर्च म्हणजे काय याचा अगदी प्रत्यक्ष आणि विपरीत अनुभव आला. हुटूंच्या तावडीतून कॅथलिक चर्चकडे पळणार्या टुट्सींची स्थिती एका कसायाच्या तावडीतून दुसर्याक कसायाकडे गेलेल्या थँक्सगिव्हिंगच्या टर्कीसारखी अवस्था झाली. प्रेमाचा धर्म म्हणून आपली जाहीरात करणार्या आणि दयाळू म्हणवल्या जाणार्यास येशूच्या आश्रयाला गेलेल्या टुट्सींची निर्दयपणे हत्या करण्यात आली.
काही ठिकाणी विश्वासाने आश्रय मागायला गेलेल्या टुट्सींचं पाद्री आणि नन यांनी स्वागत केलं आणि मग विश्वासघात करत त्यांची हत्या केली,तर काही ठिकाणी हे काम चर्चशी संगनमत असलेल्या हुटू सैनिकांवर सोपवलं गेलं. चर्चचे पाद्री आणि नन आपल्या डोळ्यांसमोर होत असलेल्या हत्याकांडाचे मूक साक्षीदार बनून राहिले. त्यांच्या "गॉडचे शत्रू" मारले जात असताना त्यांना मधे पडायचं काहीच कारण दिसलं नाही. लोकांना चर्चमध्ये टुट्सींवर बलात्कार आणि खून करायला प्रोत्साहन देणारा फादर वेन्सेसलास मुनीश्यॅक हा दुर्दैवाने मोकळा फिरतो आहे.
एकट्या न्टारामा (Ntarama) कॅथलिक चर्चमध्ये ५००० टुट्सींचं हत्याकांड केलं गेलं. अशाच हत्या न्यामाटा (Nyamata), न्यारुबुये (Nyarubuye), स्याहिंडा (Cyahinda), न्यान्गे (Nyange)), आणि सेंट फॅमील (Saint Famille) इथे केल्या गेल्या.
यातल्या न्यान्गे पॅरीश (चर्च) येथील हत्याकांडाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. न्यान्गे पॅरीश मध्ये झालेल्या २,००० टुट्सींचे हत्याकांड तिथल्या चर्चमधले फादर अथानासे सिरोम्बा यांच्या मार्गदर्शनाखाली घडलं. फादर अथानासे याने प्रथम टुट्सींना तुतीस चर्चमध्ये आश्रय घेण्यास सांगितले आणि नंतर संपूर्ण इमारत बुलडोझरने जमीनदोस्त केली. हे पुरेसे वाटले नाही म्हणून की काय, फादर अथानासे याने हत्यारबंद हुटूंना बोलावून घेऊन इमारतीच्या ढिगार्याहतून बचावलेल्या टूट्सींना गोळ्या घालायला सांगितलं. आर्चबिशप पेरौदिनने हुटू बंडखोरांनी चालवलेल्या हत्याकांडाला चक्क बायबलमधले संदर्भांचे आधार दिले. इतकंच नव्हे पेरौदिनने स्वतः नरसंहारात उत्साहपूर्वक भाग घेतला. फादर वेंसेसलास मुन्येशयाका यांनी तर लोकांना चक्क टुट्सी स्त्रियांवर बलात्कार आणि त्यांची हत्या करण्यास प्रोत्साहन दिले.
चर्चला संलग्न असलेल्या शाळांमध्येही विद्यार्थी आणि शिक्षकांची हत्याकांडं घडली. आपण ज्यांच्यावर विश्वास टाकला, अशा चर्चमधल्या फादर आणि नन यांनीच आपला विश्वासघात केला ही भावना जनतेसाठी सगळ्यात वेदनादायी होती.
उपसंहार
या हत्याकांडांच्या नंतर सुरवातीची काही वर्ष चर्चने त्यांच्याकडून काही अपराध घडले होते हेच नाकारलं. शेवटी तब्बल बावीस वर्षांनी चर्चने त्यांचे अपराध स्वीकारत एक माफीनामा प्रसिद्ध केला. या नरसंहारात कधी थेट तर कधी विश्वासघाताने मारल्या गेलेल्या लाखो निरपराध लोकांच्या पदरी चर्चकडून गुन्ह्याची स्वीकारोक्ती आणि एक माफीनामा या स्वरूपात क्रूर थट्टा वाट्याला आली. मालकांनी कोंबड्यांची झुंज लावावी, आणि त्यांनी काहीही विचार न करता कोणत्याही सबळ कारणाशिवाय रक्तबंबाळ होईपर्यंत किंवा अगदी जीव जाईपर्यंत एकमेकांशी झुंझत बसावं तसा हा प्रकार होता. जसं जगभर झालं, तसं इथेही मालकांच्या जागी चर्च होतं आणि झुंजणार्या दोन कोंबड्यांच्या जागी टुट्सी आणि हुटू.
चर्चचा हत्याकांडातील प्रत्यक्ष सहभाग रवांडातील शांतताप्रिय नागरिक आणि विशेषतः टुट्सी कधीच विसरले नाहीत. याच कारणास्तव राष्ट्राध्यक्ष पॉल कगामे यांनी अक्षरशः हजारो चर्च आणि मशीदी बंद केल्या. या नरसंहारातून धडा घेतलेल्या रवांडाच्या नागरिकांना फसवून केलेल्या धर्मांतरातून लादल्या गेलेल्या रिलिजियनसचा धोका ध्यानात आलेला आहे. त्यांच्या सुदैवाने त्यांना पॉल कगामे यांच्या रूपात अशा रक्तपिपासू वृत्तीच्या रिलिजियनस पासून आपल्या देशाला वाचवण्यासाठी सातत्याने कार्यशील असणार्या व्यक्तीच्या रुपात योग्य नेता मिळालेला आहे.
© मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ १, शके १९४०
टीपः आपल्याला परिचित असलेला याच विषयावरचा हॉटेल रवांडा हा सिनेमा आपण बघितला असेलच. नसेल तर आवर्जून बघा. याच बरोबर 'समटाईम्स इन एप्रिल' हा चित्रपटही बघण्यासारखा आहे.
संदर्भः
(१) विविध वर्तमानपत्रे व माहितीपट
(२) https://bit.ly/2EH9ixH