Tuesday, January 6, 2026

पट्ट्या पट्ट्यांची अर्धी चड्डी आणि बिनबाह्यांचा गंजीफ्रॉक

२०२४ ची लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक असावी. मतदान केंद्राच्या आसपास गाड्या लावण्याची सोय नव्हती, म्हणून आम्ही काही अंतरावरच्या एका गल्लीत एका बंगल्यासमोर गाडी लावली आणि घाईघाईत मतदानाला गेलो. मतदान करून आल्यावर गाडी काढायला जाताच बंगल्याच्या बागेतून झाडांना पाणी घालत असलेल्या एका इसमाचा एक अत्यंत उर्मट स्वरात आवाज आला, "इथे कुठे गाडी लावलीत, पाटी दिसली नाही का इथे गाडी लावू नये अशी?" 

आधी खरंच पाटीकडे लक्ष गेलं नव्हतं. "अरेच्या, मला खरंच दिसली नाही पाटी....सॉरी हं, चूकच झाली." असं म्हणून तिथून निघालो.

अर्धांगिनीला आश्चर्य वाटलं, "तुम्ही पटकन सॉरी का म्हणालात? कसा उद्धटपणे बोलत होता तो माणूस! तिथे गाडी लावायला अशी बंदी करता येते का?"

मी तिला म्हटलं, "त्याने पट्ट्या पट्ट्यांची अर्धी चड्डी आणि बिनबाह्यांचा गंजीफ्रॉक घातला होता, आणि तो नळीने झाडांना पाणी घालत होता म्हणून." 

सौ म्हणाली, "म्हणजे?"

"म्हणजे त्या माणसाकडे पाहून मी cost-benefit analysis केला. तो भव्य कपाळ असलेला माणूस पट्ट्या पट्ट्यांची अर्धी चड्डी आणि बिनबाह्यांचा गंजीफ्रॉक घालून झाडांना पाणी देत होता याचा अर्थ तो पूर्णपणे निवांत होता आणि त्याच्याकडे भरपूर वेळ होता. त्याच्याशी उलट उत्तरं करायला, वाद घालायला सुरवात केली असती तर त्याचं काहीच गेलं नसतं, आपल्याला पुढे ज्या कामांना जायचं होतं ती लांबली असती. सुट्टी असल्याने आजूबाजूचे बंगलेवाले निवांत असणार, ते ही आपल्याशी भांडायला आले असते आणि आपला आणखी वेळ वाया गेला असता. आपला मूड खराब झाला असता, शिवाय त्यांचं मतपरिवर्तन झालं नसतं ते नसतंच. म्हणून त्या काकांना सरळ सॉरी म्हणून टाकलं. भांडण होईल या अपेक्षेने सरसावून पुढे आलेल्या त्या माणसाचा फुगा तिकडेच फुस्स झाला आणि तो इसम गप बसला. चरफडण्यापलीकडे त्याच्या हातात काही उरलं नाही. अर्थात नेहमीच सॉरी म्हणायचं असतं असं नाही, तर कधीकधी साफ दुर्लक्ष करून हसून निघून जायचं असतं."

मागच्या रविवारी एकाचा मेसेज आला, की "बघ रे तुझ्यावर एकाने पोस्ट लिहिली आहे. खूप पर्सनल झालाय तो माणूस. खाली कमेंट्स पण तशाच आहेत. तू उत्तर दिलं पाहिजेस!" मी त्याला टाळायचा बऱ्यापैकी प्रयत्न केला, पण त्याने खूप आग्रह केल्यावर मी त्याला वरचा किस्सा सांगितला.

आणि म्हटलं, त्या माणसाने पट्ट्या पट्ट्यांची अर्धी चड्डी आणि बिनबाह्यांचा गंजीफ्रॉक घातलाय. आणि कमेंटकर्ते नळीने बागेला पाणी देतायत. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे, पण आधीपासूनच बाजू ठरवून टाकलेल्या आणि मला व्हिलन घोषित केलेल्या कावीळ पीडित जनतेशी मी तिथे जाऊन कितीही वाद घातला तरी उपयोग नाहीये, आणि मी यांच्याइतका रिकामXX नाहीये. तेव्हा त्याला पट्ट्या पट्ट्यांची अर्धी चड्डी आणि बिनबाह्यांचा गंजीफ्रॉक घालून निवांत बोंबलू दे, मी हसून दुर्लक्ष करणार, I can't afford to waste time to fill their free time.

त्याला समजलं असावं. 

🖊️ मंदार दिलीप जोशी
पौष कृष्ण ३/४, शके १९४७ | अंगारक संकष्ट चतुर्थी