Friday, May 31, 2019

मी आणि तो

मी गेलो उत्साहाने त्याच्या इफ्ताराला
तो मला संपवण्या ज़कात झोळीत घालत होता

पाहून त्याला क्रूसावरती डोळां आले पाणी
तोच क्रूस घालण्या गळ्यात संधी शोधत होता

मला वाटले इश्काला नसतो मजहब काही
तो शीर माझे धडावेगळे उंच उडवत होता

मी समजलो प्रेमात कसला रिलिजियन बंधू
बंबात घालुनी लव्ह माझे तो हासत होता

पोसले साप ते कसे निघावे शाकाहारी
तो अजगर निधर्मांध मजला गिळत होता

©️ मंदार दिलीप जोशी

Thursday, May 23, 2019

पुन्हा एक वार, आलं मोदी सरकार !

मी काही काळापूर्वी एक पोस्ट टाकली होती त्यात म्हटलं होतं की माझं प्राधान्य हिंदुत्व व हिंदुत्वाधारित विकास आहे. पुढे म्हटलं होतं त्याचा भावार्थ असा होता की जरी असं असलं तरी पूर्ण विचारांती मी याच मतावर पोहोचून ठाम आहे की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली हिंदुत्व व विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने निर्णयप्रक्रिया व वेग इत्यादी परिप्येक्ष्यांतून पूर्ण बहुमताने निवडून आलेले भाजप सरकार हाच २०१९ला योग्य आणि एकमेव पर्याय आहे.

या पाच वर्षात मला काय मिळालं, हा विचार माझ्या मनाला कधीच शिवला नाही. माझे जवळचे आणि कुटुंबियांना चांगलंच माहीत आहे की एखाद्या गोष्टीची सत्यता आणि देशासाठी असलेलं महत्त्व पटलं की खिशाला खार लाऊन आणि आपला वेळ खर्च करुनही मी अनेक गोष्टी करतो. त्यामुळे मोदींनी माझ्या खिशात किती पैसे टाकले हा विचार मी करत नाही, करणार नाही.

तरीही एक सांगू इच्छितो. प्रधानमंत्री आवास योजना, आयुषमान योजना यातून सहाय्यता मिळालेले माझ्या जवळच्या मित्रपरिवारात, सहकर्मचार्‍यांत, आणि वैय्यत्तिक ओळखीत आहेत. एक लक्षात घ्या, हा फक्त पैसा नाही. पैसा काय सगळ्यांनाच हवा असतो, मलाही तुम्हालाही. पण जेव्हा आत्यंतिक गरज असताना मदत मिळते तेव्हा त्याची किंमत ही आभाळाहून जास्त असते. एक रुपया मदत पाठवली तर त्यातले जेमतेम पंधरा पैसे लाभार्थींपर्यंत पोहोचतात हे दिवस आपण बघितलेले असताना आता तो आख्खा रुपया थेट लाभार्थींच्या खात्यात, मग ते शहरी असोत किंवा शेतकरी, पोहोचणारे दिवस आपण बघत आहोत याचं श्रेय निर्विवादपणे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनाच जातं.

या परिप्येक्षातून आयकर रिटर्न्स भरणार्‍यांच्या संख्येत या पाच वर्षात भरीव वाढ झालेली आहे या गोष्टीकडे बघणे गरजेचे आहे. सामान्यतः मेहनतीने पैसा कमावणार्‍या जनतेला कर द्यायला हरकत नसते, पण त्या पैशाचं पुढे काय होतं किंवा कररूपी पैसा योग्य ठिकाणी खर्च होतो की नाही याची चिंता त्याला अधिक असते. हां, सरकारचा दट्ट्या असतोच, पण जबरदस्तीपेक्षा सरकारप्रती असलेला विश्वास हा अधिक प्रभावी ठरतो. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी हा विश्वास देशाच्या जनतेत रुजवल्यामुळे लोकांची कर भरण्याकडे कल वाढत चालला होता, आणि त्याचीच परिणिती रिटर्न्स वाढण्यात झाली.

हिंदुत्वाचं म्हणाल तर मुळात तुमच्यातच एकी नसेल तर मोदी काय "गुंडाळून ठेवतो मी संविधान, लगेच हिंदूराष्ट्र घोषित करतो, आणि धरुन हाणतो म्लेंछांना आणि यवनांना" असं म्हणावं अशी अपेक्षा आहे का? त्यांच्यावर किती आणि कसा दबाव आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? एखादी योजनेसाठी चार कागद लागत असतील तर म्लेंच्छ आठ घेऊन पोहोचतो, प्रत्यक्ष सरकारी कार्यालयात जाऊन योजनेची सगळी माहिती घेतल्यावर. आणि हिंदू घरी बसून मला काहीच कसं माहीत नाही, मोदींनी पोहोचवली का नाही माहिती अशी किरकिर करतो. भांडण झालं की पाच मिनिटात शंभर लोक गोळा करण्याची क्षमता तुमच्यात आहे का? नसेल तर आधी निर्माण करा आणि मग मोदी अमुक का करत नाहीत आणि तमुक का करत नाहीत याच्या चर्चा करा.

दुसरी गोष्ट, आजवर ज्याला इंग्रजीत म्हणतात तसं "Wearing your Dharma on your sleeve" असं  कुणी केल्याचं स्मरतं का? निवडणुका असो किंवा नसो, सातत्याने भगवी वस्त्रे आणि स्थानिक वेषभूषा करुन देवदर्शनाला जाणारा पंतप्रधान कुणी बघितला होता का? हिरव्यांची जाळीदार टोपी घालायला नकार देणारे मोदीजी आवर्जून कुठलीही निवडणूक नसताना स्वतः गंगा आरती साठी जाताच, पण सोबतच्या परदेशी पाहुण्यांनाही घेऊन जातात. उघडपणे हिंदू संस्कृती व धर्माबद्दल आदर व्यक्त करतात. हिंदू संस्कृतीचा अविभाज्य अंग असलेला योग आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिवस म्हणून साजरा केला जाण्याचं श्रेय कुणाला याचा विचार हिंदूंनी अवश्य करावा. निवडणुका आल्यावर राजकारणाचा भाग म्हणून आपले ख्रिस्ती आणि पारशी मूळ लपवून आपण जानवेधारी हिंदू असल्याचं सांगत देवळादेवळातून हिंडणार्‍या आणि नंतर ते सोंग साफ विसरणाऱ्या राहुल गांधीच्याच इटालियन मोतोश्रींनी हिंदूंच्या मुळावर येणार्‍या आणि हिंदूंच्या सत्यानाशाचे थेट कारण ठरणारा कायदा करण्याचं ठरवलं होतं, हे हिंदूंनी विसरू नये. हा विषय मोठा आहे, विस्तृतपणे पुन्हा केव्हातरी बोलू .

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरुन गळे काढणार्‍या लोकांनी पंतप्रधान मोदींच्या बायकोची आणि आईची काहीही तक्रार नसताना आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्या दोघीही राजकारणात नसताना अकारण प्रत्येक वादात त्या दोघींना ओढलं तेव्हा मोदींनी एक चकार शब्द काढला नाही. पण माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या भ्रष्टाचाराचा विषय काढल्यावर राहुल गांधी यांना ते आपले पिताजी असल्याची आठवण झाली आणि त्यांनी पुन्हा मोदींच्या कुटुंबियांबद्दल उद्गार काढले. बारा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि पाच वर्ष देशाचे पंतप्रधान असताना इतर कुणाच्या घरच्यांनी महाल बांधले असते. पण नरेन्द्र दामोदरदास मोदी हा इसम खरंच वेडा म्हटला पाहीजे, कारण या सतरा वर्षात त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या पदाचा एक रुपयाही अनुचित फायदा झालेला नाही. या उलट उत्पनाचं काही साधन नसताना राहुलच्या इटालियन मम्मीची संपत्ती इंग्लंडच्या राणीशी स्पर्धा करतानाही दिसली. या पार्श्वभूमीवर स्वतःच्या बचतीतली मोठी रक्कम जो माणूस सरळ दान करुन टाकतो, अशा माणसाला वेडा नाही तर काय म्हणावं? आधी केले, मग सांगितले ही म्हण या बाबतीत स्वतः जगत आहेत हे सगळा देश उघड्या डोळ्यांनी बघत होताच.

संरक्षणाच्या बाबतीतही मोदींनी देशाला नाराज केलं नाही. आधी पाकिस्तानात शरीफ महाशयांची अचानक भेट घेऊन टीकेचे धनी झालेले मोदी हे टीकाकारांना कळलेच नाहीत असे म्हणावे लागेल. नंतर पाकिस्तानची कशी ठासली हे सगळ्यांना ठाऊकच आहे. राफेल खरेदीत विरोधकांनी अनेक अडथळे आणूनही मोदी डगमगले नाहीत. आता मात्र ते लवकर पार पडावं ही इच्छा.

या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राष्ट्रवाद हा होता. हा एक शब्द नव्हे, राष्ट्रवादात राष्ट्र सर्वप्रथम, विकास, प्रगती, संरक्षण या सगळ्या गोष्टी येतात. ज्या राष्ट्रवादाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, त्या वृत्तीच्या थोबाडीत मारणारा हा निकाल आहे. क्रिकेटचा सामना असूनही तो सोडून अनेक लोकं लोकसभा टीव्ही लोक बघत बसायचे हा आणखी एक मोठा बदल आपण बघितला.

मी काही राजकीय विश्लेषक नाही, तुमच्यासारखाच सामान्य माणूस आहे. त्यामुळे या लेखनात अनेक तृटी असू शकतात, त्याबद्दल आधीच क्षमस्व. आणखी बरंच आहे बोलण्यासारखं, लिहीताही येईल, पण सद्ध्या जरा भावुक झालोय. २०१४ पेक्षा आताच्या निवडणुकीत मोदी सरकार यावं याबद्दल भावना तीव्र होत्या, त्या अपेक्षा पूर्ण झाल्याने डोळ्यांत आनंदाश्रू आहेत. आतापर्यंत बरंच लिहिलं, बरंच वाचलं, बर्‍याच चर्चा केल्या. यापुढेही हे होईलच, पण तूर्तास सद्ध्या आपला निरोप घेतो. आता वाट पाहूया "मैं नरेन्द्र दामोदरदास मोदी, इश्वर को साक्षी रखके शपथ लेता हूं कि...." हे शब्द कानावर पडण्याची.

समारोप करतो या प्रार्थनेने:

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते॥

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता, इमे सादरं त्वां नमामो वयम्।
त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्, शुभामाशिषं देहि तत्पूर्तये॥

अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिम्, सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्।
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम्, स्वयं स्वीकृतं नः सुगंकारयेत्॥

समुत्कर्ष निःश्रेयसस्यैकमुग्रम्, परं साधनं नाम वीरव्रतम्।
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा, हृदन्तः प्रजागर्तु तीव्राऽनिशम्॥

विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्, विधायास्य धर्मस्य संरक्षणम्।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्, समर्था भवत्वाशिषा ते भृशम्॥

भारत माता की जय ! जय श्रीराम !

© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ. पंचमी शके १९४१

Friday, May 17, 2019

कोलाहल


एकांत


Sunday, May 5, 2019

जागतिक हास्यदिनाच्या निमित्ताने - टवाळा आवडे विनोद अर्थात समर्थ रामदास स्वामी आणि विनोद

समर्थ रामदासस्वामी हे विनोद करण्याच्या विरोधात होते असा अपप्रचार जाणता अजाणता अनेक जण करताना दिसतात. त्याकरता त्यांच्याच "टवाळा आवडे विनोद" या शब्दांचा आधार घेतला जातो.

समर्थांनी समर्थ रामदासस्वामींनी इतकं काही लिहून ठेवलेलं आहे की घरात, समाजात वावरण्याकरता मार्गदर्शनात्मक असं इतर काही वाचलं नाही तरी चालेल असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरू नये. त्यांनी जे लिहून ठेवलं आहे ते सगळंच्या सगळं फक्त वाचायचं म्हटलं तरी आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अंमळ अवघडच आहे. कदाचित म्हणूनच इतक्या अभ्यासू, दिव्यत्वाची प्रचिती घेतलेला विद्वान संत विनोदासारख्या निर्मळ आणि आनंद देणार्‍या गोष्टीच्या विरोधात कसा असेल अशी शंका बर्‍याच लोकांच्या मनात डोकावलेली दिसत नाही.

समर्थांचे लिखाण पूर्ण न वाचताच दासबोधातील  दशक ७, समास ९ यातील "टवाळा आवडे विनोद" हे वाक्य बाजूला काढून जे टवाळ असतात त्यांनाच विनोद आवडतात किंवा विनोद आवडणारे सगळे टवाळ असतात असे अर्थ लावून ते प्रसारित केलं गेलं. अशा लोकांकरता इथे समर्थांनीच लिहून ठेवलेलं आहे शब्दात सांगायचं तर "पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।  तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ।।" अर्थात, अशा विपर्यास करणारे प्रत्येक वेळी मत्सरी दुरात्मे असतीलच असं नव्हे, अनेकदा ते निव्वळ अज्ञानापोटी केलेलं विधान आहे असंही आढळून येतं. इतकं आध्यात्मिक, गंभीर लिखाण करणार्‍या समर्थांना विनोद आवडत नसावा हे आणखी एक गृहतिक हे वाक्य वेगळं काढून प्रसारित करण्यामागे असावं. पण खरंच समर्थ रामदास स्वामींना विनोद आवडत नव्हता का? ते हास्यविनोदाच्या विरोधात होते का?

वास्तविक समर्थांच्या पूर्ण वाङ्मयात त्यांनी कुठेही विनोदाची किंवा विनोदनिर्मितीची किंवा तो करणार्‍याची निंदा केलेली नाही. दासबोधातील दशक सातवा समास नववा यात  कुणाकुणाला काय काय आवडते त्याचे विवेचन समर्थांनी केलेले आहे. समर्थांनी टवाळ नक्की कुणाला म्हटलं आहे आणि कोणत्या संदर्भात म्हटलं आहे ती आणि त्या नंतरची ओवी मुळातून वाचल्यास याचं उत्तर आपल्याला मिळतं. त्या दोन ओव्या :

टवाळां आवडे विनोद | उन्मत्तास नाना छंद | तामसास अप्रमाद | गोड वाटे ||५१||
मूर्ख होये नादलुब्धी | निंदक पाहे उणी संधी | पापी पाहे पापबुद्धि | लाऊन आंगीं ||५२||

५१ - उन्मत्त, माजोरड्या माणसांना नाना छंद असतात किंवा आवडतात. इथे छंद याचा अर्थ आजच्या भाषेत येडेचाळे किंवा लहरीमुळे केलेली विचित्र कृते असा घ्यावा. तामसी माणसाला शांत, संयमी राहणे जमत नाही. तो सतत दुष्टकर्माकडेच आकर्षिला जातो. समर्थांना इथे हे सांगायचं आहे की त्याचप्रमाणे टवाळ माणसाला येता जाता हलक्या दर्जाचा, विकृत अशा स्वरूपाचा विनोद करायला आणि इतरांना सांगायला आवडतं.

५२ - मूर्ख लोक नादलुब्धी असतात, निंदक नेहमीच दुसर्‍याच्या उणीवा शोधण्याच्या संधी शोधत असतो, त्याला त्यातच रस असतो. तर पापी माणूस दुसर्‍याचीही बुद्धी भ्रष्ट करुन तिचे रूपांतर पापबुद्धीत करण्यात दंग राहतो.

याचा अर्थ याचा अर्थ ज्याला विनोद आवडतो, तो टवाळच असतो असा त्याचा अर्थ खचितच होत नाही. आधी म्हटल्याप्रमाणे समर्थ रामदासस्वामींचे साहित्य आणि त्यांचे आयुष्य पाहील्यास ते अगदी गंभीर प्रवृत्तीचे असतील असा निष्कर्ष काढणे उथळपणाचे ठरेल. समर्थ अशा प्रकारच्या विनोदाबद्दल काय विवेचन करतात ते मूर्खलक्षणांत अर्थात दुसर्‍या दशकात आपल्याला सापडतं. त्यातल्याही या दोन ओव्या प्रातिनिधिक म्हणाव्या लागतील:

विनोदार्थीं भरे मन | शृंघारिक करी गायेन | राग रंग तान मान | तो रजोगुण ||२४||
टवाळी ढवाळी निंदा | सांगणें घडे वेवादा | हास्य विनोद करी सर्वदा | तो रजोगुण ||२५||

सतत विनोदांत रमावेसे वाटते, विविध रंगाची व रागतालयुक्त श्रृंगारिक गायनाची गोडी वाटत राहते, तो रजोगुण होय (इथे सतत हा शब्द महत्त्वाचा). टिंगल, टवाळी, निंदा करण्यात, वादविवादात जिंकल्याचा किस्सा गर्वाने सांगण्याची आवड असते, हास्य विनोदात रमावेसे वाटते, तो रजोगुण होय.

रामदास स्वामी शिस्तप्रिय आणि बलोपासनेचे भोक्ते असले तरी ते तितकेच आयुष्याचा निर्मळ आनंद घेणारे होते. त्यांच्या या स्वभावाचे दर्शन घडविणाऱ्या अनेक घटना त्यांच्या चरित्रग्रंथांत नोंदवलेल्या आहेत. पण समर्थांनी विनोदाबद्दल काही लिहिलं आहे का हे पाहूया. पण त्या आधी एक गोष्ट पुन्हा लक्षात घेतली पाहीजे की समर्थांचा कटाक्ष येता जाता सतत टिंगल टवाळकीच्या स्वरुपात केल्या जाणार्‍या विकृत विनोदाकडे होता. निखळ विनोदाला समर्थांनी नेहमीच पाठींबा आणि प्रोत्साहन दिलेले दिसेल.

मूर्खांची आणि पढतमूर्खांची लक्षणे सांगताना समर्थ एखाद्या गोष्टीच्या खोलात न जाता उथळपणा करणार्‍या मनुष्यांच्या विरोधाभासाने भरलेल्या वागण्याला सणसणीत टोमणे मारायला कमी करत नाहीत. हा ही विनोदाचाच एक प्रकार होय. जाता जाता त्या संदर्भातल्या दशक पाचवा समास तिसरा (६६) यात समर्थ काय म्हणतात ते पाहूया:

काखे घेऊनियां दारा | म्हणे मज संन्यासी करा | तैसा विषई सैरावैरा | ज्ञान बडबडी ||६६||
असो ऐसे पढतमूर्ख | ते काय जाणती अद्वैतसुख | नारकी प्राणी नर्क | भोगिती स्वइच्छा ||६७||

बायकोच्या कमरेला हाताने विळखा घालून मला संन्यासदीक्षा द्या असं एखादा म्हणतो, तसं विषयासक्त अज्ञानी माणूस आत्मज्ञानाची स्वैर बडबड करीत सुटतो. एकूण काय तर या पढतमूर्ख लोकांना अद्वैतानुभवाचं सुख कसं माहित असावे ? नरकातील प्राणी स्वतःच्या इच्छेने नरकाचे दुःख भोगत असतात.

शेवटी समर्थांनी विनोदाबद्दल काय लिहिले आहे, किंबहुना विनोदाचे समर्थन केले आहे का, त्याला स्पष्ट शब्दात प्रोत्साहन कसे दिले आहे ते पाहणे योग्य ठरेल. दासबोध दशक चौथा समास दुसरा (१४) यात समर्थ कीर्तन कसे करावे, कीर्तन नीरस होऊ नये म्हणून त्यात रंग कसे भरावे याचे जे विवेचन करतात ते संदर्भाकरता उपयुक्त असले तरी विस्तारभयास्तव संपूर्ण इथे देत नाही. पण त्यात ते विनोदाबद्दल म्हणतात तेवढं पाहूया:

पदें दोहडें श्लोक प्रबंद | धाटी मुद्रा अनेक छंद |
बीरभाटिव विनोद | प्रसंगें करावे ||१४||

भावभक्तियुक्त पदे, दोहे, श्लोक, धाटी, मुद्रा आणि छंद यांचा समावेश कथेत असावा. प्रसंगानुरुप चेहर्‍यावर वीर, हास्य इत्यादि रसाचा उपयोग करत कथेत विनोदाने रंग भरावा. यात समर्थांनी कीर्तन रंगवण्याकरता म्हणजे रंजक करण्याकरता इतर गोष्टींबरोबरच विनोदाचाही वापर करावा असं थेट आणि स्पष्टपणे म्हटलं आहे. असे समर्थ रामदास स्वामी विनोदाच्या विरोधात कसे असतील बरे? अशा अनेक ओव्यांची उदाहरणे दासबोधात आणि समर्थ साहित्यात अनेक ठिकाणी आढळतील.

प्रत्यक्ष समर्थ साहित्यातून घेतलेल्या वरील उदाहरणांवरुन हे स्पष्ट होईल की समर्थ रामदास स्वामी विनोदाच्या विरोधात तर नव्हतेच, उलट त्यांना विनोद आवडतच होता.

© मंदार दिलीप जोशी
वैशाख शु १, शके १९४१

संदर्भः श्रीमत् ग्रंथराज दासबोध - http://www.dasbodh.com/
विशेष आभारः कीर्तनकार श्री समीर लिमये.