Wednesday, September 6, 2017

मोबाईल, बायको, पर्स, आणि आपण

मनुष्यास स्थितप्रज्ञ या पातळी पर्यंत पोहोचायचे असल्यास दोनच मार्ग उपलब्ध आहेत.

एक साड्यांच्या दुकानात सेल्समनची नोकरी करावी आणि दुसरा म्हणजे आठवड्यातून एकदा बायकोच्या किंवा आईच्या ज्या पर्समधे मोबाईल वाजतोय त्याच पर्समधून फोन वाजायचा थांबायच्या आत काढून पलिकडच्या माणसाला हेलो म्हणून दाखवण्याचा सराव करावा.

साड्यांच्या दुकानात सेल्समन होणे अवघड वाटत असल्यास दुसर्‍या पर्यायाचे अवलोकन करा.

मोबाईल फोन हा घरी असताना पर्समधे का ठेवला जातो हे मला न उमगलेलं कोडं आहे. आणि ठेवला तर ठेवला तो नवरे लोकांना का काढायला सांगतात हे दुसरं कोडं.

आधीच पर्समधे इतक्या वस्तू असतात की फोन वाजला की आकाशवाणी झाल्यासारखा अष्टदिशांनी आवाज येतोय असं वाटत राहतं. मग आपण घराच्या आकारमानानुसार स्वयंपाकघर, दिवाणखाना, बेडरूम, इतकंच काय बाथरूम सुद्धा फिरून येतो. नेमका कुठल्या पर्समधे फोन ठेवलाय हे आठवलं आणि मोबाईल शोधायला पर्स उघडली तर त्यातल्या पिना, पेन्सिली, एक बॉलपेन, एक मार्कर पेन, एक शाळेच्या काळापासून जपलेलं शाईचं पेन, लिप बाम, पेन बाम, खडू, मुलांचे क्रेयॉन, आपण मोबाईल शोधायला आत हात घालताच बोटांचा कचकावून चावा घेत मिटणार्‍या केसांच्या जादुई क्लिपा, टोकदार कानातली, गळ्यातले साधे, मोत्याचे, अमेरिकन असे वगैरे किमान चार पाच प्रकारची गळ्यातली, शँपूची पाकिटं, घरापासून किमान १० किलोमीटरवर असणार्‍या लेडीज टेलरच्या दोन अश्मयुगीन पावत्या, आधी हात आणि मग बेसावध राहिल्यास आपलंच तोंड काळं करणारी काजळाची कांडी, पॉकेट श्रीमद्भगवतगीता (बेटा, तुम्हारा इस पर्स में क्या है? जो था वो कल नहीं रहेगा, जो नहीं था वो कैसे मिलेगा, वगैरे), स्क्रू ड्रायव्हर (हो, हा पण निघाला होता एकदा. कशाला काय विचारता? नवर्‍याचे स्क्रू टाईत करायला ख्या ख्या ख्या), आणि आपण पर्समधे हात घातलाय की मुंग्यांच्या वारुळात असा प्रश्न डावा अशा वस्तू म्हणजे सुटे मोती, वावडिंग, बॉल बेअरिंग, वेलची, लवंगा इत्यादी वस्तूंचे अडथळे पार करुन मोबाईल पर्यंत पोहोचेपर्यंत तो वाजायचा बंद झालेला असतो.

ह्या, त्यात काय, कोणाचा आहे ते पाहून परत फोन करु असं आपण म्हणतो आणि कॉल हिस्टरीत जातो. नेमका तो नंबर साठवलेला नसतो. मग बायको, "काय हो, तुम्हाला इतकं नाही जमत!" असं म्हणत हातातून मोबाईल घेते आणि त्या नंबरला बिंधास्त फोन लावते. तो नेमका तिच्या बालमैत्रिणीने घेतलेला नवा नंबर असतो. "बघा, इतक्या वर्षांनी केलाय पमीने फोन, मी लावला नसता तर आणखी किती काळाने तिने केला असता कोण जाणे" असं आपल्याला पुन्हा ऐकावं लागतं.

नेमका अशा वेळी आपला फोन वाजतो आणि पलिकडे बायकोची सासू किंवा आपली सासू यांच्यापैकी एक जण असते. आपल्याला मोबाईल तिसरा हात असल्यासारखा जवळ ठेवायची सवय असल्याने उचलावाच लागतो आणि बायकोच्या बालमैत्रिणीशी (तिच्या - आपलं नशीब कुठलं इतकं चांगलं? - तिच्या) गप्पा संपेपर्यंत आपल्या फोनवर पलिकडे आपली सासू असल्यास "तुमची मुलगी कित्ती दमते हो कश्शा कश्शाला म्हणून वेळ नसतो तिला" अशी कौतुकं सांगत आणि बायकोची सासू असल्यास पटकन विषय बदलत "अगं आई आज मन्याने काय कमाल केली माहित्ये शाळेत" या ट्रॅकवर गाडी नेत काही वेळ काढावा लागतो. सुमारे असंख्य मिनीटांनी बालमैत्रिणीशी बोलून झाल्यावर बायको फोन ठेवते आणि आपली सासू असल्यास, "अहो काय हे, आधी नाही का सांगायचं आईचा फोन होता. काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल म्हणून इतका वेळ थांबली ती! आता तिची औषधांची वेळ आहे, उचलेल की नाही कोण जाणे फोन, काय बरं काम असेल?!" असं म्हणत फोन लावते आणि तिची सासू असल्यास, "दमले बाई, उद्या सकाळी लगेच करते फोन, आता झोपल्याही असतील सासूबाई" असं म्हणत सुस्करा सोडते.

स्थितप्रज्ञ होण्याकरता साड्यांच्या दुकानात सेल्समन होणे त्यापेक्षा सोपं वाटू लागतं.

-----------------------------------------------------------------
या लिखाणाचा कुठल्याही शहाण्या, अर्धवट, किंवा ठार वेड्या अशा मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तींशी; जिवंत, अर्धमेल्या, किंवा मृत व्यक्तींशी; आणि त्यांच्या स्थान, भाषा, शिक्षण, आणि व्यवसाय वगैरेंशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
-----------------------------------------------------------------

© मंदार दिलीप जोशी