अथश्री प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणार्या अथश्री त्रैमासिकाचे संपादक श्री आनंद आगाशे यांच्या परवानगीने पूर्वप्रकाशित हा लेख इथे प्रकाशित करत आहे.
-----------------------------------------------------------------------------------
आपल्याला एखादा चित्रपट आवडण्याची कारणं अनेक असू शकतात. कुणाला एखाद्या चित्रपटातली हाणामारी आवडेल तर कुणाला भावनिक संवाद, कुणाला त्यातलं चित्रिकरण आवडेल, कुणाला अभिनय आवडेल, तर कुणाला आणखी काही. पण एक कारण सनातन आहे आणि ते म्हणजे चित्रपटात आपल्या दैनंदिन जीवनाचं प्रतिबिंब दिसणं. ज्या चित्रपटात ते दिसतं तो त्या प्रेक्षकाच्या भावविश्वाचा एक अविभाज्य अंग होऊन जातो.
पण मनुष्यस्वभावाची एक गंमत आहे. हे प्रतिबिंब चित्रपट बघताना आपल्याला उपदेशाच्या स्वरूपात नको असतं. दोषारोप करणारं बोट दाखवून आपल्या वागण्यातली विसंगती जाणवून दिलेली आपल्याला आवडत नाही. आपल्याला हवी असते ती करमणूक. इथे प्रवेश करतं ते हलक्याफुलक्या विनोदाच्या माध्यमातून सामाजिक विषय मांडण्याचं कसब. हे कसब चित्रपटसृष्टीत अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच चित्रकर्त्यांना साधलं. त्यांपैकी एक म्हणजे या लेखाचे उत्सवमूर्ती ऋषिकेश मुखर्जी. हिंदी चित्रपटसृष्टी मोठी करण्यात ज्या अनेक गुणी बंगाली कलावंतांचा सिंहाचा वाटा आहे त्यातले एक उत्तुंग व्यक्तिमत्वं म्हणजे ऋषिदा.
मूळचे कलकत्त्याचे असलेल्या मुखर्जी यांनी सुरवातीला पोटापाण्याच्या सोयीसाठी काही काळ प्राध्यापकी केली. पण चित्रपटक्षेत्रात नाव कमवायची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना. आजच्यासारखेच त्याकाळीही अनेक तरूण आवड आहे, गती आहे म्हणून या बेभरवशाच्या आणि तूलनेने स्थिरता नसलेल्या व्यवसायात आत्मविश्वासाने उडी मारत. असंच साहस करत ऋषिदांनीही या मायावी दुनियेत प्रवेश केला. बी. एन. सरकार यांच्या कलकत्ता मधल्याच न्यु थियेटर्स मध्ये त्यांनी कॅमेरामनची नोकरी पत्करली. मग काही काळाने कैंचीदा म्हणून ओळखल्या जाणार्या त्या काळच्या प्रख्यात सिनेसंकलक सुबोध मित्तर यांच्याकडे त्याच संस्थेत संकलनकौशल्य आत्मसात केलं. अखेर ते ज्या संधीची वाट बघत होते ती संधी त्यांच्याकडे चालून आली. बिमल रॉय यांच्या सिद्धहस्त मार्गदर्शनाखाली दो बिघा जमीन या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक या नात्याने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात मुखर्जींचा प्रवेश झाला. या चित्रपटाचं संकलनही त्यांनीच केलं.
ऋषिदांना स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शन करण्याची पहिली संधी मिळाली ती १९५७ सालच्या मुसाफिर पासून. दिलीप कुमार, किशोर कुमार, केष्टो मुखर्जी, सुचित्रा सेन, उषा किरण, दुर्गा खोटे अशा अनेक कलाकारांची मांदियाळी असलेला हा चित्रपट वास्तविक तीन कथांची गुंफण होती. आपल्या पहिल्याच चित्रपटात असा प्रयोग करणं हे अत्यंत धाडसाचं आणि म्हणूनच कौतुकास्पद होतं. मुसाफिर बॉक्स ऑफिसवर आपटला असला, तरी मुखर्जींच्या दिग्दर्शनकौशल्याने प्रभावित झालेल्या राज कपूरने त्यांच्याकडे आर.के स्टुडिओच्या अनाडीचं दिग्दर्शन सोपवलं.
साधंसोपं कथानक, सामाजिक संदेश, आणि मर्यादित पण रोचक व्यक्तिरेखा असलेला अनाडी प्रचंड लोकप्रिय झाला. दुग्धशर्करा योग असा की त्याने प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांचीही वाहवा मिळवली. त्या वर्षीचा उत्कृष्ठ दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार हुकला असला तरी अनाडीला आणि त्याच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या कलावंतांना मिळून तब्बल पाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. मुखर्जींच्या या दुसर्याच चित्रपटाने त्यांना दिग्दर्शक म्हणून लोकमान्यता मिळवून दिली. या धवल यशानंतर ऋषिकेश मुखर्जींनी मागे वळून पाहिलंच नाही.
सत्यकाम या चित्रपटात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर उद्भवलेल्या एकंदर सामाजिक परिस्थितीने आपल्या आदर्शांच्या झालेल्या ठिकर्या आणि मूल्यांची पदोपदी चाललेली चेष्टा-अपमान पाहून व्यथित झालेल्या तरुणाची कथा, नमक हराम मधील कामगारवर्गाचा संघर्ष, अभिमान मधल्या पती-पत्नीं मध्ये पुरुषी अहंकारामुळे झालेला बेबनाव असे अत्यंत गंभीर प्रकृती असलेल्या विषयांचे प्रभावीपणे सादरीकरण करून मुखर्जी यांनी ते चित्रपट तितकेच मनोरंजकही होतील याची पुरेपूर काळजी घेतली. अशोक कुमार आणि संजीव कुमारच्या अभिनयानं नटलेला आशीर्वाद, धर्मेंद्रचा अनुपमा, बलराज सहानी अभिनीत अनुराधा यासारखे वेगळे चित्रपटही सरळ सरळ धंदेवाईक सिनेमांमध्ये मोडणारे नसले तरीही ते अजूनही तितक्याच आवडीने बघितले जातात ते याच कारणाने. या पैकी 'अनुराधा'ला १९६१ साली उत्कृष्ठ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, आणि जर्मनीतल्या गोल्डन बेअर पुरस्कारासाठी नामांकितही झाला.
धर्मेन्द्रची पहिली ओळख आजच्या प्रेक्षकांना होते ती प्रामुख्याने त्याच्या जेम्स बाँड छाप मारधाडपटांतूनच. अशा चित्रपटांपासून धर्मेन्द्रप्रेमाची सुरवात होणारा त्याचा चाहतावर्ग सत्यकाम आणि अनुपमा या चित्रपटांमधला त्याचा नियंत्रित आणि संयत अभिनय पाहून आश्चर्यचकित होतो. या दोन्ही चित्रपटांतला धर्मेंद्रचा सशक्त अभिनय बघून इंग्रजीत ज्याला director's actor म्हणतात ते नक्की काय ते नेमकं समजतं आणि इथेच ऋषिदांच्या प्रतिभेसमोर आपण नतमस्तक होतो. गुड्डीतला सिनेनटाच्या रंग फासलेल्या चेहर्याआड दडलेल्या माणसाचं दर्शन घडवणारी धर्मेन्द्रची भूमिका आणि जया भादुरीच्या अभिनयाला असलेल्या 'द गर्ल नेक्स्ट डोअर' च्या प्रतिमेमुळे आलेल्या मर्यादा या चित्रपटात एक बलस्थान म्हणून समोर येतात तेव्हा उत्पल दत्त यांच्या प्रोफेसर गुप्तांच्या "जय धर्मेन्द्र" सारखं 'जय हृषिदा' म्हटल्यावाचून राहवत नाही. स्त्रीप्रधान चित्रपटात पूर्वी दिसायच्या त्या रडकथा. पण रेखाने ऋषिदांच्या मार्गदर्शनाखाली तिच्या जबरदस्त अभिनयाने गाजवलेले खूबसूरत आणि झूठी हे त्याला सणसणीत अपवाद आहेत.
त्यांच्या अत्युत्तम कलाकृतींमध्ये गणल्या गेलेल्या आनंद (१९७१) मधली कर्करोगग्रस्त आनंद या तरुणाची वेदना ही प्रेक्षकांना फक्त अश्रू ढाळायला लावत नाही. आपण आनंदने केलेल्या विनोदांवर चक्क हसतो देखील. कुठेही लांबलचक संवाद, अकारण लावलेलं पाल्हाळ, आणि सतत उपदेशांचा मारा यातलं काहीही आपल्याला या सिनेमात दिसत नाही. डॉ. भास्कर बॅनर्जीच्या डोळ्यांत आपलं मरण स्पष्ट पाहून आनंद त्यालाच धीर देतो आणि 'बाबूमोषाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहीये!' या साध्यासोप्या शब्दात जगायचं कसं हे शिकवून जातो. या चित्रपटात आपल्याला राजेश खन्नातला सुपरस्टार दिसत नाही, आपल्याला दिसतो तो आतड्याच्या कर्करोगाने हळू हळू मरणाकडे खेचला जात असतानाही इतरांचेच अश्रू पुसणारा आनंद. आपला प्रेमभंग विसरून मित्राचं, डॉ. भास्करचं प्रेम जुळवायला झटणारा आनंद. आणि 'मौत तू एक कविता है...मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको' म्हणत मृत्यूशी काव्यमय मैत्री करणारा आनंद. यानंतर १९७२ साली आलेल्या बावर्ची मधल्या प्रमुख भूमिकेसाठी राजेश खन्नाची निवड निश्चित झाली तेव्हा तो त्याच्या कारकिर्दीच्या यशोशिखरावर होता. अशा या सुपरस्टारला अर्ध्या बाहीच्या खाकी शर्ट आणि अर्ध्या विजारीत, डोक्यावर गांधी टोपी आणि खांद्यावर टॉवेल या अवतारात ऋषिदांनी दाखवण्याचं धाडस केलं. आनंद प्रमाणेच या चित्रपटातही राजेश खन्नाने साकारलेल्या नायकाला 'नायिका' नाही! देवळात प्रवेश करताना आपली पादत्राणं बाहेर काढून जावं तसं ऋषिदांच्या कॅमेर्यासमोर येण्याआधी 'स्टार'पदाच्या चपला आपोआप काढल्या जात त्या या अशा. सबकुछ राजेश खन्ना असलेल्या साध्यासुध्या आनंद इतकाच त्याचा बावर्चीही आपल्याला अंतर्मुख करतो आणि कुठेही प्रचारकी भाषा न वापरता एकत्र कुटुंबव्यवस्थेचे फायदेही दाखवून देतो.
व्यक्तिरेखांमधे रंग भरणे हा ऋषिदांच्या दिग्दर्शनकौशल्याचा एक महत्त्वाचा पैलू. त्यांच्या चित्रपटांत छोट्या भूमिका करणारे कलाकार आणि त्त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा ठळपणेही लक्षात राहतात. आनंद मधला जॉनी वॉकरचा इसाभाई सुरतवाला म्हणजेच 'मुरारीलाल' आणि आसित सेनचा औषधखाऊ सेठ चंद्रनाथ, काली बॅनर्जीने साकारलेली बावर्ची मधली आधी कृष्णावर जळणारी आणि मग तिची बाजू घेऊन आपल्याच आईशी भांडणारी मीता, बावर्चीमधलाच बायल्या नृत्यशिक्षक गूफी पेंटल, चित्रपटात काम मिळेल म्हणून गावाहून पळून आलेला आणि स्वप्नभंगाचं दु:ख आईपासून लपवणारा असरानीचा गुड्डीतला कुंदन, चुपके चुपके मधे धर्मेन्द्रने ".....जी ओ गू क्युं नहीं होता?" म्हणताच नाकाला पदर लाऊन उठणारी उषा किरण, अभिमान मधला डेव्हीडचा ब्रिजेश्वर राय, गोलमाल मधला युनुस परवेझचा नाकात बोटं घालणारा बडे बाबू, इन्स्पेक्टरच्या भूमिकेतला ओमप्रकाश....अशी उदाहरणं असंख्य आहेत. ही माणसं त्यांच्या लकबी, स्वभाववैशिष्ठ्यांसह आपल्याला आजही आठवतात ती त्यांच्या सुंदर व्यक्तिरेखाटनामुळे.
कितीही मोठा नट असो, फारशा चौकशा न करता जगन्मित्र असलेल्या ऋषिदांच्या चित्रपटात काम करायला नेहमीच उत्सुक असे. राज कपूर, देव आनंद, धर्मेंद्र, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या त्याकाळच्या 'स्टार' अभिनेत्यांबरोबर त्यांनी एका पेक्षा एक सरस चित्रपट दिले. त्यापैकी अमिताभने त्यांच्याकडे सर्वाधिक चित्रपट केले. मुखर्जींची जादू अशी, की आपल्या सुपरस्टार पदाचा जराही अभिमान न बाळगता अमिताभने त्यांच्या अनेक चित्रपटात अगदी छोट्या म्हणजेच २-३ मिनिटांच्या पाहुण्या भूमिकाही केल्या. आठवा: गोलमाल चित्रपटातल्या 'सपने में देखा सपना' या गाण्यात अमोल पालेकर सुपरस्टार झाल्यावर भाव घसरलेला, फुटपाथवर बसलेला निराश अमिताभ. सुपरस्टार देव आनंद हा उत्कृष्ठ अभिनेता म्हणून कधीच प्रसिद्ध नव्हता. मात्र जेव्हा जेव्हा त्याच्यातला अभिनय काढून घेणारा दिग्दर्शक मिळाला तेव्हा तेव्हा त्याचा अभिनय नावाजला गेला. ऋषिदांनी देवला दिग्दर्शित केलेल्या असली नकली मधे त्याने केलेला नैसर्गिक अभिनय हे त्याचंच एक उदाहरण आहे.
चित्रपटाची कथा आणि विषय कुठलाही असला तरी ऋषिकेश मुखर्जी यांचे बहुतेक सगळे चित्रपट निखळ कौटुंबिक करमणूक म्हणूनच ओळखले जातात याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या चित्रपटातील साधेपणा व त्यांनी माणसांचे आपापसातले नातेसंबंध यांचे अत्यंत तरलतेने पडद्यावर केलेले सादरीकरण. मुखर्जी यांना वरवर साध्या आणि सोप्या घटना प्रसंगांची पडद्यावर मांडणी करणं जास्त कठीण आहे हे ठाऊक असूनही ते अशाच आव्हानात्मक विषयांमध्ये अधिक रस घेत. त्यांच्या चित्रपटांमधून दिल्या जाणार्या संदेशांची कटूता आणि बटबटीतपणा संपूर्णपणे वर्ज्य करुन मनोरंजनरूपी साखरेच्या गोड वेष्टनात गुंडाळूनच दिली गेली पाहीजे याकडे त्यांचा कटाक्ष असे. इंग्रजीत जे रचना तत्व (design principle) म्हणून वापरलं जातं ते K.I.S.S. म्हणजेच Keep it Simple, Stupid या तत्वाचा अनेक दिग्गज समीक्षकांच्या मते हिंदी चित्रपटांमध्ये मुखर्जी यांच्या इतका उपयोग कुणीच केला नसेल, अपवाद असलाच तर तो फक्त बासू चॅटर्जींचा. मुखर्जीं यांनी व्यावसायिक मसालापटांचा झगमगाट आणि कलात्मक चित्रपटांतलं अंगावर येणारं वास्तव या दोन्हीत सुवर्णमध्य साधला. आपल्या प्रत्येक निर्मितीत सर्वसामान्य माणसाची बदलती मानसिकता प्रतिबिंबित केल्याने त्यांचे बहुसंख्य चित्रपट प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत ठरले यात काही नवल नव्हे.
मुखर्जी यांचे सुरवातीचे चित्रपट हे विचारप्रवर्तक, सामाजिक किंवा गंभीर कथा असणारे असले, तरी त्यांच्या कारकीर्दीच्या दुसर्या टप्प्यात त्यांनी त्याबरोबरच अनेक विनोदी आणि करमणूकप्रधान चित्रपटांची मालिकाच सादर केली.
विनोदाच्या एका विशिष्ठ शैलीला मी वुडहाऊस शैली असं म्हणतो. पी. जी. वुडहाऊस यांच्या गोष्टी वाचताना हळू हळू वातावरणनिर्मिती होऊन एका क्षणी फिसकन् हसू येतं किंवा हास्यस्फोट होतो. या शैलीचं दुसरं वैशिष्ठ्य असं की विनोदनिर्मितीसाठी काही ओढून ताणून विशेष प्रयत्न केले गेले आहेत असं वाटत नाही. कथेतल्या पात्रांच्या संवादांमधून आणि कथा जशी उलगडते त्यातून जी स्वाभाविक आणि सहज वातावरणनिर्मिती होते त्याचा ह्या हास्यस्फोटात महत्त्वाचा वाटा असतो. या प्रकारच्या विनोदांनी जर सभ्यपणाबरोबरच सुसंस्कृतपणाही जपला तर त्यांचा सगळ्या कुटुंबाबरोबर आनंद घेता येतो. हीच शैली चित्रपटांसारख्या वेगळ्या माध्यमातही आपल्याला दिसते.
मुखर्जी यांच्या चित्रपटांत हीच शैली आपल्याला प्रकर्षाने जाणवते. काही सन्माननीय अपवाद वगळता आजचे तथाकथित विनोदी चित्रपट बघितले तर प्रेक्षकांकडून हशा वसूल करायला आचकट-विचकट हावभाव, विचित्र अंगविक्षेप, किंवा सरळ सरळ घाणेरडी भाषा यांचाच प्रामुख्याने आधार घेतलेला आढळतो. मध्यमवर्गाची नाडी अचूक ओळखलेल्या मुखर्जी यांनी चुपके-चुपके, गोलमाल, नरम-गरम, रंग बिरंगी या त्यांच्या विनोदी चित्रपटांमध्ये कुठेही असले प्रकार तर वापरले नाहीतच पण द्वैअर्थी किंवा अश्लील संवादांना जवळजवळ पूर्णपणे फाटा देऊन सकस व अभिरूचीपूर्ण विनोदनिर्मिती केली. शिवाय नायक हा एक तर 'बस्ती में रहने वाला' अत्यंत गरीब किंवा मग महाल सदृश्य बंगल्यात राहणारा गर्भश्रीमंत" अशा टोकाच्या प्रकारांच्या वाट्याला क्वचितच जाऊन, मध्यमवर्गाचे यथार्थ दर्शन घडवलं.
समाजाच्या एखाद्या वर्गाचं जगणं सिनेमात दाखवणं म्हणजे तो राहतो ते घर, तो वावरतो ती ठिकाणं आणि आजूबाजूची माणसं समानशीले व्यसनेषु सख्यम् आहेत की नाही एवढंच मर्यादित जग दाखवणं नव्हे. त्यांचं हात-पाय धुताना, पाणी पिताना, सिगारेट ओढताना, चालताना, कपडे घालताना या आणि अशा दैनंदिन गोष्टींच दर्शनही तितकंच प्रत्ययकारी व्हायला हवं. ऋषिदांनी या वातावरणनिर्मितीत किती प्राविण्य मिळवलं होतं ते सांगायला गोलमाल या चित्रपटातलं उदाहरण प्रातिनिधिक ठरावं. चित्रपटाच्या सुरवातीला अमोल पालेकर घरी येतो, एका तंद्रीत आणि उत्साहात धाकट्या बहिणीला मॅचबद्दल सांगत असतो. तिला जेवण वाढायला सांगून बाथरूममध्ये हात-पाय धुतो, आणि बाथरूमचं दार तसंच उघडं ठेऊन टेबलाशी येऊन बसतो. दोन सेकंदांनी गप्पा चालू ठेवत बहीण त्याला खायला देते आणि दार ओढून घेते. आपल्या सर्वांवरच लहानपणापासून घरातल्या आई-आजी आणि इतर मोठ्यांकडून तिन्हीसांजेला काय करावं काय करु किंवा बोलू नये याचे संस्कार झालेले आहेत. बावर्ची मधे 'ज्यांनी लहानाचं मोठं केलं त्यांचाच विश्वास आपल्यावर नाही...यापेक्षा आपण आपल्या आईवडिलांबरोबर अपघातात मेलो असतो तर बरं झालं असतं' असं रडवेली झालेली कॄष्णा (जया भादुरी) सांगते. हे ऐकल्यावर दुर्गा खोटे सात्त्विक संतापाने त्यांच्या खास ठसक्यात "सुनोsss, शाम के वक्त लडकी की बातें सुनो" म्हणतात तेव्हा आपल्याला याच संस्कारांचं मायाळू रूप दिसतं.
नर्मविनोदी संवादांची पखरण असलेला गोलमाल इतका लोकप्रिय झाला, की सलग एका चित्रपटगृहात पाच वर्ष धो धो चालणारा सिनेमा अशी ज्याची ख्याती त्या शोले या अफाट लोकाश्रय लाभलेल्या सिनेमासमोरही त्याने तिकीटबारीवर दणक्यात धंदा केला. रूढ अर्थाने 'हीरो' या संकल्पनेत न बसणार्या अमोल पालेकर सारख्या अभिनेत्यालाही या चित्रपटाने हिंदीत चांगलीच लोकप्रियता मिळाली, तसंच उत्पल दत्त यांच्या सारख्या मातब्बर अभिनेत्याने चरित्र अभिनेताही कशाप्रकारे उत्कृष्ठ दर्जाचा विनोदी अभिनय करू शकतो हे दाखवून दिलं.
ह्याच दोन कलाकरांना घेऊन कुठेही तोचतोचपणा न जाणवू देता त्यांनी नरम गरम व रंगबिरंगी हे धमाल चित्रपट सादर केले. चुपके चुपके या चित्रपटात तर त्यांनी धमालच उडवून दिली. तो पर्यंत 'अँग्री यंग मॅन' आणि अॅक्शन हीरो म्हणून मान्यता पावलेल्या अमिताभ बच्चन व धर्मेंद्र यांनी या चित्रपटात असरानी, ओमप्रकाश व केष्टो मुखर्जी यांच्यासारख्या नावाजलेल्या विनोदी अभिनेत्यांच्या तोडीस तोड विनोदी अभिनय केला, याचं श्रेय अर्थातच मुखर्जी यांच्या दिग्दर्शनाला जातं. याच मालिकेतला १९९८ साली आलेला झूठ बोले कौवा काटे हा खास ऋषिदा पठडीतला नर्मविनोदी चित्रपट मात्र सपशेल आपटला. झूठ बोले कौवा काटे अयशस्वी होण्यामागे कदाचित सिनेरसिकांची बदलेली (की बिघडलेली?!) अभिरुची आणि पात्रनिवड (उत्पल दत्तला पर्याय म्हणून अमरीश पुरी आणि अमोल पालेकरला पर्याय म्हणून अनिल कपूर) ही कारणं असू शकतील. नर्मविनोदी चित्रपटांबाबत बोलताना दीप्ती नवल आणि फारुख शेख या त्याकाळच्या अनोख्या हिट जोडीने धमाल उडवून दिलेला किसीसे ना कहना हा चित्रपट आपण विसरूच शकत नाही. यातही उत्पल दत्त यांनी त्यांच्या उत्स्फूर्त अभिनयाने कहर केला होता.
दिग्दर्शनाबरोबरच गाण्यांच्या नितांतसुंदर चित्रिकरणामध्येही त्यांनी प्राविण्य मिळवलं होतं. गुड्डी चित्रपटातलं 'हम को मन की शक्ती देना' तसंच आनंद मधील 'कहीं दूर जब दिन ढल जाए' ही दोनच उदाहरणं आपल्याला याची ग्वाही देण्यास पुरेशी आहेत. त्यांच्या सिनेमात कुठेही गाणी 'घातली आहेत' असं वाटत नाही. ती कथानकाचा एक भाग होऊन किंवा कथा सांगण्याचं एक माध्यम बनून ती आपल्यापुढे सादर होतात. हे कौशल्य त्यांच्या व्यतिरिक्त फक्त विजय आनंद उर्फ गोल्डी ला साधलं होतं.
ऋषिकेश मुखर्जी हे फक्त उत्कृष्ठ दिग्दर्शकच नव्हे, तर एक सहृदय 'बॉस'ही होते याचं एक उदाहरण मंजू सिंग यांनी एका मुलाखतीत दिलं होतं. गोलमाल मधे अमोल पालेकर यांच्या धाकट्या अविवाहीत बहिणीची भूमिका साकारणार्या मंजू सिंग या प्रत्यक्षात दोन मुलींची आई होत्या. या गोष्टीची जाणीव असलेले मुखर्जी इतर जेष्ठ कलाकारांना सरळ सांगत, "मी हिचा सहभाग असलेली दृश्ये आधी चित्रीत करणार आहे म्हणजे तिला लवकर घरी जाता येईल."
रोमँटिक दृश्ये आणि पती-पत्नींमधले नाते यांचे सुंदररित्या चित्रिकरण करणार्या मुखर्जी यांची पत्नी मात्र त्यांच्या आधी ३० वर्ष हे जग सोडून त्यांना एकटं करून गेल्या. त्यांचा एक मुलगा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर दम्याचा तीव्र झटका येऊन मरण पावला. त्यांना तीन मुलीही आहेत. प्राणीप्रेमी असलेले मुखर्जी आपल्या बांद्र्याच्या सदनिकेत आपल्या काही पाळीव कुत्र्यांच्या आणि क्वचित भेट देणार्या एखाद्या मांजराच्या सहवासात राहत. मुले आणि नातेवाईक येऊन-जाऊन असले, तरी ते आपल्या आयुष्याची शेवटची काही वर्ष घरात एकटेच होते - सोबत असलीच तर हेच पाळीव प्राणी व काही नोकर यांची.
"ये दुनिया एक रंगमंच है और हम सब उसमे काम करनेवाली कठपुतलीयां है" असा काहीसा संवाद आनंद मधे आहे. योगायोग असा की ऋषिकेश मुखर्जींनी या जग नामक रंगमंचाचा निरोप घेतला तो याच चित्रपटातली अजरामर गाणी गाणार्या मुकेशच्याच स्मृतीदिनी. मूत्रपिंडाचा विकार बळावल्याने ऋषिदांचं २७ ऑगस्ट २००६ रोजी निधन झालं.
आजच्या चित्रपटांत सर्वसामान्य माणूस कुठेही दिसत नाही. दिसतो तो नुसता चकचकाट. गाण्यांत दिसतं तो आधुनिकतेच्या नावाखाली ठेक्याला आलेलं अवास्तव महत्त्व, वाद्यांचा गदारोळ, आणि आचकटविचकट नाच. नात्यांचं साधंसोपं भावस्पर्शी चित्रिकरण लोप पावलंय आणि त्याच्या जागी आलं आहे ते स्वार्थासाठी एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे संवाद. हळुवारपणे प्रेम व्यक्त होणं कधीच संपलं आहे. त्याजागी आलं आहे ते 'लोकांना हवं ते आम्ही दाखवतो' च्या नावाखाली हवं ते ओरबाडून घेण्याची चटक लावणारी वासनांधता. शिव्याशाप आणि अश्लीलतेने ओतप्रोत भरलेले संवाद आज विनोदाची झूल पांघरून आमच्यावर अधिराज्य करु पाहत आहेत. निखळ विनोद तर औषधालाही नाहीत. ही अशी अंगावर येणारी करमणूक पाहिली की जीव गुदमरतो आणि मग कळवळून म्हणावसं वाटतं, "ऋषिदा, तुम्ही परत या हो!"
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संदर्भः आंतरजालावरील अनेक संकेतस्थळं व माझे चित्रपटप्रेम.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
दुसरा लेख: मनोरंजनाचे घेतले व्रत | विजय आनंद उर्फ गोल्डी