Showing posts with label सनातन अर्थव्यवस्था. Show all posts
Showing posts with label सनातन अर्थव्यवस्था. Show all posts

Monday, October 12, 2020

छोटे स्थानिक व्यवसाय आणि आपण: हिंदू अर्थव्यवस्था - भाग ३

Keep it Simple, Stupid!

तंत्रज्ञानाचा वापर या अनुषंगाने एक वेगळा मुद्दा मांडू इच्छितो. तुम्ही व्यवसाय करताना तंत्रज्ञानाचा उपयोग करत असलात तर गोष्टी साध्या सोप्या ठेवा. संभाव्य गिर्‍हाईकांना तुम्ही तंत्रज्ञान वापरून बनवलेल्या संकेतस्थळे किंवा अ‍ॅप वापरताना आरामात खरेदी करता आली पाहीजे. 

दोन अनुभव सांगतो. माझा एक परिचिताचा सेंद्रीय शेती व शेतमाल विक्रीचा व्यवसाय आहे. आता एका शहरात व्यवसाय करायचा म्हटल्यावर अमुक ठिकाणी विक्री होणार इथवर ठीक आहे, पण आता ही ठिकाणे ठरणार कशी, तर आजूबाजूच्या लोकांचा अंदाज घ्यायचा, पुरेशी लोकं सेंद्रीय शेतमाल घ्यायला तयार असली की त्यांनी मागणी नोंदवायची, मग ते ठिकाण ड्रॉप पॉइंट ठरणार. हे किती कटकटीचं आहे! एक तर हा सेंद्रीय शेतमालाची किंमत जास्त, लोकं याकडे आकर्षीत कशी होणार? त्यापेक्षा सरळ ट्र्क घेऊन सोसायटीच्या बाहेर यायचं, ज्याला घ्यायचं तो घेईल. शिवाय भाजी घेताना समोर ज्या भाज्या दिसतील त्यापैकी माणूस ठरवतो कुठल्या घ्यायच्या ते. काही दिवस आधी यादी तयार करुन मग भाज्या नाही घेता येत. 

पण नाही, आमच्या सोसायटीसाठी व्हॉट्सप ग्रूप बनवून झाला आणि एकही प्रतिसाद आला नाही. गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या करुन ठेवल्यावर कोण प्रतिसाद देणार? लोकांनी किंमतीची कारणे सांगून काढता पाय घेतला.

दुसरा अनुभव. तोच परिचित. कोकणी व इतर स्वदेशी उत्पादनांसाठी एक अ‍ॅप बनवण्यात आलं. म्हटलं बरं झालं आता अ‍ॅप हाताशी असेल तर उत्तम. पण हाय रे कर्मा. आधी अ‍ॅप डाऊनलोड करायचं, मग त्यात नाव, पत्ता, फोन ही माहिती भरायची. इथवर ठीक. पण मग तुम्ही राहता त्या भागातला 'प्रतिनिधी' तुमच्याशी संपर्क साधणार आणि तुम्हाला अ‍ॅपचा अ‍ॅक्टिव्हेशन कोड देणार. मग तुम्ही अ‍ॅप वापरू शकता. पण का ही गुंतागुंत पुन्हा? अ‍ॅमॅझॉन किंवा इतर अ‍ॅप्स सारखं सोपं का नाही बनवता येत? एक तर पत्ता नोंदवायचा असतोच, तिथे राज्य आणि शहरांचे ड्रॉप-डाऊन बॉक्स आहेतच (जिथे तुम्ही वस्तू पोहोचवू शकता त्याची मर्यादा तिथेच वापरकर्त्याला दिसते), त्यामुळे त्या त्या विभागातल्या प्रतिनिधीने अ‍ॅपचा अ‍ॅक्टिव्हेशन कोड देण्यात काहीही अर्थ नाही. फार फार तर अ‍ॅटोमेटीक पाठवता येणारा ओटीपी ठीक. पुढे काही समस्या आल्यास प्रतिनिधीशी संपर्क साधणे ठीक, पण अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हेट करायला प्रतिनिधीने फोन करण्यात काय हंशील?

म्हणजे आधी अ‍ॅपशी मारामारी करा, मग फोन येणार तो सुद्धा वाट्टेल तेव्हा, मग अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हेट होणार. मग वस्तू दिसणार. मग त्या मागवणार. कशाला हे सव्यापसव्य? सरळ अ‍ॅप डाऊनलोड करुन हव्या तितक्या डिव्हाईसेसवर इन्स्टॉल करुन एकच खातं तयार करुन हवं तेव्हा ऑर्डर करण्याची सोय देणं इतकं अवघड आहे का? 

हे इतकं पोटतिडकीने लिहीण्याचं कारण म्हणजे बाबांनो संभाव्य ग्राहकांकडे ऑनलाईन खरेदी करताना वेळ आणि संयम अजिबात नसतो. त्यात तुम्ही अशा पद्धतीने गोष्टी गुंतागुंतीच्या करुन ठेवल्यात तर लोक वैतागून नाद सोडून देतात.

म्हणूनच तंत्रज्ञान वापरणार असाल तर गोष्टी साध्या, सोप्या, आणि खरेदीसाठी सुलभ ठेवा. तरच लोक तुमच्या उपक्रमाकडे आकर्षित होतील. 

थोडक्यात Keep it Simple, Stupid! 

🖋️  मंदार दिलीप जोशी

ता.क. इथे stupid हे व्यक्तीला नसून वृत्तीला म्हटले आहे. तेव्हा राग मानू नये. 

भाग १भाग २

Tuesday, June 23, 2020

छोटे स्थानिक व्यवसाय आणि आपण: हिंदू अर्थव्यवस्था - भाग २

#VocalForLocal

एक पूजा साहित्य विक्री करणारे दुकान आणि एक किराणा व इतर सामानाचे प्रसिद्ध दुकान यांची संकेतस्थळे पाहून लक्षात आलेल्या काही गोष्टी. 

✔️ काही प्रमुख दुकानांनी लवकरात लवकर ऑनलाइन सेवा देणे सुरू करणे गरजेचे आहे. 

✔️ अनेक दुकानांची संकेतस्थळाच्या नावाखाली फक्त अगदी बेसिक साईट असते. कधी कधी तर फक्त होम पेज असतं. आणि त्यावर नाव आणि पत्ता आणि इतर तुटपुंजी माहिती असते जी फक्त दुकानात पोहोचण्यासाठी आपल्याला मदत करते. 

पण ऑनलाइन यादी आणि ऑर्डर करता येणे या सोयी या संकेतस्थळांवर अजूनही नाहीत. अनेकदा दुकानात फोन केल्यावर ऑर्डर पाठवायचा व्हाट्सप क्रमांक मिळतो. तोच संकेतस्थळावर देता येणार नाही का?

संकेतस्थळ काढून मग माहिती अद्ययावत करण्याचे विसरणे हे करू नये. तत्सम अनेक बाबी आहेत.

✔️ तात्पर्य हे की आता फक्त गल्ल्यावर बसून असेल गिऱ्हाईक तर येईल दुकानात असा विचार न करता ऑनलाईन सर्च मार्गाने नवीन गिऱ्हाईक जोडणे आणि उपरोक्त सोयी देऊन नियमित गिऱ्हाईकांना बांधून ठेवणे हे अत्यावश्यक झालेले आहे. 

आधीचा भाग: इथे क्लिक करा


🖋️  ©️ मंदार दिलीप जोशी

छोटे स्थानिक व्यवसाय आणि आपण: हिंदू अर्थव्यवस्था - भाग १


#VocalForLocal

बरेच दिवस लिहू लिहू म्हणत होतो तेवढ्यात काल बेलापुरे काकांची पोस्ट बघितली.

गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहे की फक्त "स्थानिक" विक्रेत्यांकडून विकत घ्या वगैरे वगैरे, पण हे नेमकं कसं करायचं याबद्दल हे थोडं मुक्तचिंतन. आधी सोबत जोडलेली पोस्ट वाचून घेतलीत तरी चालेल. त्यात महत्त्वाच्या सूचना आहेत.

आपल्या शेजारी पाजारी, इमारतीत, सोसायटीत, मित्रमंडळींत, ऑफिसात कुणी ना कुणीतरी हिंदू व्यक्ती किंवा कुटुंब असेलच की जे घरात विविध खाद्यपदार्थ, मसाले, वगैरे घरीच बनवतात. आपल्या परिचयातले अनेक जण आयुर्वेदिक वैद्य आहेत जे उटणी किंवा तत्सम उत्पादने बनवतात. अशांची एक यादी तयार करा आणि वेळोवेळी ती अद्ययावत करत रहा.

✔️ आपल्या सोसायटीचा व्हॉट्सअप गृप असेलच, त्यावर मेसेज करुन अशी माहिती आपल्याला सहज मिळू शकते आणि पसरवता येते. एकदा दर्जा अणि व्यक्तीबद्दल खात्री झाली की अशी माहिती वेळोवेळी पसरवत रहावी. मग तिथे आपल्याला त्यातून काय मिळेल हा विचार करु नये. 
✔️ आज प्रत्येक जण व्हॉट्सअप, फेसबुक अशा सोशल मिडियावर आहे. अशा ठिकाणी लहानसे मेसेज तयार करुन आपण वेळोवेळी पोस्ट करत राहू शकतो. 
✔️ आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्यापैकी अनेकांना जुजबी फोटो एडिटिंग (उदा. फोटोशॉप) येतंच. अशा उत्पादनांचं मार्केटींग करताना आकर्षक रंगसंगती वापरून ती व्यक्ती जे पदार्थ किंवा मसाले वगैरे बनवते त्याची जाहीरात बनवता येईल. 
✔️ अशी जाहीरात करत असताना खाली त्या व्यक्तीला विचारून घेतलेला फोन्/व्हॉट्सअप नंबर अवश्य द्यावा म्हणजे संपर्क साधणे सोपे जाईल. ईमेल असेल तरी उत्तम.

असा व्यवसाय करणार्‍यांनी आपला दर्जा राखणं आवश्यक आहे, तसेच आपण घरगुती पातळी वर करत असल्यास मधेच कंटाळा आला म्हणून बंद करु नये, दीर्घकाळ करण्याची तयारी ठेवावी. कमाईचा मुख्य स्त्रोत नोकरी असल्यास व्यवसायात बनवत असलेल्या किमान एका गोष्टीचं उत्पादन बंद करु नये. मग पुढे वाढवता आणि कमी करता येतं. पण तुम्ही मधेच आणि सगळंच बंद करता आणि पुन्हा सुरु करता हे नियमित ग्राहकांच्या दृष्टीने गैरसोयीचं ठरू शकतं आणि मग गिर्‍हाइके बांधून ठेवता येत नाही. कारण असे व्यवसाय बऱ्याच प्रमाणात माऊथ पब्लिसिटीवर चालत असल्याने ही काळजी घेतली पाहिजे.



हे झालं घरच्या पातळीवर व्यवसाय करणार्‍यांच्या बाबतीत. या संबंधी इथे चर्चा करुया. 

पुढचा भाग: इथे क्लिक करा

🖋️ ©️ मंदार दिलीप जोशी