Saturday, May 9, 2020

आदिवासी विनिताने कोयत्याने नक्षलवादी एरिया कमांडर बसंत गोप याला कापून केलं ठार

आपल्याकडे एक म्हण आहे, भित्यापाठी ब्रह्मराक्षस. अर्थात मनातली भीतीच आपल्याला संकटांना तोंड देण्यापासून परावृत्त करते. ही भीती निघाली की समोर असलेला शत्रू कुणीही असो, कितीही ताकदवान असो, त्याच्याकडे कुठलीही हत्यारे असोत त्याचा पराभव ठरलेला असतो. ही गोष्ट आहे झारखंडच्या गुमलामधल्या एका आदिवासी खेड्यातल्या विनिता उरांव हिची. मुलाखत देताना अतिशय साधी आणि शांत वाटणारी विनिता प्रत्यक्षात वाघीण आहे. कसं ते आपण पाहू.

रणरागिणी विनिता उरांव
पण पूर्ण गोष्ट सांगण्याआधी नक्षलवाद्यांची विनिताच्या परिवाराशी नेमकं काय शत्रुत्व होतं हे जाणून घ्यायला आपल्याला थोडं मागे जावं लागेल. काही वर्षांपूर्वी विनिताचे वडिल शनिचरवा उरांव हे जलसंधार, जलयुक्त शिवार वगैरे कामं करायचे. त्याच काळात नक्षलवाद्यांनी एकदा त्यांच्याकडे पन्नास हजाराची खंडणी मागितली. शनिचरवा यांनि खंडणी देण्यास नकार दिल्याने नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केली. या घटनेनंतर नक्षलवाद्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी उर्वरित परिवाराने रांची गाठली आणि तिथे मोलमजूरी करुन आपला उदर्निर्वाह करु लागले. लॉकडाऊनमुळे सगळा परिवार पुन्हा आपल्या गावी परतला. आणि मंगळवारी.....

आता वळूया मुख्य बातमीकडे. गुमला जिल्ह्यापासून दहा किलोमीटरवर वृंदा नायक टोली गाव आहे. या गावात वृंदा आपला नवरा भीमराव, दोन मुलं, भाऊ पियुष आणि आईसह राहते. मंगळवारी रात्री जेवण झाल्यावर सगळे झोपी गेले. अचानक गोळीबाराच्या आवाजाने सगळ्यांना जाग आली. पाच ते सहा नक्षलवाद्यांनी विनिताच्या घराला वेढा घातला. हे पीएलएफआय  या नक्षलवादी संघटनेचे अतिरेकी असल्याचं लवकरच सगळ्यांच्या लक्षात आलं. ते विनिताचा नवरा भीमराव याला हाका मारुन बाहेर यायला सांगत होते. विनिताच्या कुटुंबाला आणि गावातल्या इतरांना दहशत बसावी म्हणुन हवेत गोळीबार सुरुच होता. असा काही वेळ गेला. कुणीच दरवाजा उघडत नाही म्हटल्यावर नक्षलवाद्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करायचा प्रयत्न केला. एवढ्यात त्यांच्यापैकी कुणालाही काहीही कळण्याच्या आत विनिताने कोयता घेऊन त्यातल्या एकावर जोरदार हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने तो नक्षलवादी खाली पडला. तो खाली पडल्यावर विनिताने त्याच्यावर त्वेषाने आणखी अनेक वार केले. आता त्याचे साथीदार बावचळले. अशा प्रकारच्या हल्ल्याची अपेक्षाच त्यांनी केली नव्हती. त्यांनी कसंतरी गंभीर जखमी झालेल्या आपल्या म्होरक्याला उचललं आणि तिथून पळून गेले. 

नक्षलवादी पळून गेल्यावर विनिताने गुमलाचे पोलीस निरिक्षक असलेल्या श्री जनार्दन यांना फोन करुन सगळा वृत्तांत कथन केला. सद्ध्या पोलीसांनी गावातच मुक्काम ठोकला आहे. बुधवारी पोलीसांना छापा टाकताना बसंत गोपचा मुडदा जंगलात बेवारस अवस्थेत पडलेला सापडला. जखमी बसंत गोपचा मृत्यू झाल्यावर त्याचं शरीर पळून जाणार्‍या नक्षलवाद्यांनी तिथेच फेकून दिलं होतं. 

बेवारस अवस्थेत फेकून दिलेला नक्षलवादी अतिरेकी बसंत गोपचा मुडदा

दैवदुर्विलास बघा. या नक्षलवादी संघटनेचं पूर्ण नाव आहे पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया. सामान्य जनतेची मुक्ती नावात(च) असणार्‍या या संघटना मात्र प्रत्यक्षात लोकांच्या हत्या करत फिरतात. काही वर्षांपूर्वी खबरी असल्याच्या संशयावरुन हत्या करायला आलेल्या नक्षलवादी नरधमांनी तो व्यक्ती पळून गेल्यावर त्याच्या बायकोच्या हतातून त्यांच्या चार महिन्याच्या बाळाला हिसकावून घेतलं आणि लोखंडी सळीने मारहाण केली, व ध त्याचा बळी घेऊन त्याच्या आईसमोरच त्याला पुरलं होतं. तेव्हा कुणी नक्षलवादी कसे जन्माला येतात वगैरे बकवास केली तर त्यांच्या तोंडावर ही उदाहरणे फेकून मारा. सरकारने अतिशय नीच अशा या अवलादीला आणि त्यांच्या शहरी पाठीराख्यांना निर्घृणपणे ठेचलं पाहीजे. तसेच जनतेनेही विनिताप्रमाणे सावध राहून अशा नराधमांना चांगलाच धडा शिकवावा. 

सरकारने विनिताला संरक्षण द्यावं तसंच काही बक्षिस सुद्धा जाहीर करावं अशी नम्र विनंती. झारखंडमधलं सद्ध्याचं सरकार लक्षात घेता ही अपेक्षा मोठी आहे पण तरी...

© मंदार दिलीप जोशी 
वैशाख कृ २, शके १९४२

परिशिष्ट १: विनिताची मुलाखत



परिशिष्ट २: काही बातम्या