Saturday, February 1, 2020

कोरोनास्य कथा: रम्या:

अमेरिकन फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात एफबीआयच्याएजंटस् नी नुकतंच बॉस्टनमधल्या विद्यापीठ व एका रुग्णालयाशी संलग्न असलेल्या तीन जणांवर हेरगिरीचे आरोप ठेवले. या तिघांपैकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

हार्वर्ड विद्यापीठाच्या रसायनशास्त्र व रासायनिक जीवशास्त्र विभागाचे अध्यक्ष डॉ चार्ल्स लिबर (Dr. Charles Lieber) यांनी त्यांना चीनकडून दरमहा मिळालेल्या ५०,००० डॉलर रकमेबाबत व एरवी मिळालेल्या कोट्यवधी डॉलर्सबद्दल संरक्षण खात्याला खोटी माहिती दिल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली.

मॅसेच्युसेट्सचे अ‍ॅटर्नी जनरल अ‍ॅन्ड्र्यू लेलिंग (Andrew Lelling) यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ चार्ल्स लिबर यांना गेल्या अनेक वर्षात ही रक्कम चीनमधील संस्थांसाठी संशोधन करण्याच्या मोबदल्यात त्यांना देण्यात आली. डॉ लिबर यांना त्यांच्या हार्वर्ड विद्यापीठातील कार्यालयात अटक करुन सक्तीच्या प्रशासकीय सुट्टीवर पाठवण्यात आले. अटकेच्या काळात अर्थातच त्यांना विद्यापीठात अध्यापन आणि संशोधनात्मक कार्यात सहभागी होता येणार नाही. डॉ चार्ल्स लिबर हे चौकशीत पूर्ण सहकार्य करत असून या प्रकरणातील त्यांच्या सहभागाचे पुनरावलोकन करत आहेत असं हार्वर्ड विद्यापीठाकडून प्रसूत करण्यात आलेल्या माहितीत म्हटलं आहे.

आरोप ठेवण्यात आलेले इतर दोन जणं चीनी "विद्यार्थी" असून हे बॉस्टनमधील विद्यापीठात संशोधन सहाय्यक अर्थात रिसर्च असिस्टंट म्हणून काम करत होते.

यातली एक जण यँकिंग ये (Yanqing Ye) ही चक्क चीनच्या सैन्यात लेफ्टनंट म्हणून अजूनही कार्यरत आहे. अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करताना तिने ही माहिती लपवली होती. तिने एप्रिल २०१९ साली बॉस्टन विद्यापीठ सोडले असून ती सद्ध्या चीनमधे असल्याने अर्थातच तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, आणि सगळ्या आंतरराष्ट्रीय संकेतांना खुंटीवर टांगून ठेवण्याच्या चिनी दादागिरीच्या पद्धतीमुळे तशी शक्यताही नाही. Yeकडच्या उपकरणांत रोबोटीक्स आणि संगणक वैज्ञानिक असलेल्या दोन अमेरिकन नागरिकांची माहिती सापडली.

झाओसंग झेंग (Zaosong Zheng) या दुसर्‍या 'सहाय्यकाला' तो चीनला परतण्याच्या प्रयत्नात असताना लोगन विमानतळावर एफबीआयच्या मते "संवेदनशील जैविक नमूने" (Sensitive Biological Samples) असलेल्या तब्बल २१ कुप्यांसकट अटक करण्यात आली. तो हार्वर्ड विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीवर बेथ इस्रायल मेडिकल सेंटरमध्ये संशोधक म्हणून कार्यरत होता.

एक सांगायचंच राहीलं, हे पैसे डॉ चार्ल्स लिबर यांना चीनमध्ये रासायनिक-जैविक प्रयोगशाळा उभारण्याकरता देण्यात आले होते. त्यांनी जी रासयनिक-जैविक प्रयोगशाळा उभारायला चीनला मदत केली होती, ती प्रयोगशाळा मध्य चीनमधील वुहान तंत्रज्ञान विद्यापीठात आहे.

जगभरात झपाट्याने पसरत असलेल्या आणि हजारोंच्या संख्येने लोकांना बाधित करत असलेल्या कोरोना व्हायरसचा उगम हा याच वुहान मधल्या एका प्रयोगशाळेत झाला. आत्तापर्यंत जगभरात कोरोना व्हायरसच्या तब्बल दहा हजार रुग्ण सापडल्याच्या बातम्या आहेत. चीनमधे या व्हायरसने आजारी पडलेल्या आणि दगावलेल्यांच्या बातम्या भारतात येऊन धडकू लागताच आपल्याकडे टिपिकल "मेले साप-विंचू कुत्री-मांजरी काहीही खातात आणि मग आजारी पडतात" अशा स्वरूपाच्या टिपिकल प्रतिक्रिया ऐकू येऊ लागल्या, आणि आपली जनता 'आपल्याला काय त्याचं' म्हणून आपापल्या कामाला लागली, आणि सद्ध्या बजेट-बजेट खेळायच्या मनस्थितीत आहे. तेव्हा या बातमीक्डे दुर्लक्ष झाल्यास नवल नाही.


© मंदार दिलीप जोशी
माघ शु. सप्तमी (रथसप्तमी), शके १९४१

(विस्तृत माहिती)