Wednesday, July 13, 2016

पंडित नामा - १: गिरीजाकुमारी टिक्कू

त्यांच्यावर अन्यन्वित अत्याचार झाले. घरंदारं उध्वस्त करण्यात आली. तुम्ही इथून निघून जा, आणि तुमच्या मुली इथे सोडून जा अशा घोषणा ऐकून घ्याव्या लागल्या. दिलेल्या धमक्या खर्‍या करुन दाखवत त्यांच्या आयाबहिणींवर, मुलींवर, आणि बायकांवर निघृण बलात्कार करुन त्यांची त्याहून क्रूरतेने हत्या करण्यात आली. जे स्त्री-पुरुष गोळीने मेले, ते सुटले म्हणायचे अशा भयानक पद्धतीने क्लेष देत देत त्यांना अत्यंत वेदनादायी पद्धतीने हळू हळू मृत्यूच्या स्वाधीन करण्यात आलं. सीमेपलिकडच्या ओळखदेख नसलेल्यांनी तर घात केलाच पण वर्षानुवर्ष ओळख असलेल्यांनीही पाठीत खंजीर खुपसला. साडेतीन लाखाहून अधिक लोक देशोधडीला लागले......अहं...शब्द चुकला. आपल्याच देशात माणूस देशोधडीला कसा लागेल? पण तसंच काहीसं झालं खरं. उत्पन्नाचे स्त्रोत, जगण्याचे साधन, आणि साधनच काय जगण्याची परवानगीही त्यांना नाकारली गेली. आपल्याच देशात परक्यासारखं ट्रॅन्झीट कॅम्प मधे राहणं, अन्न-पाणी-निवार्‍याच्या शोधात भटकणं नशीबात आलं. आत्तापर्यंत ओळखलंच असेल तुम्ही मी कोणाबद्दल बोलतोय. हो, आपलेच काश्मीरी पंडित. त्यांच्याच काही सत्यकथा सांगणार आहे. पण आधीच सांगतो. ज्यांचं मनोधैर्य भक्कम असेल त्यांनीच हे वाचा. कमकुवत हृदय असणार्‍यांसाठी हे नाही. गोष्ट पहिली: गिरीजाकुमारी टिक्कू. जन्मः १५ फेब्रुवारी १९६९ | हत्या: ११ जून १९९० या महिलेबद्दल मी प्रथम फेसबुकवर वाचलं होतं. काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांबाबत पूर्ण कल्पना असली, तरी फेसबुक आणि व्हॉट्सॅपवरुन आलेल्या ढकलसंदेशात बर्‍यापैकी मसाला मिसळलेला असतो याची कल्पना असल्याने यात वर्णन केलेल्या तपशीलांवर कितपत विश्वास ठेवावा याबद्दल मी जरा साशंकच होतो. पण ती पोस्ट एका मैत्रिणीला दाखवल्यावर तिने त्याची सत्यता पटवली. कारण तिच्याच कंपनीत गिरीजाचा भाचा की पुतण्या काम करत होता आणि त्याने या कथेची सत्यता प्रमाणित केली. एकोणीसशे ऐंशीच्या दशकाचा अंत होता होता काश्मीरात नुकताच हिंसाचार सुरु झाला होता. त्रेहगामच्या एका मुलींच्या शाळेतल्या प्रयोगशाळेत सहाय्यक म्हणून काम करणार्‍या गिरीजाला कुणीतरी निरोप दिला की काश्मीर खोरे कायमचे सोडण्याआधी निदान तुझा पगार तरी घेऊन जा. ती शाळेत गेली, पगार घेतला, आणि मग तिच्या एका मुस्लिम सहकार्‍याच्या घरी काही कामानिमित गेली. तिच्या शाळेत जाण्यापासून ते मुस्लीम सहकार्‍याच्या घरी जाईपर्यंतच्या प्रत्येक हालचालीवर अतिरेक्यांकडून नजर ठेवली जात होती. त्या सहकार्‍याच्या घरी ती जाताच अतिरेकी त्या घरात घुसले आणि तिला घेऊन जाऊ लागले. यावर तिच्या मुस्लीम सहकार्‍यानेही काहीच आक्षेप घेतला नाही. जणू काही अंगणात घुसलेल्या एखाद्या वांड जनावराला त्याचा मालक येऊन घेऊन जातो आहे आणि ब्याद टळली असाच त्याचा आविर्भाव होता. इतरही कुणीच आक्षेप घेतला नाही. कारण ती हिंदू होती. काफीर होती. तिच्या शरीरावर त्यांची मालकी असणं इस्लाममधे धर्ममान्य होतं. ती त्यांची "मालमत्ता" होती. मग तिला विवस्त्र करण्यात आलं. तिच्यावर त्या अतिरेक्यांनी सामूहिक बलात्कार केला. एकदा नाही, दोनदा नाही, अनेक दिवस. आणि मग जिवंतपणीच त्या धर्मांध इस्लामी अतिरेक्यांनी तिच्या शरीराचे लाकडे कापण्याच्या करवतीने दोन तुकडे करुन मग तिचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला. तुम्हा आम्हाला तिला झालेल्या वेदनांची स्वप्नातही कल्पना करता येणं निव्वळ अशक्य आहे. साधं भाजी चिरताना बोट कापलं तरी आपण वेदनांनी किती कळवळतो ते आठवा. आणि मग कल्पना करा. आधी सामूहिक बलात्कार झाला आहे त्या स्त्रीवर. आणि मग लाकडे कापण्याच्या करवतीने शरीराचे दोन तुकडे. आपण एक वाकप्रचार वापरतो. एखादी फार वाईट घटना घडली की आपण म्हणतो, "शत्रूवर सुद्धा वेळ येऊ नये". इथे ती ज्यांच्या बरोबर वर्षानुवर्ष राहत होती, ज्यांना मित्र समजत होती त्यांनीच शत्रू बनून तिच्यावर हे नृशंस अत्याचार केले होते. तिचा बळी घेतला होता. का? कारण ती काश्मीरी पंडीत होती. हिंदू होती. त्यांना म्हणे आझादी हवी होती. आझादीसाठी हिंसेचं समर्थन करायचंच झालं, तर हे असे अत्याचार कुठल्या मापदंडात बसवायचे? भारतालाही आझादी काही निव्वळ बिना खडग बिना ढाल मिळालेली नाही. आपल्याकडेही क्रांतीकारकांची उज्ज्वल परंपरा आहे. पण असे अत्याचार तर सोडाच, त्यांनी कारणाशिवाय स्वकीयांवर तर सोडाच पण परकीय असलेल्या निर्दोष ब्रिटीशांवरही हेतूपुरस्सर हातही उचलल्याचं एकही उदाहरण इतिहासात सापडणार नाही. मग जे आपल्याच सोबत राहतात, आपले शेजारी-सहकारी आहेत, काश्मीरच ज्यांची मातृभूमी आहे, त्यांच्या अब्रूवर, जीवावर अशा प्रकारे राक्षसांनाही लाजवेल अशा पद्धतीने घाला घालण्याची ही कृत्ये कुठल्या क्रांतीकार्यात मोडतात? इस्लामी दहशतवादाने काश्मीरात अशा प्रकारे अनेक बळी घेतले. या महिलेच्या जवळच्या नातेवाईकाचा योगायोगाने शोध लागला म्हणून ही गोष्ट पहिली लिहायला घेतली. तुम्हाला कंटाळा आला का? की अंगावर काटा आला? काही असो, आपल्याला हे सारं माहीत हवं. कारण हाताला लागल्यावर डोळ्यांतून पाणी येतं, तसं आपल्याच देशातील एका राज्यात आपल्याच बांधवांवर झालेले अन्यन्वित अत्याचार आपल्या अंतःकरणाला भिडायला हवेत. कारण एखाद्या अवयवाला झालेला कर्करोग जसा पूर्ण शरीरात पसरतो, तसा एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या शेवटी शेवटी लांब कुठेतरी काश्मीरात सुरु झालेला दहशतवाद आता तुमच्या आमच्या दाराशी येऊन ठेपला आहे. आता अतिरेकी फक्त सीमेपलिकडून काश्मीरात येत नाहीत. ते बोटीतूनही येतात. त्यांना आपल्यातच राहणारे अस्तनीतले हिरवे निखारे मदत करतात.आणि या अत्याचारांची लांबूनही झळ न लागलेले काही हिरवट पत्रमहर्षी अतिरेक्यांशी चर्चा करा असा फुकटचा सल्ला देतात. काश्मीर खोर्‍यातून बाहेर पडताना त्यांनी सर्वस्व गमावलं असेल, पण स्वाभिमान सोबत होता. त्या जोरावर ते उभे राहीले. नोकरी केली. धंदा केला. देशाचे प्रामाणिक नागरिक म्हणून नाव कमावलं. पण आपल्यावर झालेल्या अत्याचारांच्या नावाखाली एकाही काश्मीरी पंडीताने, कुणाचीही हत्या करण्यासाठी बंदूक नाही उचलली. बंदूक सोडा हो रागाच्या भरात साधा दगड नाही उचलला भिरकवायला कुणाच्या अंगावर. त्यामुळे दहशतवादाला धर्म नसतो वगैरे भूलथापा माझ्यासमोर तरी नका ठोकू. हा सरळसरळ एका वंशाचा विच्छेद करण्यासाठी पेटून उठलेला इस्लामी दहशतवाद होता. आणि आहे. नावं वेगवेगळी असतील. पण आहे. आपल्याला हे सारं माहीत हवं. काश्मीरसाठी मोजलेली किंमत समजली की मग, "देऊन टाका एकदाचा तो काश्मीर" अशी मुक्ताफळं कुणी उधळणार नाही. कदाचित. पुढची गोष्ट उद्या. अहं... इतकी भयानक नसेल कदाचित.............कदाचित असेलही. बघा बुवा. ज्यांचं मनोधैर्य भक्कम असेल त्यांनीच हे वाचा. कमकुवत हृदय असणार्‍यांसाठी हे नाही. -------------------------------------------------------- © मंदार दिलीप जोशी आषाढ शु. ९, शके १९३८ १३ जुलै इसवी सन २०१६ --------------------------------------------------------