Saturday, January 31, 2015

हा अधिक, तर तो उणा?

24वर्षे क्रिकेट खेळुन 200 कसोटी आणी शेकडो दिवसीय सामने खेळुन 100शतके अन 30हजार धाला केल्या म्हणुन सचिन तेँडुलकरला "देवत्व" बहाल करणारे आपल्या देशात करोडो लोक आहेत.पण 27वर्षात दहा बार लाख कँन्सरग्रस्त रुग्नांना अन त्यांच्या नातेवाईकांना दुपारचे भोजन मोफत देणाऱ्‍या मुंबईच्या हरखचंद सावला यांना मात्र कोणी ओळखतही नाहि..विषेश म्हणजे त्यांचा फोटो मिळवायला मला पुर्ण एक दिवस लागला..>>

फेसबुकवर बराच काळ फिरत असलेल्या पोष्टीचा हा एक भाग. गुगल गेल्यास सगळी पोस्ट वाचता येईल. मुद्दामून इथे देत नाही.


हरखचंद सावला यांची कामगिरी निश्चितपणे थोर आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे (आणि हे मी माझ्या मूळच्या चिकित्सक स्वभावला दूर ठेऊन, त्या माणसाबद्दल आलेल्या फेसबुकी फॉरवर्डवर बिंधास विश्वास ठेऊन म्हणतोय, तो माणूस खरंच अस्तित्वात आहे का याचीही खात्री केलेली नसताना.) पण याचा अर्थ प्रत्येक वेळी एखादं इतर क्षेत्रात थोर कर्तृत्व असलेलं व्यक्तीमत्व घ्यायचं आणि त्याच क्षेत्रातील कामगिरीबद्द्ल त्याला दिलेल्या एखाद्या पदवीवरुन टोमणे मारायचे आणि लोकांचा तेजोभंग करायचा हा करंटेपणा आता पुरे झाला. आहेच सचिन तेंडुलकर देव, पण त्याला देव म्हणतात ते फक्त क्रिकेटमधेच, त्याला कुणी थोर समाजसेवक म्हणत नाहीत - जरी तो दोनशे अनाथ मुलांच्या जेवणाखाण्याचा, कपड्यालत्त्याचा, व शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलत असला तरी! सचिनने क्रिकेटमधून जो लोकांना आनंद दिलाय, त्याचं वर्णनही करता येणार नाही, मग त्याची तूलना इतरांशी कशाला? आणि हरखचंद महान माणूस असले तर सचिनमधे उणेपणा कसा काय येतो?

मुळात तूलनाच करु नये, पण तुम्हाला तूलनाच करायची हौस असेल, तर त्याच क्षेत्रातला चमकोगिरी करणारा माणूस घ्या आणि बडवा त्याला खुशाल. त्यासाठी apples and oranges यातला फरक समजण्याची कुवत असावी लागते.

दुसरी गोष्ट, जी मला तितकीच धोकादायक वाटते म्हणजे आंतरजालावर सगळीच माणसं एखादी गोष्ट वाचली की खोलात जाऊन विचार करत नाहीत. अशी चुकीची तूलना वाचून एखाद्या सचिनच्या चाहत्याने किंवा ज्याला कुणाला बडवायला घ्याल त्याच्या चाहत्याने समजा हरखचंद यांच्या सारख्या माणसा बद्दल मनात अढी ठेऊन त्यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं तर? हा त्यांना मिळू शकणार्‍या मदतीच्या दृष्टीने नुकसानकारक नव्हे का?

तेव्हा हरखचंद सावला यांच्याबद्दल भरपूर लिहा. आपल्या आजूबाजूला असेच प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तिमत्वे तुम्हाला दिसली तर त्यांच्याबद्दलही लिहा. आम्ही नक्की वाचू. पुढे ढकलू (फॉरवर्ड). शक्य झाल्यास मदतही करु. आपल्या पण अशा समाजसेवकांबद्दल लिहीताना सचिन तेंडुलकर किंवा इतर कुठल्या व्यक्तिविशेषाला कमी लेखणारे संदर्भ वापरून मनाचा कोतेपणा दाखवू नका, आणि इतर कुणी तसं करत असेल तर त्याला रोखा ही कळकळीची विनंती. अक्षरशः वात आलाय अशी आचरट तूलना बघून.

----------------------------------
माघ शु १२, शके १९३५
----------------------------------