Monday, September 14, 2020

समाजवाद अर्थात फुकटेगिरी भाग २: खाजगीकरणाला आक्षेप कुणाचा?

समजा एक प्रवासी व्हॅन ८ जण त्यात बसल्यावर निघणार आहे. या क्षणाला त्यात फक्त ३ जण आहेत. त्यातल्या एकाला खूप घाई आहे. तो बाकी दोघांना सांगतो की आपण तिघे एकूण ८ जणांचं प्रवासभाडं देऊया म्हणजे आपण लवकर पोहचू. आता बाकीचे दोघे विचार करतात की आपण का द्यायचे? त्याला घाई असेल तर त्याने त्याचं अधिक पाच जणांचं भाडं द्यावं. तिसऱ्या माणसाकडे इतर काहीच पर्याय नसल्याने तो झक मारत याला तयार होतो. बाकी दोघे खुश होतात की आपण आपल्या आधीच्याच भाड्यात लवकर पोहोचणार! 

आता प्रसंग तोच. तिसरा माणूस तोच उपाय सुचवतो. बाकीचे पुन्हा तेच सांगतात, की घाई असेल तर तू दे बाकीच्या लोकांचं भाडं, आम्ही का द्यायचं?! पण आता गंमत अशी आहे की आता पर्याय असल्याने तो सरळ ओला/उबर/वगैरे बुक करतो आणि लवकर पोहोचतो. 

आता व्हॅनमध्ये फक्त २ जणं आहेत. त्यामुळे आता ८ प्रवासी जमायला पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागू लागतो. त्या तिसऱ्या प्रवाशाच्या घाईचा फायदा घेऊन त्याच्या पैशाने जे बाकीचे दोन जण जलद प्रवास करण्याची मजा घेत होते आता त्यांना त्रास होऊ लागतो. आता ८ प्रवासी जमायला आणखी वेळ लागत असल्याने व्हॅनचालक भाडं वाढवतो, कारण त्यालाही एक मर्यादेपलीकडे एका जागी व्हॅन उभी ठेवणं परवडणारे नसते.

३ जणांनी भाडं वाटून घेतलं असतं तर जितका जलद प्रवास झाला असता तो तर होतच नाही वर आहे ते भाडं सुद्दा वाढतं. यात तिसरा माणूस हा प्रवाशांचा प्रातनिधिक समजावा, कारण जसा तिसऱ्या माणसाने पर्याय वापरला तसं इतरही प्रवासी विचार करतात आणि ते पर्याय वापरून जलद प्रवास करू लागतात.

आता खाजगीकरणाला विरोध कोण करतं? ― ना व्हॅनवाला विरोध करतो ना ज्याला ओला/उबर परवडतं तो विरोध करतो ― ते बाकीचे दोन जण, जे तिसऱ्याच्या जीवावर आणि पैशावर जलद प्रवासाची मजा घेत होते आता ते खाजगीकरणाला विरोध करू लागतात.


ते विरोध करतात कारण त्यांना वाटतं हा माणूस जो आमच्याबरोबर व्हॅनमधून प्रवास करत असे आणि त्याच्यामुळे माझा वेळ वाचत असे त्याने आता मला ओला/उबर मधूनही व्हॅनच्याच भाड्यात प्रवास घडवावा.

आहे की नाही मज्जा?

©️ मंदार दिलीप जोशी
भाद्रपद कृ १२, शके १९४२

समाजवाद अर्थात फुकटेगिरी भाग १