Showing posts with label फॅसिझम. Show all posts
Showing posts with label फॅसिझम. Show all posts

Tuesday, January 19, 2021

साम्यवाद आणि भंपकपणा: मोदी, हिटलर, आणि फॅसिझम

आपण अनेकदा बघतो की डावे आणि इतर विरोधक मोदीजी त्यांच्या मनासारखे वागत नाहीत म्हणून त्यांना नावे ठेवताना हिटलर आणि फॅसिस्ट म्हणतात. असं म्हणताना हिटलरला सरकटपणे फॅसिस्ट (Fascist) ठरवलं जातं. हे कितपत सत्य आहे? मुळात हे बरोबर आहे की नाही? हिटलर खरंच फॅसिस्ट होता का? बहुतांश लोकांना या शब्दांचा अर्थ किंवा फरकच  मुळात कळत नसतो ही डाव्यांनी निर्माण केलेल्या इंग्रजीत ज्याला आपण नॅरेटिव्ह म्हणतो त्याची कमाल आहे.

चला, काही मूलभूत तथ्यांकडे आपण पाहू. 

(१) हिटलरच्या पक्षाचं नाव होतं National Socialist German Workers' Party (जर्मन नावः Nationalsozialistische Deutsche Arbeiterpartei किंवा NSDAP).
(२) मुसोलिनीच्या पक्षाचं नाव होतं National Fascist Party (इटालियन नाव: Partito Nazionale Fascista, PNF).

लोकांना आपल्याकडे फॅसिस्ट म्हटलं की हिटलर का आठवतो? हिटलर हा प्रत्यक्षात सोशलिस्ट अर्थात समाजवादी असताना फॅसिस्ट कसा? 

इथे जरा वेगळ्या पद्धतीने विचार करुन बघूया.

दुसरं विश्वयुद्ध जिंकणार्‍या दोस्त राष्ट्रांमधला एक देश होता USSR -यूनियन ऑफ सोवियत सोशलिस्ट रिपब्लिक्स. इथे सोशलिस्ट अर्थात समाजवादी या शब्दाला महत्त्व आहे, कारण तो रशियन विस्तारवादाचं द्योतक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विकायला काढलेला एक ब्रँड आहे. 

आता पुन्हा हिटलर सोशलिस्ट होता या मुद्द्याकडे येऊ. हिटलर सोशलिस्ट होता आणि रशियन सोशलिस्ट होते तर दोघं युद्धात विरुद्ध पक्षात कसे? हिटलर जरी सोशलिस्ट असला तरी त्यात त्याची स्वतःची अशी राजकीय आणि आर्थिक विचारसरणी होतीच की. Gottfried Feder नामक एक व्यक्ती त्याचा आर्थिक सल्लागार होता, आणि त्याचं Manifesto for abolition of interest slavery हे पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे. अर्थात, हिटलर हा पूर्णपणे फेडेरच्या सल्ल्याने चालत असे असं नाही, त्याचे इतर सल्लागार होतेच. एक गोष्ट आत्ताच स्पष्ट करु इच्छितो की इथे ना हिटलरचं समर्थन आहे ना फेडेरचे. इथे फक्त लक्षात आणून द्यायचा उद्देश आहे की ज्यू लोकांच्या खर्‍या खोट्या 'व्याजखोर सावकारी पाशा'विरोधात त्याने जर्मनीत रान उठवून जर्मन जनतेला त्यांच्याविरुद्ध भडकावण्यात तो यशस्वी ठरला होता. आता ज्यू लोक खरंच व्याजखोर होते का याचा आत्ता इथे पुरावा सादर करणं अवघड आहे, पण पूर्ण युरोपात ज्यू आपल्या व्याजखोर सावकारीसाठी बदनाम होते हे मात्र तत्कालीन संदर्भ आणि साहित्यातून आपल्याला दिसतं. याचं ठळक उदाहरण म्हणजे शेक्सपियरने देखील आपल्या 'मर्चंड ऑफ व्हेनिस' या नाटकातला शायलॉक हा खलनायक ज्यूच दाखवला होता.

आता सोशलिझमकडे परत येऊया. हिटलरच्या पक्षाच्या नावात समाजवादी हा शब्द होता आणि आपल्या घोषणापत्रात त्या पक्षाने समाजवादाच्याच मार्गाने जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. हिटलर स्वतःला खराखुरा समाजवादी म्हणवून घ्यायचा आणि रशियाच्या समाजवादाला 'बोल्शेविक कम्युनिझम' असं म्हणून हिणवायचा. असं असलं तरी साम्यवाद्यांनी हिटलरच्या नाझी पक्षाशी शय्यासोबत करण्यात कुठलाच विधीनिषेध बाळगला नाही. 

इथे डावे/साम्यवादी यांचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्यावं लागेल आणि ते म्हणजे आपल्या विचारसरणीला पर्याय किंवा प्रतिस्पर्धी उभा राहू न देणं. हिटलरला सुद्धा सोशलिस्ट म्हणून म्हणून प्रसिद्धी मिळाली असती तर रशियन ब्रँडच्या सोशलिझमला अर्थात समाजवादाला एक पर्याय उपलब्ध झाला असता. रशियाने आपल्या ब्रँडच्या सोशलिझमचं मार्केटिंग केलं असतं आणि हिटलरने आपल्या ब्रँडच्या समाजवादाची टिमकी वाजवली असती. डाव्यांना एकाच नाण्याच्या दोन बाजूही मंजूर नसतात (अगदी भारतात सुद्धा जे वेगवेगळे कम्युनिस्ट पक्ष आणि गट आहेत, त्यांच्यातही जी फूट पडलेली आहे, ती याच स्वरूपाची आहे). म्हणून मग त्यावेळच्या ताकदवान रशियाप्रणित समाजवाद्यांनी हिटलरला फॅसिस्ट लेबल लावून टाकलं. अर्थात हिटलर आणि मुसोलिनी यांची दुसर्‍या विश्वयुद्धात महाविनाशआघाडी झाल्यामुळे तसा प्रचार करणं हे रशियाप्रणित डाव्यांना सोपंही गेलं. त्यात भर म्हणजे साम्यवादी रशियाचं आणि हिटलरप्रणित समाजवादाशी असलेल्या वैराचं युद्धात रुपांतर झालं ते त्याने रशिया आणि जर्मनीमधे झालेला अनाक्रमणाचा करार मोडून थेट रशियावर हल्ला चढवल्यावर. पुढे विश्वयुद्धात दारूण पराभव झाल्याने जर्मन जिथे स्वतःला नाझी म्हणवून घ्यायला लाजत आणि मुख्य म्हणजे घाबरत होते तिथे साम्यवादी रशियाचा हा प्रचार रोखायची इच्छा होणे तर सोडाच आणि संधी सुद्धा कुणालाच मिळाली नसली तर आश्चर्य नव्हतं. 


इथे नाझी लोकांची भलामण करण्याचा हेतू नाही. फक्त डाव्यांच्या कंपूतील विसंवाद आणि शत्रुत्व दाखवायला वरील उदाहरण दिले. नाझी लोकांनी की पापं केली आहेत त्याबद्दल त्यांना मिळालेल्या शिक्षा सुद्धा सौम्यच म्हणायला हव्यात. 

Umberto Eco नामक एक प्रसिद्ध कम्युनिस्ट 'विचारवंत' होऊन गेले. त्यांनी फॅसिझमची १४ लक्षणे लिहीली आहेत. Ur-Fascism अशा नावाने शोध घेतल्यास सहज सापडतील. ती वाचली आणि एकंदर साम्यवादाचा इतिहास बघितला तर नाझी आणि साम्यवादी हे सरळसरळ एकाच माळेचे मणी असल्याचं लक्षात येईल. लालभाई असोत की हिरवे, तुम्हाला पर्याय मिळू देत नाहीत. तुमच्याकडे जी व्यवस्था आहे तिचे दोष सतत तुमच्या पुढ्यात उगाळत राहतील. तुम्हाला सतत उचकवत राहतील की तुमच्या समस्येचे कारण तुम्ही स्वीकारलेली व्यवस्था आहे आणि ती उलथवून लावणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांची व्यवस्था स्वीकार केलीत की तुमच्या सगळ्या समस्या सुटतील. त्यांची व्यवस्था आल्यावर तुमच्या समस्या जराही सुटल्या नाहीत आणि तुम्ही त्याविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत केलीत तर चक्क तुम्हालाच एक समस्या ठरवून संपवलं जाईल. कारण आम्ही समस्या संपवतो हे ते नेहमी गर्वाने सांगत असतात (गंमतीची गोष्ट अशी की समाजवाद/साम्यवाद स्वीकारलेल्या एकाही देशाचं आजवर भलं झालेलं नाही उलट तो देश आर्थिक खड्ड्यातच गेलेला आहे ही गोष्ट वेगळी).  

रशियन डाव्यांचं पाप हे आहे की फॅसिझमला लक्ष्यस करण्याच्या नादात त्यांनी राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्तीला सुद्धा जवळजवळ एखाद्या गुन्ह्यासारखं बदनाम केलं. पण मग मोदींना हिटलर आणि फॅसिस्ट का म्हणतात? सोपं आहे. हिटलरच्या जर्मनीचा नाझी पक्ष आणि इटलीच्या मुसोलिनीचा फॅसिस्ट पक्ष हे दोन्ही प्रखर राष्ट्रवादी आणि देशभक्त होते. यातूनच प्रेरणा घेऊन मोदींना हिटलर आणि फॅसिस्ट म्हटलं जातं, कारण मोदी हे इतर पंतप्रधानांपेक्षा कडक शिस्तीचे आणि प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रभक्त आहेत, तसंच ते जनतेतही या ना त्या कारणाने राष्ट्रभावना जागृत करत असतात. आजही कुणाचा आवाज बंद करायचा असेल तर त्याला फॅसिस्ट म्हटलं की गप्प करता येतं. एखादा फारच चिवट निघाला तर तू राष्ट्रवादी आहेस म्हणजे तू फॅसिस्ट आहेस हे सिद्ध झालं असं होतं. थोडक्यात, राष्ट्रवाद हा फॅसिझ्मला जोडणे आणि त्या अनुषंगाने नॅरेटिव्हची मांडणी करण्यात डाव्यांनी इतरांवर घेतलेली आघाडी लक्षणीय आहे. कम्युनिस्ट किती नीच असतात हे या उदाहरणावरुन आपल्याला लक्षात येईल. या बाबतीत कम्युनिष्ठांची स्पर्धा फक्त कौमनिष्ठच करु शकतात.

तात्पर्यः आता कुणी मोदींना हिटलर आणि फॅसिस्ट म्हटलं की हिटलर आणि मुसोलिनीच्या पक्षांची पूर्ण नावे आणि सोवियत रशियाचे पूर्ण नाव तोंडावर फेकून मारा. 

पुढच्या लेखात फॅसिझमबद्दल विस्ताराने पाहूया.

© मंदार दिलीप जोशी

ता.क.: हिटलर आणि शिस्त आणि राष्ट्रवाद यांबद्दल उहापोह करणारा आणखी एक लेख इथे वाचता येईल.