Tuesday, May 3, 2011

आणखी एक राधिका

८ मार्च २०११ रोजी सगळा देश - नव्हे - अखिल विश्व जागतिक महिला दिन साजरा करत असतानाच राजधानी दिल्लीत राधिका तन्वर या कॉलेज तरुणीला एका युवकाने गोळी घालून ठार केल्याच्या वृत्ताने सगळा देश हादरला.

"सगळा देश हादरला" असं लिहीण्याची पद्धत असते. कारण असले प्रकार आजकाल इतके सर्वसामान्य झाले आहेत की कुणी हादरत वगैरे नाही. एका सहकर्मचार्‍याची प्रतिक्रिया अगदी प्रातिनिधिक म्हणावी लागेल. "असेल काहीतरी प्रेमाबिमाचं लफडं, सोड यार".

सुदैवाने चार दिवसांत पोलीसांनी यशस्वी(!) तपास करुन खुन्याला अटक केली. विजय उर्फ राम सिंग हा तो खूनी. पोलीसांनी नेहमीच्या पद्धतीने चौदावं रत्न दाखवून त्याची चौकशी केली तेव्हा जे उघड झालं ते समजल्यावर मात्र हा विषय डोक्यातून जाईना.

उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील राम सिंग हा राधिकाच्या घराजवळच असणार्‍या एका शिवणकाम कारखान्यात कामाला होता. राधिकाचा पाठलाग करणे आणि तिला छेडणे हा त्याचा आवडता छंद होता. तसंही मुलींना अशा प्रकारे त्रास देणे हे प्रकार नवीन नव्हते, पण त्याचा राधिकावर विशेष "जीव" असावा. असाच एकदा राधिकाचा पाठलाग करत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच राधिकाने धावत रस्त्यातच उभ्या असलेल्या काही लोकांना गाठले आणि "तो माणूस मला छेडतोय" अशी आरोळी ठोकली. एखादा चोर, मुलींना छेडणारा नि:शस्त्र गुंड असे कोणी तावडीत सापडले की हात साफ करायला लोक टपलेलेच असतात. अर्थातच त्या लोकांनी मग "लडकी को छेडता है" किंवा तत्सम डायलॉग मारत त्याला बेदम चोप दिला. अशा अनेक गोष्टी कानावर आल्याने राम सिंगला कामावरुन काढून टाकण्यात आले. असेच काही दिवस गेले पण राम सिंग राधिकाचा पाठलाग करणे आणि तिने स्पष्ट नकार दिल्यावरही तिच्याकडे आपल्या एकतर्फी "प्रेमाची" कबूली देणे सोडेना.

नोकरी गेल्याने राम सिंगने मुंबई गाठली आणि तिथे रोजगार शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्याच्या विकृत डोक्यातून राधिकाचा विचार जाता जाईना. त्याने वारंवार दिल्लीला येऊन राधिकाच्या मागावर राहणे सोडले नाही. एकदा राधिका बस मधून उतरून पादचारी पुलावरून जात असताना पुन्हा त्याने राधिकाला गाठले आणि त्याच्याशी लग्न करण्याची गळ घातली. तिच्याही मनात त्याच्याविषयी 'प्रेमभावना' असल्याचा त्याचा समज होता. तसं बोलून दाखवल्यावर राधिकाने तिथेच त्याच्या श्रीमुखात भडकावली. आता हा आपल्याला त्रास देणार नाही अशा समजूतीत असलेल्या राधिकाला मात्र राम सिंगच्या मनात भडकलेल्या सूडाग्नीची कल्पना कशी असावी?

विजय उर्फ राम सिंगने आपला सूडाग्नी शमवण्यासाठी राधिकालाच संपवण्याचा घाट घातला. त्याने सरळ गुरगाव गाठले आणि तिथून दोन हजार रुपये देऊन एक 'कट्टा' उर्फ गावठि पिस्तूल विकत घेतले. गंमत म्हणावी की दैवदुर्विलास, आपल्या देशात डि.व्ही.डी प्लेअर आणि पिस्तुल या दोन वस्तू एकाच किंमतीत आणि सहजतेने विकत घेता येतात.

पिस्तूल घेऊन पूर्ण तयारीने तो पुन्हा दिल्लीला आला आणि एके दिवशी संधी साधून त्याने राधिकाला गाठले. पुन्हा त्याला झिडकारून राधिकाची पाठ वळताच त्याने खिशातून पिस्तुल काढले. पण लगेच न चालवता जिना सुरू होण्याच्या जराच आधी त्याने तिच्यावर झाडून जिन्यावरुन उतरुन पळ काढला. पुलावर बर्‍यापैकी वर्दळ असल्याने काही क्षण कुणाला काय झाले ते समजेना. ह्याच गोंधळाचा फायदा घेऊन राम सिंग तसाच पिस्तूल हातात घेऊन पळाला आणि दिल्लीच्या गर्दीत दिसेनासा झाला.

पोलीसांनी तिच्या घरच्यांकडे आणि महाविद्यालयातील मित्रपरिवाराकडे आधी चौकशी केली. मग इतर तपास सुरु झाला आणि राम सिंगच्या खोलीत राहणार्‍या मित्रांकडून माहिती मिळाल्यावर तपास वेगाने करुन त्याला मुंबईतून अटक केली. राम सिंगला त्याच्या कृत्याविषयी अजिबात पश्चात्ताप नव्हता "माझी बायको नाही झाली तर आता इतर कुणाचीही होणार नाही" असले विकृत समाधान त्याच्या चेहर्‍यावर झळकत होते.

मला सर्वात जास्त क्लेषकारक वाटलेली बाब म्हणजे राधिकाच्या घरच्यांच्या चौकशीत पोलीसांना जी धक्कादायक बाब समजली ती होय. असे काही प्रकार अनेक दिवस सुरू असल्याचे राधिकाने तिच्या घरच्यांना सांगितलेच नव्हते! मग त्याचं नावही ठाऊक असणं दूरच राहिलं. राम सिंगला जेव्हा अटकेनंतर तिच्या घरच्यांनी पाहिले तोपर्यंत त्यांनी त्याला त्यांच्या घराच्या आसपास बघितलेही नव्हते!! राधिकाने जरी फक्त तिच्या घरच्यांना 'एक माणूस आपला पाठलाग करत असतो आणि आपल्याला छेडत असतो" असं नुसतं सांगितलं असतं तरी पुढची कारवाई करुन पुढची अप्रिय घटना टाळता आली असती.

हे समजल्यावर मनात असंख्य प्रश्नांचे मोहोळ उठले. असे का झाले असावे? याला घरचे वातावरण कारणीभूत असावे का? शक्य आहे. कारण असले प्रकार घडल्यावर "तुझीच काहीतरी चूक असेल" अशी मुक्ताफळे उधळणारे पालक आहेतच की. मुलांना आई-वडीलांची इतकी भीती वाटावी, की छेडछाड आणि पाठलागासारख्या गंभीर बाबीही त्यांना सांगायला संकोचावे? मुलांना - आणि विशेषतः मुलींना) धाकात ठेवण्याच्या प्रयत्नात आपण त्यांना आपल्यापासून दूर करत आहोत ह्याची जाणीव पालक म्हणून आपल्याला राहिली नाही असे झाले आहे का? मुले आणि आई-वडील/एकूणच घरातले यांच्यातला संवाद इतका हरवत चालला आहे का, की आपल्या अब्रू आणि जिवाला असलेल्या धोक्याबाबतही घरच्यांशी बोलावेसे मुलांना वाटू नये? की राधिकाला वाटलं तशी ही बाब गांभीर्याने घेण्याजोगी वाटत नाही अनेक मुलांना? बाहेर घडणारं सगळं आपल्या आई-वडिलांना सांगणारी मुले आहेत, मान्य. पण अगदी काहीच न बोलणारी, थोडंच सांगणारी, किंवा नेमकं महत्वाचं तेच न सांगणारीही मुलं आहेतच की.

विकृत मंडळी जागोजागी असणारच, पण मग मुले असले प्रकार घरी का सांगत नसावीत? काहीही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असा विश्वास आपण आपल्या मुलांच्या मनात निर्माण करण्यात अपयशी ठरतोय का?

अशा अनेक राधिका या आधी झाल्या आहेत. पुढेही होतील. पण मुलांच्या मनात विश्वास निर्माण करण्याच्या दिशेने — जेणेकरुन त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकता येतील — आपल्याला काय करता येईल?