Thursday, May 7, 2015

आता पुरे झाली एन्टरटेनमेन्ट

एन्टरटेनमेन्ट! एन्टरटेनमेन्ट!! एन्टरटेनमेन्ट!!!

आता पुरे झाली एन्टरटेनमेन्ट. आता तरी बाहेर पडा या मूर्खपणातून. दोन्ही हात चेहर्‍यावर ठेऊन "ऐयाआआआआआ आमीsssssर" किंवा "वॉऑऑऑऑऑव सलमान" किंवा अ ते ज्ञ यापैकी एकाही अक्षराने लिहून दाखवता न येणारे चित्कार काढून मोठ्या पडद्यावर अवतरलेल्या चिकन्या नटाकडे (किंवा नटवीकडे) पाहत जणू काही हाच आणि हाच आपला उद्धारकरता आहे असे भाव थोबाडावर लेवून असणार्‍या बावळटांनो, शुद्धीवर या. वय वर्ष पस्तीस असताना घरी "स्वसंरक्षणार्थ" मशीनगन आणि हातबॉम्ब ठेवणार्‍या आणि पकडलं गेल्यावर त्या मागचं गांभीर्य न समजण्याचं नाटक करणार्‍यांच्या पाठीशी उभं राहणं बंद करा. दारू पिऊन गाडी चालवणं हा गुन्हाच नव्हे तर प्रचंड धोकादायक आहे हे गावीच नसणार्‍या आणि असलं तरी पैशाच्या जोरावर आपण माणसं आणि न्याय दोन्ही विकत घेऊ शकतो असा माज बाळगणार्‍या या समाजकंटकांचं समर्थन करणं बंद करा. आपल्या दानधर्माचा डंका पिटणार्‍या आणि प्रत्यक्षात आपल्याच गाडीखाली आलेल्या लोकांना किरकोळ पैसे देऊन वाटेला लावणार्‍या कोत्या मनोवृत्तीच्या हलकटांविषयी कणव बाळगणं बंद करा. जंगल आणि पर्यावरण म्हणजे उघड्या जीपमधून प्राण्यांची हत्या करणं याचसाठी आहेत असं वाटणार्‍या माजोरड्यांना पाठिंबा देणं थांबवा. रस्त्यावर झोपावं लागणं या मागची अगतीकता आणि लाचारी समजून न घेता त्यांना कुत्र्याची उपमा देणार्‍या टोणग्यांना आणि गुन्हा केला असेल तरी शिक्षा झाल्यावर वाईट वाटतं असे तारे तोडणार्‍या या कचकड्याच्या बाहुल्यांचं कौतुक करणं आता बंद करा. दारूच्या नशेत गुन्हा करणारा माणूस वाईट नाही तर दारू पिणं आणि ती तयार करणारा वाईट याचा साक्षात्कार ऐन खटल्याच्या वेळी होणार्‍या येडपट चाहत्यांनो, तुमचा उथळपणा बंद करा.

लहानपणी कधी शेजारी राहणार्‍या तुमच्या सवंगड्याचं खेळणं त्याला न विचारता घरी आणलं म्हणून थोबडवून घेतलंय का कधी? तेच खेळणं उचलून तुमची आई तुम्हाला फरफटत घेऊन गेली असेल आणि ते खेळणं परत करायला लावलं असेल. आणि पुन्हा सगळ्यांसमोर बदडलं असेल आणि दोन दोन दिवस जीवघेणा अबोलाही धरला असेल. आज चाळीशीच्या घरात असलेले काही जण कदाचित हे वर्णन आठवून एव्हाना मनाने भूतकाळात पोचलेही असतील. त्यावेळची आई-वडिलांची प्रतिक्रिया आठवते? आपल्या मुलाने चोरी केली, तो वाया गेला, आता त्याचं कसं होणार आणि असे असंख्य भाव तुमच्या माऊलीच्या चेहर्‍यावर दिसले असतील तुम्हाला. हेच का आपण संस्कार केले असे हताश भाव तुमच्या वडिलांच्या चेहर्‍यावर दिसले असतील. आणि यामुळे तुम्हालाही तुम्ही केलेल्या गुन्ह्याची.....माफ करा....ते कायदेशीर झालं....तुम्ही केवढं मोठं पाप केलंय याची जाणीव होऊन तुमचं मन अपराधगंडाने ग्रस्त झालं असेल. यातूनच तुमच्या मनात पापभीरू वृत्तीही निर्माण झाली असेल. कायदा पाळणारे आणि त्याचा आदर करणारे नागरिक असेच तयार होतात.

पण बॉलिवुडमधले आईबाप तसे नसतात बरं का. चित्रपटात एका तरुणीला पळवून नेणार्‍या आपल्या मुलाला गोळी घालणारी आई दिसते तर प्रत्यक्षात आपल्या मुलाने घरात एके ५६ आणि हातबाँब ठेवले आणि बॉम्बस्फोट होणार आणि शेकडो लोक मारले जाणार ही माहिती पोलीसांना दिली नाही हे समजल्यावर मात्र जंगजंग पछाडून त्या देशद्रोही मुलाला उगवता सुर्य हे प्रमाणपत्र मिळवण्याची धडपड बाप करताना दिसतो. तो त्याला कायद्याने झालेली शिक्षा भोगावी आणि मग सुधारावे असा प्रयत्न काढताना मात्र दिसत नाही. अशा घटना घडल्या ही यांचा दांभिकपणा अधिकच ठळकपणे दिसतो.

चित्रपटातलं आदर्श वर्तन प्रत्यक्षात असावं अशी भाबडी आशा आज कुणालाही नाही आणि तशी अपेक्षा ठेवणं फार योग्य ठरणार नाही. चित्रपट आणि मालिकांतले प्रेमळ आणि वात्सल्यसिंधू बाबूजी पार्टीत झिंगलेले दिसतात आणि चित्रपटात कोट्यावर्धी कमावणारी नटी हॉटेलमधे उरलेलं अन्न पार्सल का नेऊ देत नाही म्हणून तिथल्या व्यवस्थापकाला शिवीगाळ करताना दिसते. जोपर्यंत याचा समाजाला आणि देशाला अपाय होत नाही तो पर्यंत याकडे फारसं गांभीर्याने बघण्याची गरजही निर्माण होत नाही. मात्र चित्रपटातला प्रामाणिक, सालस, साधा, कायद्याचं पालनच नव्हे तर गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी प्रसंगी कायदा हातात घेणारा/री ही प्रतिमा जेव्हा लोकं खरी मानून चालतात आणि त्याने केलेल्या कायदेभंगाकडे आणि देशद्रोहाकडे जेव्हा सहानुभूतीने पाहू लागतात, तेव्हा खरा धोका निर्माण होतो. अशा लोकांमुळे आपली मनं बोथट आणि रोगट करुन घेतलेल्या संपूर्ण समाजाला घाऊक  मानसोपचारांची गरज आहे असं वाटू लागतं.

माझ्याकडे पैसा आहे मला काहीही शक्य आहे असा माज करुन कुणी कायदा मोडून माणसं मारू लागत असेल आणि त्याला शिक्षाच होऊ नये म्हणून त्याच्या फक्त कुटुंबियांपैकीच नव्हे आपल्याहीपैकी कुणी त्याचं लंगडं समर्थन करत असेल तर आपल्या संस्कारातच काहीतरी गडबड आहे का हे तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे. कायद्यापुढे कुणी मोठं नाही, देशापेक्षा काही महत्त्वाचं नाही हे संस्कार लहानपणापासून देणं ही आजची प्राथमिकता आहे. लहानपणी क्षुल्लक गोष्टींवरुन थोबडवून घेतलेल्या आजच्या चाळीशीत पोचलेला आजचा बाप जेव्हा स्वतःच्या मुलाला मात्र "जाऊ दे, लहान आहे मुलगा" या मानसिकतेतून शिक्षा करत नाही, तेव्हा त्याला त्या मानसिकतेतून बाहेर काढायलाच हवं आहे. आजच्या आई-वडीलांनी आपल्या मुलांना हे सांगायला हवं की दबंग हीरो हे आजचे खरे हीरो नव्हेत. त्यांचे अनुकरण करायची काहीही गरज नाही. अगदी खेळतानाही नाही. ते समाजाला आणि देशालाही धोकादायक आहे. आज संपूर्ण देशाला आदर्शवत वाटावेत असे लालबहादूर शास्त्रींसारखे नेते अस्तित्वात नाहीत. त्यांच्या एका शब्दाखातर दुष्काळात अनेकांनी स्वतः सुखवस्तू असतानाही एक वेळचे जेवण सोडलं होतं. मात्र ज्यांचा आदर्श ठेवावा असे अनेक जण आपल्या देशात आजही आहेत. आजचे खरे नायक हे हातात काठी वगळता काहीही शस्त्र नसताना आपल्यावर धडाधड मशीनगनमधून गोळ्या चालवणार्‍या कसाबवर झेप घेऊन त्याला पकडून देणारे निधड्या छातीचे हवालदार तुकाराम ओंबळे आहेत. कमांडो संदिप उन्निकृष्णन सारखे शूर तरूण आहेत. प्रचंड दबावाखाली असतानाही सलमान खान विरुद्ध पोलीसात स्टेटमेंट देऊन खटला उभा करायला लावणारे आणि त्यापायी हाल हाल होऊन स्वतःचा जीव गमवायला लागणारे रवींद्र पाटील यांच्यासारखे दृढनिश्चयी पोलीस आहेत. काहीही वैय्यक्तिक फायदा नसताना जगभर नैसर्गिक संकटात आणि युद्धजन्य परिस्थितीत मदतकार्य करणारे आपले असंख्य सैनिक आहेत. देशात कुठेही कुठलाही अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती आली की सर्वप्रथम तिथे मदतकार्याला पोहोचणार्‍या नि:स्वार्थी संघ कार्यकते आहेत. स्टॉकहोम जल पुरस्कार ज्यांना मिळाला ते राजेंद्र सिंह आहेत. कुष्ठरोग्यांची सेवा करणारे बाबा आमटे आहेत. कायद्यापेक्षा मोठं आणि देशहितापेक्षा महत्वाचं कुणीही आणि काहीही नाही असे संस्कार मुलांवर करण्याची गरज आज कधी नव्हे ती निर्माण झालेली आहे. ही वेळ पुनश्च हरिॐ करण्याची आहे. बघू नका यांचे सिनेमे. गाणी ऐकू नका. बहिष्कार घाला. न्यायव्यवस्था जिथे न्याय द्यायला एका तपाहून अधिक लावते तिथे तुमचे हे प्रयत्न चोख काम करतील. ओस पडेलेली चित्रपटगृहच यांना धडा शिकवतील. तुम्हाला अदाचित संजय दत्तच्या वेळी हे करणं जमलं नसेल तर तुमची तेव्हाची पापं धुण्याची ही संधी आहे. कुटुंब घडवा, समाज आपोआप घडेल.

तेव्हा आता बास्स झाली एन्टरटेनमेन्ट.

---------------------------------------------------
संकष्ट चतुर्थी, वैशाख शु. ४, शके १९३७
अर्थात इसवीसन ७ मे २०१५
---------------------------------------------------