Tuesday, January 12, 2016

माध्यमवेश्यांचा नंगानाच


गालिब अब्दुल गुरू. अर्थात फाशी गेलेला अतिरेकी अफझल गुरूचा मुलगा. त्याला जम्मू-काश्मीर बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ९५% गुण मिळाल्यावर माध्यमवेश्यांना आनंदाच्या उकळ्याच्या उकळ्या फुटल्या आहेत. जणू अफझल गुरूचीच फाशी रद्ध झाली असावी किंवा तो मरणोत्तर निर्दोष सिद्ध झाला असावा. जणू अब्दुल गुरूची गुणपत्रिका ही अफझल गुरूला व त्याच्या कुटुंबियांना मिळालेले देशभक्तीचे सर्टिफिकेटच होय. जणू अफझल गुरू हा कुणीतरी संत महात्मा असावा किंवा किमानपक्षी अतिरेकी नसावाच. टाईम्स ऑफ इंडियाने तर अफझल गुरूचे छायाचित्र आणि भोवती फासाचा दोर अशा फोटोच्या पार्श्वभूमीवर त्याच्या मुलाचा अब्दुल गुरूचा फोटो टाकून अफझल गुरूला तर भगत सिंगचा दर्जा देऊन टाकला. जेमतेम आठवडाभरापूर्वी झालेला पंजाबातल्या पठाणकोट येथील हवाईदलाच्या तळावर झालेल्या हल्ल्यातल्या अतिरेक्यांनी "आम्ही अफझल गुरूच्या हत्येचा बदला घ्यायला आलो आहोत" अशा आरोळ्या ठोकल्याच्या बातम्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही क्षुल्लक बातमी मोठी करुन दाखवताना माध्यमवेश्यांना फुटलेल्या उकळ्या अधिकच संशय निर्माण करतात.

 


हे लोक स्वतःच्या मुलांचे निकाल पाहूनही इतके आनंदीत होत नसावेत. ज्या संसदीय लोकशाहीचे हे बातमीविक्रेते उठता बसता गोडवे गात असतात, त्याच लोकशाहीचे प्रतीक असलेल्या संसदेवर हल्ला करायला जबाबदार असलेल्या एका अतिरेक्याच्या पोराबाळांविषयी इतका पुळका? संसदेचे संरक्षण करताना हुतात्मा झालेल्या पोलीसांच्या घरच्यांची चौकशी केली आहे का यांनी कधी? संसदेबाहेर अतिरेक्यांना पहिल्यांदा बघणारी आणि इतर पोलीसांना सावध करणारी हवालदार कमलेशकुमारी यादव या अतिरेक्यांची पहिली बळी ठरली तिच्या घरी बरखा दत्त गेली आहे का कधी? राजदीप सरदेसाईला अफझल गुरूच्या मुलाला डॉक्टर व्हायचं आहे याचं केवढं कौतुक, त्याला बघितलंय कधी या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या १४ लोकांच्या (त्यातले ६ पोलीस) आणि  २२ जखमी लोकांच्या घरी जाऊन चौकशी करताना? त्यांची मुलंबाळं कुठल्या शाळाकॉलेजात शिकत आहेत, त्यांचे मार्क किती, त्यांना नोकरी किंवा व्यवसायासाठी काही मदत हवी आहे का हे प्रश्न इतकी वर्ष या पत्रकार मंडळींना का पडले नाहीत? राजदीपपत्नी सागरीकाचाही त्यांच्या कुटुंबियांसाठी जीव का कळवळला नाही?

मुंबई बाँबस्फोट खटल्यात फाशी गेलेला याकुब मेमन हा चार्टर्ड अकाउंटंट होता. चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे त्यांच्या सुदैवाने मॉर्निंग वॉकला जे कधीच जात नाहीत, ते लोकसत्ता नामक तथाकथित वृतपत्राचे संपादक गिरीश कुबेर यांच्या भाषेत 'सनदी लेखपाल'. अतिरेकी हल्ल्यांच्या मागे असलेल्या, म्हणजे मास्टरमाइंड असलेल्या  अतिरेक्यांची शैक्षणिक पात्रता पहा. आयटी व्यवसायिक, सॉफ्टवेअर अभियंता, डॉक्टर,  रसायन अभियंता, असे बहुतेक लोक उच्चविद्याविभूषित आहेत. राजदीप सरदेसाईंना गालिब अब्दुल गुरूचे उत्तम मार्क ही गोष्ट "अ स्टोरी ऑफ होप" अर्थात "आशादायी गोष्ट" वाटते. त्याच्या दिल्ली विद्यापीठाच्या पदवीधर असलेल्या मरहूम अब्बांना म्हणजे अफझल गुरूला किती मार्क होते माहित नाही, पण  एवढं निश्चित, की उत्तम गूण हे देशभक्त असल्याचं लक्षण ठरू शकत नाहीत. लक्षात घ्या, काहीही करा आम्हाला तुम्ही दाबू शकत नाही (no matter what you do, we will not break) असं तो म्हणतो, डॉक्टर व्हायचं आहे असं तो म्हणतो, पण मला देशाचा चांगला नागरिक व्हायचं आहे असं काही त्याच्या तोंडून बाहेर पडलेलं नाही. तेव्हा हे बातमीविक्रेते किंवा माध्यमवेश्या काहीही म्हणोत सरकार आणि गुप्तहेर संस्थांनी त्याच्यावर लक्ष ठेवलेलंच बरं. अखंड सावधान असावे, असे श्री स्वामी समर्थ म्हणून गेलेच आहेत. तेव्हा आयसीसमधे सामील झालेल्या एका युवकाने धर्मबुडवी असल्याचा आळ घेऊन आपल्या मातेलाच गोळी घातल्याचे उदाहरण ताजे असताना आपल्या अतिरेकी असलेल्या बापाच्या फाशीचा सूड घ्यायला मातृभूमीला लक्ष्य करायचा हेतू तो बाळगत नाही ना, याची काळजी घेतली पाहीजे.  त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नांचा किती फायदा होईल याबाबत साशंकताच आहे, पण शक्य झाल्यास त्याचं समुपदेशन करुन त्याला देशाचा जबाबदार नागरिक व्हायला मदत केली पाहीजे.

अब्दुल गुरूच्या परीक्षेतल्या उत्तम गुणांनी हुरळून गेलेल्या माध्यमवेश्यांचा मूर्खपणा इथेच थांबत नाही. २६/११चा हल्ला लाईव्ह दाखवल्याने व कदाचित मुद्दामून अनेक गोष्टी उघड केल्याने गमावलेले जीव स्मरणात आहेत ना? गालिब अब्दुल गुरूला खरोखरीच देशाचा चांगला नागरिक व्हायचं असेल, प्रामाणिक माणूस व्हायचं असेल, तर त्याच्या या दिशेने होणार्‍या संभाव्य प्रयत्नांना याच खोडसाळ आणि विघ्नसंतोषी बातमीविक्यांनी सुरुंग लावला आहे असे साधार म्हणण्यास वाव आहे. तो सापाचं पिल्लू ठरतो की हिरण्यकश्यपूच्या पोटी आलेला भक्त प्रल्हाद, ते काळच ठरवील, मात्र त्याच्या बापाचं कर्तृत्व जगजाहीर असताना अशा प्रकारे त्याचं नाव माध्यमांत झळकावून त्याची ओळख उघड करुन किंवा अगोदरच माहित असल्यास ती आता अधिक व्यापक प्रमाणात पसरवून या बातमीविक्यांनी प्रचंड मोठी घोडचूक केली आहे हे नक्की. आता त्याची प्रत्येक हालचाल, तो कुठल्या महाविद्यालयात जाणार आहे, कुठल्या वर्गात बसणार आहे, त्याचे मित्र कोण याच्याकडेही लोकांचं लक्ष असणार.  उद्या त्याच्या जीवाला काही धोका झाला तर हेच बातमीविके उद्या मोदी सरकार आणि हिंदुत्ववाद्यांवर याचं खापर फोडायला मोकळे.

पण थांबा, तोच तर यांचा डाव कशावरुन नसेल?





--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
पौष शु. ३, शके १९३७
--------------------------------------------------