Tuesday, August 18, 2020

रात्रीस खेळ चाले, कोकण, आणि मी

ही मालिका २९ ऑगस्टला निरोप घेते आहे त्या निमित्ताने...

मुळात आधीपासून ग्रामीण भागात आणि विशेषतः कोकणात संध्याकाळ झाली की एकदम सामसूम होतं. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नाही. आतासारखी सगळीकडे वीज नसल्याने पूर्वी दोन घरातलं अंतर कितीही असलं तरी रात्रीच्या भयाण शांततेत दार प्रत्यक्ष वाजवून माणूस बाहेर आल्याशिवाय शेजार आहे हे जाणवत देखील नसे; आताही फार फरक पडलेला नाही, पण अनेक घरात आलेल्या मठ्ठ खोक्यामुळेही लोक एकमेकांना भेटायला फार बाहेर पडत नसावीत. तर, संध्याकाळी दिवेलागणीनंतर करण्यासारखं काही नसल्याने मुलांचे अभ्यास, जेवणं, आणि झोप यांच्यात मध्ये भरपूर वेळ मिळे. दिवसा ज्याकडे लक्षही जात नसे असे एखादे झाड रात्री उगाचच भयानक वाटतं. 

मुबलक प्रमाणात असलेली झाडं झुडपं आणि पानाफांद्यातून रात्री डोकावणारा चंद्रप्रकाश आणि वीज आल्यानंतरच्या काळात रोजच चाललेला बल्बच्या प्रकाशाचा खेळ त्या वातावरणाच्या गूढतेत आणखीच भर टाकतो. कोकणातल्या गावांत अनेक गल्ल्या आणि आळ्यांत खांबांवरून जे दिवे सोडलेले असतात त्यांचे काम म्हणजे परिसर उजळून टाकणे हे नसून तो खांब तिथे आहे हे वाटसरूंना दाखवण्यापूरते मर्यादित असते. त्यामुळे दोन खांबांच्या मधला भाग लोक घाबरत घाबरतच पार करतात. 

त्यामुळे मग वेळ घालवायला म्हणा किंवा आलेले खरे खोटे अनुभव वाटून घ्यायला म्हणा असंख्य भूतकथांचा जन्म झाला यात नवल नाही. याला वर वर्णन केल्याप्रमाणे असलेल्या कोकणातल्या नीरव शांततेची आणि भरपूर आणि दाट वृक्षसंपदेची फोडणी मिळाली आणि खऱ्या खोट्या असंख्य भुतांनी गोष्टीरुपाने वावरायला सुरवात केली.

काही काळापूर्वी कोकणातल्या भुतांचे प्रकार वाचले होते ते जसे आठवतात तसे देतो आहे:

वेताळ, ब्रह्मग्रह, समंध, देवचार, मुंजा, खवीस, गिऱ्हा, चेटकीण, झोटिंग, वीर, बायंगी, जखीण, हडळ, म्हसोबा, लावसट, भानामती, चकवा, वगैरे. यांची वर्णने देत बसत नाही कारण फेसबुकवर किंवा नेटवर इतर ठिकाणी शोधल्यास सहज सापडेल.

लहानपणी आजी आजोबांनी भरपूर भुतांच्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातली एक गंमतीशीर गोष्ट म्हणजे "रामाच्या देवळासमोर एक बाई राहते, तिचा दरवाजा वाजवल्यावर ती बसल्याजागेवरून लांबूनच हात लांब करून दार उघडते" ही होती. गंमतीशीर अशाकरता म्हणालो की तेव्हा जाम तंतरली असली तरी नंतर रामाच्या देवळसमोर भूत कसं राहील असं आजीने विचारल्यावर आजोबा आपली खेचत होते हे लक्षात आलेलं. तरीही त्या घरासमोरून जाताना काही दिवस घाबरायला व्हायचंच!

मी मूळचा कोकणचा असल्यामुळे कोकणावर भयंकर प्रेम आहे हे वेगळं सांगायला नकोच. पूर्वी पडघवली वगैरे मालिकांतून कोकण दर्शन झालं खरं, पण तरी कोकणाला टीव्हीवर पुरेसे प्रतिनिधित्व न मिळाल्याने तो अनुशेष कोण भरून काढणार हा प्रश्न होताच. अशात #झी_मराठी वर #रात्रीस_खेळ_चाले सुरू झाली आणि आता मजा येणार असं वाटू लागलं. पण झीवरच्या इतर (म्हणजे जवळपास प्रत्येक) मालिकांसारखीच आरंभशूर झालेल्या या मालिकेने नंतर कंटाळवाणं केलं. एखादा विषय सुरू केल्यावर त्याचं पुढे काहीही होताना न दाखवता विसरून जाणं आणि शेवटी प्रत्येकावर का संशय आहे याची कारणे देऊन शाळेत आदा मादा कोण पादा केल्यागत त्यातल्या एकीला अटक करणं यामुळे मालिकेने खूपच अपेक्षाभंग केला. पात्रयोजना जरी चपखल असली तरी यामुळे शेवटी शेवटी वैताग आला होता. त्यात मालिकेतले क्वचितच दिसणारे आणि कपाटातून बाहेर येणारे अण्णा ही माझी विशेष आवडती व्यक्तिरेखा.

ही मालिका परत सुरू होणार म्हटल्यावर फार आशा नव्हतीच पण उत्तम अभिनय, मागल्या सीझनमधे गंडलेलं कथानक सुधारून ओघवती कथावस्तू देणे, उत्कृष्ट पात्रनिवड यांनी या मालिकेच्या आधी काय घडते हे दाखवणाऱ्या सीझनने म्हणजेच प्रिक्वेलने खूप मजा आणली. अगद कमी फुटेज किंवा लहानात लहान व्यक्तीरेखाही लक्षात राहते. मुख्य म्हणजे या मालिकेतले कलाकार कपडे घालतात ते आवडले. म्हणजे इतर मालिकांसारखं संडासात जाताना लग्नाला निघाल्यासारखे कपडे घालणे किंवा नखशिखांत नट्टापट्टा केला असतानही "अभी तैय्यार होके आती हूं" म्हणणे नसायचे. कुठेही नाव ठेवायला जागा नाही.

अण्णा नाईक ही व्यक्तिरेखा अतिशयोक्तीपेक्षाही जास्त भडक असल्याने पटत नव्हतं, पण असे लोक खरंच अस्तित्वात असल्याचं काही जणांनी किस्से सांगितले त्यातून कळलं. ही भूमिका साकारणारे श्री माधव अभ्यंकर यांच्याशी फेसबुकवरच बोलताना त्यांनीही असली माणसं अस्तित्वात असतात असं सांगितलं होतं. ते खरं असेल तर अवघड आहे.

<< माझं आधीचं मत हे होतं: अगदी अनेक जुन्या हिंदी सिनेमातले व्हिलनही कुटुंबवत्सल दाखवले आहेत. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एखादा माणूस कितीही संतापी, विक्षिप्त, तिरसट, बाई आणि बाटलीत गुरफटलेला, लोकांना फसवून त्यांच्या जमिनी लाटणारा, वगैरे सगळे वाईट धंदे करणारा असला तरी तो शेवटी प्रॉपर्टी आणि पैसा जमवतो कुणा करता, तर आपल्या कुटुंबाकरताच. मग हा माणूस याला मारीन, गोळी घालीन, घराबाहेर काढीन, वगैरे करून शेवटी घरी कोण शिल्लकच उरलं नाही तर एवढी संपत्ती काय वर घेऊन जायची आहे का? म्हणूनच अण्णा नाईक ही व्यक्तिरेखा एका मर्यादेपलीकडे पटत नाही. या सगळ्याचा लेखक व दिग्दर्शकांनी विचार करायला हवा होता.) >>

बाकी अण्णा नाईक यांच्या भूमिकेत श्री माधव अभ्यंकर आणि पांडूच्या भूमिकेत प्रल्हाद कुडतरकर रॉक्स! आपण फॅन!! नेने वकील (शेवटच्या काही भागांत कलाकार बदलले, ते ही छानच, पण माझे आवडते दिलीप बापटच), शेवंता (अपूर्वा नेमलेकर). सदा, वच्छी आणि आबा, शोभा, काशी, माई (शकुंतला नरे), रघूकाका (अनिल गावडे), दत्ता (सुहास शिरसाट), माधव (मंगेश साळवी), छाया (नम्रता पावसकर), सरिता (प्राजक्ता वाड्ये) आणि इतर सगळेच उत्तम. अधुनमधुन दिग्दर्शकाला ही गूढकथा आहे की रात्रीस खेळ चाले ऐवजी दिवसा केलेले चाळे (सॉफ्ट पॉर्न) दाखवायचे आहेत याचा गोंधळ झाल्यासारखं वाटत होतं, पण ठीक आहे.

©️ मंदार दिलीप जोशी
श्रावण कृ. द्वादशी, शके १९४२

टीपः रात्रीस खेळ चाले चे Meme: या मालिकेने मीम साठी अनेक फोटो मिळवून दिले. Zee5 App किंवा ब्राउझर वरून Zee5 वर मालिकेचा एखादा भाग सुरू असताना हवा तो क्षण किंवा पात्रांच्या चेहऱ्यावर हवे ते भाव आले की मी तो क्षण साधून स्क्रीनशॉट काढतो आणि वापरतो. असे अनेक फोटो/स्क्रीनशॉट माझ्या संग्रही असतात व एखादा विनोद सुचला की त्यातला एखादा काढून वापरतो. नेटवर असलेले आयते फोटो काही कामाचे नसतात कारण काही अपवाद वगळता मराठीत अजून Still Photography पुरेशी फोफावलेली नाही. म्हणून हे फोटो मालिकेच्या निर्मात्यांकडेही सापडणार नाहीत. त्यामुळे एखादा विनोद सुचल्यास त्याची मीम करायला मला ५ मिनिटेही लागत नाहीत.