Thursday, June 23, 2016

यस्य कस्य तरोर्मूलं

काल परवा व्हॉट्सॅपवर कोथिंबीर वापरून किडनी साफ करा अशा आशयाची एक पोस्ट वाचली त्या संदर्भात:

आपल्याकडे लोक पुन्हा आयुर्वेदाकडे व आजीबाईचा बटवा या प्रकाराकडे पुन्हा वळू लागले आहेत. पण आपल्याकडे लोकांच्या उत्साहाने उसळून वर यायला काही कळीचे शब्द (की वर्ड) - उदाहरणतः आयुर्वेदिक, organic, घरगुती, देशी उपचार, वगैरे - पुरेसे ठरतात.  हे शब्द दिसले रे दिसले की अतीउत्साहात 'आला मेसेज केला फॉरवर्ड' असं केलं जातं.

कोथींबीर काय, लिंबू काय, किंवा मध काय - या सगळ्याच गोष्टी आहारात असाव्यातच आणि योग्य प्रमाणात असाव्यात. पण त्याचा उल्लेख जेव्हा औषध म्हणून केला जातो तेव्हा त्याचा धोका आपल्याला जाणवायला हवा.

आयुर्वेदात शंभरपैकी शंभर वेळा प्रत्येक व्यक्तीला तपासूनच त्या व्यक्तीला योग्य ठरेल तो उपाय सुचवला जातो. तेव्हा एखाद्या वैद्याकडून एखादा उपाय एखाद्याला सुचवला गेला असेल तर त्याला सब घोडे बारा टक्के असा न्याय लावता येत नाही. त्या उपायात उल्लेख असलेला त्रास तुम्हाला असेल तर, पुन्हा सांगतो, तुमचा वैद्य तुम्हाला स्वतः तपासून मगच उपाय सुचवेल.

समजा तुम्ही तुमच्या वैद्याला न विचारताच तो प्रयोग केलात आणि त्याचा काहीही अपाय झाला नाही तरी त्याचा अर्थ तो औषध म्हणून सर्रास वापरायचा असा त्याचा अर्थ होत नाही. याचा अर्थ एकच - तुम्हाला काहीही नुकसान झालेलं नाही.

बरं, असा संदेश पुढे ढकलायचाच असेल तर पुढील दोन गोष्टी कराच म्हणजे कराच.

(१) वैद्याकडून तो धोकादायक नाही याची खातरजमा करुन घ्या
(२) धोकादायक नसेल तर त्याचा उल्लेख औषध म्हणून न करता "माझे स्वतःवर केलेले घरगुती प्रयोग" अशा मथळ्याखाली पाठवा. आता तुम्ही म्हणाल की वैद्यांना आक्षेप नाही तर तुम्हाला काय त्रास आहे?

पण पुन्हा वरचा मुद्दा सांगतो. कुठलाही वैद्य तुम्हाला हे असे ढकलसंदेशातले उपाय, अपायकारक नसले तरी, इतरांना औषध म्हणून सांगा असं सांगणार नाही.

हे इतके पाल्हाळ लावण्याचा उद्देश असा की आजही अनेक जण असे संदेश वाचून घरगुती प्रयोग करतात आणि उपाय लागू पडला नाही की निराश होतात. क्वचित असा प्रयोग उलटला, तर तब्येतही बिघडू शकते.

आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट नसतात असं लोक म्हणतात, पण योग्य मार्गदर्शना अभावी अशा अघोरी प्रयोगाद्वारे काही गोष्टींचे सेवन केले गेले तरी जो इफेक्ट व्हायचा तो होतोच ना! नैसर्गिक रेचक असलेला एखादा पदार्थ घेतल्यावर डोकेदुखी उद्भवणार नाही कदाचित, पण लोटा परेड अंमळ वाढण्याचीही शक्यता आहेच की!

समारोप करता करता शाळेत संस्कृत शिकत असताना वाचलेला श्लोक आठवला, तो आठवेल तसा देतो आहे.

यस्य कस्य  तरोर्मूलं, येनकेनापि मिश्रितम् ।
यस्मै कस्मै प्रदातव्यं, यद्वा तद्वा भविष्यति ।।

अर्थातः कशाचे तरी मूळ कशात तरी मिसळून कुणालातरी दिले असता काहीतरी होते. (नाही का?)

तेव्हा, सावधान!

आपला तार्किक,

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. ३, शके १९३८ | संकष्ट चतुर्थी

Sunday, June 19, 2016

वामपंथी भारत विखंडन १ - छडी लागे छम छम

काही दिवसांपूर्वी जे.एन.यु. मधलं फुटेज खरं असल्याची बातमी आपण वाचली असेलच. आज ट्विटरवर फिरता फिरता कन्हैया आणि त्याच्या लाल क्रांतीवाल्या कॉम्रेड लोकांचे छायाचित्र एके ठिकाणी पाहून त्यांची पुन्हा आठवण आली.

मानसशास्त्रात वेगवेगळ्या विकृतींचे वर्णन केलेले आपल्याला आढळते. पण या डाव्या विचाराच्या लालभाईंचं त्यात काहीच वर्णन दिसत नाही याचं मला नेहमी आश्चर्य वाटत असे. पण मग अधिक विचार करता असं लक्षात आलं की या क्षेत्रावर त्यांचंच वर्चस्व असण्याचा तर हा परिणाम तर नव्हे?

मला एक सांगा. आई, बाबा, आणि शाळेतले मास्तर किंवा बाई यांचा मार खात खात मोठ्या झालेल्या माझ्या आणि मागच्या इथल्या एक दोन पिढ्यांना एक प्रश्न आहे. उठता लाथ बसता बुक्की, धम्मक लाडू आणि चापट पोळी, आणि छडी लागे छम छम विद्या येई घम घम या गोष्टींची सढळ हस्ते उधळण जितकी आपल्या बाबतीत व्हायची त्या तूलनेत आपण आपल्या मुलांना नगण्य किंवा काहीच प्रसाद देत नसणार. बरोबर ना?

आधुनिक बालमानसशास्त्रानुसार चालणारे आपल्यापैकी अनेक जण मुलांना साधा धपाटाही घालत नसणार. मग आता आठवून पहा, आपण जितके आज्ञाधारक आणि सदाचरणी होतो, तितकी तुमची मुलं आहेत का? मग एक दोन पिढ्यातच मुलांचं संगोपन करण्याची पद्धत इतकी कशी बदलली? याचा विचार थोडा फ्लॅशबॅकमधे जाऊन केला तर आपल्यावरचा डाव्या विचारांचा प्रभाव पडल्याचा संशय नक्कीच निर्माण होतो.

हां, काळ बदललाय, झपाट्याने पुढे गेलाय हे खरं. अपवाद नक्की असतील, पण सर्वसाधारणपणे विचार केला तर मुलं म्हणून आपण आपल्या आई-बाबांच्या दृष्टीने हाताळायला अधिक सोपे होतो. अपवादाने नियम सिद्ध होत असला तरी अपवादाला आपण नियम म्हणू शकत नाही, बरोबर ना? डाव्या विचारांचे पाईक आणि साम्यवाद्यांची खासियत अशी असते की प्रचलित व्यवस्थेतले असेच अपवाद शोधायचे आणि तेच कसे नियम आहेत अशी हवा निर्माण करायची, जेणेकरुन लोकांना त्या संपूर्ण व्यवस्थेविषयीच घॄणा उत्पन्न व्हावी. आणि अर्थातच न्युनगंड. मग आधीच्या पिढीतल्या नारायणाला आजच्या सुनीलला आपण कसं बदडायचो ते आठवून डोळ्यांत पाणी येतं, आणि तो पुढच्या पिढीतल्या अदित्यला अंजारत गोंजारतच मोठं करायचं मनावर घेतो. आणि अशा रीतीने पुढची पिढी प्रथम क्रमांकाची सर्किट करून सोडण्याचा डाव्या विचारांचा मनसूबा तडीस जातो. हां, अपवाद हाच नियम आहे हा विचार आपल्या मनावर ठसवताना ते उपाय सुचवत जातात, मग त्याने काही 'सुधारणा' होवोत किंवा न होवोत. पण जे बदल होतील ते चांगल्यासाठीच आहेत आणि आपण कसे योग्य मार्गावर आहोत हे गाजर मात्र दर टप्प्यागणिक आपल्याला दाखवायला ते विसरत नाहीत.

हे फक्त एक उदाहरण आहे, आपल्या घरातलं. पण आज देशात जिथे जिथे फार काही बिघडल्याचं आपल्याला दिसतं तिथे तिथे तुम्हाला या साम्यवादी, डाव्या विचारांचा प्रभाव नक्कीच दिसून येईल. कारण आधुनिक मानसशास्त्र हे त्यांच्यासाठी शास्त्र कमी आणि शस्त्र अधिक आहे.

अहो, उगाच का कन्हैय्या आणि अनिर्बन जन्माला येतात?

ही पोस्ट एखाद्या कवटी सरकलेल्या कॉन्स्पिरसी थिअरीवाल्याची वाटली, तर बुवा सरकलेत म्हणून सोडून द्या. पण सोडून देण्याआधी ही पोस्ट पुन्हा एकदा वाचून त्यावर विचार करुन पहा.

जाता जाता एक सत्यघटना सांगतो:

पात्रयोजना: अतीद्वाड कार्टं आणि त्याचे बाबा.
स्थळः अमेरिका

बाबा: कार्ट्या..........
कार्ट: डॅड, हात खाली घ्या, पोलीसांना फोन करेन.
बाबांचाच चेहरा थोबाडीत खाल्ल्यासारखा.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
पात्रयोजना: हेच दोघे
स्थळः भारत

बाबा: <फट्यॅक्> 
कार्ट पोलीसांना फोन करतं. अर्ध्या तासात हवालदार घरी.
कार्टः ओ, बाबांनी मला थोबाडीत मारलं.
पोलीसः मग? तुझा बा न्हाई मारणार तुला तर काय मी मारणार? मारू?
कार्ट्याचं थोबाड पुन्हा एकदा थोबाडीत मारल्यासारखं.

~ सत्यघटना ~

अवांतरः आपला साम्यवादी सोवियत रशियाशी असलेल्या मैत्रीचा काळ आठवून बघितला, तर साधारण हे असे विचार हळू हळू आपल्या देशात झिरपायची सुरवात कधी झाली असावी याचा अंदाज येतो आणि त्याचे हे असे परिणाम कधी दिसू लागले असावेत याचाही. सोवियत नेते निकिता ख्रुश्चेव म्हणे म्हणायचे, "We cannot expect the Americans to jump from Capitalism to Communism, but we can assist their elected leaders in giving Americans small doses of socialism until they suddenly awake to find they have Communism." येतंय का थोडं थोडं लक्षात?

टीपः लेखातील सर्व नावे काल्पनिक.

---------------------------------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी - मराठी रूपांतर व संपादन
प्रेरणास्त्रोत / मूळ  हिंदी लेखन - आनंद राजाध्यक्ष

जेष्ठ शु. १४, शके १९३८, वटपौर्णिमा
---------------------------------------------------------------------------------

पुढचा भाग इथे

Sunday, June 5, 2016

अली नामक एका वादळाला श्रद्धांजलीक्ले म्हणजे माती. माती - लोक जिला पायदळी तुडवतात ती. जिला कायम तुच्छ लेखलं जातं ती माती. एखाद्याला नेस्तोनाबूत केल्यावर आपण म्हणतो 'धूळ चारली', आय मेड हिम बाईट द डस्ट.

कॅशिअस मार्सेलिअस क्ले या नावाने जन्मलेल्या त्या विलक्षण मानवाने एक दिवस ठरवलं की मी माती म्हणून ओळखला जाणार नाही. मला कुणी तुच्छ म्हणू शकणार नाही. आणि मला कुणी धूळही चारू शकणार नाही. आय विल नॉट बाइट द डस्ट, एव्हर. क्ले ऐवजी त्याने अली हे नाव धारण केलं. अली म्हणजे 'उच्च', 'वरचा', 'उत्कृष्ठ'. आणि मग कृष्णवर्णीयांविरुद्ध होत असलेल्या अन्याय आणि भेदभावाने पेटून उठलेला कॅशिअस मार्सेलिअस क्ले झाला मोहम्मद अली. अली!!!

लहान मुलांत प्रचंड उर्जी असते. त्याला योग्य वळण लावल्यास मोठे चमत्कार घडू शकतात. अलीच्या आयुष्यात असाच एक चमत्कार घडला. सायकल चोरली म्हणून चोरट्याला ठोकून काढण्याची गर्जना करणार्‍या अलीला योग्य दिशा दाखवली ती एका पोलीस अधिकार्‍याने. ठोकून काढायला आधी ते कसं करायचं ते शिकावं लागतं असा धडा त्याने अलीला दिला, आणि दिशा दाखवली मुष्टीयुद्धाच्या प्रशिक्षणाची. आणि मग तो पुढची दोन दशकांहून अधिक काळ थांबलाच नाही. प्रतिस्पर्ध्यांना ठोकून काढणे हे एकमेव लक्ष्य ठरवून तो त्यात यशस्वी होत गेला. इतका, की एकोणीसशे साठ साली व्यावसायिक मुष्टीयोद्धा झाल्या नंतर सलग एकोणीस लढती त्याने जिंकल्या. त्यातल्या तब्बल पंधरा लढतीत त्याने प्रतिस्पर्धी मुष्टीयोद्ध्यांना भुईसपाट, म्हणजे नॉक आउट केलं.

पण अलीची रग केवळ प्रतिस्पर्ध्याला रिंगमधेच नामोहरम करण्यावर समाधान होत नसे. आपल्याकडे जसं क्रिकेटमधे प्री-मॅच स्लेजिंग होतं, तसं अली प्रतिस्पर्ध्याविरुद्ध अतिशय आढ्यताखोर आणि अपमानास्पद वक्तव्य करुन त्याला भयानक राग आणत असे. प्रतिस्पर्ध्याला उद्देशून शेलक्या विशेषणांचा उपयोग करण्यात तो कुठलाही विधिनिषेध बाळगत नसे. कधी कुणाला अमुकच राउंडमधे आडवा करण्याची वल्गना असे, कधी कुणाला "तुला आता पेन्शनीतच काढतो" अशी धमकी असे, तर कुणाला कुठल्यातरी प्राण्याची उपमा देऊन हिणवणं असे. लढतीच्या आधीच प्रतिस्पर्ध्याच्या डोक्यात जाण्याची कुठलीही संधी अलीने सोडली नाही. त्याला पहिलं विश्वविजेतेपद मिळवून देणार्‍या लढती आधी देखील त्याने त्याचा प्रतिस्पर्धी सॉनी लिस्टन याला 'अस्वल' अशी उपमा देऊन त्याला प्राणीसंग्रहालयात टाकण्याची गरज असल्याचा चिमटा काढला होता. अक्षरशः राक्षसी चणीचा अवाढव्य लिस्टन हे ऐकल्यावर प्रचंड भडकला होता. प्रत्यक्ष लढतीच्या वेळी रिंगमधे मात्र लिस्टनला त्याचा राग अलीवर काढता आला नाही. त्या वेळी विश्वविजेता हा किताब राखण्यात लिस्टन अयशस्वी ठरला आणि अलीला त्याचं पहिलं विश्वैजेतेपद मिळालं.

अलीने या लढतीनंतर इस्लामचा स्वीकार केला. क्लेचा अली कसा झाला, त्याची बीजं कुठे रोवली गेली हे शोधताना एक सर्वश्रुत कथेचा आधार घ्यावा लागतो. आपल्या मित्रांबरोबर 'फक्त श्वेतवर्णीयांसाठी' असलेल्या एका हॉटेलात अली गेला. तिथे त्याला जेवण देण्यास तिथल्या व्यवस्थापनाने नकार दिला. अर्थात, हे एकंच कारण असेल असे नव्हे, पण या घटनेचा खोल परिणाम त्याच्यावर झाला हे निश्चित.

लढतीआधी इतरांना हिणवून चीड आणणारा आणि कदाचित त्याचाच उपयोग लढतीत करुन घेणारा अली मात्र लढतीच्या वेळी स्वतःच्या रागावरचा ताबा कधीच सुटू देत नसे. धर्म आणि नाव बदलून काळ लोटला तरी अर्नी टेरेल हा मुष्टीयोद्धा त्याला कायम 'क्ले' असंच संबोधत असे. त्याचा राग मनात ठेऊन अलीने त्याच्या विरुद्ध एकोणीसशे सदुसष्ट साली लढतीला उतरल्यावर प्रत्येक जोरदार ठोशागणिक "अंकल टॉम, सांग माझं नाव काय आहे?" असं सुनावत त्याला ठोकत गेला. ही अत्यंत चुरशीची झालेली लढत अलीनेच जिंकली हे वेगळं सांगायला नकोच.

(हे लिहीत असताना उगाचच जॉनी मेरा नाम सिनेमात देव आनंद प्राणला ठोसे लगावत असताना प्रत्येक ठोशागणिक "मेरा नाम जॉनी नहीं है" असं ठणकावतो त्याची आठवण झाली. देव आनंद कुठे, मोहम्मद अली कुठे! Silly me! पण असंही असू शकेल, की या लढतीत घडलेल्या या शारीरिक आणि शब्दांच्या आदानप्रदानाचा उपयोग चित्रपटकर्त्यांनी सिनेमा बनवताना कशावरुन केला नसेल? शक्यता आहे. असो, अवांतर खूप झालं.)

जगात आपला काही संबंध नाही तिथे नाक खुपसायची आणि लष्कर घुसवायची ही अमेरिकेची वाईट खोड. पण अंगात प्रचंड रग असली आणि लढण्याची कायम खुमखुमी असली तरी तो पर्यंत संपूर्ण धर्मांध झालेल्या आणि धर्माव्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणासाठी युद्ध करायला नाखुष असलेल्या अलीने व्हियेतनाम युद्धाच्या वेळी लष्करात दाखल व्हायचा आदेश आल्यावर त्याला स्पष्ट नकार दिला. आणि वर "ज्यांचे आपल्याशी कोणतेही वैर नाही त्या व्हियेतनामी लोकांना मारायला मी का हातात बंदूक घेऊ?"अशी मखलाशीही केली. साहजिकच त्याबद्दल त्याने सरकारचा रोष ओढवून घेतला आणि त्याच्या मुष्टीयुद्ध खेळण्यावर बंदी आणण्यात आली. तीन वर्ष हे तूफान शांत राहिलं. पण तो तेव्हा स्वस्थ बसला नाही. त्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि तिथे मात्र त्याला न्याय मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरची बंदी उठवली आणि हे वादळ पुन्हा धुमाकूळ घालायला सज्ज झालं.

पण देवांनाही प्रसंगी माघार घ्यायला लागते अशा या जगात कुणीच कायम अजिंक्य राहू शकत नाही. अलीलाही याचा अनुभव जो फ्रेझिअर विरुद्धच्या जगप्रसिद्ध लढतीत आला. फ्रेझिअरला दमवण्यासाठी रिंगच्या दोरांचा आधार घेत रिंगमधे त्याला फिरवणार्‍या अलीला फ्रेझिअरने मारलेल्या एका जोरदार हुकच्या फटक्याने आडवं केलं. अली मोजून तीन सेकंदांनी उठला. मात्र तो पर्यंत पंचांनी फ्रेझिअरला विजेता घोषित केले होते. अशा तर्‍हेने अलीला पहिल्या पराभवाची चव चाखावी लागली. असं जरी असलं तरी एकोणवीसशे एकहात्तर सालची ही लढत मुष्टीयुद्धाच्या विश्वातील आजपर्यंतची सर्वोत्तम लढत म्हणून मानली जाते.

मात्र पराभव शांतपणे घेईल तो अली कसला? या लढतीनंतर या वादळाने दोन वेळा विश्वविजेतेपद स्वतःकडे अक्षरशः खेचून आणलं. त्यातल्या पहिल्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत हेविवेटचा बादशहा जॉर्ज फोरमनला हरवून तर दुसरं विश्वविजेतेपद जो फ्रेझिअर विरुद्धची लढत जिंकून तीन वर्ष आधी झालेल्या पराभवाचा वचपा काढत तो विश्वविजेता झाला.

अत्यंत अहंकारी आणि उर्मट असलेल्या अलीला स्वत:बद्दल इतका आत्मविश्वास होता, की त्याने स्वतःच्या आत्मचरित्राचं शीर्षक 'द ग्रेटेस्ट' असं ठेवलं. त्याची दुसरी मुलगी लैला अली, ही देखील मुष्टीयोद्धा म्हणून प्रसिद्धी पावली.

अखेर एकोणवीसशे एक्क्याइंशी साली या तूफानाने निवृत्ती पत्करली. त्याचं दुर्दैव असं की कारकीर्दीत तब्बल एकोणतीस हजारावर ठोसे खाऊन ताठ उभा असलेल्या अलीला निवृत्तीनंतर लगेचच पार्किन्सन्स या आजाराने गाठलं आणि त्याच्या साध्या साध्या हालचालींवरही बंधनं आली. पण, पण, पण, स्वस्थ 'बसेल' तो अली कसला. त्याने त्याही अवस्थेत पार्किन्सन्सग्रस्त रुग्णांसाठी सामाजिक कार्य सुरु केलं आणि ते खूप वाढवलं.

अशा या बहुपेडी व्यक्तीमत्वावर चित्रपट निघाला नसता तरच नवल होतं. हॉलीवुडच्या अत्यंत हरहुन्नरी, अष्टपैलू, आणि धमाल अभिनेता विल स्मिथ याने "अली" या नावानेच काढलेल्या चित्रपटात खूप मेहनत घेऊन अलीची भूमिका केली होती. वाचनाचा कंटाळा असेल, तर हा सिनेमा नक्की पहावा.दुर्दैवाने या आजारातच काल त्याचा मृत्यू झाला, आणि दैवदुर्विलास असा की क्ले या नावाचा तिटकारा असणारा अली, मातीतच विसावण्यास सज्ज झाला.

या वादळाला नम्र श्रद्धांजली.

अली, तू कायम जगाच्या स्मरणात राहशील. रेस्ट इन पीस अली. रेस्ट इन पीस.

--------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ १४, शके १९३७
--------------------------------------