Sunday, May 5, 2019

जागतिक हास्यदिनाच्या निमित्ताने - टवाळा आवडे विनोद अर्थात समर्थ रामदास स्वामी आणि विनोद

समर्थ रामदासस्वामी हे विनोद करण्याच्या विरोधात होते असा अपप्रचार जाणता अजाणता अनेक जण करताना दिसतात. त्याकरता त्यांच्याच "टवाळा आवडे विनोद" या शब्दांचा आधार घेतला जातो.

समर्थांनी समर्थ रामदासस्वामींनी इतकं काही लिहून ठेवलेलं आहे की घरात, समाजात वावरण्याकरता मार्गदर्शनात्मक असं इतर काही वाचलं नाही तरी चालेल असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरू नये. त्यांनी जे लिहून ठेवलं आहे ते सगळंच्या सगळं फक्त वाचायचं म्हटलं तरी आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अंमळ अवघडच आहे. कदाचित म्हणूनच इतक्या अभ्यासू, दिव्यत्वाची प्रचिती घेतलेला विद्वान संत विनोदासारख्या निर्मळ आणि आनंद देणार्‍या गोष्टीच्या विरोधात कसा असेल अशी शंका बर्‍याच लोकांच्या मनात डोकावलेली दिसत नाही.

समर्थांचे लिखाण पूर्ण न वाचताच दासबोधातील  दशक ७, समास ९ यातील "टवाळा आवडे विनोद" हे वाक्य बाजूला काढून जे टवाळ असतात त्यांनाच विनोद आवडतात किंवा विनोद आवडणारे सगळे टवाळ असतात असे अर्थ लावून ते प्रसारित केलं गेलं. अशा लोकांकरता इथे समर्थांनीच लिहून ठेवलेलं आहे शब्दात सांगायचं तर "पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।  तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ।।" अर्थात, अशा विपर्यास करणारे प्रत्येक वेळी मत्सरी दुरात्मे असतीलच असं नव्हे, अनेकदा ते निव्वळ अज्ञानापोटी केलेलं विधान आहे असंही आढळून येतं. इतकं आध्यात्मिक, गंभीर लिखाण करणार्‍या समर्थांना विनोद आवडत नसावा हे आणखी एक गृहतिक हे वाक्य वेगळं काढून प्रसारित करण्यामागे असावं. पण खरंच समर्थ रामदास स्वामींना विनोद आवडत नव्हता का? ते हास्यविनोदाच्या विरोधात होते का?

वास्तविक समर्थांच्या पूर्ण वाङ्मयात त्यांनी कुठेही विनोदाची किंवा विनोदनिर्मितीची किंवा तो करणार्‍याची निंदा केलेली नाही. दासबोधातील दशक सातवा समास नववा यात  कुणाकुणाला काय काय आवडते त्याचे विवेचन समर्थांनी केलेले आहे. समर्थांनी टवाळ नक्की कुणाला म्हटलं आहे आणि कोणत्या संदर्भात म्हटलं आहे ती आणि त्या नंतरची ओवी मुळातून वाचल्यास याचं उत्तर आपल्याला मिळतं. त्या दोन ओव्या :

टवाळां आवडे विनोद | उन्मत्तास नाना छंद | तामसास अप्रमाद | गोड वाटे ||५१||
मूर्ख होये नादलुब्धी | निंदक पाहे उणी संधी | पापी पाहे पापबुद्धि | लाऊन आंगीं ||५२||

५१ - उन्मत्त, माजोरड्या माणसांना नाना छंद असतात किंवा आवडतात. इथे छंद याचा अर्थ आजच्या भाषेत येडेचाळे किंवा लहरीमुळे केलेली विचित्र कृते असा घ्यावा. तामसी माणसाला शांत, संयमी राहणे जमत नाही. तो सतत दुष्टकर्माकडेच आकर्षिला जातो. समर्थांना इथे हे सांगायचं आहे की त्याचप्रमाणे टवाळ माणसाला येता जाता हलक्या दर्जाचा, विकृत अशा स्वरूपाचा विनोद करायला आणि इतरांना सांगायला आवडतं.

५२ - मूर्ख लोक नादलुब्धी असतात, निंदक नेहमीच दुसर्‍याच्या उणीवा शोधण्याच्या संधी शोधत असतो, त्याला त्यातच रस असतो. तर पापी माणूस दुसर्‍याचीही बुद्धी भ्रष्ट करुन तिचे रूपांतर पापबुद्धीत करण्यात दंग राहतो.

याचा अर्थ याचा अर्थ ज्याला विनोद आवडतो, तो टवाळच असतो असा त्याचा अर्थ खचितच होत नाही. आधी म्हटल्याप्रमाणे समर्थ रामदासस्वामींचे साहित्य आणि त्यांचे आयुष्य पाहील्यास ते अगदी गंभीर प्रवृत्तीचे असतील असा निष्कर्ष काढणे उथळपणाचे ठरेल. समर्थ अशा प्रकारच्या विनोदाबद्दल काय विवेचन करतात ते मूर्खलक्षणांत अर्थात दुसर्‍या दशकात आपल्याला सापडतं. त्यातल्याही या दोन ओव्या प्रातिनिधिक म्हणाव्या लागतील:

विनोदार्थीं भरे मन | शृंघारिक करी गायेन | राग रंग तान मान | तो रजोगुण ||२४||
टवाळी ढवाळी निंदा | सांगणें घडे वेवादा | हास्य विनोद करी सर्वदा | तो रजोगुण ||२५||

सतत विनोदांत रमावेसे वाटते, विविध रंगाची व रागतालयुक्त श्रृंगारिक गायनाची गोडी वाटत राहते, तो रजोगुण होय (इथे सतत हा शब्द महत्त्वाचा). टिंगल, टवाळी, निंदा करण्यात, वादविवादात जिंकल्याचा किस्सा गर्वाने सांगण्याची आवड असते, हास्य विनोदात रमावेसे वाटते, तो रजोगुण होय.

रामदास स्वामी शिस्तप्रिय आणि बलोपासनेचे भोक्ते असले तरी ते तितकेच आयुष्याचा निर्मळ आनंद घेणारे होते. त्यांच्या या स्वभावाचे दर्शन घडविणाऱ्या अनेक घटना त्यांच्या चरित्रग्रंथांत नोंदवलेल्या आहेत. पण समर्थांनी विनोदाबद्दल काही लिहिलं आहे का हे पाहूया. पण त्या आधी एक गोष्ट पुन्हा लक्षात घेतली पाहीजे की समर्थांचा कटाक्ष येता जाता सतत टिंगल टवाळकीच्या स्वरुपात केल्या जाणार्‍या विकृत विनोदाकडे होता. निखळ विनोदाला समर्थांनी नेहमीच पाठींबा आणि प्रोत्साहन दिलेले दिसेल.

मूर्खांची आणि पढतमूर्खांची लक्षणे सांगताना समर्थ एखाद्या गोष्टीच्या खोलात न जाता उथळपणा करणार्‍या मनुष्यांच्या विरोधाभासाने भरलेल्या वागण्याला सणसणीत टोमणे मारायला कमी करत नाहीत. हा ही विनोदाचाच एक प्रकार होय. जाता जाता त्या संदर्भातल्या दशक पाचवा समास तिसरा (६६) यात समर्थ काय म्हणतात ते पाहूया:

काखे घेऊनियां दारा | म्हणे मज संन्यासी करा | तैसा विषई सैरावैरा | ज्ञान बडबडी ||६६||
असो ऐसे पढतमूर्ख | ते काय जाणती अद्वैतसुख | नारकी प्राणी नर्क | भोगिती स्वइच्छा ||६७||

बायकोच्या कमरेला हाताने विळखा घालून मला संन्यासदीक्षा द्या असं एखादा म्हणतो, तसं विषयासक्त अज्ञानी माणूस आत्मज्ञानाची स्वैर बडबड करीत सुटतो. एकूण काय तर या पढतमूर्ख लोकांना अद्वैतानुभवाचं सुख कसं माहित असावे ? नरकातील प्राणी स्वतःच्या इच्छेने नरकाचे दुःख भोगत असतात.

शेवटी समर्थांनी विनोदाबद्दल काय लिहिले आहे, किंबहुना विनोदाचे समर्थन केले आहे का, त्याला स्पष्ट शब्दात प्रोत्साहन कसे दिले आहे ते पाहणे योग्य ठरेल. दासबोध दशक चौथा समास दुसरा (१४) यात समर्थ कीर्तन कसे करावे, कीर्तन नीरस होऊ नये म्हणून त्यात रंग कसे भरावे याचे जे विवेचन करतात ते संदर्भाकरता उपयुक्त असले तरी विस्तारभयास्तव संपूर्ण इथे देत नाही. पण त्यात ते विनोदाबद्दल म्हणतात तेवढं पाहूया:

पदें दोहडें श्लोक प्रबंद | धाटी मुद्रा अनेक छंद |
बीरभाटिव विनोद | प्रसंगें करावे ||१४||

भावभक्तियुक्त पदे, दोहे, श्लोक, धाटी, मुद्रा आणि छंद यांचा समावेश कथेत असावा. प्रसंगानुरुप चेहर्‍यावर वीर, हास्य इत्यादि रसाचा उपयोग करत कथेत विनोदाने रंग भरावा. यात समर्थांनी कीर्तन रंगवण्याकरता म्हणजे रंजक करण्याकरता इतर गोष्टींबरोबरच विनोदाचाही वापर करावा असं थेट आणि स्पष्टपणे म्हटलं आहे. असे समर्थ रामदास स्वामी विनोदाच्या विरोधात कसे असतील बरे? अशा अनेक ओव्यांची उदाहरणे दासबोधात आणि समर्थ साहित्यात अनेक ठिकाणी आढळतील.

प्रत्यक्ष समर्थ साहित्यातून घेतलेल्या वरील उदाहरणांवरुन हे स्पष्ट होईल की समर्थ रामदास स्वामी विनोदाच्या विरोधात तर नव्हतेच, उलट त्यांना विनोद आवडतच होता.

© मंदार दिलीप जोशी
वैशाख शु १, शके १९४१

संदर्भः श्रीमत् ग्रंथराज दासबोध - http://www.dasbodh.com/
विशेष आभारः कीर्तनकार श्री समीर लिमये.