Thursday, June 6, 2013

हे आणि ते - १: पाहुणचार

एकदा माझी एक आजी तिच्या भाचीच्या मुलाच्या लग्नानिमित्त तिच्याकडे उतरली होती. लग्नघर असल्याने आणि अर्थातच वार्धक्यामुळे आजीला माझ्या घरी येणं शक्य नसल्याने तिनेच सुचवल्याप्रमाणे तिला भेटायला मी तिथे गेलो. तिच्या माहेरच्या मंडळींशी ख्यालीखुशाली विचारणार्‍या गप्पा झाल्या. त्यांचा आधीपासून परिचय होताच, त्यामुळे गप्पांना वैयक्तिक संदर्भही लाभला. पण त्या बोलण्याला गप्पा असं म्हणणं म्हणजे विंदू दारा सिंगला अभिनेता म्हणण्यासारखं आहे.

मी बहुतेक अत्यंत चुकीच्या वेळेला तिथे पोहोचलो होतो. "ए श्रीsssssss ये ना रे" भयानक हेल काढत तीच ती जान्हवी तिटकारा यावा इतक्या लाडीकपणे एक एक शब्द उच्चारून श्रीला आधी वात आणि मग झोप दोन्ही आणत होती असा ज्वलंत विषय कम् दृष्य सुरू असताना मी तोंड उघडण्याचं धारिष्ट्य केलं आणि मी विचारलेला प्रत्येक प्रश्नावर आणि दिलेल्या प्रत्येक उत्तरावर "आँ?! क्कॉय? हां हां, हो का? क्कॉय? हां बोल आता" अशा प्रतिक्रिया उपस्थित काकु-आत्या इत्यादी मंडळींकडून मिळत गेल्या. आजीला कमी ऐकू येतं त्यामुळे मला तिच्याशी जोराने बोलावं लागत होतं आणि रोज अशा पद्धतीने बोलण्याची सवय नसल्याने तोच वरच्या पट्टीतला आवाज इतरांशी बोलताना लागत होता. मला इथे आमंत्रण नव्हतं मान्य, पण मी आल्यावर लक्ष देऊन चार शब्द नीट बोलले गेले असते तर मी काय त्या हेलकाढू जान्हवी आणि बावळट शिरोमणी श्रीच्या प्रेमालापात विघ्न आणून त्यांच्या सिरिअलचा बट्ट्याबोळ करणार होतो का? असो. तर, टीव्हीवर चाललेली बोंबाबोंब, लग्नघरातली गडबड, माझा मोठा आवाज या अभूतपूर्व गोंधळात आजीची सदिच्छा भेट मी कशीबशी उरकली आणि पुढ्यातला चिवडा लाडू पोटात ढकलून, तिथून अक्षरश: पळ काढला.

तिथून बाहेर पडलो आणि गेल्याच वर्षी आलेला एक अतिशय छान अनुभव आठवला. माझ्या एका कलीग-कम्-मैत्रिणीकडे सहकुटुंब जेवायला आमंत्रण होतं. शनिवारी संध्याकाळी साडेसातला जायचं असं ठरलं होतं पण मुलांना तयार करण्याच्या गडबडीत पोहोचायला आठ वाजलेच. आम्ही पोहोचलो तेव्हा ती आणि तिचा नवरा, दोघांनीही "या..." म्हणून सुहास्य वदनाने स्वागत केले. औपचारिक हसू लगेच ओळखू येतं मला, हे मात्र तसं नव्हतं हे स्पष्ट दिसत होतं. ते "या" बोलले नसते तरी निव्वळ ते स्मितहास्य पाहूनच ते अगदी मनापासून केलेलं स्वागत आहे हे मला जाणवलं असतंच. सुरवातीच्या गप्पा झाल्यावर पावभाजी हा मेनू असल्याचं समजलं. "अगदी last moment ठरलं पाव भाजीचं" मैत्रीण म्हणाली. आमच्या 'कुटुंबाला' पावभाजी अत्यंत प्रिय असल्याने तिच्या चेहर्‍यावर विशेष आनंद पसरला. मलाही उगाच भारंभार पदार्थ नसल्याने बरं वाटलं. बरेच पदार्थ असणं चुकीचं नाही, पण मग एकाचीही धड मजा घेता येत नाही. तेव्हा पावभाजी जिंदाबाद करत गप्पा मारत मारत सगळ्यांनी सही झालेल्या पावभाजीवर ताव मारला. मग दोघांनी आम्हाला सगळं घर दाखवलं. काही वेळाने पुलंच्या म्हैस कथेतल्या वर्णनाप्रमाणे दोन ट्रकवाले, दोन एसटीवाले, आणि दोन मुंग्या या समोरासमोर भेटल्या की काहीतरी टिकटिक टिकटिक टिकटिक टिकटिक झालंच पाहीजे या न्यायाने दोघा बायकांचं स्वयंपाकघरात काहीतरी गुफ्तगू झालं. मग पुन्हा गप्पा झाल्या आणि आल्यापासून साधारण दोनेक तासांनी आम्ही निघालो.

दुसर्‍या दिवशी मी दोघांनाही पावभाजी आणि पाहुणचार आवडल्याचा एसएमएस केला तेव्हा दोघांनीही उत्तर पाठवताना भेटीबद्दल आनंद व्यक्त केला.

त्या शनिवारी रात्री उशीरा झोप आणि रविवारी लवकर उठल्याने झोप अनावर होऊन मी रविवारी दुपारी बराच वेळ झोपलो. त्यामुळे रात्री जागरण झालं. मला सकाळी लवकर उठून चालायला जायचं असल्यामुळे ती झोप सोमवारी सकाळीही पूर्ण झाली नाही. मंगळवारच्या झोपेवरही याचा परिणाम झाला आणि माझं काम हळु हळु होऊ लागलं. लक्ष केंद्रित करण्यावर झालेल्या परिणामामुळे मी लक्षपूर्वक काम करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करु लागलो आणि त्या भानगडीत इतरांशी बोलणं कमी झालं. या मौनामुळे त्या मैत्रिणीचा गैरसमज झाला आणि तिने मला विचारलं की "का रे बाबा शनिवारी तू आमच्याकडे येऊन गेल्यानंतर काही घडलं का? I am finding you a little aloof. आमच्याकडून काही चूक झाली आहे का?" खरं तर तसं काहीही नव्हतं. पण तिने हा विचार केला याचंच मला खूप कौतुक वाटलं. झोपेच्या खोबर्‍याची कथा सांगून तिचा गैरसमज मी लवकरच दूर केला, पण भेटीनंतर काहीही कारणाने का असेना 'काही चुकलं का' असं विचारणं हे संवेदनशील मन असल्याचा संदेश देऊन गेलं. या निमित्ताने आधी लक्षात न आलेली आणखी एक आणि महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्यांच्या पाहुणचाराची छान पद्धत. त्या दिवशी आम्हाला झालेल्या उशीरामुळे आमची वाट बघत असताना वेळ घालवायला त्यांनी कदाचित टीव्ही सुरू केलेला असावा. आम्ही घरात पाऊलही ठेवण्याच्या आत तो बंद झालेला होता. मला आत्ता आठवलं की यजमानांना रिमोट खाली ठेवताना मी बघितलं होतं बहुतेक. आम्ही घरात पाऊल ठेवण्यापासून तिथून निघून लिफ्टमधे शिरण्याच्या वेळेपर्यंत टीव्ही नाही, मधूनच पेपर किंवा मासिकं चाळणं नाही, मोबाईलशी चाळा नाही की मोबाईल वाजणं नाही, काही लहानसहान काम करणं नाही की आम्ही आल्यामुळे इतर कामं बाजूला राहिली आहेत असा साधा भास देखील आम्हाला झाला नाही - दोघांनीही संपूर्ण लक्ष आमच्यावरच केंद्रित केलेलं होतं आणि हे सगळं सहज होत होतं - दोघांच्याही वागण्यात कृत्रिमपणाचा लवलेश नव्हता. आम्ही काही सारखे कुणाकडे जातो असं नाही. पण बर्‍याच काळानंतर आम्हाला पाहुणे म्हणून गेल्यावर इतका छान अनुभव आला. शिवाय संपूर्ण वेळ आमच्याकडेच लक्ष दिल्याने अगदी राजेशाही पाहुणचार झाल्यासारखं वाटलं. समोरच्याच्या मनाचा आणि आनंदाचा इतका बारकाईने विचार करणार्‍या या साध्या स्वभावाच्या दांपत्याने केलेल्या आदरातिथ्य आणि त्याबद्दल केलेल्या पाठपुराव्याचं खूप कौतुक वाटलं.

'
अतिथी देवो भवया वचनाचा खरा अर्थ त्यांनी जाणला होता हे निश्चित. दुसर्‍या दिवशी पूजा करताना हात जोडल्यावर बाप्पाने त्यांना कायम सुखात ठेवावं अशी इच्छा आपोआप व्यक्त केली गेली, आणि तेव्हापासून त्या दोघांचा समावेश माझ्या रोजच्या प्रार्थनेत होतो आहे.