Friday, November 12, 2010

शबरीधाम

रामायणातला एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे शबरी आणि तिची उष्टी बोरे खाणारे श्रीराम आणि लक्ष्मण यांची गोष्ट. एका दंतकथेनुसार शबरीचा आश्रम जिथे होता त्या ठिकाणाला भेट देण्याचा नुकताच योग आला.

अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल्या दंडकारण्यात राहणारी धार्मिक वृत्तीची शबरी ही पूर्णा (पुष्करणी) नदीच्या तीरावर असलेल्या निबीड अरण्यात एकांत स्थळी तपस्येकरता राहत असे. जवळच असणार्‍या सरोवराच्या काठावर स्नान, पूजा, होम इत्यादी धर्मकार्यार्थ अनेक ऋषीगण नियमित येजा करत असत. शेवटी जंगलच ते, मार्ग असा कितीसा चांगला असणार? सरोवराकडे जाणार्‍या रस्त्यावरचे बारीक बारीक दगड, काटे, आणि पायांना इजा होऊ शकेल अशा इतर अनेक गोष्टींचे त्या रस्त्यावरून निर्मूलन करून ऋषींच्या मार्गातले अडथळे शबरी दूर करत असे. स्त्रीसुलभ लज्जा म्हणा किंवा इतर काही कारण, ही सगळी कामे ती लपूनछपून करत असे. शबरी याबाबतीत इतकी काळजी घेत असे की झाडू वापरला तर त्या आवाजाने आपल्याकडे लक्ष वेधलं जाईल म्हणून ती हातानेच ही कामे करी. ही सगळी कामे कुणी केली हे उघड झालं तर आपल्यावर नसता प्रसंग ओढवेल अशी तिला भीती होती.

रोज आपला मार्ग साफ आणि निर्धोक बघून ही साफसफाई करतं तरी कोण असा प्रश्न समस्त ऋषी-मुनी आणि इतर साधक मंडळी एकमेकांना आश्चर्याने विचारत असत.

अखेर मातंग ऋषी यांना हे रहस्य उलगडलं. शबरीशी झालेल्या भेटीत त्यांनी तिच्यातले सुप्त गुण हेरले आणि तिला आपल्या आश्रमात आश्रय दिला. असे म्हणतात की देव दिवाळी (कार्तिक पौर्णिमा) ह्या दिवशी ही भेट झाली. शबरीने आश्रमाची व तिथल्या रहिवाशांची लहान-मोठी कामे करण्याबरोबरच ज्ञानार्जनही सुरु केलं. आपल्या मृदू आणि विनयशील स्वभावाने आश्रमातल्या सगळ्यांची मने तिने लवकरच जिंकून घेतली. दिवसभर विविध कामात व्यग्र असूनही चाललेले विद्यादान लक्ष देउन ग्रहण करणे आणि काही न समजल्यास नम्रतेने शंका विचारून लगेचच निरसन करुन घेणे ही शबरीची दिनचर्याच झाली. अशा प्रकारे विद्याग्रहण करून ती अनेक विषयांत पारंगत झाली.

मातंग ऋषींनी शबरीमधली ज्ञानपिपासा ओळखून आणि पारखून घेतल्यावर तिला आपली विद्यार्थिनी म्हणून स्वीकारले. ते इतकंच करुन थांबले नाहीत तर तिला आपल्या इतर शिष्यगणांच्या बरोबरीचे स्थान दिले.

अशा प्रकारे नित्यनेमाने गुरुसेवा करत असताना एके दिवशी मातंग ऋषींनी तिला आपल्या मनातला सल बोलून दाखवला, आणि त्याचबरोबर तिला आशीर्वादही दिला. ते म्हणाले, "पोरी, माझ्या हयातीत प्रभूंनी (श्रीराम) मला दर्शन दिले नाही, पण त्यांच्या चरणकमलांनी ते तुझी पर्णकुटी नक्की पवित्र करतील".

अशीच अनेक वर्ष लोटली. सीतेच्या शोधात दंडकारण्यातून जात असताना कबंध नावाचा अत्यंत कुरूप आणि महाभयानक राक्षस राम-लक्ष्मणांना सामोरा आला. लक्ष्मणाने त्या राक्षसाचे हात कापून त्याचा वध केला. त्याच्या कलेवरावर अंत्यसंस्कार केल्यावर चितेतून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. तो म्हणाला, मी दनुपुत्र असून ऋषीमुनींना त्रास देत असे, त्यामुळे स्थूलशिरा नामक ऋषींनी मला एक शाप दिला. त्या शापाच्याच प्रभावामुळे माझे मूळचे तेजस्वी रूप जाऊन हे असले विचित्र रूप प्राप्त झाले. तुम्ही माझा उद्धार केलात." असे सांगून त्याने राम-लक्ष्मणांना वंदन केले, आणि सीतेचा शोध घ्यायचा असेल तर आधी किष्किंधेच्या सुग्रीवाशी मैत्री कर असा सल्ला दिला. तसेच वाटेत शबरीमातेची भेट घ्या असंही सांगितलं.

मजल दरमजल करत वनातून मार्गक्रमण करत असताना श्रीरामांना शबरीचा आश्रम दिसला. अखेर भगवंताशी शबरीची भेट झाली. साक्षात प्रभूराम समोर दिसल्यावर शबरीच्या मुखातून बाहेर पडलेले पहिले शब्द गीत रामायणात म्हटल्याप्रमाणे "धन्य मी शबरी श्रीरामा, लागली श्रीचरणे आश्रमा" असेच असतील. शबरीने भक्तीभावाने दोघांना नमस्कार केला. तुलसीदासांच्या रामचरितमानस मध्ये या भेटीचं "स्याम गौर सुंदर दोऊ भाई, सबरी परी चरण लपटाई" असं सुंदर वर्णन केलं आहे.

पुढची गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे ते इथे लिहीत नाही. तर, शबरीचा आश्रम ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणाला भेट देण्याचं भाग्य मला नुकतंच प्राप्त झालं.

प्रभू रामाच्या चरणस्पर्शाने भारतवर्षातील अनेक ठिकाणे पवित्र झाली आहेत. गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यातील वनक्षेत्र हे त्यातीलच एक. पंचवटीच्या नैऋत्येला असणारे हे वनक्षेत्र प्राचीन दंडकारण्याचा एक भाग आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असणार्‍या आहवा इथून ३४ किलोमीटर अंतरावर असणार्‍या सुबीर गावाजवळ एक 'चमक डोंगर' नामक पर्वत आहे. शबरीच्या अलौकिक आध्यात्मिक शक्तीमुळे हा डोंगर तसंच पूर्णा नदीचा परिसर प्रकाशमान झाला होता अशी कथा आहे. म्हणून त्याला तसे नाव पडले असावे. या परिसरात वास्तव्य करणारे हिंदू कोळी व अन्य आदीवासी समाजाच्या मनात रामायणकार वाल्मिकी ऋषी यांच्याबद्दल नितांत श्रद्धा आहे. मातंग ऋषी व शबरी माता यांच्याबद्दलही स्थानिक भिल्ल समाज आणि इतर वनवासी लोकांच्या मनात अनन्य श्रद्धाभाव आहे.

ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आणि शबरी यांची जिथे भेट झाली अशी श्रद्धा आहे, तोच हा पर्वत. याच पर्वतावर शबरीधाम नामक मंदिराची निर्मिती झाली आहे. हल्ली हे स्थान म्हणजे एक तीर्थक्षेत्रच झालं आहे. दरवर्षी माघ महिन्यातल्या पौर्णिमेला जवळच असणार्‍या सरोवरातील मातंग तीर्थात स्नान करण्यासाठी हजारो भाविक जमतात. यालाही आजकाल पम्पा सरोवर म्हणतात पण मूळ पम्पा हे कर्नाटकात आहे.

डांग जिल्ह्यात आणि आसपासच्या परिसरात समाजसेवा करणारे स्वामी असीमानंद हे हिंदूंच्या दृष्टीने एक थोर व्यक्तीमत्व. त्यांनी डांग जिल्ह्यात केलेल्या कामामुळे आज तिथल्या आदिवासी समाजात समृद्ध भारतीय संस्कृतीविषयी बर्‍यापैकी जागृती निर्माण झाली आहे. स्वामी असीमानंद हे मुळात अभियांत्रिकी चे पदवीधर. उच्चशिक्षित असूनही नोकरी-व्यवसाय करण्यात समाधान न मानता इथे येऊन त्यांनी हे अवघड कार्य हाती घेतले आणि तडीसही नेले..

रामायणावर प्रवचने करणारे मोरारिबापू यांनी २००२ साली स्वामी असीमानंद यांच्या विनंतीवरून शबरीधाम येथेच त्यांच्या प्रवचनांचा कार्यक्रम केला. तो करत असताना एकदा बोलता बोलता सहज त्यांच्या तोंडून "इथे आपण एक कुंभ मेळा आयोजित करुया" अशी इच्छा प्रदर्शित केली गेली. फेब्रुवारी २००६ साली सुरु झालेला हाच आगळावेगळा कुंभ मेळा आता शबरीकुंभ म्हणून ओळखला जातो. याच स्थानावर स्थानिय समितीने स्वामी असीमानंद यांच्या मार्गदर्शनाखाली एक नेटके देऊळ बांधले. करवीर पीठाच्या शंकराचार्‍यांच्या हस्ते इथे एक ध्वजारोहण कार्यक्रम आणि एक धर्म परिषदही पार पडली.

महाराष्ट्रातील नंदूरबार इथून मला या ठिकाणी पोहोचायला सुमारे दोन तास लागले.



महाराष्ट्रात सगळीकडे सूचनाफलक आणि स्थानदर्शक/दिशादर्शक फलक हे मराठी-हिंदी-इंग्रजी या तीन भाषांमध्ये लिहीण्याची पद्धत आहे. गुजरात राज्यात प्रवेश केल्यावर दिसलेले सगळे फलक फक्त गुजराती भाषेत आणि त्याच लिपीत दिसले. देवनागरी तर सोडाच, इंग्रजीतला एकही फलक दिसला नाही. अर्थात, त्यामुळे विदेशी पर्यटकांबरोबरच भारताच्या इतर भागातील पर्यटकांचीही गैरसोय होते.



रस्ता संपल्यावर दिसणारे शबरीधाम मंदिर


समोरील बाजूस असलेले एक कृत्रीम तळे


शबरीधाम मंदिराचा समोरचा भाग


मंदिराच्या भिंतीवर असलेले एक चित्र - बोरे चाखून बघताना शबरीमाता


चित्रात खालच्या बाजूला जे तीन दगड दिसत आहेत - ज्या दगडांवर बसून शबरीच्या हातची बोरे राम-लक्ष्मणांनी खाल्ली ते हेच अशी येथील स्थानिकांची श्रद्धा आहे.


जवळून काढलेले एक छायाचित्र


भ्राता लक्ष्मणासह बोरं खात असलेले श्रीराम


शबरीधाम मंदिराच्या गच्चीवरून दिसणारा परिसर


मंदिराची आणखी काही छायाचित्रे






शबरीधाम मंदिराचा मागचा भाग


शेजारील पंपेश्वर महादेवाचे देऊळ
+



शबरीधाम नंतर मी पम्पा सरोवराला भेट दिली. याच पम्पा सरोवरात रामाने लक्ष्मणासह स्नान केल्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणात पुढील प्रकारे येतो:


क्रमेव गत्वा प्रविलोकयन्वनं ददर्श पम्पांशुभदर्शकाननाम् |
अनेक नानाविध पक्षीसंकुलां विवेश राम: सह लक्ष्मनेन ||

स्वैर भाषांतरः ज्या पम्पा सरोवराच्या काठावर (बसून) आसपासच्या मंगलमय वनश्रीचे दर्शन घेताना त्यांना आनंद झाला, त्या सरोवरात रामाने लक्ष्मणासह स्नान करण्याचे हेतूने प्रवेश केला.

वरून दिसणारा पम्पा सरोवराचा भाग


पम्पा सरोवराच्या परिसरात बागडणारे बगळे


स्नान केल्यावर राम लक्ष्मणाला म्हणाला....

सप्तानां च समुद्राणामेषु तीर्थेषु लक्ष्मण |
उपस्पृष्टं च विधिवत्पितरस्वापि तर्पिता: ||
प्रनष्टमशुभं तत्तत्कल्याणं समुपस्थितम् |
तेन तत्वेन हृष्टं मे मनो लक्ष्मण संप्रति ||

स्वैर भाषांतरः पुष्करणी (पूर्णा) नदीच्या या रम्य सरोवरात मातंग ऋषींनी स्थापन केलेल्या सप्तसमुद्रांच्या तसेच अनेक तीर्थांच्या पवित्र जलात स्नान करुन मी पापक्षालन केलं आहे तसेच पितरांचे ऋण फेडले आहेत. याच कारणाने आपल्या वाट्याला आलेले सगळे अशुभ नाहीसे होऊन आपले कल्याण होईल. म्हणूनच आता माझ्या मनाला अतीव आनंदाचा अनुभव येत आहे.

सरोवराची इतर काही छायाचित्रे - अगदी रम्य परिसर







शबरीधाम जवळील पम्पा सरोवराजवळील देवळात मातंग ऋषींची व शबरीची मूर्ती.


या देवळाबाहेर किंवा देवळातही या मूर्ती कोणाच्या आहेत हे सांगणारी एकही पाटी आढळली नाही.

शबरीधामकडून पम्पा सरोवराकडे जातानाही रस्त्यांची अवस्था अक्षरशः दिव्य आहे. आत्तापर्यंत मला कोकणातल्या काही ठिकाणी असणार्‍या खड्ड्यातल्या रस्त्यांचा(!) अनुभव असल्याने त्याहून वाईट काही पहायला मिळेल याची अपेक्षा नव्हती, पण अनुभव आला खरा. अत्यंत कार्यक्षम कारभार असणार्‍या गुजरात सरकारच्या कामाचा प्रभाव सगळ्या गुजरातेत पहायला मिळतो, असे असताना प्रशासनाने ह्या पावन जागेकडे जाणारे रस्ते (अरुंद असले तरी) निदान बर्‍या अवस्थेत ठेवले असतील, ही अपेक्षा फोल ठरली. अमेरिकेचे एक राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते, "आमचा देश श्रीमंत आहे म्हणून आमचे रस्ते चांगले आहेत असं नव्हे, तर आमचे रस्ते चांगले आहेत म्हणून आमचा देश श्रीमंत आहे". हा धडा आपण कधी घेणार?



सरोवराच्या परिसरात फक्त नावाला "गुजरात टुरिझम" अशी पाटी आहे. एक उसाच्या रसाचे दुकान आणि आणखी एक सटरफटर छाप वस्तू विकणारे लहानसे दुकान वगळता सरकार पुरस्कृत 'टुरिझम'च्या नावाने सगळा आनंद आहे. मी मुद्दामून सरोवर वगळता बाकी परिसराची जास्त छायाचित्रे नाही काढली, कारण ह्या पवित्र परिसराचा पर्यटकांनी कचरा टाकून केलेला उकिरडा पाहून मनाला अतिशय यातना झाल्या, आणि त्या कटू आठवणी फोटोत तरी येऊ नयेत ही इच्छा होती. वरच्या छायाचित्रात खालचा भाग नीट बघितलात तर तुम्हाला पर्यटकांनी काय पराक्रम करुन ठेवलाय याचा थोडाफार अंदाज येऊ शकेल.

तसंच, पोहायला जाणार्‍यांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षक (लाईफगार्ड) तर फार लांबची गोष्ट आहे, एकही सुरक्षारक्षक किंवा एक साधा गाईडवजा पोर्‍याही दिसला नाही. गुजरात सरकार पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत शबरीधाम आणि पम्पा सरोवर परिसर या दोन ठिकाणांच्या बाबतीत तरी सपशेल अपयशी ठरलं असं खेदाने नमूद करावंसं वाटतं.

तरीही, ते इंग्रजीत 'इन अ लायटर व्हेन' का काय म्हणतात तसं बोलायचं झालं, तर परमेश्वर व त्याच्या लाडक्या भक्तांचं दर्शन इतक्या सहजा सहजी होत नाही, तेव्हा तेवढे कष्ट सोसायलाच हवेत आणि एकदा तरी शबरीधाम आणि पम्पा सरोवराला भेट द्यायलाच हवी.


~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ जय श्री राम ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~

संदर्भ:
(१) शबरीधाम यात्रा महात्म्य - लेखक राजेश सुरेश दिक्षित (फक्त हिंदीत उपलब्ध).
(२) गीत रामायण.

आभारः
(१) नंदूरबार येथील राष्ट्रसेविका समिती सदस्या सौ. विद्युल्लता अभ्यंकर.
(२) मायबोलीवरील गप्पागोष्टी पानावरचे अनेक ज्यांनी मला शुद्धलेखनाविषयी मदत केली: सानी, भुंगा, स्मिता बिनिवाले, व अनेक इतर.

लेखातील सर्व छायाचित्रे: प्रत्यक्ष स्थळांवर जाउन काढली आहेत. प्रताधिकार सुरक्षित.