Showing posts with label भाषांतरित कथा. Show all posts
Showing posts with label भाषांतरित कथा. Show all posts

Thursday, February 1, 2024

सेलिब्रिटी

रात्रीचे बारा वाजले होते.

केस विस्कटलेले, कपडे अस्ताव्यस्त झालेले, तरीही एक प्रकारचा आनंद चेहर्‍यावर घेऊन अत्यंत उत्तेजित झालेला मित्या कुल्डारोव्ह आपल्या आईवडीलांच्या फ्लॅटमधे घुसला आणि सगळ्या खोल्यांत तरंगत फिरला. त्याचे आईबाबा झोपायच्या तयारीत होते. थोरली बहीण एका कादंबरीचं शेवटचं पान वाचत होती. आणि त्याचे शाळकरी भाऊ गाढ झोपी गेले होते.

"अरे हा काय अवतार करुन घेतला आहेस, आणि कुठून येतो आहेस? काय चालवलं आहेस हे!" आईबाबा उद्गारले.

"नका विचारू, अजिबात नका विचारू. माझाही विश्वास नसता बसला प्रत्यक्ष अनुभव घेतला नसता तर. खूपच अविश्वसनीय गोष्ट घडली आहे आईबाबा!" असं म्हणून कसलासा अत्यानंद झालेल्या मित्याला धड उभंही राहता येईना, आणि त्याच अवस्थेत त्याने  खिदळत आरामखुर्चीत आपला देह टाकला. 

"अशक्य प्रकार घडलाय, तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही असा. बघा!"

अंगाभोवती शाल लपेटून त्याची बहीण खाटेवरुन उठून मित्याचं म्हणणं ऐकायला आत गेली. त्याचे भाऊही जागे झाले. 

"काय झालं रे, असा काय दिसतोयस?" त्याच्या आईने काळजीने विचारलं.

"आई, आई तुला काय सांगू मला किती आनंद झालाय. आई, तुला माहित्ये का, आता आख्ख्या रशियाला माझं नाव ठावूक झालं आहे. आख्ख्या रशियाला! डिमिट्री कुल्डारोव्ह नामक एक नोंदणी कारकून अस्तित्वात आहे हे आजवर फक्त तुम्हाला माहित होतं, आता पूर्ण रशिया मला ओळखतो आई, पूर्ण रशिया! परमेश्वरा!!!"

मित्या म्हणजे डिमित्री इतका उत्तेजित झाला होता की तो खुर्चीतून टुणकन् उडी मारून उठला आणि पुन्हा सगळ्या खोल्यांत तरंगत फिरून आला. 

"अरे पण आम्हाला धड सांगशील का नेमकं काय झालंय?"

"तुम्ही सगळे शहामृगासारखे राहता, पेपर वाचत नाही, काय छापून आलंय याचा गंध नसतो. किती रोचक गोष्टी असतात वर्तमानपत्रांत! पेपरांत छापून आलं की लगेच सगळ्यांना सगळं समजतं, काहीच लपून राहत नाही. मला किती आनंद झालाय तुम्हाला सांगू! तुम्हाला माहित्ये का, पेपरात फक्त सेलिब्रिटी लोकांची नावं छापून येतात. आणि आता त्यांनी चक्क माझं नाव छापलंय!!!"

"काय सांगतोस काय, कुठे?"

मित्याच्या वडिलांचा चेहरा फिका पडला. आईने भिंतीवरच्या क्रूसाकडे एकदा नजर टाकली आणि पटकन आकाशातल्या बापाकडे करुणा भाकली. त्याचे शाळकरी बंधू अंथरूणातून उठून लगेच त्यांच्या दादाकडे म्हणजे मित्याकडे गेले. 

"होय, होय. माझं नाव वर्तमानपत्रात छापून आलेलं आहे. आता आख्ख्या रशियाला माझं नाव कळलेलं आहे. आई, ही प्रत जपून ठेवा त्या पेपरची, या अविस्मरणीय प्रसंगाची आठवण म्हणून आपण अधुनमधून ते वाचत जाऊया. थांब, मी दाखवतो."

असं म्हणून मित्याने खिशातून त्या दिवशीचं वर्तमानपत्र काढून दाखवलं. बाबा, हे बघा, असं म्हणून त्याने निळ्या पेन्सिलीने खूण केलेल्या एका परिच्छेदाकडे लक्ष वेधून घेतलं.

"वाचा!"

मित्याच्या बाबांनी खिशातून आपला चष्मा काढून डोळ्यांवर चढवला. 

"मोठ्याने वाचा बाबा" मित्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. आईने पुन्हा एकदा भिंतीवरच्या क्रूसाकडे नजर टाकली आणि आकाशातल्या बापाकडे करुणा भाकली. बाबांनी घसा खाकरला आणि पेपर वाचायला सुरवात केली. 

"२९ डिसेंबरच्या रात्री अकरा वाजता डिमिट्री कुल्डारोव्ह नामक एक नोंदणी कारकून..."

"बघितलंत?! पुढे वाचा बाबा..."

"...डिमिट्री कुल्डारोव्ह नामक एक नोंदणी कारकून, लिटिल ब्रोनायाह भागातील कोझिहिन इमारतीत असलेल्या बिअरच्या दुकानातून आपल्या मित्राबरोबर मद्यधुंद अवस्थेत परतत असताना..."

"मी आणि सायमन पेट्रोविच येत होतो बाबा, बरोब्बर वर्णन केलंय... वाचा बाबा पुढे वाचा..."

"...मद्यधुंद अवस्थेत परतत असताना घसरुन एका घोडागाडी खाली पडला. अचानक घडलेल्या घटनेमुळे घोड्याने घाबरून कुल्डारोव्हच्या अंगावरुन उडी मारली आणि अर्थातच मागून गाडीही नेली. गाडी थोडी पुढे गेल्यावर काही कामगार गाडीला थांबवण्यात यशस्वी झाले. सदरहू घोडागाडीचा मालक युहनोवस्की जिल्ह्यातील डुरिकिनो गावचा रहिवासी असलेला इव्हान डेट्रोव्ह नामक व्यक्ती असल्याचे समजते, तसेच गाडीत स्तेफान लुकोव्ह नामक एक मॉस्को शहरातील दुय्यम व्यापारी असल्याचेही समजते. अपघात घडल्यावर सुरवातीला बेशुद्धावस्थेत असलेल्या कुल्डारोव्हला पोलीस ठाण्यात नेण्यात आले व तिथे त्याला एका डोक्टरांनी तपासले. त्याच्या डोक्यावर बसलेला मार..."

"गाडीच्या खालचा दांडा लागला बाबा, वाचा वाचा पुढे वाचा..."

"...त्याच्या डोक्यावर बसलेला मार फार गंभीर नसल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची पोलीस ठाण्यात योग्य पद्धतीने नोंद करण्यात आली आणि जखमी व्यक्तीवर योग्य औषधोपचार करण्यात आले... "

"थंड पाण्याने शेक घ्यायला सांगितलं मला त्यांनी." "आता पूर्ण रशिया ओळखतो मला. झालं ना वाचून सगळं? द्या तो पेपर इकडे." असं म्हणून मित्याने पेपर खेचून घेतला आणि घडी करुन खिशात ठेवला. 

"आता मला ही गोष्ट माकारोव्ह कुटुंबियांना सांगितली पाहीजे. मग इवानित्स्की मंडळींना सुद्धा. आणि नातास्या इवानोव्हना, आणि अ‍ॅनिसिम वॅसिलिच... किती जणं बाकी आहेत अजून. चला, मी पळतो.

मित्या आपली टोपी आणि मफलर चढवला आणि आनंदाने नाचत विजयी मुद्रेने घराबाहेर पडला.

(रशियन लेखक अ‍ॅन्टोन चेकोव्ह यांच्या "जॉय" या कथेचं मराठी रुपांतर)

© मंदार दिलीप जोशी
पौष कृ ६, शके १९४५ | विक्रम संवत २०८० | युगाब्ध ५१२५