सद्ध्या रामायण मालिका सुरू आहे.
महाराज दशरथांनी माता कैयेयीला दिलेल्या दोन वरांची पूर्तता करायला राम अगदी सहज वनवास मान्य करुन अयोध्येतून निघून जातो. त्याच्यासोबत पत्नी सीता आणि धाकटा भाऊ लक्ष्मणही. आजोळी गेलेल्या भरताला हे कळल्यावर तो आईची कठोर शब्दांत निर्भत्सना करतो आणि रामाला आणायला सगळ्यांसोबत वनात जातो. रामाने नकार दिल्यावर तो त्याच्या पादुका अयोध्येत सिंहासनावर ठेवतो आणि रामाच्या वतीने राज्य करतो. धर्मपालन करण्याकरता, दिलेला शब्द पाळण्याची आपल्या कुळाची परंपरा आहे तिची प्र्तिष्ठा राखायला आपल्या हक्काचं असलेलं राज्य सहज दुसर्याला देऊन टाकणारा राम आणि आपल्या हक्काचं नसलेलं पण आयतं मिळालेल्या राज्याचा राजा म्हणून उपभोग घ्यायचं नाकारून ते रामाला परत द्यायला निघालेला आणि रामाच्याच पादुका सिंहासनावर ठेऊन त्याच्या वतीने राज्य करणारा भरत अशी देवमाणसे होती म्हणून आपलं राष्ट्र मोठं झालं.
असं आजच्या काळात घडू शकेल का? असं आज कोण करेल? दोन घराच्या मधलं कुंपण एक इंच इकडे की तिकडे यावरुन पिढ्यानपिढ्या कोर्ट्कज्जे करणार्याया लोकांच्या काळात भरतासारखी वृत्ती कुणाची असेल? असा विचार मनात आला आणि लगोलग एका मित्राने सांगितलेला किस्सा आठवला. तो सांगतो आहे अशा पद्धतीने हा किस्सा तुमच्या समोर मांडतो आहे:
"मी आमच्या गावी हल्ली सहा सात वर्षांपासून नियमित जाऊ लागलोय. माझ्या जन्माच्या फार आधीपासून, म्हणजे साधारण २०-२५ वर्ष आधीपासूनच, आजीने घरचे संबंध तोडले होते किंबहुना तिला तोडायला लावले गेले असं म्हणणं संयुक्तिक ठरेल. साधारण १९६५ च्या दरम्यान घडलेली ही गोष्ट आहे. आजीचे आणि इतर घरच्यांचे काही गंभीर स्वरूपाचे वैयक्तिक वाद झाले आजीला बाबांच्या चुलत्यांनी घराबाहेर काढलं. आजीने फक्त जुजबी कपडे आणि तेव्हा दहा वर्षाच्या माझ्या बाबांना कडेवर घेऊन घर सोडलं आणि बदलापूरात निघून आली.
वडिलांचा मामा इकडे राहत असे, त्याने एक घर पाहून दिले, आजीला नोकरी लावून दिली. मग आजीने २०-२५ वर्ष नोकरी करुन बाबांना मोठं केलं. लग्न लावून दिलं. आजोबा तिकडेच राहायचे, आणि वर्षातून एकदा दोनदा इकडे त्यांना न सांगता इकडे आजीला आणि बाबांना भेटायला याय. त्यांनी घरच्यांना विरोध केला नाही म्हणून आजीचा त्यांच्यावरचा राग कधीच गेला नाही.
ती चुलत्यांची पिढी नंतर कालौघात संपली आणि जवळजवळ पन्नास वर्षांनि आता माझे जे चुलत चुलते आहेत, त्यांच्यापैकी दोन नंबरचे काकाआजोबा आहेत त्यांचा मुलगा सहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ मध्ये आजीला शोधत इकडे आले. मला गावी घेऊन गेले आणि सगळी कायदेशीर कारवाई करून सगळीकडे सातबाऱ्यावर, घरावर आमची आजीची, आईची, आणि माझी नावे लावून घेतली (माझे बाबा हयात नाहीत). हे माझे चुलत चुलते सांगतात, ती लोक सगळी नालायक होती आमच्या काकूशी अशी वागली. आम्ही लहान होतो तेव्हा. जे झालं ते झालं, पण आता ज्यांच्या हक्काचं जे आहे ते त्यांना मिळायला हवंच.
हे एवढावरच थांबलं नाही. त्यांनी मध्यंतरी जमिनीचे व्यवहार करायचे होते तेव्हा मला बोलवून घेतले आणि माझा त्यात हिस्सा आहे म्हणून माझ्या परवानगीने सगळे सोपस्कार पार पाडले. त्या व्यवहारात जे पैसे मिळाले त्याचा हिशोब मला देऊन ते पैसे माझ्या खात्यातही भरले. त्यांंचं म्हणणं असं की आम्हाला आमचं आहे अजून काय करायचं आहे अधिक हाव ठेवून?! त्या काकाने असं करायचं कारण म्हणजे त्याची आई.. जी आमची दोन नंबरची काकूआजी.. तिने हे सगळं ठरवून मोठ्या मनाने केलं.. आता ते घर आणि तिथलं सगळं ही काकूआजी पाहते. ती एकदम देव माणूस आहे.
गावचं घर पाहणारे आमचे चुलत काका भजनीबुवा आहेत. टिळा लावून पांढरा झब्बा लेंगा घालून फिरणारे. गुरुवारी तिथल्या दत्ताच्या देवळात, शनिवारी मारुती मंदिरात भजनाला टाळ घेऊन असतात. कधीही घरी गेलो की सकाळी वाडीतल्या बागेत धोतर नेसून परडीत फुलं काढताना, नाहीतर दुपारी वाडीत वालीच्या खोप्यात बंदूक घेऊन माकडांना हुसकवताना दिसतात. नाहीतर चुलीसाठी लाकडं आणताना दिसतात. काकू परसदारी हौदात कपडे धुताना नाहीतर भांडी घासताना दिसते. काकूआजी पडवीतल्या झोपाळ्यावर बसून सुपारी कातरताना दिसते. खळ्यात काजू नाहीतर कोकम वाळत घातलेली दिसतात. टिपिकल कोकणातल्या घरातलं दृश्य.
मग मी आता चार सहा महिन्यांनी पडीक असतो तिकडे. येताना मला घरची कोकमं, मोहरी, वाली, मिऱ्या, काजू, गरे बांधून दिले जातात.
जाताना हलका जाणारा मी येताना आनंदाचं ओझं घेऊन घरी येतो.
आजकालच्या काळात असा विचार मनात येणं हीच मोठी गोष्ट. बरं आला जरी, तरी इतक्या वर्षांपूर्वी दुरावलेल्या नातेवाईकांना चिकाटीने शोधून काढणं ही त्याहून मोठी गोष्ट. आणि वर तरुण वारसाला सोबत घेऊन सगळीकडे कागदोपत्री नावे लावणे म्हणजे कहर आहे. धन्य ती मित्राची काकू आजी आणि धन्य ते चुलते ज्यांनी हे सगळं घडवून आणलं.
भारतातल्या एकूण हिंदू लोकसंख्येपैकी १% लोक जरी असं वागायला लागले, तर रामराज्य नाही तरी त्याचे वारे नक्की वाहू लागतील हे नक्की.
शुभ रात्री मित्रांनो. जय श्रीराम |
© मंदार दिलीप जोशी
चैत्र चतुर्दशी, हनुमान जयंतीचा उपवास, शालीवाहन शके १९४२