Thursday, October 28, 2010

चित्रपट परिचय - १ | पॅथोलॉजी: हत्येचे मानसशास्त्र(?)

मी प्रामुख्याने इंग्रजी चित्रपटांचा चाहता आहे. अगदी सगळ्या प्रकारचे चित्रपट बघतो. त्यांच्याकडे असलेलं विषयांच वैविध्य मला खूप आकर्षित करतं. नेहमीचे हाणामारी आणि विनोदपट तर बघतोच, पण शक्यतो थोडे वेगळे सिनेमे बघायला आवडतं. शिवाय यासारखे सिनेमे आपल्याकडे चित्रपटगृहात प्रदर्शित होत नसल्याने बघायला मिळत नाहीत, पण ते कुठल्यातरी वाहिनीवर किंवा डी.व्ही.डी.वर सहज बघायला मिळतात. अशाच काही मला आवडलेल्या चित्रपटांविषयी लिहीण्याचा मानस आहे. सुरुवात २००८ साली आलेल्या पॅथोलोजी या सिनेमापासून करतोय. हे चित्रपटांचे परिक्षण मात्र नाही हे शीर्षक वाचून आपल्या लक्षात आलं असेलच. तुमच्यापैकी ज्यांना असे वेगळे इंग्रजी सिनेमे बघायची हौस आहे त्यांना या लेखनाचा उपयोग झाला तर मी कृतकृत्य होईन.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -


तुम्हाला खून करायचाय? हो, बरोबर वाचलंत, खून - मर्डर, हत्या, खलास करणे वगैरे ज्याला म्हणतात तो.......बहुतेक मी सुरवात चुकीच्या पद्धतीने केली. जरा वेगळ्या पद्धतीने विचारतो. समजा तुम्हाला अशी हमी मिळाली की खून केल्यावर कोणतेही परिणाम तुम्हाला भोगावे लागणार नाहीत, तर तुम्ही खून कराल? हो, अगदी कुण्णा कुण्णाला कळणार नाही तुम्ही खून केलाय ते. मग, काय विचार आहे तुमचा? आता तुमच्यापैकी बहुतेक जण सरसावून बसतील. तुमचा होकार गृहीत धरतोय मी. कारण एव्हाना कदाचित ज्यांचा खून करावासा वाटतो अशी किमान दोन-चार जणांची नावंही तयार असतील तुमच्याकडे. आता मी तुम्हाला विचारलं की हे जे कोणी लोक आहेत, त्यांचे खून तुम्हाला का करायचे आहेत, तर त्याची तुमच्यापुरती वैय्यत्तिक वैमनस्यापासून किंवा समाजहित वगैरें कारणंही तुमच्याकडे तयार असतील.

इथेच पॅथोलॉजी या चित्रपटाचं वेगळेपण आहे. या चित्रपटात अनेक खून आहेत, पण त्याची कारणं अतिशय वेगळी, अगदी आपण कल्पनाही करु शकणार नाही इतकी वेगळी आहेत. इथे तोंडी लावण्यापुरती माफक मारामारीही आहे, शेवटी चित्रपटाच्या नायकाने घेतलेला सूड आहे, आणि ज्याला 'लव्ह, सेक्स और धोखा" म्हणतात ते सुद्धा आहे, पण हे सगळं हा चित्रपट अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडतो.

आधीच सांगतो. ज्यांना बिभत्स रसाचं वावडं आहे, किंवा ज्यांची हृदयं कमकुवत आहेत, अशा दोन्ही प्रकारच्या लोकांनी ह्या सिनेमाच्या वाट्याला जाऊ नये. कारण हा चित्रपट अतिशय अंगावर येणारा असा आहे. मेंदूला झिणझिण्या येणं म्हणजे काय याचा अनुभव हा सिनेमा देतो.

चित्रपट सुरु होतो ते मृतदेहांची तोंडं एका इस्पितळातील निवासी विद्यार्थ्यांनी हलवण्याच्या दृश्याने. एखाद्या पपेट शो मध्ये जसं दोर्‍यांच्या सहाय्याने बाहुल्यांचे अवयव हलवले जातात तसंच, पण इथे दोर्‍यांशिवाय, फक्त हातमोजे घातलेल्या हातांनी. काल्पनिक संवाद त्या मृतदेहांच्या तोंडी घालून त्यातला आनंद लुटणे हा उद्देश. इथेच आपल्याला शिसारी येते. पण वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणून काम करताना, विशेषकरून शवविच्छदनाचं काम करताना संवेदनशील होऊन चालत नाही. किंबहुना असलेला संवेदनशीलपणा दाबून टाकावा लागतो, आणि मग त्यासाठी असली कृत्य जन्म घेतात.

या चित्रपटाचा नायक टेडी ग्रे (Milo Ventimiglia) हार्वर्ड मेडिकल स्कूलमधून अत्युच्च गुण मिळवून देशातल्या सर्वात प्रतिष्ठीत पॅथोलॉजी अभ्यासक्रमात दाखल होतो. यात त्याच्या बुद्धिमत्तेबरोबरच त्याच्या भावी सासर्‍याचाही वशीला असावा अशा अर्थाचं दृश्य त्याचं स्वागत करणार्‍या त्याच्या वरिष्ठांशी झालेल्या त्याच्या संवादातून आपल्याला समजतं. हे वरिष्ट त्याची ओळख इस्पितळातील अतिशय हुशार (की चलाख?) समजल्या जाणार्‍या गटातील डॉक्टर जेक गॅलो (Michael Weston) याच्याशी करुन देतात. डॉ. टेडीची हुशारी ओळखलेला जेक हा लवकरच डॉक्टर टेडी याला आपल्या गटात (की कंपूत?) सामील करुन घेतो.

या गटाच्या गूढ आणि विचित्र वागण्यामुळे डॉक्टर टेडीच्या मनात त्यांच्याविषयी सुरवातीपासूनच संशय निर्माण होतो. एके दिवशी पब मध्ये मौजमजा करत असताना डॉक्टर जेक मी तुम्हाला लेखाच्या सुरवतीला विचारलेला प्रश्न टेडीला विचारतो त्यावर डॉ. टेडी जे उत्तर देतो त्यात तो म्हणतो "आपण (माणसं) म्हणजे जनावरं आहोत. दुसर्‍याचा जीव घेण्याची वृत्ती आपल्यात उपजतच असते. तुम्हाला हे एव्हाना कळलं असेल असं मला वाटत होतं. हां, आता आपण सुधारलेले, पुढारलेले, वगैरे आहोत, त्यामुळे आपण याविषयी बीअर पिता पिता चर्चा करतो, प्रत्यक्ष कृती करत नाही इतकंच." या प्रसंगामुळे डॉ. टेडी हा इतरांपेक्षा वेगळा आहे आणि तो 'आपल्यातला' होऊ शकतो हे त्या कंपूच्या लक्षात येतं.




हळूहळू या गटाचा एक भयानक खेळ डॉ. टेडीच्या लक्षात येतो तो त्यात पहिल्यांदा फसल्यावरच. तो खेळ असतो माणसं मारण्याचा. त्या गटातल्या प्रत्येकाने एक खून करायचा आणि तो खून म्हणजे तो मृत्यु कसा झाला असावा याचा अंदाज गटातील बाकीच्यांनी वर्तवायचा. ज्याचा खून ओळखता येणार नाही तो जिंकला असा हा खेळ असतो. शहरातल्या ज्या मृत्यूंचे नक्की कारण सर्वसाधारण डॉक्टरांना कळू शकत नाही असा प्रत्येक मृतदेह त्याच इस्पितळात येत असल्याने या गटाला शवागारात त्यांची चर्चा बिनबोभाट करता येते. डॉ. टेडी हाही हळू हळू त्यात गुंतत जातो. अशा प्रकारे जाणारा प्रत्येक बळी हा एक वाईट किंवा विकृत व्यक्ती असल्याचं त्याच्या मनावर ठसवलं गेल्यामुळे या कामात त्याला एक प्रकारचा आनंदही वाटू लागतो. मात्र हळूहळू बळी गेलेली माणसं ही सर्वसाधारण असून फक्त एका विकृत आनंदासाठी हा खेळ सुरु असल्याचं टेडीच्या लक्षात येतं. मात्र त्याला या खेळाचं व्यसन लागल्याने तो यातून बाहेरही पडू शकत नाही. यागटाचं खूनसत्र सुरुच राहतं. मात्र या सगळ्याला एक विचित्र वळण लागतं ते असाच एक खून करताना डॉ. जेकची प्रेयसी असलेली डॉ. ज्युलिएट बाथ (Lauren Lee Smith) हिच्यात गुंतल्यामुळे आणि त्यांचं हे प्रकरण डॉ. जेकला समजल्यामुळे. चिडलेला जेक त्याचा पुढचा खून म्हणून ज्युलिएटचाच जीव घेतो. ज्युलिएटचा मृत्यू कसा झाला याची चर्चा हा गट करत असताना शवागारतल्या इन्सिनरेटरच्या गॅस सिलेंडरचा खटका उघडाच राहिल्याचं जेकच्या लक्षात येतं (वास्तविक हे काम टेडीचंच असतं). एका प्रचंड स्फोटात सगळे मरतात. जेक मात्र बचावतो आणि टेडीबरोबर राहत असलेल्या त्याची वाग्दत वधू ग्वेन विलियमसन (Alyssa Milano) हिचा खून करतो.

टेडी अर्थातच चिडतो, मात्र तोही या खेळात गुंतल्यानं उघडपणे काहीही बोलू शकत नाही. ग्वेनचं पोस्ट मॉर्टम दुसर्‍या एखाद्या (हुशार) डॉक्टराच्या हातात गेलं तर आपलं बिंग फुटेल ह्या भीतीने तो स्वत:च ग्वेनचं शवविच्छेदन करतो आणि मायट्रल व्हॉल्व प्रोलॅप्स्ने हृदय अचानक बंद पडल्याची नोंद मृत्युचे कारण म्हणून करतो.

आपण अत्यंत हुशारीने केलेल्या खुनाची नोंद ही नैसर्गिक मृत्यू अशी झाल्याने संतप्त झालेला डॉ. जेक एक दिवस टेडीवर इस्पितळातच हल्ला करून त्याला बांधून ठेवतो आणि जाब विचारतो. टेडी त्याला "मला माहित होत..." अशा अर्थाचं बोलत असतानाच या खूनसत्राचा मूक साक्षीदार असलेला आणि जेकच्या गटाने 'बावळट' असं लेबल लावलेल्या टेडीचा सहकारी डॉ. बेन स्ट्रॅविन्स्की (Keir O'Donnell) हा ऐन वेळी मदतीला धावून येतो आणि औषध टाकलेल्या रुमालाने जेकला बेशुद्ध करून टेडीची सुटका करतो. मग हे दोघं जेकने ज्या पद्धतीनं ग्वेनला मारलेलं असतं त्याच पद्धतीनं जेकची इहलोकीची यात्रा संपवतात.

डॉ. जेक गॅलो हा ग्वेनला कसं मारतो आणि डॉ. टेडी आणि डॉ. बेन त्याच पद्धतीनं जेकला नक्की कसं संपवतात हे मात्र इथे सांगण्यात मजा नाही. अर्थातच तुम्हाला हे आंतरजालावर अनेक ठिकाणी वाचायला मिळेलच, पण माझं ऐकाल तर ते वाचू नका. हा लेख वाचून हा चित्रपट बघायचं ठरवलंच असेल तर ते तुम्ही प्रत्यक्ष छोट्या पडद्यावर बघा. हा सिनेमा स्टार मूव्ही किंवा एच.बी.ओ. वर काही महिन्यांपूर्वी लागून गेला आहे, कदाचित पुढेही लागेल. नाहीतर डी.व्ही.डी. विकत घेऊन बघता येईल.

ह्या चित्रपटातले बहुतेक नट आपल्याकडे फारसे माहित नाहीत. तसंच हा सिनेमा भारतात आला नाही त्याला यासारखी अनेक कारणं आहेत. अर्थात, काही सणसणीत अपवाद सोडले तर चांगल्या परकीय कल्पनेचं मातेरं कसं करावं यात नैपुण्य प्राप्त केलेले हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक बरेच आहेत, त्यामुळे यांपैकी एखादा महाभाग इम्रान हाश्मी, जॉन अ‍ॅब्राहिम, डिनो मोरिया किंवा तत्सम ठोकळ्यांना घेऊन एखादा मल्लिकापट किंवा बिपाशापट काढण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. (आठवा: टॉम क्रूझचा कोलॅटरल आणि त्याची भ्रष्ट नक्कल असलेला इम्रान हाश्मीचा द किलर.) तेव्हा तो अत्याचार होण्याआधी मूळ इंग्रजी चित्रपट बघून घ्या.

चित्रपटातल्या सगळ्यांची कामं विलक्षण ताकदीची झाली आहेत. रूढ अर्थाने अनुक्रमे नायक आणि खलनायक असलेल्या टेडी आणि जेक यांचे काम केलेल्या मायलो वेंटिमिग्लिया (Milo Ventimiglia) आणि मायकल वेस्टन (Michael Weston) यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. अनेक भयपट आणि बीभत्स रसाने ओतप्रोत सिनेमे बघूनही हा सिनेमा माझ्यासाठी अंगावर येणारा अनुभव होता, यात या दोघांच्या सशक्त अभिनयाचा मुख्य वाटा आहे. तेव्हा पुन्हा एकदा सांगतो, हा चित्रपट डोक्याला झिणझिण्या आणणारा आहे, तेव्हा तुम्हाला बीभत्स रसाची अ‍ॅलर्जी असेल किंवा रक्तदाबाचा किंवा हृदयविकाराचा त्रास असेल तर ह्या सिनेमा न बघणं श्रेयस्कर.

तर, माणूस खून का करतो याला काही ठोस कारण असावंच लागतं असं नाही. निव्व्ळ मजा म्हणून माणसं मारली जाऊ शकतात किंवा माणसातलं जनावर बळावलं की हे सुप्त स्वभावविशेष उफाळून बाहेर येतात म्हणूनही माणसांना संपवलं जाऊ शकतं. कदाचित म्हणूनच कारण (motive) असो किंवा नसो, पोलीस सगळ्यांवरच संशय घेत असावेत. अर्थात हे विचार नेणिवेच्या पातळीवर (subconsciously) होत असावेत. काहीही असो, शेवटी आपण जनावरं आहोत, नाही का?

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

संदर्भ:

(१) स्टार मुव्हीज, एच.बी.ओ. वरील चित्रपट बघणे.


(२) कलाकारांच्या नावांसाठी: विकिपिडिया.

(३) सर्व छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -


दीपोज्योती दिवाळी अंक येथे पूर्वप्रकाशित.