Tuesday, October 23, 2018

माननीय सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य न्यायाधीश श्री गोगोई यांस दिवाळीनिमित्त अनावृत्त पत्र

माननीय सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य न्यायाधीश श्री गोगोई व जमात-ए-पुरोगामी यांस

सप्रेम नमस्कार पी.आय.एल. विशेष

हे दुसरे पत्र लिहीण्यास कारण की दिवाळी जवळ आली आहे व आपण मोठ्या उदार अंतःकरणाने हिंदूंना रात्री ८ ते १० फटाके वाजवायला परवानगी दिली आहे. अर्थात काही 'बॅड हिंदू' ही वेळ पाळणार नाहीतच, पण इतर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे आपले दुर्लक्ष झाले असावे असे वाटले म्हणून हा पत्रप्रपंच.

(१) आकाशकंदील लावू की नको?
(१) (अ) लावायला परवानगी असेल तर आत साधा बल्ब लावू की एलईडीचा?
(१) (ब) बल्ब किती पावरचा लावू?
(१) (क) आकाशकंदील किती उंचीवर लावू?
(१) (ड) आकाशकंदील संध्याकाळी किती ते किती लावावा?
(१) (ई) आकाशकंदीलाचा रंग भगवा असेल तर चालेल की हिरवा हवा? त्यासंदर्भातही नि:संदिग्ध निर्देश द्यावेत.

(२) सज्जात म्हणजे बाल्कनीत दिव्यांच्या माळा लावायच्या की नाही?
(२) (अ) लावायला आपली हरकत नसेल तर प्रत्येक माळेत किती दिवे असावेत?
(२) (ब) त्यांची लुकलुक करण्याची वारंवारता अर्थात फ्रिक्वेन्सी किती प्रतिमायक्रोसेकंदांची असावी?
(२) (क) प्रत्येक दिव्यात लुकलुक करणारे किती रंग असावेत? त्यात भगवा असावा की नसावा?
(२) (ड) माळेची लांबी किती सेंटीमीटर किंवा मीटर असावी?
(२) (ई) माळ चायनीज चालेल का मेड इन इंडियाच हवी? मेड इन अमेठीच हवी असे काही आहे का? स्पष्ट निर्देशांच्या प्रतीक्षेत.

(३) सज्जात व दाराबाहेर पणत्या लावायच्या की नाही?
(३) (अ) पणत्या लावण्यास आपण परवानगी दिली तर नेमक्या किती पणत्या लावाव्यात (म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगने अँटार्क्टिका पाघळणार नाही)? या संदर्भात आपण काही नि:संदिग्ध निर्देश दिलेत तर बरे होईल.
(३) (ब) पणत्यांमध्ये कुठले तेल वापरू म्हणजे साधे की तिळाचे की आणखी कुठले?
(३) (क) प्रत्येक दिव्यात प्रतिदिन किती मिलीलिटर तेल वापरायचे?

(४) दिवाळीच्या फराळात किती तेल वापरायचे?
(४) (अ) दिवाळीच्या फराळात चकल्या व कडबोळी यांचा व्यास किती असावा ?
(४) (ब) दिवाळीचा फराळ करताना चिवडा आणि फरसाण किती ग्रॅम करावे? ते किती तिखट असावेत?
(४) (क) लाडूचा व्यास किती असावा?
(४) (ड) लाडू व करंजी किती गॉड असावेत, अर्थात त्यांच्यात साखरेचे प्रमाण किती असावे?
(४) (ई) दिवाळीच्या फराळाचा कॅलोरीफिक वाल्यू किती असावा?

(५) देशात महिषासुरासारखे नरकासुराचे फ्यान तयार झाले आहेत का? तसे असल्यास  नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून आंघोळ केली तर नरकासुर समर्थकांच्या भावना दुखावतील का? या संदर्भात दिल्ली व जे.एन.यु परिसर, आणि फर्ग्युसन महाविद्यालय, व उर्वरित भारत यांच्या साठी आपण वेगवेगळे निर्देश देणार का?

(६) आंघोळीकरता आम्ही जे उटणे वापरतो ते किती मिलीग्रॅम वापरावे?
(६) (अ) उटण्यात कोणते घटक असावेत?
(६) (ब) उटण्यात कोणत्या वनस्पती घातल्या म्हणजे निसर्गाची हानी होणार नाही?

(७) आंघोळ करताना तेल वापरावे का?
(७) (अ) तेल कुठले वापरावे?
(७) (ब) तेल लावल्यावर लगेच आंघोळ करुन वाया घालवावे की व्यवस्थित जिरेपर्यंत तसेच बसून रहावे असे आपले मत आहे काय?
(७) (क) अंदाजे किती मिलिग्रॅम तेल प्रतिमाणशी दर आंघोळीला वापरावयास आपली परवानगी आहे?
(७) (ड) आपल्या निर्देशांपेक्षा अधिक तेल वापरल्यास दंड किती होऊ शकेल?

(८) पाडव्याला पत्नीने पतीला आणि भाऊबीजेला बहिणीने भावाला ओवाळायची पद्धत आहे. या पुरुषप्रधान परंपरांमध्ये यंदा आपण बदल करणार आहात का? (मग भेट किंवा बहीणबीज बहिणीने भावाला द्यावी लागेल - नै म्हटलं आपल्या निदर्शनास आणावे. उगाच बायकांना खर्च नको, कसें?)

(९) पाडव्याला.........असो....जाऊ दे.....इश्श.

(१०) रांगोळी दाराबाहेर काढली चालेल की घरातच काढू?
(१०) (अ) रांगोळीचे सर्वोच्च न्यायालय संमत डिझाइन्स कुठले?
(१०) (ब) रांगोळीत कुठल्या व्यक्तिमत्वांचे प्रतिनिधित्व असावे अथवा असू नये?
(१०) (क) रांगोळीत वापरावयाचे रंग कोणते?
(१०) (ड) रांगोळीचा आकार काय असावा?

(११) अभ्यंगस्नान करताना जरा जोशातच अंघोळ केली जात असल्याने भरपूर पाणी वापरले जाते. तरी प्रतिमाणशी किती लिटर पाणी वापरावे त्याचे नि:संदिग्ध निर्देश आम्हाला दिवाळीच्या आत कळावेत अशी नम्र विनंती.

(१२) हिंदूंना देवदर्शनाला देवळात जायची परवानगी आहे का? की जवळच्या पोलीस स्टेशनात किंवा सत्र न्यायालयात जाऊन हजेरी लावून यायचे? या संदर्भात सुद्धा स्पष्ट नियम सांगावेत.

भारतातल्या न्यायालयांसमोर साडेतीन कोटी खटले प्रलंबित असल्याचे मध्यंतरी वाचले. काय लोक असतात? आपल्याकडे न्यायाधीशांची संख्या लक्षात घेऊन कुणी खटले दाखल करतच नाही. लोकांना फार हौस कोर्टाची पायरी चढण्याची. आजोबांच्या वेळेपासून सुरू झालेले दिवाणी दावे नातू मरायला टेकला तरी निकाली लागत नाहीत हे माहित असताना न्यायव्यवस्थेवरचा ताण लक्षात न घेता वकील आणि न्यायप्रक्रियेवर खर्च करण्याची लोकांची हौस जिरत नाही हे खरंच. ती आपण जिरवाल ही खात्री आहे. पण अशा कोट्यावधी दिवाणी आणि फौजदारी खटल्यांसारख्या अनावश्यक आणि सटरफटर खटल्यांकडे लक्ष न देता आपण नालायक आणि रिकामटेकड्या हिंदूंचे सण व प्रथा यांच्याकडे लक्ष देत आहात (आणि अधून मधून प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपलीच चव्हाट्यावर मांडत आहात) हे नि:संशय प्रशंसनीय आहे. वर्षानुवर्ष चालणार्या व न्यायाधिशांच्या डोक्याची मंडई करणार्या या यडचाप खटल्यांपेक्षा पटकन निर्णय देऊन आटपता (आणि रिकामटेकड्या हिंदूंना आपटता) येतील अशा गणेशोत्सव कसे साजरे करावेत, जलीकट्टू, होळीचे पाणी, दहीहंडीची उंची, विविध जत्रांच्या वेळी दिले जाणारे कोंबड्यांचे बळी, तसेच आता दिवाळीचे फटाके याकडे आपण दिलेले लक्ष हे खरेच कौतुकास्पद आहे.

या संदर्भात मला व माझ्या काही समविचारी मित्रांना वरील प्रश्न पडले आहेत त्या संदर्भात आपण स्पष्ट निर्देश द्यावेत जेणेकरून आम्हाला घरी दिवाळी नियमानुसार व सर्वोच्च न्यायालयसंमत अशा पद्धतीने साजरी करता यईल अशी आपल्याला या ठिकानी नम्र व साष्टांग नमस्कार घालून विनंती.

आपला (परत) नम्र,
© मंदार दिलीप जोशी
अश्विन शु. ४, शके १९४०, कोजागरी