#BoycottBollywood चळवळीला मूर्खात कसं काढायचं याचा आदिपुरुषचा ट्रेलर आणि त्यानंतर सुरु झालेलं प्रिमॅच्युअर रावणदहन हा एक वस्तुपाठ आहे. आत्तापर्यंत सैफचा रावण आणि त्याची मापं काढणार्या पोस्टी येऊन गेल्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी रावणाला ठेवण्यात चित्रपटामागच्या शक्ती यशस्वी झाल्या. एकूण पोस्ट्सपैकी ९५% पोस्ट या रावणावर होत्या.
आणि हिंदुत्ववादी / #BoycottBollywood वाले या गुगलीवर त्रिफळाचित झाले.हा गुगली कसा?
पहिल्या फोटोकडे बघा. तुम्हाला तो आवडलेला नाही, कारण नेहमी, म्हणजे लागोपाठ सिनेमा मागून सिनेमात, नराधम, दुष्ट, अत्याचारी खलनायक मंडळींना नेहमी विभूती, गंध इत्यादी हिंदू प्रतीकं लावलेलं का दाखवायचं? आमी नाई म्हणजे नाही सहन करणार.
आता दुसर्या फोटोकडे बघा. तुम्हाला तोही आवडलेला नाही, कारण तुमचा व्हिलन कितीही दुराचारी, अत्याचारी, बलात्कारी, थोडक्यात नीचपणाचा कळस असला तरी तो तुम्हाला म्लेंछवेषात वेड्याबिद्र्या पक्ष्यावर आरुढ होऊन आलेला चालणार नाही. आमी नाई म्हणजे नाही सहन करणार.
अरे मग तुम्हाला हवंय तरी काय? फक्त बॉयकॉट बॉयकॉट करत आऊटरेज करायचंय? — हे मी नाही म्हणत, बॉलीवूडने तुमच्यावर फेकलेली Strawman Argument आहे. Strawman Argument म्हणजे तुमच्या मुद्द्याला खेचून दुसर्या टोकाला नेत "तुम्हाला असं म्हणायचंय का?" या पातळीवर चर्चा आणून ठेवणे. समजा तुम्ही म्हणालात की प्रदूषण कमी होणार्या गाड्यांची निर्मिती वाढली पाहीजे, तर समोरचा म्हणतो "म्हणजे काय आता बैलगाड्यांनी प्रवास करायचा का?" याला म्हणतात Strawman Argument. यात आता तुम्ही स्वतःचा मुद्दा बाजूला ठेवून त्याने मांडलेल्या दुसर्या टोकाच्या मतावर वाद घालू लागता. तर ते असो.
कथेचा नायक, श्रीराम कसे असले पाहीजेत, माता सीता कशी दाखवली पाहीजे, महाबली हनुमान कसे दिसले पाहीजेत यावर चर्चा फिरण्याऐवजी, चर्चा ही अधर्माचा पुतळा म्हणता येईल अशी व्यक्ती, ज्याच्या निर्दलनासाठी आणि धर्मसंस्थापनेकरता प्रत्यक्ष भगवान विष्णूंना अवतार घ्यावा लागला तो राक्षसराज रावण कसा होता आणि कसा दाखवला पाहीजे यावर केंद्रित झाली. सर्वांनी रावणाच्या गुणांची यादी सादर करुन झाली. थोडक्यात, ही चर्चा "आमचा व्हिलन किनै..." याच भोवती फिरत राहिली.
Saif Ali Khan says Adipurush will ‘humanise’ Raavan, ‘justify his abduction of Sita’ - सैफ एका मुलाखतीत म्हणाला की आदिपुरुष सिनेमा रावणाचा 'मानवी चेहरा' समोर आणेल, सीताहरण योग्य कसं हे सिद्ध करेल.
पण अश्शी कश्शी हेअरस्टाईल रावणाची, अश्शी कश्शी मुघली दाढी रावणाची असं म्हणत, तुम्ही नाई म्हणजे नाही सहन करणार. तुम्ही म्हणणार की आमचा व्हिलन किनै विभूती लावायचा, आमचा व्हिलन किनै वेदविद्या पारंगत होता, आमचा व्हिलन किनै वीणा वाजवायचा, आमचा व्हिलन किनै शिवभक्त..... ब्लाह ब्लाह ब्लाह. मुघल असो वा राक्षस, दोघांचेही वर्तन तसेच होते आणि दोघेही संपवण्याच्याच लायकीचे हे आपण लक्षात घेतलंच नाही.
उद्या सैफने येऊन विचारलं की "तुमचा व्हिलन इतका यंव आणि त्यंव होता, मग तो वाईट कसा? उगाच आला सिनेमा झोडप, आला सिनेमा झोडप करताय!" असं म्हणत आपली, म्हणजे बॉयकॉट गँगची अक्कल काढली तर पुढच्या वेळी आपण गोंधळून नेमका कोणता मुद्दा उचलावा या गडबडीत पुढचा सिनेमा काही कोटी कमावून जाईल.
थोडक्यात, तुम्ही युद्धभूमी चुकीची निवडली या वेळी "खलनायक कसा असायला हवा" ही. हरकत नाही.
युद्धभूमीची निवड करता यायला हवी. फार लांब नको जायला, पेशवे बाजीराव यांना पालखेडचा विजय कशामुळे मिळाला हे लक्षात घेतलं तरी पुरेसं आहे. दुर्दैवाने आपण पराभवातूनही शिकत नाही आणि शत्रू आपल्या विजयांचा अभ्यास करुन आपल्याला नंतर व्यवस्थित खिंडीत गाठतो.
युद्धभूमीची निवड करता यायला हवी. फार लांब नको जायला, पेशवे बाजीराव यांना पालखेडचा विजय कशामुळे मिळाला हे लक्षात घेतलं तरी पुरेसं आहे. दुर्दैवाने आपण पराभवातूनही शिकत नाही आणि शत्रू आपल्या विजयांचा अभ्यास करुन आपल्याला नंतर व्यवस्थित खिंडीत गाठतो.
पुढच्या वेळी लक्षात ठेवा.
प्रांजळ कबूली: सुदैवाने माझं अकाउंट रिस्ट्रिक्टेड होतं नाहीतर मलाही पोस्टी टाकायचा मोह आवरला नसता, तेव्हा मी जखमी होऊन संघाच्या बाहेर बसलेल्या, आणि त्यामुळे तटस्थ विचार करायची संधी मिळालेल्या खेळाडूसारखा आहे.
© मंदार दिलीप जोशी
विजयादशमी, शके १९४४