रशियाचे सम्राट झार निकोलस, त्यांची पत्नी, चार मुली, आणि राजकुमार अलेक्सी यांची निघृण हत्या करुन साम्यवादी बोल्शेविक क्रांतीने रशियातली राजेशाही संपवली आणि गरीब, पिडीत, शोषित, कष्टकरी (proletariat) जनतेचा प्रतिनिधी म्हणून गर्भश्रीमंत कॉम्रेड लेनिन सोवियत रशियाचा अध्यक्ष बनला आणि त्याच्या मृत्यूनंतर कॉम्रेड स्टालिन. याच स्टालिनच्या मृत्यू आणि त्या नंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर बेतलेला हा चित्रपट साम्यवादी हुकुमशाही व्यवस्थेची भयानकता आणि दहशत आपल्यापर्यंत चक्क विनोदाच्या माध्यमातून पोहोचवतो.
चित्रपट सुरु होतो तो रेडियो मॉस्कोच्या एका प्रेक्षागृहात सुरु असलेल्या एका वाद्यसंगिताच्या मैफिलीने. या मैफलीचे थेट प्रक्षेपण स्टालिन ऐकतो आणि प्रक्षेपण हाताळणार्या कर्मचार्याला फोन करुन "मला या मैफिलीचं ध्वनिमुद्रण हवं आहे, ते घ्यायला कुणालातरी पाठवतोय" असा आदेश देतो. हे ऐकल्यावर त्या कर्मचार्याचं धाबं दणाणतं. कारण या मैफलीचे फक्त थेट प्रक्षेपण केलेले असतं पण ध्वनिमुद्रण मात्र केलेलेच नसतं, मग स्टालिनला ध्वनिमुद्रण पाठवणार कसं? शिवाय फोन होईस्तोवर नुकतीच मैफल संपलेली असल्याने अर्धेअधिक प्रेक्षक बाहेर पडलेले असतात आणि कलाकारांची आवराआवर सुरु असते. त्याही परिस्थितीत मैफलीच्या थेट प्रक्षेपणासारखी वाटावरणनिर्मिती व्हावी म्हणून कलाकारांना पुन्हा गोळा केलं जातं, बाहेर पडत असलेल्या प्रेक्षकांना दम देऊन पुन्हा बसवलं जातं, आणि प्रेक्षकांच्या उर्वरित रिकाम्या जागा भरायला अक्षरशः रस्त्यावरुन जाणार्या आणि सापडलेल्या कुणालाही आणून प्रेक्षक म्हणून बसवलं जातं. कुणालाही म्हणजे अक्षरशः कुणालाही, मग त्यात एक उलटी दोन सुलटी करुन स्वेटर विणणारी बाई, एक फळं हादडणारी बाई, आपल्या आयुष्यात प्रेक्षागृह न बघितलेलं आणि चेहर्यावर 'अजि म्या मार्क्स पाहिला' असे भाव घेऊन वावरणारं एक जोडपं अशी सगळी ध्यानं पाहून आपण फिसकन् हसायला सुरवात करतो. स्टालिनसाठी पुन्हा सगळा पसारा मांडून ध्वनिमुद्रण करायचं इथवर ठीक, पण ऐकलेल्या मैफलीत आणि ध्वनिमुद्रणात स्टालिनला फरक जाणवला तर काय या दहशतीने मैफलीचा मूळ संचालक म्हणजे कंडक्टर झीट येऊन पडतो आणि ध्वनिमुद्रण हाताळणार्या कर्मचार्यापुढे उपलब्ध वेळात नवा कंडक्टर शोधण्याचं नवीन झेंगट येऊन उभं राहतं. इथेही दुसर्या एका म्युझिक कंडक्टरला नाईट गाऊनमधेच उचलून आणतात आणि तसंच मैफल दिग्दर्शित करायला उभं करतात.
तर अशा रितीने मैफल संपते आणि ध्वनिमुद्रण हाताळणारा कर्मचारी स्टॅलिनपर्यंत पोचवण्यासाठी तयार झालेली ध्वनिमुद्रिका घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याच्या हातात ती ठेवत असतानाच संगीत मैफलीतली पियानोवादक ("मी पुन्हा पियानो वाजवायला हवा असेल तर माझा मेहनताना वाढव" असं सांगून ते कबूल करुन घेऊन मगच पुन्हा पियानो वाजवायला तयार झालेली) मारिया त्या ध्वनिमुद्रिकेच्या पाकिटात एक चिठ्ठी सारते. त्या चिठ्ठीमध्ये तिने स्टॅलिनवर बिनधास्तपणे जहरी टीका केलेली . ग्रामोफोनवर ध्वनिमुद्रिका लावून स्टॅलिन मैफलीचा आनंद पुन्हा लुटण्यासाठी सज्ज होत असताना त्याला खाली पडलेली ती चिठ्ठी दिसते ती वाचत असतानाच त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागतं आणि तो जागीच कोसळतो. सकाळी चहा घेऊन येणार्या सेविकेला स्टालिनची अवस्था दिसते आणि मग सुरु होतात अचाट प्रकार. सगळ्यात आधी तिथे पोहोचतो तो गृहमंत्री बेरिया. तिथे पोहोचताच तो स्टालिनच्या त्याही अवस्थेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवू पाहतो. मागोमाग तिथे पोहोचतो उपाध्यक्ष मेलेंकॉव्ह आणि त्यानंतर घाईघाईत नाईट ड्रेसवर कोट पँट चढवून धावतपळत आलेला सरचिटणीस निकिता क्रुश्चेव्ह. मागोमाग कामगार मंत्री कगानोविच, व्यापारमंत्री मियोकन, आणि (आपल्या विशिष्ट पद्धतीने ठेवलेल्या दाढीसाठी जगप्रसिद्ध असलेला) संरक्षणमंत्री बुल्गानिन तिथे हजर होतात. मग परराष्ट्रमंत्री मोलोटोव्ह, सैन्यप्रमुख फील्ड मार्शल झुकॉव्ह हेही या खेळात सामील होतात आणि जशीजशी 'पात्रांची' संख्या वाढते तसातसा गोंधळ वाढत जातो.
स्टॅलिनच्या अचानक मृत्यूने निर्माण झालेला राजकीय पेचप्रसंग, त्यातूनच त्याच्या या सहकार्यांना दिसणार्या विविध संधी, त्यात एकमेकांचा कल कुठे आणि कुणाकडे आहे याचा अंदाज घेत कुरघोडी करण्याची आणि आघाडी उघडण्याची सतत चालवलेली अगदी पार स्टालिनच्या अंत्यविधीपर्यंत आणि नंतरही चाललेली कटकारस्थानं, स्टॅलिनच्या कारकीर्दीत घडलेल्या घटनांचे हिशोब चुकते करणे, ठार मारण्यासाठी चिह्नित केलेल्या लोकांच्या यादीत सतत होणारे बदल, दीर्घकाळ स्टालिनच्या मर्जीने अत्याचार करत अनेकांचे जीव घेऊन आपल्या खुर्च्या आणि जीव अबाधित राखणाऱ्या त्याच्या सहकारी मंत्र्यांनी तो मेल्यावर अचानक आपण उदारमतवादी आहोत हे दाखवायची धडपड करणे आणि दिखाऊपणासाठी का होईना अनेक कैद्यांना सोडणे इत्यादी दयाळू धोरणे आखणे, स्टालिनची मुलगी स्वेतलाना आणि मुलगा वॅसिली यांना 'मॅनेज' करण्याची धडपड, अशा प्रसंगांमुळे परिस्थिती प्रत्येक क्षणाला कूस बदलते आणि आपली उत्कंठा वाढवत नेत एका अंगावर येणार्या प्रसंगाने चित्रपटाचा शेवट होतो.
या रुक्ष घडामोडी घडत असताना यात विनोदनिर्मितीला वाव कुठे मिळणार हा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे. पण चित्रपट पाहताना लेखक डेव्हिड स्नायडर व इयान मार्टिन आणि दिग्दर्शक अरमांडो इयानुची (Armando Ianucci) इत्यादींना पहिल्या दृश्यापासून पुन्हा पुन्हा दाद द्यावीशी वाटते. सुरवातीपासून शेवटापर्यंत कुठेही आपल्याला कंटाळा येत नाही. उपरोल्लेखित संगीत मैफलीचे उदाहरण घ्या - स्टालिनची दहशत इतकी की सुरवातीला दारावर थाप पडल्यावर प्राण कंठाशी आणून 'आता नाही येणे जाणे' असे भाव चेहर्यावर आणत बायकोचा निरोप घेणारा, त्याला का बोलावलं जात आहे हे समजल्यावर बुचकळ्यात पडलेला कंडक्टर शेवटी त्याच्या मनासारखी मैफल पार पडल्याने सुटका झाल्याचे जे भाव चेहर्यावर आणतो तो क्षण चित्रपटाच्या त्या भागाचा परमोच्च बिंदू आहे.
स्टालिन मेला आहे की नाही, नसेल तर पुन्हा कार्यरत होण्याइतका बरा होईल की नाही, हे ठरवायला डॉक्टर बोलवावेत तर मॉस्कोतल्या सगळ्या चांगल्या डॉक्टरांना मारुन टाकल्याने गोची झालेली असते, म्हणून मग मैफल हाताळणारा कर्मचारी जशी वाट्टेल ती माणसे प्रेक्षक म्हणून धरून आणतो तसे अक्षरशः 'ध्यानं' वाटतील अशा डॉक्टरांना आणि इतर वैद्यकीय स्टाफला धरून आणले जाते ती वेड्यांची मांदियाळी पाहून आपल्याला पोट धरधरून हसणं भाग पाडतं. अत्यंत गंभीर आणि गुंतागुंतीची परिस्थिती असलेले प्रसंग आणि प्रसंगांच्या मालिका विनोदाच्या माध्यमातून प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचतात. अगदी झाडाकडे तोंड करुन लघवी करणारा मेलेंकॉव्ह आणि त्याच्याशी गप्पा मारणारा लेवेरँटी बेरिया हे दृश्य सुद्धा त्याच्या खुसखुशीत संवादांमुळे आपल्याला हसवून जातं. आवश्यक तिथे तिरकस, हवे तिथे बोचरे, आणि जिथे हवे तिथेच असलेले संवाद ही या चित्रपटाची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे.
साम्यवादी राजवटीत होणारी व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी; संपत्ती, जीव, आणि अब्रू यापैकी कशाचीच शाश्वती नसणे आपलं बूड शाबूत रहावं म्हणून सतत चालणारी नेत्यांची केविलवाणी धडपड आणि जनरल सेक्रेटरी (इथे स्टालिन) यांच्याशी एकनिष्ठ असण्याच्या शपथा घेणे; ठार मारावयाच्या व्यक्तींच्या याद्या स्टालिनच्या कार्यालयवजा निवासस्थानाबाहेर एनकेव्हिडी (NKVD) च्या अधिकार्यांच्या हातात ठेवताना बेरिया त्यांना देत असलेल्या सूचना ही दृश्ये प्रथम हसवत असली तरी चित्रपट जसजसा शेवटाकडे जाऊ लागतो तसतसं त्यातला थंड क्रूरपणा ठळकपणे जाणवू लागतो. स्टॅलिनच्या मृत्यूनंतर झालेल्या पार्टी मिटींगमधे विविध पदे आणि जबाबदार्यांचे वाटप इत्यादी बाबतीत 'एकमताने' घेतलेले निर्णय हे दृश्य साम्यवादी राजवटीत असलेला वास्तविक भंपकपणा दाखवतं., याखेरीज एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटात प्रमुख घटना किंवा मुख्य पात्रांच्या मागे पार्श्वभूमीवर सतत हिंसा दिसते. म्हणजे एकट्याने किंवा घोळक्याने लोकांना धरुन नेलं जात आहे, बंद दाराआडून ऐकू येणारा गोळीबार, ढकलून दिल्याने कुणीतरी जिन्यावरुन गडगडत खाली पडतंय, निव्वळ स्टालिन आजारी असल्याची बातमी घेऊन आलेल्या सैनिकाला झालेली अटक, इत्यादी प्रसंग संपूर्ण चित्रपटभर दिसत राहतात, आणि हे असं सतत दिसणारं थंडपणे चालणारं दमन हा कम्युनिस्ट कम्युनिस्ट हुकूमशाही राजवटीचा स्थायी भाव सतत चित्रपटभर अधोरेखित होत राहतो. म्हणूनच चित्रपटाच्या पोस्टरवर शेक्स्पिअरच्या 'कॉमेडी ओफ एरर्स'च्या धर्तीवर असलेले 'कॉमेडी ओफ टेरर्स' हे शब्द शोभतात.
एखाद्या गोष्टीचं गांभीर्य चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचे अनेक मार्ग असले तरी चक्क विनोदाचा वापर करुन सादरीकरण प्रभावीपणे करण्यात यशस्वी ठरणारा कदाचित हा एकमेव सिनेमा असावा. चित्रपटाची लय आणि गती शेवटपर्यंत टिकून राहते याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. या आधी हुकूमशाहीवर विनोदी अंगाने टिप्पणी करणारे सिनेमे झाले नाहीत असं नाही, त्यातली चटकन आठवणारी नावे म्हणजे चार्ली चॅप्लिनचा द ग्रेट डिक्टेटर ते हल्ली हल्ली म्हणजे २०१२ साली आलेला साशा बॅरन कोहेनचा द डिक्टेटर हे दोन सिनेमे. मात्र या दोन्ही चित्रपटांत परिस्थितीवर भाष्य करायला विनोदाचा वापर करण्याऐवजी विनोदनिर्मितीकडे कल अधिक दिसून येतो. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर प्रेक्षकांना हसवणे हा प्रमुख उद्देश आणि त्याला तोंडी लावायला अनुक्रमे हिटलर आणि अरबी लष्करी हुकूमशहा हे हुकमी भावनिक पत्ते घेऊन दोन्ही सिनेमे बनवले आहेत असं वाटून जातं. या सर्व चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर साम्यवादी हुकूमशाहीची गोष्ट सांगण्याला प्राधान्य देणारा आणि तरीही विनोदनिर्मितीच्या योग्य जागा हेरून आपल्यापर्यंत योग्य तो संदेश पोहोचवणारा 'द डेथ ऑफ स्टालिन' ठळकपणे उठून दिसतो.
पु. ल. देशपांडे आपल्या अंतु बर्वा या व्यक्तिचित्रात म्हणतात, "विशाल सागरतीर आहे, नारळीची बने आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारे काही आहे; पण त्या उदात्ततेला दारिद्र्य विलक्षण छेद देऊन जाते आणि मग उरते एक भयाण विनोदाचे अभेद्य अस कवच." हा चित्रपट त्याही पलिकडे जाऊन आपल्याला हसवत हसवत अंतर्मुख व्हायला भाग पाडतो, आणि म्हणूनच वेगळा ठरतो. नेहमीच्या हेरकथा आणि विनोदपटांनी कंटाळला असाल तर हा चित्रपट नक्कीच एक सुखद धक्का देऊन जाईल हे नक्की.
म्हणूनच 'द डेथ ऑफ स्टालिन' बघायला विसरू नका!
© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. १३, शके १९४२, महाशिवरात्री