Thursday, October 27, 2022

परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे

प्रत्यक्ष आयुष्यात बहुसंख्य हिंदूंनी पुन्हा कुंकु/टिकली/गंध लावायला सुरवात करायला हवी असं नेहमी वाटत असे. मी स्वतः पाश्चात्य कपडे घालूनही मी रोज गंध लावून ऑफिसात जायचो, अजूनही जातो. खरं तर या कपड्यांना सोयीचे/नियमांअंतर्गत मोडणारे कपडे असं म्हणायला हवं. कारण कॉर्पोरेट ऑफिसात धोतर नेसून जाता येत नाही. पण अनेक ठिकाणी कुठल्याही कपड्यांसोबत कुंकू/टिकली-टिळा लावण्यावर बंधन नाही. इस्रोचे अवकाश शास्त्रज्ञ के कस्तुरीरंगन हे ही कामावर नियमित गंध लावून जात असत. जेव्हा ऑफिसात स्त्रिया टिकली लावून येतात तेव्हा त्यांचं व्यक्तिमत्व हे फक्त कॉर्पोरेट न राहता त्याला एक वेगळीच झळाळी प्राप्त होते आणि एक प्रकारचं तेज चेहर्‍यावर असल्याचं भासतं. 

प्रत्यक्ष जगण्यात हिंदुत्वाची प्रतीके आणि चिह्ने आपण श्रद्धेने, अभिमानाने, आणि नियमितपणे अंगावर ल्याली पाहीजेत. या विषयावर मी माझ्या पद्धतीने काम करायला सुरवात केली होती आणि पुढेही करत राहीन. पण काल मला एका फेसबुक मैत्रिणीचे संदेश आले (चित्र १) आणि फेसबुकवर आपला वेळ अगदीच वाया जात नाही हे पटलं. कुंकू/टिळा/गंध हे कालबाह्य नाही तर अभिमानाने मिरवावे असे सांस्कृतिक, धार्मिक चिन्ह आहे हे विशेषतः तरुणांच्या मनावर ठसवले गेले पाहीजे. इथे मी कुंकू/टिकली लावण्यामागे विज्ञान, आज्ञाचक्र वगैरे बाबींबद्दल बोलत नाही कारण गोष्टी विनाकारण गुंतागुंतीच्या होतील. 
























एक आक्षेप समोर आला की पाश्चात्य कपड्यांवर कुंकू/टिकली लावण्याचा आग्रह बरोबर नाही. पण कुंकू-टिळा हे कपड्यांवर अवलंबून ठेवून आपण त्याचा परीघ मर्यादित करत आहोत. हे लिहीत असताना पाश्चात्य कपड्यांवर म्हणजे जीन्स-टीशर्टवर टिच्चून टिकली लावून फिरणारी एक फेसबुक अविवाहित भगिनी आठवली. तिची पोस्ट सोबत जोडली आहे, अर्थातच नाव झाकून. ती काही हिंदू धर्मातली पंडित नाही, पण तिच्या मनात जी विचारांची सुस्पष्टता आहे ती मला क्वचितच इतर लोकांच्यात दिसते (चित्र २ आणि ३). 





































पोस्टच्या सुरवातीला ज्या मैत्रिणीचा उल्लेख केला ती विवाहित आहे आणि घरातली कर्ती स्त्री आहे. नवरा-बायको आणि एक मूल असं कुटुंब आहे. याचा अर्थ  किमान तीन जणं या विचारांनी प्रभावित झाले आहेत किंवा होतील. ते कदाचित इतरांना प्रभावित करतील. यालाच हिंदीत ज्योत से ज्योत जलाते चलो म्हणत असावेत.

तुमच्यापैकी कुणी या बाबतीत समविचारी असेल तर मी एकटा काय करु शकतो किंवा शकते असा विचार करुन हताश होऊ नका. मात्र जे कराल त्याला भगवंताचे अधिष्ठान असावे.  

सामर्थ्य आहे चळवळीचे  जो जो करील तयाचे॥ परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥ (दा. २०.४.२६)

आपण सूज्ञ आहात, बहुत काय लिहीणे!

© मंदार दिलीप जोशी
कार्तिक शु. द्वितिया, शके १९४४